|| जिचं-तिचं आकाश ||
भारतीय संस्कृती, परंपरेत ‘’स्त्री“ ला अनन्य साधारण असं महत्त्व आहे. याचा उल्लेख आपल्या वेद-उपनिषदा मध्ये केलेला आहे. ’अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी‘ या पंचकन्यांचं स्मरण नित्यनेमाने करण्याची प्रथा आजही सुरू आहे. थोडक्यात ‘स्त्री’ ही क्षणिक काळची पत्नी अन् अनंत काळची माता असते नव्हे आहे. या संसाररुपी भवसागरातील ‘स्त्री-पुरुष’ हे या रथाची दोन चाकं आहेत. सनातन काळातही ‘स्त्री’ चे महत्व अन् महती याचे यथार्थ वर्णन विविध पुराण साहित्यात वाचावयास मिळते.
पुर्वी ‘चूल आणि मूल‘ यात स्त्री जरी गुंतलेली असली तरी तिचे संसारिक कर्तव्य पार पाडत असताना सुद्धा तिचे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक, राजकारणादीसह कौटुंबिक ही मोलाचे योगदान होते नव्हे आजही आहे. स्वातंत्र्य पूर्व काळात नाना शंकरशेठ, ज्योतीबा फुले, भारतरत्न महर्षी कर्वे आदी समाजसुधारकांनी स्त्रीच्या शिक्षणाचा वसा घेऊन तो यशस्वीपणे अंमलातआणला; त्याची वेळोवेळी दखल सर्व भाषेतील विशेषतः मराठी साहित्यात घेतली गेली आहेत. (उ.दा: ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, विभावरी शिरूरकर उपाख्य मालतीबाई बेडेकर, सुमती क्षेत्रमाडे, बेबी कांबळे, कुमुद पाध्ये, गिरिजा कीर, प्रज्ञा दया पवार, नीरजा, सुनंदा भोसेकर, मेघना पेठे आदी) आज २१ व्या शतकात हाच वसा पुढे नेटाने नेणाऱ्यात प्रामुख्याने चित्रा मेहेंदळे यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल.
कधी अमेरिकेत तर कधी भारतात वास्तव करणाऱ्या चित्रा मेहेंदळे यांनी पूर्वी ‘न्यूज स्टोरी टुडे’ साठी ‘अमेरिकेतील नवदुर्गा‘ ही आणि ‘’जिचं तिचं आकाश“ या लेखमाला न्यूज स्टोरी टुडे वेबपोर्टलवर लिहिल्या होत्या. त्यातील सर्व यश कथांचे संकलन करून ते ‘’जिचं – तिचं आकाश“ या पुस्तक रूपाने “न्यूज स्टोरी टुडे‘ च्या प्रकाशिका सौ.अलका देवेंद्र भुजबळ यांनी प्रकाशित केले आहे. यात प्रतिकूल परिस्थितीतही समाजभान ठेवून कर्तबगार एकूण तेहतीस स्त्रियांच्या समग्र जीवनावर यथार्थ प्रकाश झोत टाकला आहे.

यात वीरमाता अनुराधा गोरे, डॉ मेघा शेटे, न्या. भाग्यश्री पारेख, गीताबेन कांटावाला, डॉ आसावरी बापट, माधवी कुंटे, डॉ नंदिनी धारगळकर, सुलभा पंचवाघ, विभावरी काळे, डॉ आसावरी भट, प्रतिक्षा तोंडवळकर, रश्मी बर्वे, उषा दीपक फाल्गुने, डॉ विद्या देवधर, सुधा माटे, चंद्रिका कामथ, वसुधा पर्वते, पूर्णिमा क-हाडे, मानसी पालकर, नीता रांगणेकर, अश्विनी क्षीरसागर, यशस्विनी गोरे-लिमये, पूर्वल घाटे, शिल्पा अरुण वझे, नीता उपेंद्र मेहेंदळे, अनुश्री क्षीरसागर, शीळ वादिका, अपर्णा काकिर्डे, डॉ स्वाती भाटवडेकर, रेखा दिवेकर, नंदिनी जोशी, श्र्वेता बापट आणि दीपाली केळकर, प्रतीक्षा तोंडवळकर आदींचा समावेश आहे.
|| वीरमाता अनुराधा गोरे ||
वीरमाता अनुराधा गोरे यांचं नाव ज्याच्यामुळे सर्वश्रुत झाले ते त्यांचे सुपुत्र विनायक यांच्यामुळे. कर्तव्यनिष्ठ देश सेवेसाठी बलिदान केलेल्या एका सैनिकी अधिकारी शूरवीराची माता असलेल्या अनुराधा यांनी आपलं माहेर, तेथील त्यांच्या पूर्वजांची तलवार आणि ती तलवार पाहून विनायकाला स्फूरण येत असे. शिवाय शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा या बाल विनायक पगठा पडला. शिवाय त्याचे वडील विष्णू गोरे हे एक अत्यंत हुशार तर होतेच शिवाय ते सुवर्णपदक विजेते होते व बॅंकिंग क्षेत्रात उच्चपदावर होते. वडिलांचा वारसा आपल्या मुलांने पुढे चालवावा ही अपेक्षा स्वाभाविक होती. अशा सुसंस्कारित माता पित्याच्या संस्कारात वाढलेला विनायक याचा कल देशसेवेकडे होता. देशसेवा हीच ‘ईश’ सेवा हे मनी बाळगून त्यांने चार्टर्ड अकांटंटची आर्टिकलशिपवर पाणी सोडले. नंतर त्यांने संयुक्त संरक्षण सेवेत (Combined Defence Services Examination) उत्तीर्ण झाला. डेहराडून येथील इंडियन मिलिटरी ॲकॅडेमी येथे दाखल झाला. संरक्षण सेवेतील खडतर प्रशिक्षण पूर्णपणे उत्तमरितीने यशस्वी झाल्यावर तो २२ जून, १९९१ रोजी भारतीय लष्करी सेवेत दाखल झाला.आपल्या ५ वर्षाच्या कारकिर्दीत त्याच्या हुशारी, चाणाक्षपणा, समय सुचकतादीमुळे त्यांने आपल्या वरिष्ठांचा विश्वास संपादन केला अन् साहजिकच त्यांच्या वर मोठी जबाबदारी टाकली. जम्मू काश्मीर मध्ये कुपवाडा येथे पाकिस्तानी शत्रूशी लढताना त्याला ‘ वीर गती ‘ मिळाली.
आपल्या डोळ्यासमोर कोणत्याही मातेला पुत्राचा मृत्यू येणं ही कल्पनाच करवत नाही.अशा मानसिक प्रतिकूल परिस्थितीत ही वीर माता खचून न जाता धीर, संयमाने प्राप्त परिस्थितीला सामोरे गेली. अशा या वीरमाता अनुराधा गोरे यांच्या समग्र जीवनावर यथार्थ प्रकाश झोत टाकला आहे लेखिका चित्रा मेहेंदळे यांनी.
|| डॉ मेधा शेटे ||
डॉ मेधा शेटे या व्यवसायाने वैद्यकीय डॉक्टर. ‘रुग्णसेवा हीच ईशसेवा‘ हे ब्रीद मनी बाळगून त्या कार्यरत आहेत. आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून त्यांनी वयोवृद्ध लोकांसाठी ‘मराठी मित्रमंडळ ’साथसंगत महिला मंडळ, याबरोबरच प्रवचन, ‘थॅलेसेमिया मुक्त मुंबई‘ व्याख्यान, गरजूंना वैद्यकीय मार्गदर्शन, लेख, शिबिर याद्वारे जनजागृतीचे कार्यात त्या सतत कार्यरत आहेत. त्यांच्या या सामाजिक सेवेची जाणिव ठेवून त्यांना विलेपार्ले तर्फे ‘ जनगौरव पुरस्कार,’ स्वा.वीर सावरकर सेवा केंद्राचा ‘समाज सेवक पुरस्कार’, रोटरी क्लब तर्फे व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कारादीनी सन्मानित केले आहे.
|| न्या. बागेश्री परीख ||
‘पोलीस स्टेशन ‘ मध्ये कधी जाऊ नये तसेच कोर्टाची पायरी कधी चढू नये असं जे म्हटलं जायचं त्यात तथ्य होत नाही असं नाही.पण गंमत म्हणजे आजची आधुनिक स्त्री ही सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. त्याचा प्रत्यय न्यायमूर्ती बागेश्री परीख यांच्यावरील लेख सृजन वाचकांना येईल. त्या वकिलकी करत करत ‘ कुटुंब ‘ न्यायालयातून न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्या. त्यांचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालय पुढील शिक्षण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथून समाज कार्य विषयात एम.ए.ही पदवी प्राप्त केली.काही वर्षे एका संस्थेत सामाजिक कार्यकर्ती म्हणून काम केले. त्यांचा विवाह श्री योगेन परीख यांच्याशी १९७० साली झाला.त्यांचे पती हे पर्यावरण तज्ज्ञ. त्यांच्या सक्रीय पाठिंब्यामुळे बागेश्री ताई सर्व खटले, दावे, कौटुंबिक समस्या, घटस्फोटादी दिवानी न्यायालयात जाण्या ऐवजी जर ते समुपदेशन, सामंजस्य व सामोपचाराने सोडविले तर वेळ, श्रम वाचू शकतो. यास्तव अशा प्रकारचे दावे, खटले ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ‘ कडे आली.ही सर्व जबाबदारी बागेश्री बाईनी मोठ्या कौशल्याने हाताळली.त्यात त्यांना यश मिळत गेलं.
ही कौटुंबिक न्यायालय ही पुणे, छत्रपती संभाजी नगर आणि मुंबई येथे सुरू झाली. आधी बागेश्री बाईनी कायद्याची पदवी घेतली आणि हे सर्व आपला संसार सांभाळून त्यांनी यात यश मिळविले. नंतर त्यांची नव्याने सुरू झालेल्या कुटुंब – न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली. त्या या पदावर एक तप होत्या. बागेश्रीबाईना हा समाज सेवेचा वारसा त्यांचे वडील सदाशिव धुरंधर यांच्या कडून आला. निवृत्तीनंतरही आज वयाच्या ८० व्या वर्षातही आपले नानाविध छंद जोपासत समाज जीवनातील सर्वं स्तरावर त्या सतत कार्यमग्न राहात आहेत.बागेश्री बाईंच्या समग्र जीवनाचा यथार्थ मागोवा लेखिका चित्रा मेहंदळे यांनी या लेखात घेतला आहे.इच्छा असेल तर मार्ग सापडतो याच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे बागेश्री परीख हे होय.
|| गीताबेन कांटावाला ||
गीताबेन कांटावाला या ‘ ओरिगामी ‘ कलेत पारंगत आहेत.या कलेचा त्या यथाशक्ती प्रचार, प्रसार करीत आहेत.त्याशिवाय त्या रवींद्र संगीत, मॉडेलिंग, पोहणे, पत्ते, कॅरम या छंदातही त्या रमतात. एवढेच नाहीतर त्या दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी त्यांना पुस्तक वाचून दाखवतात.
|| डॉ आसावरी बापट ||
डॉ आसावरी बापट या माहेरच्या पद्मा केळकर. त्या समाजशास्त्र विषयात एम.ए. नंतर त्यांनी संस्कृत पदविका अभ्यासक्रम आणि एम.ऊ.चा अभ्यास केला. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही त्यांच्या संस्कृतीच्या प्राध्यापिका डॉ गौरी माहुलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच.डी. करायला सुरूवात केली. त्या उत्तम वक्त्या तर आहेतच शिवाय आपला एखादा मुद्दा वा कठीण विषय त्या सहजपणे समजून सांगतात. मुळात त्यांच्या वाणीत गोडवा आहे शिवाय प्रसन्न व्यक्तिमत्त्व ल्यायल्याने जन माणसांवर प्रभाव पाडू शकल्या.घेतली. त्यांच्या या कौशल्याच्या लाभ गुप्तचर विभाग, पोलीस खाते, इविधपोलीस अकादमी, फोर्सवन, आर्मी वॉर कॉलेज महू, विविध मॅनेजमेंट संस्थादीकांनीहश घेतला आहे. याशिवाय या विषयांवर त्यांनी विविध प्रचार प्रसार माध्यमातून मुलाखती व विस्तृतपणे लेखन केले आहे. स्वामी विवेकानंद केंद्राच्या म्यानमार, काठमांडू येथे संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या संशोधन श्रेणीत स्मृती साहित्य, प्राचीन वास्तुकला, स्थापत्य अभियांत्रिकी, कौटिल्यीय अर्थशास्त्र,यांचा समावेश आहे. त्यांना हा बहुगुणांचा वारसा त्यांच्या आईकडून मिळाला आहे हे त्या अभिमानाने सांगतात.
|| माधवी कुंटे ||
मराठी साहित्याच्या संदर्भात विशेषतः विलेपार्ले, मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या सुश्री माधवी कुंटे यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. कधी कोणाच्या लेखनीला मुहूर्त मिळेल हे सांगणं जरा कठीणच. वयाच्या ४५ व्या वर्षी माधवी ताईच्या लेखणीला अंकुर फुटले. ते वर्ष होते १९८९ साल. आणि पाहता पाहता त्यांचे १०० वे पुस्तक २३ मार्च २०२४ साली प्रसिद्ध झाले. माहेरच्या त्या मोने. बी.ए.ऑनर्स, बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स आणि बी.एड.यात त्या नेहमीच गुणवत्ता यादीत आल्या आहेत. अध्यापन क्षेत्रात त्यांनी जवळ जवळ दोन तपं कार्यमग्न होत्या.त्यांचे पती मर्चंट नेव्ही होते. त्यांच्यासह त्यांनी अनेक सागरी सफरी केल्या आहेत त्या आधारे त्यांच्या समर्थ लेखणीतून ‘ मी एक खलाशी ‘ ही कादंबरी प्रसिद्ध झाली. लगेच त्याची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली. त्याची नोंद कुसुमाग्रज, व.पु.काळे, शंकर वैद्य, नौवहन सल्ल्यागार सुधीर नाफडे, नौदल प्रमुख भास्करराव सोमणादी मान्यवरांनी घेतली.या कादंबरीला ‘दलित साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. १९८९ सालच्या दहा उत्कृष्ट कांदबरीत तिची निवड झाली. इथूनच माधवी ताईची लेखनाची गाडी सुसाट वेगाने धावू लागली.पाहता पाहता त्यांच्या समर्थ लेखणीतून शंभरेक दर्जेदार पुस्तकं लिहून झाली.२७ कथा संग्रह, विविधांगी विषयांवर लेख, पाचेक ललित लेख संग्रह प्रसिद्ध झाली आहेत.वेद राही यांची पुस्तकही अनुवादित केलीय. मुंबईतील बहुतांश नियतकालिक, तरूण भारत, दिवाळी अंक यातही त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या माधवीताईनी साहित्य संमेलनात अध्रक्षपदही भुषविले आहे. निगर्वी स्वभावाच्या माधवीताईची माझी ओळख होती. आमचे दूरध्वनीवरूनही बोलणं व्हायचं…पण आता..त्या आपली साहित्य सेवा रुजू करण्यासाठी साहित्य शारदादेवीच्या दरबारात हजर झाल्या आहेत.. मराठी सारस्वत एका विदुषीला समस्त सृजन मराठी रसिक मुकला आहे. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
|| सुलभा पंचवाघ ||
गेल्या पिढीतील सर्वसामान्यपणे सृजनशील मराठी मनावर ‘पु.ल.देशपांडे‘ नावाचं गारूड होते नव्हे आजही आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व ल्यायलेल्या पु.ल.यांची लोकप्रियता फक्त सृजन मराठी भाषिकांवरच आहे याची खंत अनेकानप्रमाणे सुलभा पंचवाघ यांनाही वाटते अन् ती रास्त वाटते. नुसती खंत करीत न बसता त्यांनी पु.ल.च्या पच्छात त्यांच्या लेखनावरचे एकपात्री, ऑनलाईन प्रयोग सुरू केले आहेत. आज वयाच्या ८० व्या वर्षी त्या हे प्रयोग देश-विदेशात करीत आहेत. अमेरिकेत त्या आपल्या मुलीकडे जाऊन येऊन अस्तात. तेथील ‘ सॅनहोजे ‘ इंडियन कम्युनिटी सेंटर ‘ येथे झूम मिटिंगवर कार्यक्रम होतात ते या हिंदीतून सादर करीत आहेत. त्या मुळच्या सूलभा दळवी अस्सल पुणेकर. एम.ए.पर्यत शिक्षण झालेल्या सुलभाताईनी अनेक नाटकांत विविधांगी भुमिका साकारल्या आहेत. भारतीय विमानदलातील अधिकारी असलेल्या पंचवाघ यांच्याशी १९६४ मध्ये विवाहबद्ध होऊन दिल्लीत गेल्या. सतत बदल्या, वाढत्या सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी जमेल तसे तिथे अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले.पुणे आकाशवाणी, दूरदर्शन, विविध भारती यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. अलूरकर म्युझिक हाऊसच्या दृश्यश्राव्य शैक्षणिक विभागाच्या त्या संचालक म्हणून काम केले आहे. आता मात्र त्यांनी फक्त आणि फक्त पु.ल.च्या लेखनावर लक्ष केंद्रित करून प्रयोग करीत आहेत.” यशस्वी होण्यासाठी धावाधाव करून दु:खी होण्यापेक्षा, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानायचा ‘’ या आपल्या विचारसरणी त्यात रमतात. यांचं छान चित्रण चित्रा मेहेंदळे यांनी यात केले आहे.
|| विभावरी काळे ||
‘ईश‘ स्मरण करीत करीत ‘ कर्मयोग ‘, बुध्दीचा कौशल्याने वापर करून ‘ज्ञानयोग ‘व नंतर समर्पित भावनेने ‘ ईश ‘ स्मरण करतांना साधतांना यशापयश ‘ भक्तियोग ‘ हे तिन्ही योग आपल्याला आपल्या ‘ सदगुरू ’
मध्ये सहजपणे दिसतात, हाच ‘ पूर्णयोग ‘.यालाच गीतेत ‘ स्थितप्रज्ञ ‘ म्हणतात. अशा सहज सुंदर, सोप्या भाषेत गीता समजावून सांगणाऱ्या विभावरी विनोद काळे. या पुर्वाश्रमीच्या विभावरी हिंगवे. त्या मुळच्या नागपूरच्या. बी.एस.सी. मग बी.ए., एम. ए.(मराठी) या पदव्या मिळाल्या. त्यांना मराठीला कवी ‘ग्रेस’होते. लग्नानंतर त्या पुणे येथे आल्या. तेथून त्यांनी एम.फिल.केलं. मग मुंबईत आल्यावर सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक साहित्यिक क्षेत्रात रमल्या.इ.स.२००४ साली पुण्याच्या ‘ स्वामी विद्यानंद ‘ यांचा अनुग्रह प्राप्त झाला. त्यांच्या गुरूनी जे प्रेम, आत्मविश्वास, आत्मियता दिलाय हाच जीवनाचा एकमेव उद्देश. तो त्यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केलंय. चित्रा मेहेंदळे यांनी विभावरी काळे यांचे व्यक्तिचित्रण छान लिहिले आहे.
|| आसावरी भट ||
आसावरी भट या व्यवसायाने डॉक्टर. संस्कृत भाषेत पी.एच.डी. ‘:रुग्ण सेवा ‘हीच‘ ईश सेवा‘ त्यांनी अनेक आजारी रुग्णांचे आशीर्वाद घेतले आहेत.आपल्या वयाच्या पन्नाशीनंतर ‘वेदांत‘ विषयात एम.ए.मध्ये त्या मुंबई विद्यापीठातून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. कन्नड भाषा घेऊन एम.ए.,मायथॉलॉजीचाही त्यानी अभ्यास केला आहे. आज वयाच्या पंचाहत्तरीत त्या समर्थ रामदास यांच्या साहित्याचा अभ्यास करून समर्थ विद्यापीठाच्या ‘प्राज्ञ‘ पर्यंतच्या सर्व परीक्षा प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्या आहेत. बहु आयामी व्यक्तीमत्व ल्यायलेल्या आसावरी ताई यांना साहित्यिक, सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातही लक्षणीय असं योगदान आहे. खरंतर या विदुषी म्हणायला हरकत नाही. चित्रा मेहेंदळे यांनी हे सुंदर शब्दांकित केले आहे.
|| प्रतीक्षा तोंडवळकर ||
प्रतिकूल परिस्थितीवर (अठरा विश्व दारिद्र्य) न डगमगता आपलं ध्येय साध्य करणाऱ्यात प्रतीक्षा तोंडवळकर यांच नाव आवर्जून घ्यावं लागेल. त्या इयत्ता सातवीत असतांना आईवडिलांनी १९८२ साली लग्न लावून दिले. पती बुक बायंडिंगचे काम करायचे.. आर्थिक आवक जेमतेमच. पुर्वीपासून ‘अंथरूण पाहून पाय पसरावे‘ या उक्तीप्रमाणे वागावे लागायचे. “त्यांच लग्न काय झालं अन् वैधव्य काय आलं“ पण तरीही त्या नियतीला दोष न देता आलेल्या परिस्थितीला धैर्याने तोंड दिले.बॅंकेत दोन तासाची नोकरी सांभाळून त्यांनी इ.१०वी उत्तीर्ण झाल्या, बॅंकेत सफाई कामगार ते बॅंकेत अस्सिटंट जनरल मॅनेजर या पदापर्यंतचा केलेला यशस्वी प्रवास चित्रा मेहेंदळे यांनी रोचक पद्धतीने लिहिला आहे. त्यांचा हा आदर्श गरजू नवोदितांनी अवश्य समोर ठेवावा असा आहे.
|| रश्मी बर्वे ||
नारदीय कीर्तन परंपरा पुढे निरंतर सुरू राहावी यासाठी ज्या व्यक्ती धडपडत आहेत त्यात रश्मी बर्व यांच नाव आवर्जून घ्यावं लागेल. त्यांना सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप श्री चारूदत्त आफळे यांचे यथार्थ मार्गदर्शन लाभले. त्या कथ्थक नृत्यांगना सुध्दा आहेत.त्या मॅरेथॉन स्पर्धेत नेहमी यशस्वी होतात. सद्गुरू महाराज ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर यांची नित्यनेमाने उपासना त्या एकनिष्ठने करीत आहेत. त्यांचे पती नितीन हे आय आय टी मद्रास, एम.टेक. आय आय टी मुंबई मग अमेरिकेत वास्तव्य. तेथे आपल्या सनातन धर्मातील कीर्तन परंपरा याचे जतन-संवर्धना बरोबरच त्याचा प्रचार प्रसार त्या करीत आहेत; हे विशेष होय. अशा आगळ्यावेगळ्या व्यक्तीमत्वावर चित्रा मेहेंदळे यांनी छान प्रकाश झोत टाकला आहे.
|| डॉ विद्या देवधर ||
डॉ विद्या देवधर या पुस्तकाच्या लेखिका चित्रा मेहेंदळे यांच्या खास सखी. आपल्या या सखीबद्दल लिहितांना विद्याबाईच्या समग्र जीवनाचा यथार्थ असा आढावा घेतांना त्यांच्या अभ्यासूवृतीचे शब्दांकन केले आहे. विद्याताई यांनी ‘स्वामी विवेकानंदाचा स्त्रीविषयक दृष्टिकोन‘ यावर लिहिलेला पहिला लेख ‘लोकप्रभा ‘ मध्ये १९७६ साली छापून आला होता. ’’स्त्री लिखित कादंभरी : प्रेरणा व प्रवृत्ती!‘’ हे पुस्तक आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशित झाले होते. या मुळच्या पार्ला, मुंबईच्या. सुसंस्कृत, सुशिक्षित आई-वडिल हे लेखक, संशोधक. त्यांचा हा वसा विद्याताईने घेतला.एम.ए.,एम.फिल.,पी.एच.डी.केली. त्यांना रा.ब.माढेकर सुवर्ण पदक मिळाले.पोस्ट डॉक्टरेट रिसर्च केले. २००३ ते २००८ अशी फेलोशिप मिळाली. यात त्यांनी ‘कृष्णामृतनट‘ या इ.स.१७५३ मध्ये लिहिलेल्या २३ हजार हस्तलिखिताचे संपादन, त्यातील काव्य, सामाजिक परिस्थिती, भाषा, उर्दू शब्दांचा उपयोग यावर त्यांनी ‘आनंदाचे आवारू‘ हा ग्रंथ सिद्ध झाला. २०१६ ते २०१८ अशी लोकसभा फेलोशिप मिळाली त्याकाळात त्या सतत दोन वर्षे दिल्लीला जात होत्या. ‘कानून निर्माण में महिलाओं का योगदान‘ हा ग्रंथ लिहिला. त्यानिमित्याने लोकसभेतील ग्रंथालय व लोखसभेत जाण्याची संधी मिळाली. स्त्री साहित्य सामाजिक जाणीव, श्रीमद्भगवद्गीता- काव्य आणि तत्त्वज्ञान, श्रीमद्भगव कथा, दीपस्तंभ यासह आठेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. नॅशनल बुक ट्रस्टने त्यांचे ‘कायदे निर्मितीत स्त्रियांचे योगदान‘ हे पुस्तक २०२५ मध्ये प्रकाशित झाले. २५० च्यावर अभ्यासपूर्ण लेख, ‘तेजतपस्विनी‘ या चित्रपटाची कथा, एका लघुपटाची संकल्पना, लेखन, निवेदन या बाजू त्यांनी समर्थपणे सांभाळ्या. ‘नारायणी नमोस्तुते’ या महिला कोशात त्यांचा परिचय आहे. बृहनमहाराष्ट्र हैदराबाद येथील मराठी साहित्य परिषद तेलंगाना राज्याच्या अध्यक्षा आहेत.
’पंचधारा’; ‘संवादू‘ या द्विमासिकाच्या त्या संस्थापक, संपादक आहेत. चित्राताई त्यांच्याबद्दल लिहितात, ‘विद्या एकतर ओटा, स्टेज नाही तर विमानात तरी असतात.भारतातील अप्रकाशित अशा स्त्रियांना समाजासमोर ‘पंचधारा‘ या मराठी साहित्य परिषद ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यांच्या मातोश्री सुशीला महाजन यांचे आशीर्वादात्मक मार्गदर्शन, पती अजित, कस्तुरी व करिष्मा यांचे सक्रिय सहभाग हे त्या कृतज्ञतेने व्यक्त करतात. आणीबाणीच्या काळात त्या बंद गजाआडच्या सरकारी पाहुण्या होत्या. दिल्लीच्या पथसंचलन घोड्यावर स्वार होत सर्वात पुढे ध्वज हाती घेऊन त्यांनी भाग घेतला. १९९० मध्ये आकाशवाणी केंद्र, हैदराबाद येथे कार्यक्रमाचे मराठीतून नियोजन, निवेदन, रामोजी फिल्म सिटीत हॅलो इंडिया येथेही त्यांनी आपल्या कार्य कर्तृत्वाची छाप पाडली. अशा या अष्टपैलू विद्या देवधर यांच्या कार्य शैलीचा तपशीलवार परिचय चित्रा मेहेंदळे यांनी करून दिला आहे.
उषा फाल्गुने, सुधा माटे, चंद्रिका कामत, सुश्री पर्वते, पूर्णिमा कऱ्हाडे, मानसी पालकर,नीता रांगणेकर- नाबर, अश्विनी क्षीरसागर, यशस्विनी गोरे-लिमये, पूर्वल घाटे, शिल्पा अरुण वझे, नीता उपेंद्र मेहेंदळे, अनुश्री क्षीरसागर, शीळ वादिका, अपर्णा काकिर्डे, डॉ.स्वाती भाटवडेकर, रेखा दिवेकर, नंदिनी जोशी, श्र्वेता बापट आणि अर्थात दूरदर्शनच्या मराठी बातम्या देणाऱ्या, विविधांगी विषयांवर प्रभुत्वाने, वक्ता दशसहसत्रेशू असलेल्या दीपाली केळकरसह यांच्या अफाट कार्यकर्तृत्वासह आकाशात सृजन रसिक वाचकांना चित्रा मेहेंदळे यांनी मस्तपेकी भ्रमंती घडवून आणली आहे.

आकर्षक मुखपृष्ठ, लक्षवेधी रचना- मांडणी असलेल्या या पुस्तकाची निर्मिती ‘ग्रंथाली‘ने केलीय. प्रकाशिका अलका भुजबळ यांनी न्यूज स्टोरी टुडे साठी हे प्रकाशित केले आहे. आजच्या समस्त तरुणींनी आणि त्यांच्या आई वडिलांनी अवश्य वाचावे असे हे पुस्तक आहे.

— परीक्षण : नंदकुमार रोपळेकर. मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
