पन्नाशी ओलांडली की, बऱ्याच स्त्रियांना असे वाटते की निम्मे आयुष्य गेले आता काय…? बर ,रिटायरमेंट हा शब्द देखील महिलांच्या नशीबातच नसतो.
लहानपणी वडिलांच्या धाकात, लग्न झाल्यावर पतीच्या व मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या धाकात अनेकींचे आयुष्य जाते.
पण…. आता या वयात बदललेली ती दिसून येते. तिच्या विचारात परिवर्तन झालेले आपण पाहतो. आता ती स्पष्ट बोलते ठामपणे निर्णय घेते आपले मत ही न घाबरता मांडते. अनेक वर्षाच्या खस्ता खाऊन हा आंतरिक बदल जाणवतो.
आता जीवनाकडे बघण्याचा तिचा दृष्टीकोन बदलतो. आवर्जून असे लक्षात येते की आता तर खरे आयुष्य सुरू झाले….एक नवी सुरवात….एक सोनेरी पहाट…एक अदृश्य संधी आपली वाट पाहत असते. थोडे हे शांत झालेले घड्याळाचे काटे जणू सांगतात जग आता तरी स्वतःसाठी.
जबाबदारी व कर्तव्य निभावताना कधी पन्नाशी आली हे कळाले नाही. आता या वयात कोण काय म्हणेल ? कोणाला काय वाटते ? याची चिंता सतावत नाही.
जीवनाच्या अनुभवातून अनेक गोष्टी शिकलेल्या असतात. त्यामुळे आजूबाजूलच्या नकारात्मकतेचा तिच्यावर परिणाम होत नाही अथवा तो करून घेत नाही.
आता हे बोनस आयुष्य जगताना आपल्या राहिलेल्या अनेक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. अनेक छंद, वेळेअभावी न करता आलेल्या गोष्टींना आपल्या त्या छाटलेल्या पंखांना पुन्हा उभारी देऊन नवे स्वप्न पहाते. जाताना कोणतीही खंत नको. हे करायचे राहिले ते मी का केले नाही…? कोणतेही ओझे नको.
भूतनाकातील चुकांवर चर्चा व भविष्याची चिंता न करता वर्तमान जगण्याचा प्रयत्न करते. आत्मिक समाधान व आनंद शोधते. कोणी काही बोलले तर फारसे मनाला लावून न घेता आता खरे तर थोडे सोडून द्यायला शिकते. तेव्हा आवर्जून जाणवते की हेच तर आनंदी जीवनाचे रहस्य आहे.
आता त्या लोकांच्यात रमते जेथे तिला तिचा नव्याने शोध होतो. एक आपलेपणाची जाणीव वाटते. कोणताही संकोच न बाळगता ती मुक्तपणे जगायला शिकते.
ज्या गोष्टी बदलू शकत नाही त्या बदलण्याचा अट्टहास करत नाही राग चिडचिड कमी होऊन आता थोडी शांत होते.
लहान लहान गोष्टीतून आनंद घेण्याचा प्रयत्न करते. कट्यावरच्या कप्पा मैत्रिणींसोबत गप्पा मनसोक्त जगण्याला खऱ्या अर्थाने सुरवात होते. थोडे बंधनातून स्वतःलाच मुक्त करते. ठामपणे नकार देखील देते. आता कोणतीही भीती नसते नवीन गोष्टी शिकण्याचा व करण्याचा प्रयत्न करते. कोणाशी स्पर्धा न करता आपल्या आवडीला प्राधान्य देते. कोणी चांगले म्हणू अथवा वाईट त्याचा फारसा परिणाम होत नाही.
अशी बदललेली ती दिसल्यावर तिला नाव ठेवू नका, तिचा हेवा करू नका. तिच्या हिंमतिचे तिच्या धाडसाचे कौतुक नाही केले तरी चालेल. तिला साथ नाही दिली तरी चालेल. मात्र ! तिचे खच्चीकरण करू नका. तिचा हा प्रवास सोपा नसतो अनेक यातना त्याग करून ती हे नवीन करण्याचा प्रयत्न करत असते.
लेट पण थेट अशा या तिला, तिच्या इच्छाशक्तीला व जिद्दीला सलाम.
अशी ही बदललेली ती अनेकांचे प्रेरणास्थान बनते. जगायला बळ देते एक उमेद देते. ती आवर्जून सांगते की नवीन काही तरी करण्यासाठी कधीही केव्हाही व कोणत्याही वयात सुरवात करता येते. वय हा केवळ एक आकडा आहे. जोपर्यंत इच्छा आहे, एक आशेची ज्योत व जोडीला विश्वास आहे तोपर्यंत अशक्य काहीच नाही. तुम्हाला काय वाटते ….? जरूर सांगा….

— लेखन : रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
Very Nice Mam