ब्रह्मगिरी पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं त्र्यंबकेश्वर हे केवळ ज्योतिर्लिंगस्थळच नव्हे, तर अध्यात्म आणि निसर्ग यांच्या संगमाचे केंद्र आहे.
येथे दरवर्षी हजारो भाविक श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी परिक्रमा करून त्यांचं मन, शरीर आणि आत्मा यांचं शुद्धीकरण करतात.
श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंग मधील महाराष्ट्रातील एक श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे. ब्रह्मगिरी पर्वतावर गौतम ऋषींचा आश्रम होता.
गो- हत्येच्या पापातून मुक्तता व्हावी म्हणून त्यांनी घोर तपश्चर्या करून महादेवांना प्रसन्न करून महादेवांना त्रिमूर्तीचा अवतार धारण करण्याची विनंती केली. महादेवांनी त्रिमूर्तीचा अवतार धारण करून ज्योतिर्लिंगात विराजमान झाले तेव्हापासून या स्थानास श्रीत्रंबकेश्वर (पूर्वीचे गौतम धस) म्हणून ओळखले जाते.
श्री त्र्यंबकेश्वर मंदिर हेमाडपंथी असून मंदिराचा जिर्णोद्धार नानासाहेब पेशवे यांनी केला.
त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागबळी, कालसर्प योग, शांतीपूजा त्रिपिंडी, कुंभविवाह रुद्राभिषेक, महामृत्युंजय जप येथे केले जातात. दर बारा वर्षानंतर येथे कुंभमेळा भरतो त्याला सिंहस्थ म्हणतात.
संत निवृत्तीनाथ महाराजांनी याच ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा केली असता, त्यांना गहिनी नाथांचा अनुग्रह प्राप्त झाला. त्यांच्या सांगण्यावरून निवृत्तीनाथ महाराजांनी भागवत धर्माची स्थापना केली असे सांगतात आणि म्हणून पुराण काळापासून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पुण्यप्राप्ती व पापक्षालनासाठी प्रचलित आहे.
प्रदक्षिणेचे तीन प्रकार आहे
1) ब्रह्मगिरी प्रदक्षिणा 26 किलोमीटर.
2) हरिहर प्रदक्षिणा 38 किलोमीटर.
3) अंजनेरी प्रदक्षिणा 59 किलोमीटर.
यंदा रविवारी झालेली आमची ही पहिलीच ब्रह्मगिरी परिक्रमा 25 की मी ची होती. ही परिक्रमा म्हणजे भक्ती, साहस, निसर्गप्रेम आणि सामाजिक संवेदनेचा संगमच म्हणावा लागेल.
परिक्रमेची तयारी आणि सुरुवात :
माझे मित्र सर्वश्री. नंदू भागरे (संगमनेर), संजय खेले (नगर) आणि डॉ. बाळासाहेब गायकर (नगर) हे तिघही नासिकला मला भेटायला आले आणि कुठलीही पूर्वतयारी किंवा घरी सुद्धा जाऊ न देता आहे त्या परिस्थितीतच मला त्यांनी श्री त्रंबकेश्वरी ब्रह्मगिरीच्या परिक्रमेसाठी उचललं.
मग आम्ही चौघं मिळून शनिवारी रात्री श्री त्र्यंबकेश्वराकडे रवाना झालो. मात्र अतिप्रचंड गर्दीमुळे मुक्कामाला जागा मिळाली नाही. माझ्यासोबत काहीही जीवनावश्यक सामान नव्हतं.
पण मला कम्फर्ट झोन सोडायचा होताच म्हणून शेवटी आम्ही एका दुकानाच्या फुटपाथवरच आडवे झालो.
गार वारे, पावसाची सर आणि अंगावर काहीच नसताना झोपेसाठी संघर्ष केला.
सकाळी कुशावर्तावर स्नान करून श्री त्रंबकेश्वर मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन आम्ही सकाळी सहा वाजता प्रदक्षिणा आरंभ केली. वास्तविक पाहता तिथे प्रयागतीर्थ, सरस्वतीतीर्थ, नागातीर्थ रामातीर्थ, वैतरणातीर्थ, बाणगंगातीर्थ, निर्मलतीर्थ, धवलगंगातीर्थ, पद्मतीर्थ, नरसिंहतीर्थ इतके तीर्थ तिथे आहे पण आम्ही मात्र यांचं दर्शन न घेताच परिक्रमा सुरू केली. कारण इतके दर्शन घेत बसलो असतो तर प्रदक्षिणेला खूप उशीर झाला असता.
ब्रह्मगिरी पर्वत हा स्वयंभू शिवस्वरूप व पंचमुखी शिवलिंगी आहे. आधी या पर्वताची शिवगिरी म्हणून ओळख होती. ब्रह्माच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन महादेवाने ब्रह्मास वरदान दिले की तुमचे नाव या पर्वताला देऊन मी या पर्वतावर वास्तव्य करेल तेव्हापासून या पर्वताचे नाव ब्रह्मगिरी पर्वत असे पडले अशी आख्यायिका आहे. या पर्वताला एकूण पाच शिखरे असून त्यांना शिवाचे पंचमुख म्हटले जाते.

अनुभव, श्रम आणि प्रेरणा :
मला ट्रेकिंगचा व प्रदक्षिणेचा फारसा अनुभव नव्हता, पण सोबतच्या मित्रांनी दिलेला विश्वास माझ्या इच्छाशक्तीला बळ देणारा ठरला. कुशावर्त- पेगलवाडी — पहिने- काजोली मार्गे प्रदक्षिणेला सुरुवात केली. प्रदक्षिणेचा रस्ता आता बराच चांगला आहे, सिमेंटचा आहे. लोक सांगतात पहिले फक्त पायवाट होती आणि आता गौतम ऋषीच्या डोंगरावर जाताना सुद्धा पायऱ्या केलेल्या आहेत, त्यामुळे प्रदक्षिणा सुखकर होते. पावसाच्या सरी, धुकं, धबधबे, हिरवीगार गालिच्यांसारखी गवते, झुळझुळ वाहणारे ओढे, शेतामध्ये भाताची अवनी (लावणी) सुरू होती.
काही शेतांमध्ये नागली पेरलेली दिसली. नागलीचे रोप शेतात नुसते टाकून दिले जातात ते आपोआप उगतात तर भाताची रोप ही लावणी म्हणजे अवनी करून चिखलात लावावी लागतात. डोंगराच्या कुशीत फक्त भाताच व नागलीचच पीक येतं.
शेती, डोंगर, दऱ्या, नेकलेस पॉईंट वरून पडणारा धबधबा असे अनेक शुभ्र धवल धबधबे असा हा निसर्गअनुभव प्रत्येक क्षणी भारावून टाकणारा होता. गौतम ऋषींच्या स्थानापर्यंतची चढण, तिथल्या पायऱ्या आम्हाला खूप थकवणाऱ्या होत्या.
पायात अक्षरश: गोळे आले होते. प्रवासात भेटणारे सायकलिस्ट्स म्हणजे ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करण्यासाठी नासिक सायकलिस्ट व रॉयल रायडर्स यांनी सायकलवरून ब्रह्मगिरी परिक्रमेचे आयोजन केलेले होते. जागोजागी हायड्रेशन कॅम्प लावलेले होते. ते हिरव्या आणि पिवळ्या जर्सीत खूप विलोभनीय दिसत होते आणि शिस्तीत जय भोले चा जयघोष करत प्रदक्षिणा करत जात होते. त्यात तरुण-तरुणी व 75 वर्ष वयाच्या वरचे तरुण सुद्धा फार उत्साहात दिसले.
काही जोडपी डबल सायकलचा वापर करून प्रदक्षिणा करत होते आणि काही वृद्ध, तरुण-तरुणी बालगोपाल अनवाणी पायाने प्रदक्षिणा करताना मी हे सर्व डोळ्यात साठवत होतो. हे दृश्य माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी होते. काही जण तर सायकल डोक्यावर घेऊन दोन किलोमीटर गौतम ऋषींचा डोंगर चढत होते. तिथेच ज्यांच्याकडून सायकल उचलली जात नव्हती तेथे काही पैसे घेऊन सायकल उचलणारे मुलं देखील तेथे होते. तीच त्यांची उपजीविका होती. ते सायकल उचलून डोंगरावर चढवून व डोंगरावरून उतरवून देत होते.
पण हे शक्यतो महिलांसाठीच पाहण्यात आलं. बाकी सर्व जण आपापली सायकल डोक्यावर किंवा पाठीवर घेऊन डोंगरावर चढवत होते आणि उतरवत होते. परिक्रमा करताना लहान मुले, महिला, वृद्ध, युवक सगळ्यांची उपस्थिती खूप उत्साहवर्धक होती. ओम नमः शिवाय चा जप करत व भोले बाबा ची गाणी म्हणत आनंदाने परिक्रमा करत होते. एका बाजूला भक्तिमय वातावरण आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाचं डोळ्याचं पारण फिटणार मुक्त सौंदर्य आम्हाला पाहायला मिळत होत.
जंगलातुन जाताना मोर सुद्धा पाहायला मिळाला. त्याचा आवाज सुद्धा ऐकायला मिळाला. वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळाले.
ओढयाचे संगीत ऐकायला मिळालं. इंद्रधनुष्य पाहायला मिळालं. पाझर तलाव ओसांडून वाहताना पाहायला मिळाले. विविध प्रकारच्या झाडांचे निरीक्षण व अभ्यास करायला मिळाला. आमचे मित्र डॉ. बाळासाहेब गायकर हे वनस्पती शास्त्रातील डॉक्टरेट आहे. तसेच आमचे मित्र श्री सुदेश राठोड हे पक्षी निरीक्षणात तरबेज आहेत म्हणून आम्हाला झाडे झुडपं, वेली पान फुलं यांचा अभ्यास करता आला. पक्षांचे निरीक्षण आणि अभ्यास करता आला. त्यात सादडा, हिरडा, बेहडा असेल जिथे काजव्यांची वस्ती असते ही ती झाडं होय. रस्त्यात मेटघर किल्लाही लागला तो खूप उंच आहे
रस्त्याने लहान लहान मुलं प्रत्येकाला खाऊ साठी पैसे मागत होती. पैसे दिले नाहीत तर खाऊ मागत होती.
आम्ही त्यांना काही चॉकलेट्स आणि बिस्किट्स व राजगिऱ्याचे लाडू दिले.
काही भगिनी रस्त्यावर बसून “धर्म देव माय” म्हणत भिक्षा मागत होत्या हे पाहून मन खूप अस्वस्थ होत होते.
आज आपला भारत चंद्रावर आणि मंगळवार जात आहे पण शेवटच्या माणसाच्या अन्न, हे वस्त्र निवारा, आरोग्य या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपण अजूनही पूर्णपणे सक्षम नाही याची सल मनामध्ये बोचत होती. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे आणि गरीब अधिक गरीब होत आहे ही दरी खूप विरोधाभास दर्शवते.
त्यातच या निसर्गरम्य पर्वताच्या कुशीत बिल्डर लॉबीने कन्स्ट्रक्शन कंपनी स्थापन करून प्लॉटिंगचा खूप मोठा बिझनेस उभा केलेला आहे. पुणे मुंबई नाशिक येथील उच्चभ्रू समाजाने तेथे फॉर्म हाऊस बांधून त्याचे व्यावसायिकरण केल्याचे दिसते.
ब्रह्मगिरी पर्वतावर श्री शंकराने जटा उपटलाच्या खुणा आजही अस्तित्वात आहे आणि तेथूनच गोदावरीचा उगम होतो परंतु आज गोदावरी तेथे लुप्त झाली असून आणि ती खाली म्हणजे कुशावर्तात प्रकट झाली अशीच आख्यायिका आहे. प्रदक्षिणा करताना दुरूनच ब्रह्मगिरी पर्वत, मेटघर किल्ला गोदावरी नदीचे उगम स्थान चक्रधर मंदिर हे खूपच विलोभनीय दिसते.
सामाजिक व पर्यावरणीय निरीक्षणे :
परिक्रमेच्या मार्गावर आदिवासी बांधव रानभाज्या, फुले, लिंबूपाणी प्रामाणिकपणे कष्ट करून विक्री करत होते.
त्यांची साधी राहणी आणि गरजा पाहून अंतर्मुख व्हायला झालं.
काही आदिवासी बंधू आणि भगिनींशी मला चर्चा करता आली. त्यांचे जीवन जवळून अनुभवता आलं. त्यांना बोलते करून त्यांची बोलीभाषा अनुभवता आली. त्यांच्या रोजच्या जगण्याचा संघर्ष, त्यांची तुटपुंजी उत्पन्नाची साधने तरी पण सुखी समाधानी व आनंदी जीवन कसे जगावे हे त्यांच्याकडून शिकायला मिळालं.
मात्र काही हौसे, नवसे व गवसे (निसर्गप्रेमी नव्हे) पर्यटक प्लास्टिक बाटल्या आणि प्लास्टिक रॅपर व इतर कचरा (जो कुजणारा नाही) फेकून पर्यावरणाला हानी पोहचवत होती. काहींनी तर निसर्गाची खूप हानी केलेली दिसली.
हे पाहून मन फार विषण्ण झालं. प्रदूषण न करण्यासंबंधी व निसर्ग संवर्धनाच्या बाबतीत एखाद्या एनजीओने पुढाकार घ्यायला हवा असे वाटले.
हवेचे प्रदूषण, जमिनीचे प्रदूषण आवाजाचे प्रदूषण याला कुठेतरी आवर घालणं गरजेचे आहे.

परिक्रमेचा अर्थ आणि फळ :
ब्रह्मगिरी परिक्रमा म्हणजे फक्त एक ट्रेक किंवा साहसी उपक्रम नाही. ही एक आत्मशुद्धीची वाट आहे. अध्यात्मिक दृष्टिकोनातून ही परिक्रमा केल्याने मनशांती, सात्विकता, आत्मिक समाधान आणि जीवनातील नकारात्मकता दूर होते असे जाणवले.
या परिक्रमेचा उद्देश म्हणजे, श्रद्धा, संयम, सहनशीलता आणि स्वतःशी संवाद हाच होता आणि तो माझ्या मते काही अंशी तरी सफलही झाला.
परिक्रमा करताना निसर्गाचे जे सौंदर्य अनुभवले ते अमूल्य होते. त्यातच एक प्रश्न मनात आला ….. हा निसर्ग आपल्याला पाणी, हवा, सावली, सौंदर्य देतो, पण तो आपल्याकडून काहीही मागत नाही. मग आपणच आपल्यासाठी निसर्गाने मुक्तहस्ते दिलेल्या सर्व गोष्टींचे मूल्य का ठरवतो ?
आणि निसर्ग इतकं देऊनही आपण निसर्गाला हानी का पोहोचवतो ? हा ही प्रश्न सतत माझ्या मनाला पडत होता कारण माझा भावनिक कोशन जास्त आहे.
तेव्हा निसर्ग संवर्धन ही एक काळाची गरज बनलेली आहे. हे खूप आवश्यक आहे कारण पुढच्या पिढीला हा निसर्ग आपल्याला दाखवायचा असेल तर निसर्गाचे संवर्धन हे झालंच पाहिजे. कारण आजची पिढी (10% सोडले तर) फक्त मोबाईल, व्हाट्सअप फेसबुक, इंस्टाग्राम, रिल्स आणि एकलकोंडी अशी होत चालली आहे. नात्यांच कोणतंही सोयरसुतक नाही.
वृद्ध आई वडिलांचा मानसन्मान नाही, विभक्त कुटुंब पद्धती प्रमाणे धाक आणि शिस्त नको असल्यामुळे ही पिढी वाहवत चाललेली आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणून निसर्ग संवर्धन काळाची गरज आहे. निसर्ग संस्कार महत्त्वाचे आहेत.
शेवटचा टप्पा आणि समाधान :
आय बरोबर दुपारी तीन वाजता आम्ही परत कुशावर्ता जवळ पोहोचलो. मंदिरात प्रचंड गर्दी असल्याने आम्ही दुरूनच कळसाचे दर्शन घेतले आणि परतीच्या प्रवासाला लागलो.
संध्याकाळी साडेसहा वाजता आम्ही नाशिकला पोहोचलो.
नगर आणि संगमनेर ची मित्रमंडळी एसटी बस ने पुढच्या प्रवासास निघून गेली.
मित्रांचा विरह होताच पण घरची ओढ देखील होती. माझा नातू युद्धवीर माझी वाटच पाहत होता. मी आल्याबरोबर माझ्या गळ्यात बा.बा.. बा.बा.. करत पडला.
तेथेच मला माझ्या परिश्रमाचं चीज झाल्यासारखं वाटलं. शरीर थकलेलं होतं, पायात गोळे आले होते, चालता येत नव्हतं पण मन प्रफुल्लित आणि आत्मा तृप्त होता.

परिक्रमा पूर्ण करायला इतरांना सहा-सात तास लागतात. मला तब्बल नऊ तास लागले. मात्र माझ्या साथीदारांनी दिलेली साथ, निसर्गाची अनुभूती, दिव्य दर्शन आदिवासी समाजाच्या वास्तवाची झलक आणि अध्यात्मिक चिंतन व आधुनिक भाषेत एक ट्रेक, यामुळे ही परिक्रमा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव ठरली.
माझी परिक्रमा, माझ्यासाठी एक समर्पण व साधनाच ठरली. ब्रह्मगिरी परिक्रमा म्हणजे एक आत्मानुशासनच, एक अध्यात्मिक वाटचाल आणि एक सामाजिक शिकवण आहे. निसर्ग, माणूस आणि ईश्वर यांचा संगम जर कुठे अनुभवायचा असेल, तर श्री त्र्यंबकेश्वर (पूर्वीचे गौतमधस) आणि ब्रह्मगिरी परिक्रमा हे स्थान सर्वोत्तम ठरते.आयुष्यात माणसाने एकदा तरी ही परिक्रमा करावी आणि स्वानुभव घ्यावा असे वाटते. अशाप्रकारे आमची ब्रह्मगिरी पर्वताची परिक्रमा श्री त्रंबकेश्वराच्या कृपेने व गौतम ऋषी आणि अहिल्यादेवी च्या आशीर्वादाने सफल आणि संपूर्ण झाली.

— लेखन : डॉ चंद्रकांत हलगे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
💪👍👏