१) एक पुस्तक आपणही लिहू
~~~~~~~~~~~~~~~~~~
एक पुस्तक आपणही लिहू
आयुष्याचा त्यात हिशेब ठेवू
शब्द शब्द त्यात पेरू आपण
शब्द बनून पुन्हा उगवू आपण
आठवणी साऱ्या जपून ठेवू
भूतकाळाचा मागोवा घेऊ
आपणही जरासे सोसू कळा
फुलवू गंधित शब्दांचा मळा
हृदयाचा वाचकांच्या ठाव घेऊ
शब्दरूपाने कायम जिवंत राहू
चला भावनांचे गीत होऊ
आपलीच आपण प्रीत होऊ
जोपासू जरासे आपणही छंद
दरवळू आपणच बनून गंध
एक पुस्तक आपणही लिहू
स्वतःच स्वतःचे स्वरूप पाहू
– रचना : सत्तू भांडेकर, गडचिरोली
२) पुस्तकदिन
~~~~~~~~~
पुस्तकदिन तो आज उगवला
किती दीन दिन हे आले !
नयनांची संपुटेच माझी
आर्द्र करुनी बसले !
महाभाग्य ते आम्हा लाभले
लाभला अगाधज्ञान खजिना
परी मोबीमधे रत मी असता
दुर्लक्षितो, करीत नाना गमजा
वाचन संस्कृती जगती आहे
संस्कार एक महान
बहुश्रुतता ती अंगी बाणते
हा वर नसे कधीच सान !
परी आज जगामधी
दृश्य आम्हाला इथे काय दिसते
जनता अवघी बैठक मारुनी
अधोवदन त्या मोबीमधी रमते !
अधःपात तो कसा जाहला
वाचनप्रियतेचा
दु:ख मन्मनी अतीव होते
वदन्या मूकमूक होई वाचा !
बहुविध माध्यमे होऊनी गेली
ज्ञान वर्धनाची
गोची त्यांनी अक्षम्य केली
नुरली रुची वाचनाची !
मननही गेले, चिंतन गेले
हाती काय उरले ?
पटपट विसरुनी जाती अवघे
ज्ञान मुळी ना बुद्धीमधी शिरले
आर्त विनवणी तुम्हा सुजनहो
पुस्तकात तुम्ही रमा !
पुस्तकदिन तो असाच मनवुया
नाही पुस्तकासम मित्र दुजा
– रचना : डाॅ.श्रीकांत औटी
३) पुस्तक माझा सखा
~~~~~~~~~~~~~~
शैली तंत्र
सखा, गुरू बनुनीया
पुस्तकाने दिला हात
दिले ज्ञान नी रंजन
दिली संकटांना मात….!
शिक्षणाचे रूजे बीज
पुस्तकांच्या पानातून
कसे जगावे जीवन
शिकविले शब्दातून….!
काव्य, कथा कादंबरी
गोडी लावते पुस्तक
पुस्तकांचे ग्रंथालय
तिथे झुकते मस्तक….!
साथ दिली पुस्तकाने
माझी सावली बनून
केली सख्यासम दोस्ती
सुख दुःख लपेटून…..!
अनुभवी दिले धडे
पुस्तकाने क्षणोक्षणी
गुरू रूपी दिले ज्ञान
नाना विषयाचे झणी….!
जीव लावते पुस्तक
संवादाचा महामंत्र
आयुष्याचे सारे सार
शिकविते शैली तंत्र…..!
– रचना : विजय यशवंत सातपुते, पुणे
४) काव्यलेखन.
~~~~~~~~~~~
पहिली ओळख शब्दांची
पुस्तकांतूनच हो ! झाली
अ, आ, ई, गिरविता,
गिरविता इयत्ता ओलांडली ॥
ज्ञान म्हणजे काय ?
तुच मला शिकविले
बाहेर पाऊस पडता
चांदोबाच्या गोष्टीत रमले ॥
पुस्तकातच मजला
साक्षात सरस्वती दिसली
धन्य माझे जीवन !
मी मनोमनी हसली !॥
गोष्टीतला सखा,
होतास तूच माझा
पदोपदी घेतला सल्ला
अखंड मी तुझा ॥
अविभाज्य आहेस तू
माझ्याच या जीवनाचा
लाभले भाग्य मला
आज कवयित्री होण्याचा !॥
– रचना : सौ. जयश्री जोशी. पुणे.
५) ग्रंथ हेच गुरु
~~~~~~~~~
ग्रंथ हेच गुरु / अथांग सागर
भरावी घागर / ज्ञानामृते |1|
मर्मबंध ठेवा / हृदयाशी धरा
ज्ञानमार्ग खरा / पथदर्शी |2|
शब्द अर्णवात /सामावले विश्व
कल्पनेचा अश्व / दौडे वेगे |3|
ग्रंथालय रुपी / ज्ञानगंगा घरी
वाचा एक तरी / पान रोज |4|
अज्ञान घालवी /ज्ञानाची पालवी
जीवन चालवी / मानवाचे |5|
मनी एक ध्यास / पुस्तकांची आस
जीवनाचा खास / राजमार्ग |6|
ज्ञानाचे दालन / उघडे ठेवावे
प्राशून ते घ्यावे / ज्ञानकण |7|
– रचना : सौ.शारदा मालपाणी.
६) वाचाल तर वाचाल
~~~~~~~~~~~~
पुस्तके ज्ञानभांडार
महाभारत रामायण
खंडकाव्ये अजरामर
किती करावे पारायण
ओवी ज्ञानेशाची
अभंग तुकयाचा
कथिती तत्वज्ञान
अभिमान महाराष्ट्राचा
ग्रंथसंपदा किती असावी
बालवाड्.मय मनोविश्लेषण
कथा कहाणी कादंबरी
सान थोरांचे मनोरंजन
कविता वाचून ज्ञानवृद्धी
भाषेचे अवगत व्याकरण
मात्रा वृत्ते मुक्तछंद
पुस्तकांनी समृद्ध जीवन
आज या पुस्तकदिनी
करू प्रतीज्ञा आपण
दिवसामाजी थोडे वाचन
केल्याविना दिन अपूर्ण
– रचना : अरूणा मुल्हेरकर, अमेरिका
समन्वय : विलास कुलकर्णी. मीरा रोड
🌹पुस्तकं दिन – काही कविता 🌹
सर्वच सहाही कविता अप्रतिम आहेत.
सर्वांचे अभिनंदन 🌹🌹
अशोक साबळे
Ex. Indian Navy
अंबरनाथ