एखादी व्यक्ती आकडे आणि अक्षरे अशा भिन्न क्षेत्रात कशी लीलया संचार करू शकते, याचे उदाहरण म्हणून कवयित्री, लेखिका, यूट्यूबर वसुंधरा घाणेकर यांच्याकडे बघता येईल.
वसुंधरा घाणेकर यांनी गणितात बी.एस्सी पदवी प्राप्त केल्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 38 वर्षे नोकरी केली. ही नोकरी करीत असतानाच त्यांनी साहित्याची आवड जोपासली. सामाजिक जाणीव असलेल्या त्यांच्या समस्या प्रधान कथा, नामवंत दिवाळी अंकात प्रसिद्ध होत असतात. “ज्याचा त्याचा परीघ” हा त्यांचा कथा संग्रह डिंपल पब्लिकेशन 2007 साली प्रकाशित केला आहे. तर 2016 साली “पुनः नव्याने…” हा कथा संग्रह मॅजेस्टिक पब्लिशिंग हाउस ने प्रकाशित केला. या कथा संग्रहास 2017 वामनराव रेगे पुरस्काराने सन्मानित केले गेले. त्यांचा तिसरा कथासंग्रह, “पांढरा गुलमोहर” संधिकाल प्रकाशन ने 2024 मध्ये प्रकाशित केला. तर 2025 साली “पुन्हा नव्याने” ह्या कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती निघाली.
मुलांना मराठी भाषेची गोडी लागावी यासाठी त्या स्वखर्चाने “सीझलिंग ब्राऊनी” ही यू ट्यूब वाहिनी चालवित असतात. आज आपण आपल्या पोर्टल वर त्यांची कविता आणि यू ट्यूब वाहिनी ची लिंक देत आहोत. ती आपल्याला नक्की आवडेल, असा विश्वास आहे.
वसुंधरा घाणेकर यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे.
— संपादक
एकदा किनई कावळेदादा,
फिरत फिरत गेले तळ्यावर
काळा काळा सूट अंगात
मोठ्ठा गॉगल डोळ्यावर
कावळ्याने गॉगल काढून पाहिले
तळ्यात अगदी खोss ल, खो ss ल
म्हणताच त्याने, हाय, हॅलो
मासे म्हणाले बोल बोल.
इकडून तिकडे सुळकन पोहणारे,
दिसताच मासे…
इकडून तिकडे सुळकन पोहणारे,
दिसताच मासे.
गट्ट करूया म्हणत
कावळ्याने पसरली की
त्याची पिसे.
मोठा मासा येऊन म्हणाला,
हा तर वाटतोय
काळा बगळा.
पाय दिसतात लहान,
पण माशांवर दिसतोय
तसाच डोळा !
मासे घाबरले
गेले तळ्यात
खोल खोल आत खूप
कावळ्याच्या तोंडाला
बसलं मग, कुलूप.
इतक्या खोल पाण्यात
जाईनच की मी बुडून !
कावळोबा ने केला विचार
जावं का उंच उडून
इतक्या खोल पाण्यात
जाईनच की मी बुडून !
कावळोबाने केला विचार,
आणि मग
गेला उंच उडून !
गेला उंच उडून !!
ही कविता आपल्याला पुढील लिंक वर क्लिक करून पाहता येईल.
आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

— कवयित्री : वसुंधरा घाणेकर.
— सादरकर्ती : इरा कुमठेकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️+91 9869484800

सुंदर बालकविता व सादरीकरण! लहान मुलांसाठी तर मनोरंजक आहेच पण मोठ्यांनी देखील ही कविता ऐकून त्यांच्या आत दडलेल्या लहान मुलाच्या विश्वात रममाण व्हावे इतकी गम्मत या कवितेत आहे! Video & audio सुद्धा छान प्रसन्न आहे.