“संवादभूषण”
कोणतेही पुस्तक वाचण्यापूर्वी वा चाळतांना सृजन वाचकांची सहज नजर जाते ती त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर व नंतर ‘अर्पणपत्रिका’ वर ! यानुसार माझी नजर साहजिकच मुखपृष्ठ व अर्पणपत्रिका यावर प्रथम जात असते नव्हे आजही जात आहे. याचा दुर्मिळ असा प्रत्यय मला पुन्हा आला तो महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे निवृत्त संचालक व दूरदर्शनचे माजी निर्माता मा. देवेन्द्रजी भुजबळ लिखित एका पुस्तकाचा. अर्थात ते पुस्तक म्हणजे ‘संवादभूषण‘ हे होय. या पुस्तकाच्या ‘अर्पणपत्रिकेत‘ श्री भुजबळ लिहितात : “माझ्या जडणघडणीत ज्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींचा, संस्थांचा हातभार लागला, त्या सर्वांना हे पुस्तक अर्पण” मा.श्री.भुजबळ यांनी व्यक्त केलेल्या या कृतज्ञतेच्या भावनेचा प्रत्यय त्यांचे हे पुस्तक वाचताना सृजन वाचकांना येईल.
मा. भुजबळ यांनी आजवर नगर येथील ‘दै.समाचार‘, पुणे येथील ‘केसरी‘, ‘सा.सह्याद्री’, येथे विविध पदांवर कार्यरत राहिले. नंतर पूर्ण वेळेची पत्रकारिता सोडून मुंबई दूरदर्शन केंद्रात साहाय्यक निर्माता, निर्माता व नंतर राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात जिल्हा माहिती अधिकारी, उपसंचालक, संचालक अशा विविध पदांवर कार्यरत राहून निवृत्ती नंतर ‘न्यूज स्टोरी टुडे‘ या वेब पोर्टलचे ते संपादन करीत आहेत. थोडक्यात म्हणजे या विविध प्रचार प्रसार माध्यमात त्यांनी नाना विविध कार्यक्रम, माहितीपट, दूरदर्शन वृत्तांतादी निर्मितीत योगदान दिले ; याशिवाय त्यातील काही कार्यक्रमात संहिता लेखनासह सक्रिय सहभागही घेतला होता.त्यांचा या क्षेत्रातील व्यक्तींशी जी प्रथम ओळख, मग परिचय झाला अशा काही निवडक ३४ व्यक्तींचा समग्र जीवनाचा आढावा घेत घेत या मान्यवरांची एक अनोखी अशी ओळख या ‘संवादभूषण‘ पुस्तकात अनोख्या पध्दतीने करून दिली आहे.

|| अनिल शाह ||
या व्यक्ती विषयी म्हणतात, ‘अनिल शाह हे एक उत्कृष्ट छायाचित्रकार तर आहेतच शिवाय या कलेच्या ज्ञानाबरोबरच प्रसंगानुरूप छायाचित्रण करणे, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे, नेहमी सतर्क, प्रसंगावधान, उत्तम जनसंपर्काला जोड नम्रता, प्रसंगाचे गांभीर्य हे सद्गुण आवश्यकच आहेत यात शंका नाही हे प्रत्येक छायाचित्रकारांने आपल्या मनात कायम कोरून ठेवले पाहिजे.’
अनिलजीच्या या उज्वल यशात त्यांची पत्नी सौ. माधुरी यांचा ‘सिंहाचा‘ वाटा आहे हे ते कृतज्ञतेने आवर्जून सांगतात. ते अभिमानाने सांगतात की, त्यांचा छायाचित्रणाचा वारसा/व्यवसाय त्यांचे चिरंजीव ‘यश ‘ यांने चालवावा असा अट्टाहास असा अजिबात नाहीये. त्यांच्या मुलाने यश याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटू म्हणून तो उदयास आला आहे ही खरोखरच कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल.
|| प्रा.डॉ.बाबासाहेब काझी ||
मा. काझी आणि भुजबळ या दोघांची ओळख झाली ती रानडे इन्स्टिट्युट, पुणे विद्यापीठाच्या १९८३-८४ या शैक्षणिक वर्षात. दोघेही वर्गमित्रच तर होतेच शिवाय रुममेट पण होते. तसे अबोल स्वभावाचे काझी हे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते. मुस्लिम असूनही पुरोगामी विचारांचे असलेले काझी यांच्या बरोबर देवेन्द्रजी हे एकाच सायकलने रानडे इन्स्टिट्युट येथे जाणे-येणे करायचे. एवढंच नव्हे तर ते एकाच खानावळीत एकत्र बसून डबा खात असत. पुणे येथील काझीच्या सहवासाच्या स्मृतींना देतांना देवेन्द्रजीनी काझी यांच्या व्यक्तीमत्वावर मनोज्ञ असा प्रकाश झोत टाकला आहे.
बाबांच्या समग्र जीवनाचा विचार करता त्यांचे शिक्षण बी.ए. (इंग्रजी साहित्य), एम.ए. (सोशल वर्क), पुणे विद्यापीठाची वृत्तपत्रविद्या व संज्ञापन हा अभ्यासक्रम पूर्ण केला. बाबा यांनी टाटा संस्थेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रकल्प अधिकारी म्हणून धारावीत वर्भभर ‘कम्युनिटी आउट रिसर्च प्रोग्राम‘ कार्यरत होते ; नंतर समन्वक म्हणून या स्वयंसेवी संस्थेत इन्स्टिट्यूट मिरज येथील ‘’इन्स्टिट्यूट ऑफ ऑफ सेल्फ डेव्हलपमेंट ॲंड ॲक्शन“ काम केले. तेथेच नझिरा ही काम करीत होती. तिची ओळख, परिचय, प्रेम शेवटी याची परिणीती लग्नात झाली. बाबाने ‘नेट‘ परीक्षा दिल्यानंतर ‘महाराष्ट्रातील मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा अभ्यास‘ या विषयावर कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात डॉ माडगूळकर, डॉ अंबेकर यादव मार्गदर्शनाखाली १९९४ साली ते पी.एच.डी. झाले. नंतर त्यांनी गुजरात मधील सुरत येथील ‘सेंटर फॉर सोशल स्टडीज‘ येथे साहाय्यक मग ‘यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस‘ सातारा येथे प्राचार्य पदी निवड झाली. त्यानंतर त्यांची निवड ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस‘ या संस्थेत प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. त्यांच्या पी.एचडी प्रबंधावर आधारीत ‘मोबिलायझिंग मुस्लिम्स फॉर सेक्युलायरझेशन‘ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे याशिवाय सामाजिक विषयांवर चिंतनात्मक अनेक लेख लिहिले आहेत.
कष्टाला पर्याय नाही हे खरंय पण त्याशिवाय सहनशीलता धैर्य याची जोड मिळाली तर प्रतिकूल परिस्थितीतही आपलं उच्च ध्येय कसं प्राप्त करता येते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे बाबा काझी हे होय.
|| अशोक डुंबरे ||
मा.देवेंद्रजी यांनी आपल्या सेवेतील दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई येथे अल्पकाळ नोकरी केली होती. त्या अल्पावधीत त्यांचे कार्यालयीन कामकाज व्यतिरिक्त अन्य सहकाऱ्याशी मैत्रांशी जो स्नेह जुळला त्यापैकी एक म्हणजे “आमची माती, आमची माणसं“ या लोकप्रिय कार्यक्रमाचे निवृत्त संचालक मा.अशोक डुंबरे हे होत. त्यांच्या समग्र जीवनावर प्रकाश झोत टाकतांना देवेंद्रजीनी त्यांची जीवन कथा मोजक्या शब्दात लिहितांना त्यांचे कृषी विभाग, आकाशवाणी आणि दूरदर्शन येथील अनुभवासह वैयक्तिक अडी-अडचणीचा उगाच बाऊ न करता आपण ज्या समाजात राहात आहोत त्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या कृतज्ञतेच्या भावनेने जे कार्य करीत आहेत ते खरोखरच अतुलनीय असे आहे.
सामान्य कुटुंबातील डुंबरे यांचा पिढीजात व्यवसाय ‘शेती‘ अन् जन्म ३० मार्च, १९३९ रोजी झाला. शेती हाच त्यांचा पिढीजात व्यवसाय. घरची गरीबी. वडील त्या काळचे व्हर्णाक्युरल (सातवी वर्गकक्ष) होते. इच्छा असुनही त्यांना पुढे शिकता आले नाही. त्याकाळी या शिक्षणाच्या आधारावर शिक्षकाची नोकरी मिळाली; नंतर ते नोकरी करीत करीत थर्ड ईयर पर्यंत शिक्षण घेतले. ते पुढे असिस्टंट डेप्युटी एज्युकेशन इन्स्पेक्टर या पदावर पोहोचले. तत्पूर्वी त्यांचे प्राथमिक शिक्षण जुन्नर, माध्यमिक शिक्षण ओतूर व पुणे येथून जुनी मॅट्रिक, १९६४ साली ते कृषी पदवीधर झाले.
महाराष्ट्र शासनाच्या सॉईल कॉन्झर्वेशन खात्यात कृषी पर्यवेक्षक, मग पुढे १९६५ साली पुणे येथील सेंट्रल बिल्डिंग मधील कृषी खात्याच्या मुख्यालयात झाली. शेतकऱ्यांना आधुनिक शेती, बी बियाणे आदी कृषी माहिती विभागात सुपरवाइझर म्हणून काम केल्यानंतर त्यांना प्रतिनियुक्तीवर पुणे आकाशवाणी पाठविण्यात आले; आणि येथूनच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली अन् नवा अध्याय सुरू झाला.
डुंबरेसर आकाशवाणी केंद्र, पुणे येथे पाच वर्षे फार्म रेडिओ रिपोर्टर मग १९६६ साली आकाशवाणी केंद्राच्या ‘माझं घर, माझं शेत‘ हा कार्यक्रम सुरू केला. प्रथम तो आठवड्यातून तीन दिवस प्रसारित होत असे. त्यावेळी हा खास कार्यक्रम शेतकरी बंधू साठी नभोवाणी आणि शेतकरी मंडळ असा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमाचे निर्माते होते प्रख्यात ग्रामीण लेखक व्यंकटेश माडगूळकर. त्यांच्या सोबत जयराम कुलकर्णी, श्रीकृष्ण सपाटे यांच्यासह प्रत्यक्ष जागेवर िम जाऊन ते चित्रिकरण करावे लागायचे. यानिमित्ताने डुंबरेसरांना पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हात या कामानिमित्त फिरण्याचा योग आला. खास या कामासाठी युनेस्कोने त्यांना एक जीप दिली. या दौऱ्यात कधी एकटे तर कधी सोबतीला त्याचे सहकारी असायचे. मग सांख्यिकी विभागात त्यांना गोव्यातील झुआरी केमिकल ॲन्ड फर्टिलाजर कंपनी, दुसरी बॅंक ऑफ महाराष्ट्र मध्ये कृषी अधिकारी आणि तिसरी दूरदर्शन मध्ये कार्यक्रम निर्माता म्हणून. डुंबरेसरांनी दूरदर्शनसाठी अर्ज केला व त्यात त्यात त्यांची निवड झाली. त्यांची निवड पहिले संचालक पी.व्ही.कृष्णमूर्ती, दूरदर्शनचे पहिले निर्माते पु.ल.देशपांडे, के.अब्बास आणि फिल्म डिव्हिजनचे संचालक यांच्या निवड समितीने डुंबरे सरांची निवड झाली. मंडी हाऊस दिल्ली येथे १० जूलै, १९७२ येथे प्रशिक्षण घेतले आणि ते ०१ जानेवारी १९७३ साली मुंबई दूरदर्शन केंद्रात निर्माता म्हणून कार्यभार स्वीकारला. केंद्रीय मंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते बाल गंधर्व रंगमंदिर, पुणे येथे झालेल्या या कार्यक्रमाचे प्रक्षेपण सायंकाळी साडेसात वाजता मुंबई दूरदर्शन केंद्रावरून शेतकऱ्यांसाठी हा पहिला कार्यक्रम प्रसारित झाला. यावेळी तात्कालीन कार्यक्रम अधिकारी श्री केशव केळकर यांनी सादर केला होता. एकंदर मा. देवेंद्रजीनी अशोक डुंबरे यांच्या समग्र जीवनालेख उलगडून दाखविला आहे.
|| राम खाकाळ ||
यांच्यावर लिहितांना ते एक सहकारी व नंतर मित्र झाल्यावर मा. राम यांची कामाबाबत असलेली निष्ठा, मनमिळाऊ स्वभाव अन् परोपकारी वृत्तीचे यथार्थ चित्रण लेखक देवेंद्रजीनी या लेखात केले आहे. निवृती नंतर आपल्या ज्ञान व अनुभवाचा फायदा त्यांनी ग्रामीण भागातील विकासासाठी ते प्रयत्नशील राहिले आहेत. मा. राम खाकाळ, यांचे प्राथमिक शिक्षण गावीच झाले. पुणे येथे येऊन विद्यार्थी गृहात पदवीधर झाले. मग नशिब आजमावण्यासाठी ते मुंबईला आले. दूरदर्शन मुंबई येथे सुरूवातीला कंत्राटी पध्दतीवर नोकरी मिळविली व तेथेच ते कायम झाले. ही खरोखरच कौतुकास्पद अन् भुषणावह गोष्ट म्हणावी लागेल.
अशा प्रतिकूल परिस्थितीशी झगडत राम यांनी आपले शिक्षण नगरच्या कॉलेज मध्ये मग सेंट झेवियर कॉलेज मधून रेडिओ ॲन्ड टेलिव्हिजन मधून प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला. मुंबई दूरदर्शन केंद्रात देवेंद्रची ओळख झाली ती पुढे वृध्दिंगत झाली. नम्र व मनमिळाऊ स्वभाव, यामुळे ते लोकप्रिय झाले. कौतुकास्पद गोष्ट म्हणजे दूरदर्शन या प्रभावी प्रचार प्रसार माध्यमात राहूनही ते साधे सालस वृत्तीचे होते. त्याकाळी फक्त मुंबईत (अन्य वाहिन्या नव्हत्या) हेच एकमेव दूरदर्शन होते. या क्षेत्रातील सेंट्रल फिल्म पूल या विभागात त्यांना वेळ मिळेल तसे निवडक माहितीपट दाखवायचे. त्यावेळी प्रदीप भिडे, मनोहर पिंगळे यांचा मार्गदर्शनात्मक प्रोत्साहन मिळाले. वेळ मिळेल तसतसे अन्य विभागातही ते स्वतंत्र काम करु शकत होते. खेळाच्या स्पर्धा कार्यक्रम निर्मिती आणि प्रसारणातील सहभाग हा त्यांना चिरस्मरणीय असा ठेवा देऊन गेला. या प्रक्षिणासाठी जर्मनीहून वाईजझर हे प्रशिक्षक आले होते. या अनुभवाच्या जोरावर ते निर्मिती सहायक पदी कायम नियुक्ती करण्यात आली. मुलखा वेगळी माणसं, वृत्तचित्र, काव्यकुंज, मराठी नाटक, नवरात्रीचे नऊ दिवस कार्यक्रम, राष्ट्रीय प्रसारणाचा ‘मुशायरा‘ या उर्दू या कार्यक्रमाच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.
असे नानाविध उपक्रम अंमलात आणले. ०२/१०/२००० साली कै.आर. आर.पाटील, मंत्री असताना दूरदर्शनच्या स्टुडिओतून ग्राम स्वच्छता अभियानाची सविस्तर माहिती देऊन हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात आला. रामभाऊ यांना याचे श्रेय देऊन यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये भव्य सन्मान करण्यात आला होता. कार्यालयीन कामकाज व्यतिरिक्त ते कवी मनाचे होतै नव्हे आहेत. डोंबिवलीतील थोर गणेशयोगिणी सद्गुरु सौ संध्याताई अमृते या खाकाळ परिवाराच्या आध्यात्मिक गुरू आहेत. तसेच दूरदर्शनचे निर्माते, अधिकारी, श्री. वा. रा सराफ, मनोहर पिंगळे, याकुब सईद, शशिकांत भोसले व शरद वैद्य यांचे गुरू स्थान रामभाऊच्या अंतःकरणात आहे. हे रामभाऊ कृतज्ञतेने व्यक्त करतात.
या हरहुन्नरी स्वभावाच्या राम खाकाळ या अप्रकाशित अशा व्यक्तीवर मा. देवेंद्रजी भुजबळ यांनी लिहून सांगितले आहे की, “प्रतिकूल परिस्थितीतही माणूस आपली निष्ठा, सेवाभावी वृत्ती, अपार कष्टाची तयारी, सहनशीलता या जोरावर माणूस आपलं ध्येय कसे कसे गाठतो‘’. याचा मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राम खाकाळ हे होय. निवृत्ती नंतर त्यांनी लेखक भुजबळ यांच्या सोबत देश परदेशात केलेली भटकंती अन् अनुभव याचा उल्लेखही या लेखात केला आहे. आज वयाच्या सतरीतही ते तरूणांना लाजवती अशा उत्साहाने डोंबिवलीच्या विविध सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिकादी क्षेत्रात ते कार्यरत आहेत.
|| शिबानी जोशी ||
पूर्वी दूरदर्शनची एकच अशी वाहिनी होती ती म्हणजे ‘सह्याद्री‘ ही होय. अशा त्या काळात ते आजतागायत जवळ जवळ गेली तीनेक दशकं सातत्याने दूरदर्शनवर बातम्या वाचणाऱ्यात बहुतांश वेळा जे नाव दर्शकासमोर यायचे ते म्हणजे ‘शिबानी जोशी‘ हे नाव आजही आहे.
तसं पाहू गेल्यास बॅंक आणि साहित्य याचा तसा संबंध असण्याची शक्यता कमीच. मुळच्या त्या बॅंकर. पार्लेकर असणारी शिबानी ही माहेरची रोहिणी जोशी अन् लग्नानंतरही त्या जोशीच आहेत. ‘मी अत्रे बोलतोय‘ प्रख्यात एकपात्री प्रयोगाचे सर्वेसर्वा मा. सदानंद जोशी यांच्या त्या सूनबाई. असं म्हणतात, ‘मोठ्या वृक्षाखाली इतर रोपांची वाढ खुंटते. ’याला अपवाद म्हणजे ‘शिबानी’ जोशी या आहेत. शिबानीजी यांचे कौतुक यासाठी करायचे, की आज त्यांनी जे नाव कमविले आहे ते निव्वळ स्वकर्तृत्वावर.
बालपणापासून शिबानी यांना अभिनयाची आवड होतीच. वाणिज्य शाखेतील पदवीधर असलेल्या शिबानीने बॅंकेतील नोकरी, आपला संसार सांभाळून त्यांनी नंतर मराठीत एम. ए. केले. मग पत्रकारिता व नाट्य शास्त्रातील पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. आकाशवाणीच्या नभोनाट्य, युववाणी, वनिता मंडळ, वृत्त निवेदन यासह काही कंपन्यांचे प्रायोजित कार्यक्रम व अन्य उपक्रमात त्या क्रियाशील आहेत.
शिबानीजीची खरी कसोटी लागली ती १९९२ साली मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट, १९९३ च्या दंगली, मुंबईत पकडलेल्या पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबला दिलेली फाशी, २६ जूलै, २००५ साली झालेला प्रचंड पाऊसादी प्रतिकूल परिस्थितीतही शिबानीजीनी अक्षरश: जीवावर उदार होऊन त्यांनी आकाशवाणी व दूरदर्शन केलेले वृत्तनिवेदन म्हणजे त्याची धाडशी वृत्ती होय. या व्यतिरिक्त २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन, १ मे महाराष्ट्र दिन रोजी होणाऱे संचलन, १५ ऑगस्टादी कार्यक्रमाचे निवेदन, सुत्रसंचलन सुत्रबध्दतेने त्या कौशल्याने करीत आहेत. असे नानाविध कार्यक्रम या गेली तीनेक दशकं यशस्वीपणे आजही करीत आहेत.
शिबानीजी यांचे देशात इंदोर, चेन्नई, दिल्ली,‘अरे प्रश्न, अरे प्रश्न, प्रश्न प्रश्न अरे अरे‘, हास्य मुद्दा हा द्विपात्री प्रयोग/कार्यक्रम आजही करीत आहेत. असे सांस्कृतिक कार्यक्रम त्या दुबई, सिंगापूर असे आजवर शंबरच्या वर कार्यक्रम केले आहेत रंगमंचावर निवेदनही केले आहे.
लिखित साहित्यात शिबानीजीनी बालकथा, विविध नियतकालिकातून विशेषतः दीपावली अंकात लेख लिहिले आहेत शिवाय त्यांनी सदानंद जोशी यांच्या आणि भोंडल्याच्या गाण्यांच्या पुस्तकाचे संपादनही केले आहे. ‘भ्रमंती‘ या दीपावली अंकाचे काही वर्षे संपादकपदही भुषविले आहे.
नोकरीत असताना गुणवंत कामगार पुरस्कार त्यांना मिळाला आहे. बॅंक, काही व्यावसायिक नाटकं व मराठी चित्रपटात भूमिकाही केल्या आहेत. आता निवृत्तीनंतर त्या ‘मराठी संस्कृती‘ साठी कार्यरत आहेत. ’सई‘ नावाचा एक ग्रुप स्थापन करून ‘‘भोंडला“, “हादगा’’, असे पारंपरिक कार्यक्रम सादर करीत आहेत.
दिल्ली, मॉरिशस येथेही त्या हे कार्यक्रम केले आहेत. विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे त्या सेन्सॉर बोर्डावर व नाट्य परिक्षण मंडळात सदस्य आहेत. याची नोंद राज्य शासनाने घेऊन त्यांना ‘विशेष कार्यकारी अधिकारी‘ हे पद देऊन गौरविण्यात आले आहे. अशा या हरहुन्नरी चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व ल्यालेल्या शिबानी जोशी यांना निरोगी निरामय आयुष्य लाभो हीच साहित्य व नटराजाकडे मनापासून प्रार्थना.
|| नारायण जाधव ||
देवेन्द्रजी भुजबळ हे माहिती उपसंचालक म्हणून जून २५, १९९८ कोकण भवन येथे रूजू झाले. त्यावेळी देवेन्द्रजी नेहमी प्रमाणे आपली दैनंदिन कर्तव्य पार पडत असताना शासन आणि समाजाच्या दृष्टीने लोकोपयोगी दृष्टीने उपयुक्त ठरेल काहीतरी आगळे-वेगळे काम करायचे या उद्देशाने विभागीय प्रमुखांना पत्रकार परिषद, कार्यशाळा, आयोजित करीत असत. अशा नानाविध उपक्रमांमुळे नवी मुंबई महानगर पालिका, सिडको याबरोबरच कोकण भवनात येथेही पत्रकारांचा सदोदित राबता असायचा. मग दीडके वर्ष झाली असतील त्यावेळी दै. लोकमत मध्ये पाच कॉलममध्ये बातमी झळकली ती अशी ‘कोकण विभागीय माहिती कार्यालयाचा बातम्यांचा उच्चांक‘. अतिशय समर्पक, ठळक अशी तपशीलवार बातमी देणारे दै लोकमत नवी मुंबईचे पत्रकार मा.श्री नारायण जाधव हे होत.
त्यावेळेपासून मा. देवेन्द्रजी भुजबळ यांचा जाधव यांच्याशी ओळख झाली मग परिचय झाला. या संबंधी देवेंद्रजीनी जे निरिक्षण केले आहे त्यात लिहितात, ‘जाधव हे निःपक्ष, सडेतोड अशी बातमी देताना त्यांच्या ‘वार्तापत्रात‘ (रिपोर्टिंग मध्ये) कोठेही ‘बात‘ आणि ‘मी‘ पणा नसायचा.’ अशा या पत्रकाराच्या लेखणात वैयक्तिकपणा तर नसायचाच शिवाय कोणाची निंदानालस्ती सुध्दा नसायची. हे असे दुर्मिळ गुण जाधव यांच्या रक्तात होते. म्हणूनच ते सर्वं स्तरांवर एक नि:पक्ष पत्रकार म्हणून ख्यातकीर्त झाले. नांदगाव, जळगाव येथे जन्मलेल्या जाधव यांचा पारंपरिक व्यवसाय शेती हाच होता. त्याकाळात शिक्षण आणि शेतकऱी यांचा दुरान्वयानेही संबंध नसायचा. बालपण, शालेय शिक्षण गावी, माध्यमिक शिक्षण पाटस, पुणे येथे राहणाऱ्या बहिणीकडे झाले. महाविद्यालयीन शिक्षण व पदवीधर (बी.कॉम) धरणगाव, जळगाव येथे झाले. साहजिकच अशा युवा पदवीरांचा ओघ आपसूकच मुंबई कडे न वळता तर नवलच. तेही मुंबईत आले. त्यांची पहिली नोकरी ही नवीन मुंबईतील ‘दै.नवनगर‘च्या जाहिरात विभागात. त्यावेळी मा. भाऊ तोरसेकर हे संपादक होते.
जाधव यांनी धाडसाने भाऊंना विचारले की, ‘मी महिला दिनानिमित्त काही लिहू का?’ भाऊ ऊत्तरले! ‘महिला दिनानिमित्त तू दिलेल्या लिहू शकशील?’ जाधव म्हणाले, ‘प्रयत्न करतो.’ अशारितीने जाधवांचा पत्रकारितेचा आरंभ ‘श्रीगणेशा‘ झाला. मग या क्षेत्रातील घोडदौड जी सुरू झाली ती आजतागायत सुरूच आहे.
नंतर मुक्त पत्रकार म्हणून ‘कृषीबल‘, ‘सांज तरूण भारत‘ या दैनिकात त्यांच्या बातम्या छापून येऊ लागल्या. कालांतराने दै. लोकसत्ताने नवी मुंबईसाठी ‘नवी मुंबई अंतरंग‘ ही पुरवणी सुरू केली. त्यांना नवी मुंबईत प्रतिनिधी हवा होता. ही जाहिरात वाचल्यावर जाधव यांनी रितसर परीक्षा व या मुलाखतीत (त्यावेळी अरूण टिकेकर, दिनकर रायकर यांनी मुलाखत घेतली होती) यशस्वी झाले खरे पण….
गरजेपायी त्यांना अन्य ठिकाणी नोकरी करीत असताना त्यांची मुक्त पत्रकारिता सूरूच होती. मग दै.लोकमतचे संपादक मधुकर भावे (नंदकुमार टेणी हे त्यावेळी तिथे होते) यांची भेट घेतली. लोकमतचे सर्वेसर्वा मा. राजेंद्रबाबू दर्डा यांनी दि. ५ मार्च, १९९८ रोजी जाधव यांची मुलाखत घेतली. मग मुंबईत लोकमत सुरू झाले. मधुकर भावे, नंदकुमार टेणी, राही भिडे, अभिजित ढमढेरे आदी ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार यांच्या सहकार्यात्मक मार्गदर्शनामुळे ते आजतागायत दै. लोकमत मध्ये सक्षमतेने कार्यरत आहेत. आजही ते लोकमत व मा.श्री राजेंद्रबाबू तसेच वर नमूद केलेल्या दिग्गज पत्रकारांचा जाधव कृतज्ञतेने उल्लेख करीत आहेत.
त्यांची पत्नी गृहिणी, चिरंजीव इंजिनिअरींग शिकत आहे. याशिवाय सामाजिक बांधिलकी मानून तो आपल्या आसपासच्या परिसरातील नानाविध उपक्रम, स्थानिकांचे ज्वलंत प्रश्न (पाणी, प्रदूषण वाहतूकादी) यात सक्रिय आहे. असो.
प्रतिकूल परिस्थितीतही नारायण जाधव यांनी वर्तमानपत्रासारख्या धकाधकीच्या नोकरीत यशस्वी होऊ शकले त्याचे सर्वस्वी श्रेय ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार, सहकारी, कुटुंब यांचेच हे ते नम्रपणे व्यक्त करतात हे विशेष होय. या क्षेत्रातील उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना निरोगी निरामय आयुष्य लाभो हीच साहित्य शारदादेवी जवळ मनापासून प्रार्थना.
या व्यतिरिक्त अन्य अप्रसिद्ध, प्रसिद्ध अशा मान्ववरांच्या समग्र जीवनावर यथार्थ प्रकाश झोत जसा या संवादभूषण या पुस्तकात टाकला आहे. त्याप्रमाणे लेखक देवेन्द्रजी भुजबळ यांनी मा. नरसिंग पोतकंठी, विलास सरोदे, मधुसूदन आडे, वीणा गावडे, महेंद्र कोंडे, डॉ बबन जोगदंड, सी.के. सुब्रमण्यम, संध्याताई अमृते, प्रा. डॉ नरेशचंद्र काठोळे, मनोज भोयर, वैशाली आहेर, प्रा.डाॅ.सतीश शिरसाट, मदन लाठी, विजय होकर्णे, किरण बोळे, प्रा.साईप्रसाद कुंभकर्ण, मधुकर घोडविंदे, कांचन कंदले, मरियम मिर्झा यांच्यावरही प्रकाश झोत टाकला आहे.
या पुस्तकाच्या मनोगतात लेखक देवेंद्र भुजबळ यांनी आपल्या लेखनामागील भुमिका स्पष्टपणे मांडली आहे अन् ती सृजन वाचकांना मनोमन पटणारी अशी आहे. मा. भुजबळ यांचे कौतुक यासाठी करायचे आहे, की ते स्वतः सनदी अधिकारी असूनही त्यांना साहित्याची आवड आणि त्यांच्या नजरेतून जे जे उत्तम उदात्त उन्नत उत्कृष्ट आहे ते आम सजनतेपर्यंत यावे यासाठी त्यांनी केलेला संकल्प म्हणजे “न्यूज स्टोरी टुडे“ हे पोर्टल प्रकाशन होय. या संवादभूषण मधून आजच्या तरुण पिढीला एक प्रकारची प्रेरणात्मक चालना मिळेल यात शंका नाही.
विशेष म्हणजे या पुस्तकाची निर्मिती ‘ग्रंथाली‘ या ख्यातनाम संस्थेने केली असून प्रकाशन “न्यूज स्टोरी टुडे” ने केले आहे, हे विशेष म्हणावे लागेल.

— परीक्षण : नंदकुमार रोपळेकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
