Thursday, August 7, 2025
Homeसेवाबेस्ट असलेली बेस्ट !

बेस्ट असलेली बेस्ट !

‘बेस्ट’ सेवा मुंबई महानगर पालिकेने ताब्यात घेतल्याला आज; ७ ऑगस्ट २०२५ रोजी ७७ वर्षे पूर्ण झाली आहेत.त्यामुळे ७ ऑगस्ट हा बेस्ट दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने बेस्ट च्या आतापर्यंतच्या प्रवासाचा हा आढावा.
बेस्ट ला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक

मुंबईकर प्रवाशांची उपनगरी रेल्वेच्या बरोबरीने जीवन वाहिनी बनलेली दुसरी प्रवासी वाहतूक व्यवस्था म्हणजे “बेस्ट” बस सेवा होय.

मुंबईत वीज व ट्राम सेवा चालवण्याचा परवाना बॉम्बे इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रामवेज या खाजगी कंपनीकडे होता. पण देशाला स्वतंत्र्य मिळायच्या आठवडाभर आधीच ७ ऑगस्ट १९४७ रोजी ही कंपनी मुंबई महापालिकेने ताब्यात घेतली म्हणून ७ ऑगस्ट हा ‘बेस्ट दिन’ म्हणून साजरा केला जातो.

मुंबईत बेस्टने शहराच्या विकासात अत्यंत महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम ते वातानुकूलीत बस असा मोठा प्रवास बेस्टने केलेला आहे. तर आता शहरात मोनो आणि मेट्रो ट्रेनही सुरु झाल्या आहेत.
गेल्या दिडशे वर्षांमध्ये मुंबईने ही गतीमान प्रगती केली आहे.

खरंतर मुंबईमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्रामची कल्पना एका अमेरिकन कंपनीने १८६५ साली मांडली होती. त्या कंपनीला त्याचा परवानाही मिळाला होता. मात्र ती योजना प्रत्यक्षात आली नाही. बॉम्बे ट्रामवे कंपनी, महापालिका, ‘स्टर्न्स अँड किटरेज’ कंपनी यांच्यामध्ये करार करण्यात आल्यानंतर १९७३ साली बॉम्बे ट्रामवे कंपनीची स्थापना करण्यात आली. मुंबई प्रांतासाठी बॉम्बे ट्रामवेज ऍक्ट १८७४ संमत करुन त्यानुसार बॉम्बे ट्रामवे कंपनीला ट्राम चालवण्याचे हक्क देण्यात आले. ९ मे १९७४ रोजी घोड्यांद्वारे ओढली जाणारी पहिली ट्राम मुंबईमध्ये धावली.

कुलाबा ते पायधुणी आणि बोरीबंदर ते पायधुणी अशा मार्गांवर धावलेल्या ट्रामसाठी केवळ तीन आणे भाडे ठरवण्यात आले मात्र कोणतेही छापिल तिकीट तेव्हा देण्यात आले नाही. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर तिकीट कमी करुन ते दोन आणे करण्यात आले होते. नंतर काही महिन्यानंतर तिकिटे छापण्यात आली. स्टर्न्स अँड किटरेज कंपनीने ट्रामसाठी ९०० घोडे पाळल्याचे सांगण्यात येते.

इंग्लंडच्या ‘ब्रिटीश इलेक्ट्रीक ट्रॅक्शन कंपनी’ने १९०४ साली विजेच्या वितरणाच्या परवान्यासाठी विनंती केली. त्यासाठी ‘ब्रश इलेक्ट्रीकल इंजिनियरिंग कंपनी’ने एजंट म्हणून काम पाहिले. ‘बॉम्बे ट्रामवे कंपनी’, ‘मुंबई महानगरपालिका’, ‘ब्रश कंपनी’ यांच्यामध्ये ३१ जुलै १९०५ रोजी करार होऊन हा परवाना देण्यात आला. १९०५ मध्ये बेस्ट म्हणजेच ‘बॉम्बे इलेक्ट्रीक सप्लाय अँड ट्रामवे कंपनी’ची स्थापना करण्यात आली. १९०७ साली घोड्य़ांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम बंद करुन मुंबईमध्ये पहिली इलेक्ट्रीक ट्राम धावली तर १९२६ साली डबलडेकर ट्रामही शहरात आली. त्यानंतर या कंपनीने शहरामध्ये बससेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. १५ जुलै १९२६ साली शहरात पहिली बस अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या रस्त्यावर धावली. १९४७ साली कंपनीते नाव ‘बॉम्बे इलेक्ट्रीक सप्लाय अॅंड ट्रान्सपोर्ट’ (BEST) असे करण्यात आले.

आपल्या अक्षरशः २४ तास सेवेत असलेल्या बेस्ट बस ला, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

संजीव वेलणकर

— लेखन : संजीव वेलणकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on पांढरी काठी : प्रशिक्षण संपन्न
Dr.Satish Shirsath on अनुवादित कथा
सौ. सुनीता फडणीस on श्रावण : काही कविता
सौ. सुनीता फडणीस on काही भक्ती रचना