“जोखड”
नव्या सहस्त्रकापासून पुर्वीच्या प्रगत नागर, ग्रामीण, दलित आंबेडकरी लेखनाबरोबरच मूस्लिम जाणिवांच्या साहित्याची भर मराठी साहित्य सृष्टीत पडली आहे. त्यामुळे अनुभूतीचे नवे पदर उलगडु लागले आहेत. तशी मराठी साहित्यात मुस्लिम संत वाड्.मयाची,लेखकांची मोठी परंपरा आहे.त्यात शेख महमंद, शेख फरीद पासून ते हमीद दलवाई, ते आजच्या घडीला फक्रुद्दीन बेन्नूर, फ.म.शहाजिंदे, डी.के.शेख, शफी बोल्डेकर पासूनचे सर्वदूरचे बाज जपणारे कवी, ही सहज आठवलेली नावं, आपल्या परीने मराठी लेखन करीत आहेत.
यात अशाचं एका सांगली कडील कवी मित्राची भर पडली. मुबारक उमराणी हे “जोखड” या कविता संग्रहाचे कवी आहेत. योगायोगाने “रोहिणी वाकडे साहित्य दर्शन पुरस्कार” स्पर्धेसाठी हा कविता संग्रह दाखल होता.वाचक फेरीत तीन पुस्तके काढली जातात.त्यात जोखड होते.पण अंतिम परीक्षक निवडीत तो मागे पडला. तो संग्रह मी निवांत व तटस्थपणे पुन्हा वाचला. यावेळी मात्र जाणीवेत अधिक वेगळेपण आले. अनेक कविता काही तरी वेगळे सांगत होत्या. वाचक या नात्याने मला आवाहन करीत होत्या. या कविता मुस्लिम कवी या कप्प्यात कोंबायला माझे मन तयार होत नव्हते.
कवी जात, धर्म या फुटपट्ट्यात कसा बसवायचा ? त्याला कोणती अनुभवाची झालर जोडायची नि कोणत्या मखरात बसवायचे ? हे आणि या सारखे प्रश्न “जोखड” मधील कविता वाचतांना जाणवत मला होते.ज्याला अनुभवाचा परिप्रेक्ष्य म्हणतात तो कवी का जाती, धर्मा पेक्षाहि,खुंदळून काढणाऱ्या जगण्याचा मानावा यांचा अधिक प्रगल्भपणे विचार केला तर कवी मुबारक उमराणी हा “जोखड” मधून मुस्लिम कवी म्हणून पहिल्या झटक्यात बाद होतो. आणि विचार करावा तो होरपळलेल्या अनुभूतीतून तावून सुलाखून निघालेल्या एका वेदनामयी प्रवासाचा कवी मुबारक उमराणी..!
मग एक एक पापुद्रा उलगडत गेलो तर मन, माती, शेती, संस्कृती यातून खुंदळून परिपक्व कवितेचा मुबारक उमराणी नावाचा क्लान्त, शांत, हारजितीच्या पलीकडे गेलेला कवी सापडतो…!

जोखड हा संग्रह परिस प्रकाशन सासवड द्वारा २०२३ मध्ये वाचकांच्या समोर आला. एकूण ७१ कविता आणि १२० पृष्ठांचा हा दस्तावेज आहे. बहुदा कवीचा हा पहिलाच कविता संग्रह दिसतो.मुळातच लेखक शिक्षकी पेशात असल्यामुळे व अनुभूती क्षेत्र ग्रामीण असल्यामुळे मनाचा सरळपणा कवी वृत्तीतून दिसतो.कुठेही भोगलेपणाचा आक्रस्ताळेपणा येत नाही.किंवा बंडखोर वृत्ती नाही.येथील अपरिहार्य सुखदु:खाची मांडणी करताना अधिक रमते.
शेती मातीशी कायम बांधलेला हा कवि बोलत़ो आसमानी संकटास भिऊ का मी रे? करपलेल्या शेतात पुन्हा नव्याने पेरु रे जाळतील जाळणारे मर्दाची शेती संकटातून फिनिक्स पक्षी उडेल रे ….नव्याने नवे जग मीच निर्माण करेन येवोत वा न येवोत संगे माझ्या कोणी लढेन मी,नवा वसा या जगा अर्पिण मी (पृ.२५/२६) २. एल्गार मातीचा
त्यांनीच जाळला
शेतातला ऊस
जागीच वाळला…
विषारी फवारे
मातीवर पडे
पोटरी कणीस
जागेवर सडे…(पृ.३४)
३चिंब पावसात तरी शेत करतो किसान कष्ट सोसत सोसत गातो भाकरीचे गाणं (पृ.८१) ४श्वासात शिवार
पेरतो बसावे
हिरव्या रानात
खेळत हसावे. (पृ.१०३)
५_केला सलोखा सलोखा
पाणी काजळ मातीशी
बिया रुजल्या कुशीत
माती घेई त्यां उराशी….
…. झिम्मा फुगडी खेळता
पान लागती नाचाया
थेंब थेंब नाचताना
कळे सलोख्याची माया (पृ.११०)
वरील पाच कवितेचे तुकडे चकाकून आले. मुळ कविता मुळातून वाचणे एक सलग अनुभव देऊन जातात..ते शेती माती मधील शेतकऱ्यांच्या धसाळ कष्टाचं हाती येणारे फळ आहे.त्यात सुख दु:खाचे सलीत काटे जसे सळतात. .तसे शेती मातीशी हंबरुन येणारी सुखद. झिंबडही फुलून येते.
मुबारक उमराणीची कविता प्रतिकातून अधिक बोलते. या मातीतील संस्कारीत अनुभवातून अधिक फुलून येते येथे धर्म,जात, पंथ गळून पडतात. वारकरी संप्रदाय, वारी, अभंग, टाळ, मृदंग, तुळस, वीणा यातून कविता एक व्यापक आयाम घेऊन येते. तिची सार्वत्रिक व्यापकता वाढत मानवतेलाच कवेत घेते.
— कवी मुबारक उमराणीचे सश्रध्द मन पुढील रुपाचा आकार घेत शेताशिवारातून असे उभारुन येते.संपूर्ण कविते ऐवजी भयविस्तारास्तव नेमकेपणा साठी पृष्ठावरील काही ओळी पाहू…
१- आला पाऊस पाहुणा
वाजवित नाद टाळ
रिमझिम पावसात
विठू झाला तान्हा बाळ…(२८)
२- माझा मैतर सांगतो
अंगण शशिधर
अंध मी, मन स्पर्शाने
स्पर्शतो श्रीधर… (३८)
३- नभ जहाले विठ्ठल
आली टाळकरी दिंडी
पिक वारक-या परि
धान्य आलं खंडी खंडी..(४८)
४- मीठभाकरी ती माझी
अमृताहूनी भारी
येई पंगतीला विठू
आम्ही होतो चक्रधारी…(५६)
५ देवा मी चाललो सोडून पंढरी माय चंद्रभागा,
अश्रूधारा ,कोठेच दिसेना कुठंच,
पुंडलिक माझा शोधता शोधता,
भरे माझा ऊर
धावलो रंगलो, रिंगण सोहळा
पदस्पर्श घेता,गेले सारे पाप
झाड होई बाप, देई रे सावली..(६५)
६ भूक अश्वत्थामा पट्टी
भूक होऊनी सुदामा
पोहे अश्रूत भिजता
चक्रधारी येई कामा…. (८३)
यातील प्रतिक व प्रतिमा पाहिल्या की,कवीची देव शरण्यता वा अंतिम विसावा येथील परंपरेतून येतो.संघर्षात घायाळ झाल्यानंतरची ही अवस्था असते. त्याला मुबारक उमराणीची कविता अपवाद ठरु शकली नाही. येथे कवीची मर्यादा स्पष्ट होते.
तरीही पण जोखड मधील कविता शेती,माती आणि भोवताल आपल्या कवेत घेऊ पहाते.अनेक कविता वाचतांना पदोपदी हे जाणवते.नाही तरी कवी शेवटी आपल्या मस्तकावर आभाळ व पायाखालची माती विसरु शकत नाही.याच्या खुणा मुबारक उमराणी यांच्या “जोखड” मधून ठसठशीत उमटून पडतात.त्यांच्या भावी कवितांना शुभेच्छा…!!
— समीक्षा : विजय गंगाधर वाकडे .हिंगोली
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.