स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून बालरंगभूमी परिषदेने राज्य पातळीवर एक उपक्रम आखला. तो म्हणजे महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘इतिहास महाराष्ट्राचा’ ही स्पर्धा.
महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात बालरंगभूमी परिषदेची शाखा स्थापन झाली आहे. केंद्रीय समितीच्या अध्यक्ष नीलम शिर्के आणि कार्याध्यक्ष राजू तुलालवार यांच्याकडून जिल्हा स्तरावरील शाखांना उपक्रमाचे स्वरूप कळविले जाते. त्याप्रमाणे त्या शाखा कामाला लागतात.
त्याप्रमाणे ‘इतिहास महाराष्ट्राचा’ या उपक्रमाचे स्वरूप आमच्या ठाणे शाखेला कळविण्यात आले ते असे, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव ते राज्याभिषेक’ यातील कोणत्याही प्रसंगावर नृत्य, नाट्य, गीत, एकपात्री सादरीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन करायचे. ठाणे शहरातील विविध शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांची स्पर्धेची प्राथमिक फेरी घ्यायची. त्यात पहिली ते चौथी व पाचवी ते दहावी अशा दोन गटांतून पहिले दोन विद्यार्थी निवडायचे. प्रत्येक जिल्ह्यातून असे निवडले गेलेले दोन कलाकार अंतिम फेरीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आपली कला सादर करतील.
आम्ही ठाणे शाखेच्या कार्यकारिणी सदस्यांनी ठाण्यातील शाळांना संपर्क करायला सुरूवात केली. त्यात १५, १६, १७ अशी मोठी सुट्टी आल्यामुळे संपर्क करणे अवघड गेले. आम्ही शक्यतो मराठी शाळांना संपर्क करत होतो. पण इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी स्वतःहूनच आम्हाला संपर्क केला. त्यांचेही विद्यार्थी या उपक्रमात सहभाग घेण्यास उत्सुक होते. एका हिंदी माध्यमाच्या शाळेनेही मराठीत कार्यक्रम सादर करायची तयारी दाखवली. त्यामुळे आठवड्याभरातच १७ शाळांकडून एकूण १३५ विद्यार्थ्यांनी नांवे नोंदविली. यात एकल सादरीकरण व समूह सादरीकरण असे दोन प्रकारचे सादरीकरण होणार होते.
आम्ही ही स्पर्धा १८ ऑगस्टला ठाण्यातील वारकरी भवनच्या हॉलमध्ये घेतली. या सुंदर हॉलमध्ये सकाळी नऊ वाजल्यापासूनच मुलांची लगबग सुरू झाली होती.
नऊ-दहा वर्षांची मुले कुणी मावळे, कुणी बालशिवाजी, कुणी जिजाऊ तर कुणी मराठमोळ्या स्त्रिया अशी विविध वेशभूषा करून शिस्तीत येऊन बसली. सकाळी साडेनऊपर्यंत हॉल भरलाही.

उद्घाटन समारंभाला बालरंगभूमी परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष राजू तुलालवार उपस्थित होते. ते नेहमी बालनाट्य शिबिरे घेत असल्यामुळे मुलांच्या ओळखीचे होते. त्यांना पाहून मुलांना आनंद झाला. ठाणे शाखेचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ यांनी त्यांचे स्वागत केले. सतीश प्रधान ज्ञानसाधना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. मनीषा राजपूत या पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. दीप प्रज्वलन करून पाहुणे स्थानापन्न झाले. मग मी (मेघना साने) माझ्या निवेदनात, नुकताच स्वातंत्र्यदिन झाला. सध्याचा काळ हा युद्धांचा आहे. आपल्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूर योद्धे निपजले तर आपल्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहणार आहे. म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राची आपण उजळणी करूया. त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवूया.’ असे मनोगत व्यक्त केले.
स्पर्धेच्या परीक्षकांपैकी गायिका श्रुती पटवर्धन यांनी आपल्या सुरेल आवाजात मुलांसोबत कराओके ट्रॅकवर ‘हे राष्ट्र देवतांचे’ हे स्फूर्तीगीत सादर केले. प्रेक्षकातील मुलेही त्यात सहभागी झाली.
या गायनामुळे उत्तम वातावरणनिर्मिती झाली. राजू तुलालावर सर व मिलिंद बल्लाळ सर यांनी मुलांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या.
पहिली ते चौथीच्या मुलांचे सादरीकरण सुरू झाले. पहिला स्पर्धक नीलय जाईल हा साडेपाच वर्षांचा चिमुकला होता. त्याने ‘गुणी बाळ असा जागसि का रे वाया’ हा शिवरायांचा प्रसिद्ध पाळणा ट्रॅकवर गाऊन स्पर्धेची सुंदर सुरूवात केली.

त्यानंतर एकामागून एक सादरीकरण होत गेले. कौस्तुभ सुतार नावाचा एक आठनऊ वर्षाचाच मुलगा असेल, पण हातात माईक घेऊन ढोलकीच्या साथीने दमदारपणे पोवाडा म्हणत होता. माईक धरलेला हात आळीपाळीने बदलून दुसऱ्या हाताने ऍक्शन करण्याचे कसब त्याला चांगले अवगत होते.

नऊ वर्षांची चिमुरडी मुद्रा दामले ही एकपात्री सादर करण्यासाठी आली. हातात दुपट्यात गुंडाळलेले बाळ (अर्थात खोटे) घेऊन माईकवर बिनधास्त बोलत जिजाऊंचा अभिनय करत होती. खांद्यावरची शाळासुद्धा छान सांभाळत होती. तिचं पाठांतर आणि शब्दोच्चारण याचं आम्हाला कौतुक वाटलं. आजूबाजूला काहीही होवो, तिची एकतानता ढळत नव्हती. अपेक्षेप्रमाणे तिला बक्षीस मिळालेच !

अर्णव बोपलकर नावाच्या एका दहा वर्षांच्या मुलाने फक्त तानपुऱ्याच्या साथीने शिवाजीचे गीत गायले. एखाद्या मोठ्या गायकासारखा त्याचा कसलेला सूर होता. त्यानेही बक्षिस पटकावले.
या गटासाठी परीक्षक होत्या सुनीता फडके व श्रुती पटवर्धन. नाट्यक्षेत्राचा दीर्घ अनुभव असलेल्या सुनीता फडके व संगीताचे अनेक कार्यक्रम गाजवलेल्या श्रुती पटवर्धन या चिमुकल्या मुलांचे सादरीकरण पाहण्यात गुंगून गेल्या होत्या.

गट दुसरा (माध्यमिक शाळा)चे सादरीकरण सुरू झाले. रुही बांधेकर नावाच्या एका मुलीने जिजाऊ आणि बालशिवाजीचा प्रवेश इतका सुंदर केला की आमच्यावर तिची मोहिनीच पडली.

त्यानंतर श्रेया प्रदीप जाधवने एकपात्री करून बाजी मारली. या दोघींनीही बक्षीस पटकावले. या गटात एकूण सव्वीस मुलांनी सादरीकरण केले.
लोक साहित्य आणि लोकसंस्कृती क्षेत्रातील दिग्गज अशा शैला खांडगे या स्पर्धेच्या परीक्षक होत्या.
वेगवेगळ्या प्रकारच्या सादरीकरणांचे मूल्यमापन करताना परीक्षकांचा अगदी कस लागला. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात मिलिंद बल्लाळ सरांनी मुलांसाठी आणलेला खाऊही आम्ही मधून मधून वाटत होतो.

जेवणाच्या सुट्टीनंतर समूह सादरीकरणाची फेरी सुरू झाली. यात मुलांनी चक्क दहा मिनिटांचे नाट्यप्रवेश बसवले होते. तसेच समूह गायन, समूह नृत्ये यांनी कार्यक्रम रंगू लागला. केवळ पोषाखच नव्हे तर मुलांच्या शिक्षकांनी प्रॉपर्टीचीसुद्धा व्यवस्था केली होती. ढाल, तलवारी, भाले, छत्र चामरे घेऊन समूह उपस्थित होते. स्पर्धक, पालक, शिक्षक आणि काही मुलांचे आजी आजोबादेखील उपस्थित होते. गर्दी इतकी झाली की काहींना जिन्यात बसावे लागले. डी. ए. व्ही. पब्लिक स्कुलच्या मुलांनी पेटी आणि ढोलकीच्या साथीने ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हे गाणे अतिशय सुरेलपणे सादर केले. त्यांना बक्षीस मिळाले.

तर सावित्रीबाई थिराणी विद्यालयाच्या मुलांनी ‘जन्मोत्सव ते राज्याभिषेक’ हा विषय घेऊन एक नाटक अभिनित केले. त्यात शिवाजीचा राज्याभिषेक होतो तेव्हा भालदाराने दिलेली जोरदार ललकारी आणि आत्मविश्वासयुक्त करड्या नजरेने पाहणारा शिवाजी, त्याच्या डोक्यावर छत्र चामरे ढाळणारे सेवक अशी मंडळी पुढे आली. त्यावेळी भारावून जाऊन सर्व प्रेक्षक आपोआप उभे राहिले व टाळ्या वाजवू लागले. परीक्षक ज्योती टिपणीस आणि आम्हा आयोजकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. अर्थात याही सादरीकरणाला बक्षीस मिळालेच. एकूण सतरा समूह सादरीकरणे झाली.
अशा प्राथमिक फेऱ्या महाराष्ट्रातील सर्व शाखांमध्ये नुकत्याच पार पडल्या. आता अंतिम फेरी अनंत चतुर्दशीनंतर लगेचच होणार आहे.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बालरंगभूमी परिषदे ठाणे शाखेचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ, उपाध्यक्ष पी. एन. पाटील, उपाध्यक्ष मेघना साने, कार्याध्यक्ष प्रांजली गंधे, कोषाध्यक्ष दयानंद पाटील, सहकार्यवाह राजेश जाधव, सदस्य जयश्री इंगवले, सदस्य भारती सोनगिरे, सदस्य सुचेता रेगे यांनी विशेष परिश्रम घेतले. डॉ. राजू सुब्रमण्यन् यांनी या स्पर्धेसाठी आर्थिक साहाय्य केले.
दोनच महिन्यांपूर्वी आमच्या ठाणे शाखेने आषाढी एकादशीनिमित्त ‘अभंगवारी’ ही गाण्याची स्पर्धा घेतली होती. तेव्हाही शाळांचा प्रतिसाद उत्तम होता. मुलांनी अभंग, भारूड, ओव्या सादर केल्या होत्या.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये विशेष मुलांचे संमेलन आमच्या शाखेने घडवून आणले होते. ठाणे आणि परिसरातील विशेष मुलांसाठी कार्य करणाऱ्या सत्तावीस शाळा तेव्हा सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यातील कलाकारांना व्यासपीठ मिळाले. बालरंगभूमी परिषद अशा प्रकारे विद्यार्थ्यांना चांगल्या विषयांची गोडी लावत आहे हे पाहून समाधान वाटते. मी ठाणे शहर शाखेची उपाध्यक्ष म्हणून या सगळ्या आयोजनाचा आनंद घेत आहे.

— लेखन : मेघना साने. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800