गाण्याची आवड खूप जणांना असते. गाणं गुणगुणने हे तर आनंदी व्यक्तीचे लक्षण. गाणी एकायला तर सर्वांनाच आवडतात. पण जर आवडीची गाणी स्वतःला गाता आली तर? तर ही हौस कराओके ने पूर्ण केलीय.
गाण्याची धून वाजत असताना त्या गीताचे शब्द स्वतः त्या सोबत ताल आणि लय सांभाळत गायचे म्हणजे कराओके यामुळे आपली गाणं गायची हौस पुरवता येते. असा कराओके क्लब मुंबईत, चालवणारी महिला म्हणजे समृद्धा मांडेवाल.
समृद्धाला लहानपणा पासुनच गाण्याची खुप आवड होती. पण तिच्या घरी गाण्याची आवड फारशी कोणाला नव्हती, आणि परिस्थिती मुळे गाण्याचे शिक्षणही तिला घेता आले नाही. समृद्धाला लग्नानंतर गाण्याची आवड स्वस्थ बसु देईना. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या तिच्या कार्यालयामधील श्री. बाबुदास तुपे यांच्याकडे काही दिवस तिने गाण्याचे शिक्षण घेतले. तसेच त्यांच्या कार्यालयातील श्री. शशिकांत गाडे यांनी त्यांचा स्वतःचा ऑर्केस्ट्रा चालु केला होता, त्यात श्री. गाडे यांनी समृद्धाला स्टेजवर गाणं म्हणायची संधी दिली. नंतर कार्यालयातील प्रत्येक वार्षिक कार्यक्रमात तिचे गाणे असायचेच. २०१२-१३ साली कार्यालयातील गायन स्पर्धेमध्ये तिला पहिले पारितोषिक मिळाले. यामुळे तिचा आत्मविश्वास द्विगुणित झाला.
दरम्यान गणपती उत्सव, लग्न, मेहंदी, हळदी तसेच घरगुती कार्यक्रमांमध्ये सुद्धा ती सहभागी व्हायची. याच वेळी वाशी येथे श्री. अजित मेस्त्री यांच्या कराओके क्लब मध्ये तिने प्रवेश घेतला. फक्त रविवारी दुपारी १ ते ३ या वेळेतच हा क्लब असायचा. रविवारी मेगा ब्लॉक असल्यामुळे समृद्धा सकाळी १०.३० वाजता निघून मधल्या वेळेत मॉलमध्ये टाइम पास करत दुपारी १ वाजता क्लबमध्ये यायची. पार्ले , अंधेरी येथेही कराओके क्लबमध्ये ती सहभागी व्हायची. या सर्व क्लब मध्ये ती ३ वर्षे जात होती. त्यावेळेस तिला सुचलं की आपणही असा कराओके क्लब सुरु करावा.
ही कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी तिने जागेची शोधाशोध सुरु केली. दरम्यान तिने सुगम संगीताचे शिक्षण घेतले. मुलंसुद्धा मोठी झाली होती. चाळीशी ओलांडल्यामुळे स्वतःच्या आवडीनिवडी जपाव्या, या दृष्टीने ६ डिसेंबर २०१५ रोजी माटुंगा येथे समृद्धाने ‘बिट्स कराओके क्लब’ हा तिचा पहिला क्लब सुरु केला.
सुरवातीला फक्त ३/४ मैत्रिणी यायच्या. नवीन सदस्य नोंदणीची, ती वाट बघत बसायची. मौखिक प्रसिद्धी तसेच पेपरमध्ये जाहिरात पत्रक टाकणे, या मुळे क्लबला चांगलाच प्रतिसाद मिळाला. या मध्ये तिचे पती, श्री. राजेशकुमार मांडेवाल यांचे खुप सहकार्य मिळाले.
नोकरीं आणि घर सांभाळून समृद्धा हा क्लब चालवत होती. २०१६ साली गिरगांव येथे तिने दुसरा करोओके क्लब सुरु केला. दरम्यान ती छोटे छोटे स्टेज शोज सुद्धा आयोजित करत होती, जेणेकरून क्लबच्या सदस्यांना प्रत्यक्ष स्टेजवर गाणं गायला मिळावं आणि त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित व्हावा हा हेतू असे . यासाठी ती कोणाचीही आर्थिक मदत घेत नाही. गायकाच्या चेहऱ्यावरचा आनंद तिला क्लब चालवण्याचे समाधान आणि स्फूर्ती मिळवून देत होते.
२०१८ साली सानपाडा येथे, तर २०२० साली डॉकयार्ड येथे तिने अजून दोन क्लब चालु केले, तर पाचवा क्लब लवकरच सुरु होत आहे. आतापर्यंत तिच्या कडे या चारही क्लबचे मिळून १५० पेक्षा जास्त सदस्य आहेत. गिरगांव आणि डॉकियार्डचे क्लब, तिचे मदतनीस मकरंद दळवी बघतात.
ती वर्षाला ४ मिनी शोज तर २ मेगा शोज, क्लब सदस्यांसाठी घेत असते. जेणेकरून सदस्यांना एक व्यासपीठ मिळावं आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा. क्लब चालवण्यामागे व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता, गायकांच्या चेहऱ्यावरचा आनंद हिच तिच्या कार्याची तिला पोचपावती आहे असे तिला वाटते. या क्लबतर्फे, ज्यांना गायनाची आवड आहे पण जे फी भरू शकत नाही, अशांना ती मोफत शिकविते. तसेच काही सामाजिक उपक्रमांना ती मदतसुद्धा करते. तिच्या या कार्यात तिचे मदतनीस श्री. मकरंद दळवी यांची मोलाची साथ मिळते.
श्री. विलास घोळसे, छायाचित्रकार, कार्यक्रम आयोजक आणि तिचे कार्यालयीन सहकारी यांच्या मदतीने समृद्धाने २०१९ साली मुंबई येथे २ लाईव्ह शोज (तिकीट लावून ) चे आयोजन केले होते. या लाईव्ह शो मध्ये समृद्धा मुख्य गायिका होती. त्यालाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आता ती क्लासिकल संगीत शिकतेय. एव्हढेच नाही तर, समृद्धा, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या आंतरविभागीय बॅटमिंटन स्पर्धेमध्ये भाग घेऊन ती सलग दोन वर्ष उपविजेती ठरली.
एव्हढे चार ‘बिट्स कराओके क्लब’ चालवणारी मुंबईतील समृद्धा मांडेवाल ही बहुधा पहिली महिला असावी. अशा या हरहुन्नरी समृद्धा ला तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
– अलका भुजबळ
Mb:-9869043300