Wednesday, November 26, 2025
Homeयशकथाप्रतिभावान प्रतिभा

प्रतिभावान प्रतिभा

चित्रकार प्रतिभा रावळ यांचा एकाहत्तरवा वाढदिवस कालच साजरा झाला. त्यानिमित्ताने जाणून घेऊ या, त्यांची प्रतिभाशाली आणि संघर्षमय जीवन कहाणी..
प्रतिभा रावळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक

हिंदू सणवार, जयंती, इंग्रजी दिनदर्शिके ऐवजी भारतीय पंचागानुसार साजरे झाले पाहिजेत, या पाचसहा वर्षापूर्वी मी लिहिलेल्या लेखाकडे वाचकांचे लक्ष चटकन वेधल्या गेले, त्याचे कारण म्हणजे लेखापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र अत्यन्त तन्मयतेने काढणारी चित्रकार प्रतिभा रावळ पाहून. हे चित्र पाहून वाचक खूपच प्रभावित झाले.

ज्यांच्याकडे माझा मोबाईल क्रमांक होता, त्यांनी मला थेट विचारणा केली. त्यावेळी मी त्यांना, ती चित्रकार प्रतिभा भुपाळ रावळ असून मूळ अमरावती येथील असून पुण्यात स्थायिक झाली असल्याचे सांगितले. प्रतिभाच्या जीवन संघर्षावर एक चित्रपट नक्कीच होऊ शकतो, असंच तिचं नाट्यमय जीवन आहे.

प्रतिभा ही नात्याने माझी पुतणी आहे. माझे सख्खे मावसभाऊ अमरावती येथील कै. कमलाकर दत्तात्रय तिवाटणे यांची ती थोरली कन्या. तिचा जन्म 24 नोव्हेंबर 1954 रोजी अमरावती येथे झाला. आजोबा दत्तात्रय तिवाटणे, वडील कमलाकर, काका प्रभाकर यांचा अल्युमिनियम भांडी बनवण्याचा “प्रगती मेटल इंडस्ट्रीज” हा कारखाना होता. त्या इमारतीचं नावही होतं प्रगती बिल्डिंग ! अमरावती- बडनेरा रस्त्यावर बांधलेली ती बहुधा पहिली तीन मजली इमारत असावी. तिच्या घरी त्याकाळी खूप श्रीमंती होती.

आयुष्यात पहिल्यांदाच मी तिच्या घरच्या अ‍ॅम्बेसेडर कार मध्ये बसलो. सर्व मुलामुलींनी गच्च भरलेल्या अ‍ॅम्बेसेडर कार मधून मारून आलेली ती चक्कर माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. पुढे माहिती खात्यात पदोन्नती होऊन उपसंचालक झालो तेव्हा दिमतीला अ‍ॅम्बेसेडर कार मिळाली. तिच्यात बसुन खूप दौरे केले.पण पहिल्यांदा अ‍ॅम्बेसेडर कार मध्ये बसलो, त्याचा आनंद कधी झाला नाही. अर्थात तिच्यात बसुन कराव्या लागणार्‍या प्रवासाचा अभिमान मात्र नक्कीच वाटत असे. कारण त्याकाळी अ‍ॅम्बेसेडर कार “स्टेटस सिम्बॉल” होती !

खरं म्हणजे, घरी श्रीमंती असूनही केवळ त्यावेळच्या रितिभातीनुसार प्रतिभाचा विवाह वयाच्या सोळाव्या वर्षी वाजत गाजत पुणे येथील चहाचे व्यापारी अरुणकुमार हजारे यांच्याशी झाला. त्या लग्नाला मी ही होतो. वरातीत नवरदेवासमोर, जोरात वाजत असलेल्या बॅण्डबाजाबरोबर नाचणारी मुले त्यावेळी मी पहिल्यांदाच पहात होतो. वडीलधारी मंडळी, नवरदेवाच्या मित्रांना आवर घालून, त्यांची समजूत काढून वरात पुढे न्यायचा प्रयत्न करतेय हे दृश्य माझ्या मनःपटलावर कायमचे ठसले.

लग्नानंतर प्रतिभा, सासरी पुण्यात आली. एक तर आमचे पूर्वीचे नाते, त्यात तिचे पती अरुणकुमार हे माझे थोरले बंधू कै. राजेंद्र भुजबळ यांचे घनिष्ट मित्र. त्यामुळे अरुणकुमार यांचे चहा पावडर विक्रीचे होलसेल चे दुकान म्हणजे रोज संध्याकाळी गप्पा मारण्यासाठी भेटण्याचे हक्काचे ठिकाण होते. त्यामुळे आमचे त्यांच्या दुकानात आणि बर्‍याचदा घरी सुद्धा जाणे येणे होत असे. अरुणकुमार यांच्या घरची सर्व मंडळी खूप हौशी होती. पण घरातील मोठी सून म्हणून प्रतिभाकडून खूप अपेक्षा असायच्या. संसाराचा काही अनुभव नसलेली, शिक्षणाची आस असलेली, प्रतिभा कोवळ्या वयात संसाराची जबाबदारी पडुनही हसतमुखाने सर्वांचं करायची. संसारवेलीवर एक कळी उमलली. सर्व कसं छान चाललं होतं. पण बघता बघता, प्रतिभाच्या सुखी संसाराला दृष्ट लागली. पुढे पुढे,परिस्थिती अधिकच बिकट होत गेली. मात्र अशा प्रचंड कसोटीच्या काळातही प्रतिभाने आपल्यातील कला जिवंत ठेवली. अशा परिस्थितीशी टक्कर टक्कर देता देताच पती अरुणकुमार यांचा दुःखद अंत झाला.

पुढे प्रतिभा परिस्थितीशी एकटीने झुंजत राहिली. कला, चित्रकला यातील कुठलेही औपचारिक शिक्षण नसताना केवळ अंगभूत प्रतिभा असल्याने प्रतिभातील चित्रकला, कापडकला, अन्य कला प्रकार बहरतच गेले. नव्हे, या कलासक्तीनेच बहुधा तिला सावरण्याचे, जगण्याचे, लढण्याचे बळ दिले. तिने काही वर्षे ब्युटी पार्लरचा व्यवसाय केला. त्याच बरोबर ती अनेक वर्षे ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देत होती.

प्रतिभाच्या चित्रांचे पहिले प्रदर्शन पुणे येथील प्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदिरात झाले. पुढे तिच्याकडे कामाचा ओघ निर्माण झाला. दरम्यान स्वतः रसिक असलेले भुपाळ रावळ तिच्या जीवनात आले. उपजत कला, भुपाळ रावळ यांचं प्रोत्साहन यामुळे आज प्रतिभाने फार उंची गाठली आहे. तिचा हातखंडा पाहून दिवसेंदिवस विविध, विशेषतः पाळलेल्या श्वानांच्या पेंटिंगची कामं तिला मिळत असतात.

प्रतिभाच्या कलाक्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानाची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, मानवसेवा विकास फौंडेशन, दि पॉवर ऑफ मीडिया फौंडेशन या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती दिनी, १९ फेब्रुवारी २०२० रोजी पुणे येथील नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या भव्य सभागृहात तिला “महाराष्ट्र शिवरत्न राष्ट्रीय पुरस्कार २०२०” सन्मान पूर्वक देऊन गौरविण्यात आले

भूमाता ब्रिगेडच्या लढवय्या तृप्ती देसाई, चित्रपट निर्माती अनुजा देशपांडे, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त धनंजय धोपावकर, संयोजक डॉ. नंदकुमार पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते शिवरत्न पुरस्कार तिला प्रदान करण्यात आला. कार्यक्रम स्थळी प्रतिभाची शिवचित्रे रसिकांचे लक्ष वेधून घेत होती. आयोजकांनी न राहवून त्यातील शिवरायांचे एक देखणे चित्र निवडून त्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले. प्रतिभाच्या कलेला मिळालेली ही मोठी दाद होय.

प्रेशियस डिझाईन इन्स्टिट्यूटतर्फे काही वर्षांपासून ऑनलाइन आणि ऑफलाइन स्पर्धेचे आयोजन केले जाते. या इन्स्टिट्यूटच्या संस्थापक पारुल सोसा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने आझादी का महोत्सवानिमित्त 15 ऑगस्ट 2022 रोजी आंतरराष्ट्रीय पोस्टर स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी देश विदेशातून प्रवेशिका आल्या होत्या.

कॅलिफोर्नियाचा ज्युलियन जॉन्सन, दुबईचा जेसो जॅक्सन, इंदूरची पृथा गडकरी अहमदाबादचा परिमल वाघेला यांच्या समवेत प्रतिभा सुद्धा पहिल्या पुरस्काराची मानकरी ठरली होती. या स्पर्धेचे मीडिया पार्टनर आर्ट अफेअर पेपर, हार्टिएस्ट गॅलरी, द किंग न्यूज, झी 24 तसेच इंडिया न्यूज चॅनल होते. या बरोबरच तिने अनेक चित्रकला स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसे मिळवली आहेत.

प्रतिभा ने “कुठं बोलू नका” या मराठी चित्रपटात एक भूमिका देखील साकारली आहे. कार, सायकल चालवायला प्रतिभा ला खूप आवडते. शिवाय ती नियमितपणे योगासने करीत असते. नियमित चालणे असते.

कितीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरीही खचून न जाता, परिस्थितीला तोंड देत देत आपल्यातील कला कशी जपली पाहिजे, कशी वाढवत ठेवली पाहिजे, हे सर्वानी विशेषत: स्त्रियांनी प्रतिभा कडे पाहून अवश्य शिकले पाहिजे.
प्रतिभाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. आयुष्याला द्यावे उत्तर
    ही कवितेची ओळ
    प्रतिभाताई स्वता जगत आहेत.

    गोविंद पाटील सर नेहरूनगर जळगाव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments