शेतकरी संघटनेच्या शरद जोशी यांचे पहिले मोठे प्रदीर्घ चाललेले आंदोलन किरण ठाकूर यांनी कव्हर केले होते. तो थरारक अनुभव ते या भागात सांगत आहेत;
शेतकरी संघटनेचे रेल रोको रास्ता रोको आंदोलन
गेल्या आठवड्यात नाशिकच्या सह्याद्री फार्म लि. चे अध्यक्ष श्री विलास शिंदे यांची भेट झाली. ते करीत असलेल्या शेतीविषयक प्रयोगांमुळे क्रांती कशी होऊ शकते हे पाहिले. आदल्याच दिवशी त्यांनी आडगाव येथे त्यांच्या भागधारकांच्या समोर केलेल्या भाषणाचा संदर्भ त्यांच्या बोलण्यात आला. वर्ष १९८० च्या आसपास नाशिक शहर, आडगाव, पिंपळगाव बसवंत, निफाड आणि परिसरात शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी देशाला विचार करायला भाग पाडणारे आंदोलन उभे केले होते.
“उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळाला पाहिजे” या मागणीसाठी ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हे ते आंदोलन होते. “उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव” एवढी छोटी वाटणारी गोष्ट ते शेतकऱ्यांसाठी मागत होते. सत्ताधारी पक्षाचे आणि विरोधक राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, शासन, ग्राहक अशा सर्वांनाच त्यांनी विचार करायला भाग पाडले होते.
अजूनही त्यांची मागणी मान्य झालेली नाही. शरद जोशी आता आपल्यात नाहीत. त्यांची भूमिका आणि अर्थविषयक तत्त्वज्ञान आता हळूहळू सर्व संबंधित विसरू लागलेले आहेत, अशी शंका यायला लागली. इतक्या वर्षानंतर विलास शिंदे यांनी जाहीरपणे शेतकऱ्यांची ही मागणी बरोबर होती असे सांगणे मला अनपेक्षित होते. त्यामुळे मी पुन्हा एकदा त्या भूतकाळात शिरलो.
शेतकरी संघटने ची शरद जोशी यांनी स्थापना ९ ऑगष्ट १९७९ रोजी पुणे जिल्ह्यात चाकण येथे केली. आपले पहिले आंदोलन रास्ता रोको या स्वरूपात त्यांनी सुरू केले. पुणे- नाशिक हमरस्त्यावर कांदा उत्पादक शेतकरी ठिय्या मारून बसले. प्रवासी आणि माल वाहतूक पूर्ण बंद पडली. नाकेबंदी झाली. असा दीर्घ “रास्ता रोको” भारतात पहिल्यांदाच होत होता. देशातील सर्व वर्तमानपत्रात मोठं मोठ्या हेडलाईन्स झाल्या. हे आंदोलन माझे सहकारी एम एस पगार यांनी पुण्याहून टेलिफोनवर कव्हर केले होते.
काही काळ लोटला. शरद जोशी यांनी चाकण आंदोलनाच्या अनुभवावर आधारित ऊस उत्पादकांचे आंदोलन १९८० मध्ये नाशिक जिल्ह्यात सुरू केले. तेव्हा मी वाराणसीला कार्यरत होतो. वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे माझ्या आईची काळजी घेण्यासाठी मला नाशिकला राहणे आवश्यक आहे. तेथे मला राहू द्यावे अशी विनंती आमच्या यु एन आय च्या संपादकांना दिल्ली येथे पत्र लिहून केली होती. ते त्यांनी मान्य केले. माझी बदली नाशिकला झाली.
आठ-दहा दिवसातच रेल रोको आणि रास्ता रोको असे शरद जोशी यांनी आंदोलन सुरु केले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ते कव्हर करण्याची जबाबदारी साहजिकपणे माझ्यावर आली.मुंबई- आग्रा हा नाशिक मधून जाणारा महामार्ग आणि रेल्वे वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. नाशिक जिल्ह्यातून जाणारे लहान-मोठे सर्व रस्ते बंद होते. छोटे मोठे दगड टाकून रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद पडली. पोलीस आणि एस आर पी यांनी ठिक ठिकाणी बळाचा वापर केला. लाठीमार केला. अश्रु धूर सोडले. गोळीबार केला. खेरवाडी येथे दोन आंदोलकांचा मृत्यू झाला.
तेव्हाचे अंतुले सरकार, पोलीस, आणि एस आर पी यांना हे आंदोलन नियंत्रणात आणणे मुश्कील होऊन बसले. एकाच वेळी इतक्या ठिकाणी गोष्टी घडत होत्या. माझ्यासारख्या एकेकट्या बातमीदाराच्या कौशल्याचा आणि अनुभवाचा कस लागत होता. दैनिक गावकरी आणि देशदूत सारख्या नाशिकच्या वर्तमानपत्रानाआपापल्या तालुक्याच्या बातमीदारांकडून खूप तपशील दिवसभर मिळत होता.
पहिल्या दिवशी मुंबई-पुण्याची वर्तमानपत्र गाफील राहीली. त्यांचे नाशिक मधील प्रतिनिधी यांनी मित्र आणि सहकारी यांच्या मदतीने जमेल तेवढे तपशील मिळवून आपापल्या संपादकांकडे फोन वर पाठवून देणे सुरु केले. माझ्या प्रतिस्पर्धी वृत्तसंस्थेचे म्हणजे पीटीआय चे ज्येष्ठ पत्रकार वयाने खूप, अर्ध वेळ वार्ताहर होते. मी तिशीतला, यु एन आय चा पूर्णवेळ पत्रकार होतो. त्यामुळे माझ्या बातम्या गतीने संकलन करणे आणि फोनवरून मुंबईच्या कार्याला पाठवणे मला शक्य होते.
खेरवाडी च्या आंदोलकांचा मृत्यू ही बातमी यु एन आय ला क्रेडिट देऊन बीबीसीने दिल्लीहून सांगितली. त्या काळात बीबीसी हाच राष्ट्रव्यापी बातम्यांसाठी एकमेव सोर्स होता. त्यामुळे रात्री त्यांचे बुलेटीन खूप ऐकले जायचे. त्या एकाच दिवसात नाशिकचे जिल्हाधिकारी, डीएसपी, शेतकरी संघटनेचे नेते या सगळ्यांमध्ये माझ्या अस्तित्वाची दखल घेतली गेली. दुसऱ्या दिवशीपासून हे सर्व सोर्स मला शोधत यायला लागले. आंदोलन पुढे बराच काळ चालले. पण या एका घटनेच्या कव्हरेज मुळे मी या सोर्स मध्ये आणि तेथे जमलेल्या सर्व बातमीदारांमध्ये ओळखला जाऊ लागलो.
मुख्यमंत्री अंतुले आणि स्थानिक मंत्री बळीराम हिरे, आमदार, खासदार या सगळ्यांनी हे आंदोलन दडपून टाकण्याचे सर्व प्रयत्न सुरू केले होते. तितक्याच नेटाने शरद जोशी, माधवराव खंडेराव मोरे, प्रल्हाद पाटील कराड आणि माधवराव बोरस्ते या नेत्यांनी १९-२० दिवस चाललेले हे आंदोलन धगधगत ठेवले. हे नेते आणि आंदोलक यांनी जिल्ह्याचे तुरुंग खचाखच भरले. इतर जिल्ह्यात आंदोलनाचे लोण पसरले. शरद जोशींचे आंदोलनाचे तंत्र पूर्णतः नवीन, वेगळे होते. शेतकऱ्यांना समजेल अशी अर्थकारणाची भाषा ते वापरत. पुराणातील दाखले देत. गनिमी कावा कसा वापरायचा हे आंदोलकांना समजेल अशा पद्धतीने आखणी करत.
मुंबई आग्रा महामार्ग रास्ता रोको मध्ये पूर्ण बंद पडला. दोन्ही बाजूने ट्रक ड्रायव्हर अडकून पडले. तेव्हा त्या संपूर्ण भागामध्ये प्रचंड तणाव होऊ लागला. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा शरद जोशी यांनी तीन दिवस आंदोलनाला सुट्टी दिली. परत आंदोलन सुरू करू असं जाहीर केलं. त्याप्रमाणे आंदोलन पुन्हा सुरू झालं. हे सर्वच अभूतपूर्व होतं.
एक मात्र नमूद करणे आवश्यक आहे. आंदोलनाची व्याप्ती एवढी मोठी होती कि प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहणे आणि प्रत्यक्षदर्शी म्हणून फक्त माझ्या संस्थेसाठी म्हणजे यु एन आय साठी मला किंवा बाहेरगावच्या वर्तमानपत्रासाठी बातम्या आणि लेख लिहिणे हे अशक्य होते. तशी अपेक्षा देखील नसते हे खरे. घटनांमधील तपशिलाची देवाण-घेवाण इतर प्रसंगी देखील चालूच असते. या आंदोलनाच्या व्याप्ती मुळे आणि उग्रते मुळे देखील एकमेकांना अशी मदत बातमीदार करत असत. मी त्याला अपवाद नव्हतो.

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800