भारतीय राजकारणावर अमीट ठसा उमटवणारा असामान्य संसदपटू, लढवय्या देशभक्त, तेजस्वी वक्ता, द्रष्टा लोकनेता, संसदीय लोकशाहीचा पुरस्कार करणारा थोर समाजवादी विचारवंत, एक आदर्श लोकप्रतिनिधी, कोकणच्या विकासाचा संकल्पक आणि चोखंदळ रसिकाग्रणी म्हणून बॅ.नाथ पै ओळखले जातात. आज त्यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख. बॅ.नाथ पै यांना विनम्र अभिवादन.
— संपादक
बॅ.नाथ पै यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२२ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील (आताचा सिंधुदुर्ग जिल्हा) वेंगुर्ला येथे झाला. त्यांचे मूळ नाव पंढरीनाथ हे होते. पण सगळेच त्यांना ‘नाथ’ म्हणत असल्यानं तेच नाव रूढ झालं.
नाथ पै यांचे वडील पोस्ट खात्यात नोकरीला होते. पण वारंवार होणाऱ्या बदल्यांना कंटाळून त्यांनी ती नोकरी सोडून शिक्षकी पेशा स्वीकारला. नाथ यांना केवळ आठच महिने वडिलांचा सहवास लाभला.
हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांच्या वडिलांचं निधन झालं.
नाथ पैंना तीन भाऊ आणि तीन बहिणी. अनंत, श्याम आणि रामचंद्र हे तीन भाऊ. गंगाबाई, मंजुळा आणि चंद्रभागा या तीन बहिणी. इंदिरा नावाच्या सावत्र बहिणीवर त्यांचे विशेष प्रेम होते. वेंगुर्ल्यातलं आडारी हे त्यांचं आजोळ. त्यांना लहानपणी प्लेगची लागण झाली होती.पण आई आणि भावंडांच्या सेवेमुळं ते वाचले.
नाथ पैंचं प्राथमिक शिक्षण वेंगुर्ल्याला झालं. त्याकाळी हुशार विद्यार्थ्यांना एका वर्षांत अधिक इयत्तांच्या परीक्षा देता येत असत. त्यामुळं एका वर्षांत त्यांनी तीन इयत्ता पूर्ण केल्या. त्यांच्या बंधूंनी बेळगावात दुकान उघडल्यामुळं त्यांचं माध्यमिक शिक्षण बेळगावला झालं. १९४० मध्ये मॅट्रिक उत्तीर्ण होऊन बेळगावच्या लिंगराज महाविद्यालयातून त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं. इथंच त्यांच्या वक्तृत्वावर संस्कार झाले.

त्यानंतर इंटरमीजिएट परीक्षेसाठी त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला.तेथील विद्यार्थी संसद मध्ये त्यांची पुरवठा मंत्री म्हणून निवड झाली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा तो काळ. त्यात योगदान देण्याच्या दृष्टीनं त्यांनी अभ्यास, परीक्षा बाजूला ठेवली आणि ते बेळगावला आले.
सुरुवातीला नाथ पै यांच्यावर शहीद भगतसिंग यांच्या क्रांतिकारक विचारांचा जबदरस्त प्रभाव होता. बँक लुटणं, लष्कराच्या गंजी पेटवणं या सारख्या गोष्टींतून इंग्रजांची ते त्रेधा तिरपीट उडवत.
१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांची धरपकड सुरू झाली. नाथ पै यांनाही अटक झाली.अकरा महिने अंधार कोठडी आणि त्यानंतर काही काळ तुरुंगवास भोगावा लागला. पोलीस चौकी जाळण्याच्या खटल्यातून निर्दोष सुटल्यानंतर ते राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून कार्यरत राहिले.क्रांतिकार्यामुळं त्यांच्या अभ्यासात खंड पडला होता. त्यामुळे १९४७ मध्ये नाथ पै बीए झाले. नाथ पै यांनी बॅरिस्टर व्हावं, असं त्यांच्या कुटुंबीयांना वाटत होतं. त्यानुसार ते इंग्लंडमधे शिक्षणासाठी दाखल झाले.
अभ्यासवर्ग, आंतरराष्ट्रीय समाजवादी युवक संघटना, इंग्लंडमधील मजूर पक्षाच्या नेत्यांचा परिचय, जर्मन भाषा शिक्षण,लेखन यात ते रमले. इंग्लंड, ऑस्ट्रिया, अमेरिका अशा देशांत ते राहिले. बॅरिस्टर पदवीच्या दोन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उर्वरीत शिक्षण अपूर्ण ठेवत ते भारतात आले.
नाथ पै भारतात परतले तेव्हा पहिल्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यांनी निवडणूक लढवली, त्यात त्यांचा पराभव झाला. मग ते पुन्हा बॅरिस्टर पदवीच्या उर्वरीत शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाले. वर्षभरातच ही पदवी घेऊन ते युरोपात गेले. व्हिएन्नामधे असताना ऑस्ट्रियन सरकारच्या सचिवांची मुलगी क्रिस्टल मुशेल यांच्याशी नाथ पै यांचा परिचय झाला. नाथ पै यांच्या तडफदार व्यक्तिमत्त्वानं त्या प्रभावित झाल्या. यथावकाश नाथ आणि क्रिस्टल यांचा विवाह झाला.
नाथ पैंच्या कार्याचा, वक्तृत्वाचा दबदबा युरोपमध्ये वाढला.त्यांना फिनलंड, जर्मनी, इस्राइल या देशांमधून व्याख्यानांसाठी निमंत्रणं येऊ लागली. त्यांची आंतरराष्ट्रीय समाजवादी युवक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. मात्र परदेशांतल्या लौकिकांत न रमता ते भारतात परतले. स्वातंत्र्यानंतर लोकशाहीच्या माध्यमातून सर्व प्रश्न सुटतील, ही अपेक्षा फलद्रूप होत होती, त्यासाठी त्यांना काम करायचे होते.
भारतात परतल्यावर नाथ पै यांनी गोवामुक्ती, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती आणि बेळगाव सीमाप्रश्न या तीन मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं.
लोकसभेची १९५७ ची निवडणूक जाहीर झाली. रत्नागिरी मतदार संघातून १९५२ मधे निवडून आलेले खासदार मोरोपंत जोशी हेच पुन्हा निवडून येतील असं वाटत होतं. मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमुळं जनमत काँग्रेसच्या बाजूनं नव्हतं. तसंच नाथ पै यांचं वक्तृत्व, बोलण्यातला अकृत्रिम जिव्हाळा, त्यांचा जनमानसावर असलेला प्रभाव या गुणांमुळं ते निवडून आले.
लोकसभेतल्या पहिल्याच भाषणात त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा प्रश्न उपस्थित केला.त्यांच्या या भाषणानं लोकसभेचे उपसभापती, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, केंद्रीय मंत्री गोविंद वल्लभ पंत यांच्यासह सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.

आपण लोकप्रतिनिधी आहोत तर आपण करीत असलेल्या कामांची सर्व माहिती लोकांना कळली पाहिजे, त्यांचा तो हक्कच आहे, अशी त्यांची भूमिका होती. लोकप्रतिनिधी लोकांमधे जाऊन अशा पद्धतीनं काम करतो, ही पद्धत त्यांनी नव्यानं रुजवली.
लोकप्रतिनिधी जागरूक असेल, तर लोकही जागरूक राहतील, असं त्यांना वाटत होतं. झालंही तसंच, आपापले प्रश्न घेऊन लोक स्वतः त्यांच्याकडे घेऊन येऊ लागले.
कामगार चळवळ हा नाथ पै यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांची केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली, तेव्हा संप केल्याशिवाय मागण्या मान्य होणार नाहीत, असं वातावरण कामगारां मध्ये होतं. पण नाथ पै यांनी वरिष्ठ नेते तसंच पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी वाटाघाटी करून कामगारांच्या हालअपेष्ट, दैन्य, वैफल्य त्यांच्यासमोर नेमकेपणानं मांडलं. त्यातून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाली आणि संप टळला.
कोकण विकासाच्या दृष्टीनं पहिलं पाऊल नाथ पै यांनीच उचललं. त्यांनी कोकण विकास परिषदेचे अधिवेशन बोलाविले. या अधिवेशनाचे अध्यक्षही तेच होते. अध्यक्ष या नात्यानं त्यांनी कोकण विकासाचा सूत्रबद्ध आराखडाच सादर केला.
कोकण रेल्वे हेही नाथ पै यांचं स्वप्न होतं. त्यांनी ही मागणी आग्रहानं अधिवेशनात केली. कोकण विकास परिषद घेऊन नाथ पैं यांनी कोकणी माणसाला खऱ्या अर्थानं बळ दिलं.
खासदारकीच्या तिसऱ्या कार्यकाळात नाथ पै यांनी दोन महत्त्वाची विधेयके मांडली. पहिलं विधेयक राज्य सीमा मंडळाच्या स्थापने बाबतचं होतं. खेडं हा मूलभूत घटक असून भाषिक बहुमत आणि भौगोलिक सलगता या निकषांच्या आधारे राज्यांच्या सीमा निश्चित करण्यासाठी त्रिसदस्यीय मंडळ असावं, अशी सूचना या विधेयकात करण्यात आली होती. हे मंडळ स्थापन झालं असतं, तर बेळगावचा प्रश्न सुटला असता.
नाथ पै ना आवाजाची नैसर्गिक देणगी होती.त्यांच्या आवाजाला एक विलक्षण सुरावट होती.त्याला साधनेची जोड मिळाली. नाथ पै लोकसभेत जाण्यापूर्वी कम्युनिष्ठ पक्षाचे प्रा.हिरेन मुखर्जी यांनी आपल्या वक्तृत्वाने, आपल्या इंग्रजी भाषाविलासाने संसदेला प्रभावीत केले होते, पण नाथ पैंच्या वक्तृत्वाने मुखर्जींच्या वक्तृत्वाला नमविले. वक्तृत्वाचा मनोहर आविष्कार नाथ पै यांच्याकडून होत होता.त्यांचे शुध्द इंग्रजी उच्चार, विचारांची खोली व प्रसन्न काव्यशैली या सर्वांचा प्रभाव श्रोत्यांवर पडत असे. ते फ्रेंच व जर्मन भाषाही सफाईदार पणे बोलत.
नाथ पैं च्या आवाजात एक कमावलेले मार्दव असे.इतक्या सुरेल व हुकमी आवाजाचा वक्ता नामदार श्रीनिवास शास्रींच्या नंतर नाथ पैंच होते. ते खुप तयारीने सगळी आयुधे घेऊन सभागृहात येत. ते नेहरूंना उध्दृत करू लागले तर नेहरूच बोलताहेत असे वाटावे. आचार्य अत्र्यांचा किस्सा सांगू लागले तर आचार्यांचा आवाज ते ऐकवीत. मराठी, संस्कृत व इंग्रजी काव्यपंक्ती त्यांच्या मुखातून सहज बाहेर पडत.
नाथ पैं नी सभा जिंकलेली नाही, असे कधी घडलेच नाही. मग ते संसद सभागृहात बोलत असोत, मुंबईच्या कामगारांच्या मोर्चात सहभागी झालेले असोत, तरुणांना मार्गदर्शन करीत असोत,की राजापूरच्या कुणबी शेतकर्यांना राजकारण समजावून देत असोत.
टाइम्स ऑफ इंडियाचे भूतपूर्व संपादक व ज्येष्ठ पत्रकार फ्रँक मोराईस म्हणत, “नाथ पै भारतीय संसदेतील सर्वश्रेष्ठ वक्ता होत.भारताचा एडमंड बर्क”. पंडीत नेहरू नाथ पैंच वर्णन ‘ए जंटलमन पोलिटिशअन’ असे करत.ते संसदेतील नाथ पैंची भाषणे चुकवत नसत. कधी कधी चर्चा, गप्पांसाठी मुद्दाम त्यांना घरी बोलवून घेत.अर्थात त्या काव्य, शास्र, विनोदाने रंगत असत. नाथ पै आपल्या घरासारखे पंडितजींच्या घरात वावरत.
नाथ पैं ची ओळख करून देताना इंग्लंडचे जाॅन फ्रीमन (नाथ पै विद्यार्थी असतानाचे त्यांचे स्नेही) ब्रिटिश खासदार मायकल स्टुअर्टना म्हणाले होते,”Nath Pai according to me is perhaps the best orator, and perhaps the best English speaker in parliament” त्यांनी नाथना विचारले,”Nath Pai who according to you is the best speaker in parliament ?
नाथ पैं नी त्यांना उत्तर दिले.”The best speaker of India never came to its Parliament. If one of the two Patwardhan brothers (रावसाहेब व अच्य्युतराव) had come to Parliament, you would have seen a great Parliamentarian, a great speaker…….
नाथ पै यांनी आपले सर्व आयुष्य स्वातंत्र्य, लोकशाही आणि समाजवाद यासाठी झोकून दिले होते. ते १९५७, १९६२ व १९६७ असे सलग तीन वेळा कोकणातून लोकसभेत गेले. त्यांनी कोकणातील प्रश्नांना लोकसभेत वाचा फोडली.
कोकणात रेल्वे यावी या साठी नाथ पै यांनी अथक प्रयत्न केले.पुढे त्यांच हे स्वप्न पूर्ण झाले. बेळगाव,कारवार सीमा प्रश्र्नाकरता त्यांनी संसदेत तसेच संसदे बाहेर महाराष्ट्राची बाजू मांडली. दीर्घ लढे दिले. पण मराठी भाषकांवरचा अन्याय अद्याप दूर झालेला नाही.
१७ जानेवारी १९७१ रोजी बेळगाव येथे सीमाप्रश्नावर सभा होती. डाॅक्टरांनी प्रकृती तपासून न जाण्याचा सल्ला दिला. पण बेळगावात हुतात्मा दिनासाठी आपल्याला गेलेच पाहिजे म्हणून ते गेले. बेळगाव ही त्यांची कर्मभूमी. १९४२ च्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. सीमा भागात त्यांचे भाषण झाले. हे त्यांचे शेवटचे भाषण ठरले.त्याच रात्री ४८ व्या वर्षी; १८ जानेवारी १९७१ रोजी त्यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.
‘न त्वहं कामये राज्यं,
न स्वर्गं, न पुनर्भवम्
कामये दुःख-तप्तानां प्राणिनाम अर्तिनाशनम्’
(आम्हाला राज्य नको, स्वर्ग नको, पुनर्जन्म नको, जे दुःखाने तापले आहेत, जे ओझ्याने वाकले आहेत त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याची शक्ती आम्हाला हवी.)
नाथ पै यांची ही एक आवडती प्रार्थना. तसे जीवन ते जगले.
त्यांना विनम्र अभिवादन !!
— लेखन : श्या.गो.पाटील. डोंबिवली.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800