कवी उदय भिडे लिखित ‘बिंबातले अंतरंग’ या चित्रांवर आधारीत कवितासंग्रहाचे प्रकाशन ठाणे येथे नुकतेच संपन्न झाले.
ठाण्याच्या सृजनसंवाद प्रकाशनतर्फे प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी व चित्रकार रामदास खरे यांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डाॅ. निर्मोही फडके, प्रा. सुजाता राऊत, कवी, संपादक गीतेश शिंदे उपस्थित होते.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना कवी उदय भिडे यांनी चित्रांवर कवितानिर्मिती करण्याचा प्रवास उलगडून सांगितला.
श्री रामदास खरे म्हणाले की, कवी उदय भिडे उत्तम अनुवादक आहेत. या संग्रहात चित्रांचे मर्म पकडणार्या कविता आहेत. पाश्चात्य देशात अशाप्रकारे चित्रांवर कविता केल्या जातात त्याला फोटोपोएट्री असे म्हणतात. त्यांनी या पुस्तकांतील विविध चित्रांवर भाष्य केले.

डाॅ. निर्मोही फडके यांनी चित्र व कविता यांच्या संबंधाची तात्त्विक मांडणी केली. कवी उदय भिडे उत्तम अनुवादक आहेत, हा चित्रांचा अनुवादच आहे त्यामुळे या कवितांना चित्रानुवाद म्हणता येईल असेही त्या म्हणाल्या.
प्रा. सुजाता राऊत म्हणाल्या की चित्रांवर कविता करण्याची परंपरा व्हॅन गाॅगच्या चित्रांपासून दिसते. आपल्याकडे मुघलकालीन, राजस्थानी चित्रांवर कविता करणारे कवी आहेत. कविता व चित्र या दोन्हींत अमूर्तता, उस्फूर्तता व गूढता असते. त्यांनी काही चित्रकवितांची उदाहरणे दिली.
कवी गीतेश शिंदे यांनी चित्र व कविता या दोन्ही परस्परपुरक कला असल्याचे सांगत उदय भिडे यांनी चित्रांचे अंतरंग हळुवारपणे कवितेतून उलगडल्याचे म्हटले. काव्य-चित्रांचा हा कोलाज वाचकांच्या संवेदना अधिक प्रगल्भ करेल असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन मानसी आमडेकर यांनी केले. रसिकांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्तमरीत्या पार पडला.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
मनापासून आभार