Sunday, January 25, 2026
Homeसाहित्य"बाळासाहेबांची मी घेतलेली मुलाखत"

“बाळासाहेबांची मी घेतलेली मुलाखत”

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज १०० वी जयंती आहे. या निमित्ताने, दूरदर्शन चे निवृत्त संचालक श्री चंद्रकांत बर्वे यांनी लिहिलेल्या आणि त्यांच्या “मु पो दूरदर्शन” या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेला, बाळासाहेब गेल्यानंतर
दै. सामनाने प्रकाशित केलेला लेख पुढे देत आहे.

बाळासाहेबांना विनम्र अभिवादन.
— संपादक

आज जरी बाळासाहेब ठाकरे आपल्याला सोडुन गेलेले असले तरी आज माध्यमक्रांती झालेली असल्याने साहेबांची भाषणे पाहणे ऐकणे ही सहजसाध्य बाब झालेली आहे पण 80 च्या दशकातली गोष्ट वेगळी होती. तेंव्हा आकाशवाणी व दुरदर्शन ही दोनच इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे होती. त्या काळी मी आकाशवाणीवर कार्यक्रम निर्माता होतो. 1985 साली माझी बदली मुंबईला झाली. सर्वच तरुंणाना बाळासाहेबांचे आकर्शण असते तसे मलाही होते. त्या काळात बाळासाहेबांची आकाशवाणीवर मुलाखत ही कल्पनाच अशक्य मानली जायची. मी शिवसैनिक नसलो तरी एक निर्माता म्हणुन आपण त्यांची मुलाखत घेतली पाहिजे ही गोष्ट मला मनोमन पटलेली होती, पण कॉंग्रेसच्या राज्यातील तो काळच असा होता की ……..असो !

पण 1989 साली केंद्रातील सत्ता बदलली. आता बदललेल्या परिस्थितीत आपण त्यांची मुलाखत घ्यायला हरकत नसावी ही कल्पना केंद्र संचालक श्री मधुकर गायकवाड यांना मी आमच्या कार्यक्रम मिटींगमध्येच सांगितली. ते धाडसी कार्यक्रमांना नेहमीच तयार असत. विचारसरणीने ते शिवसेनेच्या विरोधी पण आकाशवाणीसाठी त्यांची राजकीय मुलाखत घेतली पाहिजे याबद्दल मात्र ठाम! त्यांनी लगेच परवानगी दिली. ही चर्चा आमच्या कार्यक्रम मिटींगमध्येच झाली त्यामुळे मी बाळासाहेबांना कुणाच्या मार्फत भेटणार अशी चर्चा ऑफिसात सुरु झाली व यांच्या मार्फत किंवा त्यांच्या मार्फत भेटता येईल वगैरे सूचनाही, पण मला जेवढे बाळासाहेब समजले होते त्यावरुन मी एक ठरवले आपणच स्वतः मातोश्रीवर फोन करायचा…… फोन केला

मी चंद्रकांत बर्वे, आकाशवाणीतील एक कार्यक्रम अधिकारी मला साहेबांची आकाशवाणीसाठी मुलाखत घ्यायची आहे.

काय ? आकाशवाणीसाठी मुलाखत ?
होय. आकाशवाणीसाठी मुलाखत!.
कशाप्राकारची मुलाखत?
राजकीय मुलाखत.
आकाशवाणीसाठी राजकीय मुलाखत?
होय. आकाशवाणीसाठी बाळासाहेबांची राजकीय मुलाखत.
तुम्ही मागाहुन फोन करा.

असे करत, काही फोन झाले.

शेवटी मातोश्रीवरील सूचनेनुसार मी, श्री मनोहर जोशी सरांना फोन केला.

मी, चंद्रकांत बर्वे, आकाशवाणीतील एक कार्यक्रम अधिकारी मला बाळासाहेबांची आकाशवाणीसाठी मुलाखत घ्यायची आहे.
काय? आकाशवाणीसाठी मुलाखत ?
होय.
बाळासाहेबांची?.. आकाशवाणीसाठी?…त्यांनी स्पष्टपणे विचारले.
होय. बाळासाहेबांची ! आकाशवाणीसाठी ! मी तितकेच स्पष्टपणे सांगीतले.
कशाप्राकारची मुलाखत व्यंग चित्रकार म्हणुन की..?
नाही. शिवसेनाप्रमुखांची राजकीय मुलाखत.
आकाशवाणीसाठी शिवसेनाप्रमुखांची राजकीय मुलाखत?
होय आकाशवाणीसाठी शिवसेनाप्रमुखांची राजकीय मुलाखत!
सर मला म्हणाले मला प्रत्यक्ष भेटा.
कुठे ?
उद्या दुपारी हॉटेल अँबॉसडरमध्ये मी एका कार्यक्रामासाठी येणार आहे.

मी तिथे गेलो, भेटलो, बोललो. त्यांनी मला न्याहाळले. त्यांची खात्री पटली असावी. म्हणाले, मी आजच साहेबांशी बोलतो. तुम्ही उद्या दुपारी मातोश्रीवर फोन करा.

फोन केला. साहेबांनी मला भेटीसाठी दुसऱ्या दिवशी बोलावले.
मी व माझे ज्येष्ठ सहकारी श्री जयंत एरंडे पूर्ण तयारीने साहेबांना भेटायला गेलो.
मातोश्रीवर मीनाताईंनी आमचे चहापान करुन स्वागत केले.
थोड्याच वेळात साहेबांनी आम्हाला आत बोलावले.
आम्ही आत गेलो. थोडेसे दडपण होतेच. परिचय करुन दिला
बोला तुम्ही काय विचारणार आहात?

आमची प्रश्नावली तयार होतीच. एकेक प्रश्न सांगायला सुरुवात केली.

साहेब काही प्रश्नांची उत्तरे सांगता सांगता अगदी मोकळेपणे बोलत होते. एवढा मोठा नेता अगदी मोकळेपणे आमच्याशी गप्पा मारत होता. आमच्या मनावरचे दडपण होते ते नाहीसे झाले. प्रश्नावली ऐकताना त्यांनी कोणताही प्रश्न कमी करण्यास सांगीतले नाही किंवा स्वतः एखादा सुचवलाही नाही.

साहेबांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, झोपडपट्टी निर्मुलन योजना वगैरे माहिती सांगीतली.

माझा पुढचा प्रश्न, यासाठी पैसे कुठुन आणणार?
साहेब नुसते ..हं.. म्हणाले.
त्यापुढचा प्रश्न न विचारता मी आपला उत्तरासाठी तसाच थांबुन राहिलो.
साहेब मिश्किलपणे म्हणाले, पैशाची चिंता नको करुस. मी ते स्मगलिंग करुन आणीन. पुढला प्रश्न विचार. मी सोडुन सगळ्यांना हसू आले. थोड्या वेळाने मलाही.

अनेक प्रश्न विचारता विचारता पुढला प्रश्न विचारला. आपल्यानंतर शिवसेना प्रमुख कोण ?

यावर साहेबांनी मात्र मला म्हटले इथे येणारे सगळेजण मला दिर्घायुष्य चिंतितात पण तुम्ही मात्र!
मी एकदम भानावर आलो. म्हटले तसे नाही. आपण शतायुषी व्हावे असेच मलाही वाटते. हवे तर मी हा प्रश्न कमी करतो.
नाही नाही. साहेबांनी मला लगेच थांबवले. कांहीही प्रश्न विचारा. मी कोणत्याही प्रश्नाला घाबरत नाही. असो. बोलता बोलता दीड तास कसा गेला ते कळलेच नाही. ध्वनिमुद्रणाची तारीख ठरली. दोन दिवसांनी सेनाभवनात ध्वनिमुद्रण झाले. अर्थात मुलाखतीचा अवधी जास्त झाला. मी म्हटले मी या कार्यक्रमाचा कांही भाग कमी करीन पण कुठेही ध चा मा होणार नाही, किंवा अर्थाचा अनर्थ होणार नाही याची खात्री बाळगा. हवे तर कुणाला तरी संपादित भाग ऐकण्यासाठी पाठवा. बाळासाहेब म्हणाले, मला तुमची खात्री आहे अणि कांही चूक झाली तरी चिंता करु नका. कित्येकदा पत्रकार माझ्या भाषणाचे वाट्टेल ते रिपोर्टींग करतात पण मी कशाला घाबरत नाही.

सर्व वृत्तपत्रांना प्रेसनोट पाठवली. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांना कळवण्यात आले सर्व वृत्तपत्रांनी सामना, म.टा., लोकसत्ता, सकाळ, सर्वांनी २२ डिसेंबरला प्रेसनोट छापली.

शनिवार दि.23 डिसेंबर 1989 रोजी सकाळी 7.15 वा. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांची प्रथमच राजकीय मुलाखत प्रसारित झाली.

महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरुन ती सहक्षेपित करण्यात आली. ती मुलाखत शिवसेनेच्या सर्व शाखांवर रेडीओवरुन ऐकवण्यात आली. आम्ही घेतलेली मुलाखत फारच अभ्यासपूर्ण होती. त्यात पाहुण्याचा मान राखला होता पण चापलुसी नव्हती. मुलाखतीला उत्तम प्रतिसाद मिळाला, मला अभिनंदनाचे खूप फोन आले.

पण २४ डिसेंबरला मात्र सर्व पेपरातून पहिल्या पानावर शरद पवार यांची बातमी. त्यांनी बाळासाहेबांची आकाशवाणी मुलाखत प्रसारित करते यावर एकदम नाराजी व्यक्त केली आणि दिल्लीला तक्रार करणार असे सांगितले आणि आम्ही त्यांना देखील मुलाखतीसाठी विनंती केली होती पण त्यांनी आम्हाला मुलाखत देणार नाही हेही जाहीर केले.

पुढल्या दिवशी 25 डिसेंबरला केंद्र संचालक मधुकर गायकवाड यांची बातमी. त्यांनी आकाशवाणी वरील मुलाखतिचे समर्थन केले.

२६ डिसेंबरला मी ऑफिसात पोहोचताच सर्वत्र हाच चर्चेचा विषय. गायकवाड साहेबांनी मला कार्यक्रमाची कॉपी त्वरित दिल्लीला पाठवायला सांगितले. आम्ही कुठल्याच ब्रोडकास्टिंग कोडचे उल्लंघन केलेले नाव्क्ते, त्यामुळे काहीही चिंतेचे कारण नव्हते.

माझा दूरदर्शनचा मित्र नंदकुमार कारखानिसचा फोन आला. त्यालाही दूरदर्शनसाठी मुलाखत घ्यायची होती. म्हणाला माझी बाळासाहेबांची भेट घालुन दे.

मी त्याला म्हटले बाळासाहेबांची भेट घ्यायला कुणाच्याही वशिल्याची गरज नाही. मी जसे केले तसच तुही कर. पुढे त्याने तसेच केले आणि काही दिवसांनी मुंबई दूरदर्शनवर बाळासाहेब ठाकरे यांची प्रथमच मुलाखत प्रसारित झाली.

असो, पण पुढे पेपरमध्ये खूप दिवस चर्चा मात्र दूरदर्शनच्या मुलाखतीची झाली !

चंद्रकांत बर्वे.

— लेखन : चंद्रकांत बर्वे.
निवृत्त दूरदर्शन संचालक, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments