भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन, काल ६ डिसेंबर रोजी झाला. या निमित्ताने ॲड. रोहिणी जाधव यांनी बाबासाहेबांवर केलेल्या कविता आज वाचू या.
अल्प परिचय –
ॲड. रोहिणी जाधव.
राहणार सांताक्रूझ, मुंबई
शिक्षण – एल एल एम, आय.पी.आर (पी जी डी)
व्यवसाय – वकिली.
भारत केन्द्र सरकार द्वारे नोटरी म्हणून नियोजित.
काव्यलेखन, निंबध, लेखन, नृत्य अभिनय, चित्रकला, रांगोळी काढणे इत्यादी छंद आहेत. साहित्य परिषद, दादर शाखेच्या, कवितांगण, अष्टपैलू कला अकादमी मुंबई अक्षरमंच साहित्य इत्यादी समूहाच्या त्या सदस्या आहेत.
इयत्ता दूसरीला असल्यापासून त्यांनी काव्यलेखनास सुरूवात केली. त्यानंतर सातत्याने लेखन करीत आहेत. प्रथम कविताश्री ह्या मासिकातून त्यांची कविता प्रकाशित झाली.
शालेय, महाविद्यालयीन जीवनापासून आतापर्यंत अनेक बक्षिसे, पारितोषिके प्राप्त केली आहेत. अनेक एकांकिकेत अभिनय केला आहे, रांगोळी काढणे, वक्तृत्व, वादविवाद, निंबध लेखन, नृत्य, नृत्यदिग्दर्शन ही केले आहे.
मोहिनीराज, आभाळमाया, शब्दांकूर, इत्यादी काव्यसंग्रहातून
मोहिनीराज, भास्कर, शब्दांकूर, शब्दगांधार, स्नेहल दिपावली विषेशकांतून विशेषांकातून काव्य प्रकाशित झाले आहे.
फिनिक्समाॅल येथिल पॅनटलून द्वारे मदर्स डे निमित्त आयोजित सौंदर्य स्पर्धेत २०१८ मध्ये व्दितीय क्रमांकाने विजेती.
महाराष्ट्र शासन आयोजित २०२१ रोजी एकांकिका स्पर्धेत “एक झुंज वार्याची” ह्या नाटकात अभिनय.
३० जुलै २०२३ रोजी एक दिवसीय कोकण मराठी साहित्यसंमेलनात काव्य सादरीकरणा साठी सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
अस्मिता ह्या गोरेगाव येथील संस्थेने २०२२ रोजी आयोजित केलेल्या प्रतिष्ठित रांगोळी प्रदर्शनात सहभाग.
२० ऑगस्ट २०२२ रोजी कोकण नाऊ वाहिनीवर प्रभाते मनी कार्यक्रमात मुलाखत.
यंग स्टार वसई विरार, कला क्रिडा विकास मंडळ आयोजित ऑगस्ट २०२३ श्रावण सुंदरी स्पर्धेत सहभाग.
मराठी राज्यभाषेचे लोकप्रिय अनियतकालिका वर्ल्ड व्हिजन टाईम्ससाठी, “आम्ही मुंबईकर” साप्ताहिकासाठी न्यायप्रभात हया मासिका साठी तसेच अक्षरमंच साहित्यमंचा साठी लेखन.
अविचल निष्ठेने आणि ध्येयाने आपण आजवर आपल्या कर्तृत्वाने आदर्श आणि शुभ्र धवल यशाची नाममुद्रा उमटवल्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे हार्दिक स्वागत आहे.
– संपादक
१. एक पाणवठा….
(चवदार तळे सत्याग्रहावर आधारीत कविता)
एक पाणवठा……
धूत होता गुरं ढोरं
नागडी उघडी पोर
भांडीकुंडी कपडेलत्ते सारे सारे
धूत नव्हता मलीन मनाची लकतरे
एक पाणवठा…..
ऐकित ऐकवित होता गप्पा
सासू सुनेचा डाव छुपा
नवरा बायकोचा मनाचा कप्पा
प्रत्येक नात्यांचा गाठित टप्पा
उघडीत नव्हता मात्र मनाचा माणूसकीचा कप्पा
एक पाणवठा….
शेणमाती होता खात
विचारत होता जात
शिवाशिवीने बडवित होता उर
माणूस असून माणसाला लोटीत होता दूर
आसवांनी त्यांच्या त्याच्या काथळ ह्रदयास येत नव्हता पूर
एक पाणवठा….
उन्हात आटत होता
परि बारामहिने नयनी त्यांच्या दाटत होता
कधी पागोळीला त्यांना थेंबे-थेंबे भेटत होता
स्पर्शाने मात्र त्यांच्या बाटत होता
क्रांती च्या मशाली उरी पेटवित होता
थेंबाथेंबाने अग्नीफुले फुलवित होता
एक पाणवठा….
समानतेचा त्याने धडा गिरवला
किनारी त्याच्या निळा झेंडा मिरवला
महामानवाच्या ओंजळीत आला
अन अचानक पवित्र झाला
चाखली चव त्याने अन चवदार झाले.
२. महामानव
तिमिर सारे पिऊनी घेई तेजोमय दिवा
समानतेच्या प्रकाशाने मार्ग आखितो नवा
क्रांतिसुर्याचे तेज प्रकाशती दाही दिशा
अंधार पिऊनी उगवे नवी सोनेरी उषा
तेजाने तुझ्या भास्करा फुलतात नव्या आशा
पुर्ण होई मनातील ज्योतिर्मय अभिलाषा
तू शिकवलेस माणसास माणूसकी ची भाषा
पुसलीस अमानूष विषमतेची रेषा
अंगार पेटलेले असताना तव भवताली
पेटवूनी मशाली पेटविलेस रान उरी
शिक्षणाची सोनेरी दोरी पाळण्यास बांधली
हया पंखात भरली चैतन्याची नवी खुमारी
थोर तुझ्या पुण्याई मुळे लेकरांनी घेतली
दैदीप्यमान गगनचुंबी आकाशी भरारी
पार केलेस निर्भिडपणे अरण्य घनदाट
चिखलदरी खोऱ्यातून चोखलीस वाट
आमुच्यासाठी वाढलेस सोन्याचे ताट
घासा घासावरी आहेत तुझे ऋण दाट
शोषित पिडीतांचा झालास तू आधार
अन्याया प्रती तू जणू तळपती तलवार
अवघ्या स्त्रियांचा करशी उध्दार शिलेदार
समाजावरी ह्या तुझे लाख लाख उपकार
कशी कुणी आखावी कक्षा तुझ्या थोर कार्यास
प्रज्ञासुर्या तू उध्दारले सार्याच समाजास
मुकनायका तू रुढी परंपरा तोडल्यास
कोटी कोटी नमन तुझ्या शौर्यास औदार्यास
कुणा एकाच जाती साठी नव्हती केवळ खंत
मायेच्या छायेत सार्यास घेणारा थोर संत
प्रकाशले जग न उरली कसली भ्रांत
महामानवा तू तर सार्यांचाच खरा भगवंत
३. भिमरायाची सावली
भिमरायाची सावली
माझी रमाई माऊली
संगे पावलो पावली
तिच्या मायेची सावली ॥
फुलवी संसार वेल
सोसूनी अपार हाल
पाठिशी राहि खंबीर
बनूनी त्यांचा आधार ॥
विसरलीस तू रमा
तुझे दिलेले वचन
साथ सोडीता रमा
झाले एकाकी जीवन ॥
जन्मोजन्मी ची साथ
ती भरलेल्या संसारात सुखी
सोडूनी भिमाचा हात
निघूनी गेली अर्धात ॥
काळाने घेतली झेप
रमा घेई काळझोप
मावळले सारे दिप
कोणीच नसे समीप ॥
आक्रोश ते आंक्रदन
भिम ठेवी मनोमन
काळीज चिरतो क्षण
व्याकुळ भीमाचे मन ॥
तुजविण हे जीवन
जणू काटेरी हे वन
रोज तुझी आठवण
भीम ह्रदयी तीक्ष्ण बाण ॥
— रचना : ॲड. रोहिणी जाधव. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
khupach Sundar ahe rachna khupach uttam….
अप्रतिम काव्य रचना ॲड रोहिणी जाधव.अडम
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्तुत्व, विचार तसेच रमाई चे योगदान कवितांतून छान मांडले आहे.
atishay sundar ashi kavita aahe man mohak
सुप्रसिद्ध कवयित्री ॲडव्होकेट रोहिणी जाधव यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिलेल्या
कविता मनाला खूप भावल्या.भीमाई माऊलींचा जिव्हाळा
रोहिणी ताईंच्या कवितेत ओतप्रोत भरलेला आहे.
बाबासाहेबांचे विचार कवयित्रीच्या रक्तात परिपूर्ण भिनलेले दिसून येतात.बाबासाहेबांच्या महान कार्याचा अभ्यास तसेच त्यांच्याविषयीची आत्मियता व प्रेम कवितेतून दिसून येतो.महामानवाला दिलेल्या सुंदर
मानवंदने बद्दल कवयित्री रोहिणी जाधव यांचं मनापासून अभिनंदन.भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना
कोटी कोटी वंदन.
राजेंद्र वाणी
दहिसर मुंबई 🙏
महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या रचना उत्तम.