नुकताच एक पुस्तक वाचनात आलं. पुस्तकाचं नाव आहे ‘हात तुझा हातातून‘. पुस्तकाचे लेखक अतुल अरुण दाते असून शब्दांकन श्रेयसी वझे – मंत्रवादी यांनी केले आहे. बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे यांचे हे प्रकाशन आहे.
अतुल दाते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके भावगीत गायक अरुण दाते यांचे सुपुत्र आणि रसिकाग्रणी, कानसेन रामूभैया दाते यांचे नातू. संगीत क्षेत्राशी संबंधित लेख या पुस्तकात असल्याने पुस्तक अगदी आपले वाटते, मनाचा ताबाच घेते. पुस्तक संपेपर्यंत खाली ठेववत नाही. पुस्तकातली भाषा अतिशय साधी, सोपी, सरळ परंतु हृदयाचा ठाव घेणारी आहे. हाच साधेपणा जपत आठवणींचा एक सुंदर कालखंड अतुलजींनी आपल्यासमोर उलगडला आहे.
या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर अरुण दाते यांनी अतुलजींना जवळ घेतलेला एक फोटो आहे. दोघांच्याही चेहऱ्यावरचे समाधान काही खासच आहे. अरुण दातेंनी अतुलजींना जवळ घेताना त्यांच्या खांद्यावर ठेवलेला हात बरंच काही सांगून जातो. त्यांच्यातील मैत्र जाणवत राहते. मुखपृष्ठ आणि पुस्तकाचं नाव अतिशय समर्पक झालं आहे. त्यातले सुरुवातीचे लेखकाचे मनोगतही खूप बोलके आहे. या पुस्तकात अतुलजींनी आपल्या वडिलांच्या आयुष्यातील अनेक सुंदर आठवणी लिहिल्या आहेत.
त्यांच्या दीक्षित ते दाते आडनावाचा प्रवास, अरुण दाते यांच्या आयुष्यात आलेल्या विविध मान्यवरांवर, कलाकारांवर टाकलेला प्रकाश, भावसरगम, शुक्रतारा इ. कार्यक्रमांमधील आठवणी, श्रीनिवास खळे, यशवंत देव, हृदयनाथजी, पाडगावकर इ. च्या सानिध्यातील गाण्यांच्या वेळच्या आठवणी, अरुण दातेंच्या आवडत्या गायक, कलाकार, संपर्कात आलेल्या राजकारण्यांची यादी आणि त्यांच्या आठवणी अशा अनेक विषयांवर अतुलजींचे लेख आले आहेत. त्याचबरोबर स्वतः अतुलजींनी सुरू केलेल्या माणिक एंटरटेनमेंटच्या कार्यक्रमाबद्दल, TVS, सा रे ग म, अंताक्षरी, मराठीमधील तारारमपम् व इतर दूरदर्शन माध्यमांमध्ये काम करतानाच्या आठवणीही यात समाविष्ट आहेत.
त्यांच्या ‘बाबा आणि पाडगावकर यांचे 55 कार्यक्रम‘ या लेखात अतुलजी म्हणतात, बाबा व पाडगावकरांचं खूप गमतीदार आणि गहिरं नातं मी जवळून अनुभवलं आहे. कुमार गंधर्वांवरील लेखात कुमारजींना अचानक सुचलेल्या गाण्यातील एका जागेच्या दिव्य क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं…… असं ते म्हणतात…. तो लेख ही उत्तम झाला आहे. अलौकिक खळे अण्णा या लेखात ते म्हणतात की रामशाम गुणगान या गाण्याचं प्रत्यक्ष ध्वनिमुद्रण बघण्याची संधी मला मिळाली आहे…… अशा अनेक अलौकिक सुवर्णक्षणांचे साक्षीदार होण्याचं भाग्य त्यांना लाभलं असून ते त्यांच्या या पुस्तकातून सतत जाणवत राहतं. त्यांच्या या दिव्य आठवणी त्यांच्या शब्दात वाचताना आपण भारावून जातो. त्यांच्या या भाग्याचा आपल्याला हेवा वाटल्याशिवाय राहात नाही.
अरुण दाते यांची भावगीतं ऐकत आमची पिढी मोठी झाली आहे. त्यामुळे प्रेमात पडलो की “तू अशी जवळी रहा” ही ओळ नकळत आमच्या ओठी यायचीच. त्यातच लेखक अतुल दाते हा आमच्या चेतना कॉलेजचा विद्यार्थी. त्याही काळात त्याच्यामागे “अरुण दातेंचा मुलगा” हे वलय होतच.
अतुल माझा मित्र असला तरी मला सीनियर होता. त्यात त्याच्या आजोबांची म्हणजे रसिकाग्रणी रामूभैया दातेंची पुण्यतिथी समाज मंदिर हॉल, बांद्रा येथे दरवर्षी साजरी केली जायची. त्यात भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर, डॉ. प्रभा अत्रे इ. दिग्गज मंडळी आपली कला सादर करायचे. त्या कार्यक्रमाला मंगेशकर कुटुंबीय आवर्जून उपस्थित असायचे. त्या कार्यक्रमाच्या आठवणी आजही आमच्या मनात ताज्या आहेत.
अतुल दाते, किशोर कदम उर्फ सौमित्र, हे आमच्या कॉलेजची शान होती. किशोर व गणेशला नुकतीच चित्रपटांमधून कामं मिळायला सुरुवात झाली होती. अतुलनेही कॉलेजच्या अभिनय स्पर्धांमधून अभिनय करायला सुरुवात केली होती. गाण्यांच्या स्पर्धांमधून तो तबल्यावर साथही करू लागला होता. कॉलेजच्या मराठी साहित्य मंडळामुळे आम्ही सारे एकत्र आलो. पुढे दूरदर्शनवरील टीव्हीएस सारेगम मध्ये तबल्यावर अतुल दाते व शशांक मुधोळकरला पाहून आम्हीही आमची कॉलर ताठ करून घेतली आहे.
या पुस्तकात किशोर कदमनेही शुभेच्छापत्र लिहिलेले आहे. इतक्या वर्षानंतरही अतुल आमची मैत्री विसरला नाही यातच त्याचा मोठेपणा दिसून येतो. सगळ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणे हा त्याच्या घराण्याचा गुणधर्मच आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने चेतना कॉलेजचा तो सगळा काळ पुन्हा एकदा डोळ्यांसमोर तरळून गेला.
रामूभैया दाते एक दर्दी रसिक म्हणून कायम आपल्या स्मरणात राहतील. अरुण दाते त्यांच्या मधुर, मुलायम, तरल आवाजामुळे आणि त्यांच्या भावगीत गायनामुळे आपल्या लक्षात राहतील…. तसेच अतुल दाते यांना नवीन गायक, कलाकारांना त्यांनी दिलेल्या संधीमुळे पुढची पिढी ओळखत राहील.
अशा या सुंदर काळाचा प्रवास घडवून आणणाऱ्या ‘हात तुझा हातातून’ या अतुल दातेंच्या पुस्तकाचा परिचय मी इथे करून देत आहे. अनेक आठवणींचा हिंदोळ दाखवणारे हे पुस्तक तुम्हीही नक्की वाचा.

– परीक्षण : अलका अग्निहोत्री
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800