श्रावण महिना जवळ आला की सर्व महिलांची लगबग सुरु होते. कारण रिमझिम पडणारा पाऊस, हिरवागार गालीचे अंथरून त्यावर रंगीबेरंगी फुलांची सुंदर वेलबुट्टी, सप्तरंगी इंद्रधनुष्याची सुंदर कमान असा नयनांचे पारणे फेडणारा, आकर्षक निसर्ग ! त्यात मनसोक्त न्हाऊन भटकंती करून निसर्गाच्या या बदलत्या सुंदर मोहक रूपाचे दर्शन घेण्याची ओढ तर मनात असतेच, पण त्याच बरोबर सणासुदीची पण धामधूम असते. मग स्वच्छता, सजावटी, स्वतः नटूनथटून देवाना पण अभिषेक, निसर्गातील सुंदर रंगीबेरंगी फुले, पाने समर्पित करुन, कापसाची माळावस्त्रे घालुन सुंदर सजावायचे. मग तऱ्हेतऱ्हेचे खमंग, गोडधोडाचे पदार्थ, पक्वान्ने बनवून, फराळाचे पदार्थ बनवून नैवेद्य दाखवायचा, धूपदीप, कर्पूर चंदन, अत्तर यांनी सारा परिसर गंधित, पवित्र करायचा. शेवटी आळवून, ओवाळून, आरत्या म्हणून प्रार्थना करून सर्वांच्या सौख्यासाठी वरदान मागायचे. या नुसत्या वर्णनानेच किती आनंददायक चित्र डोळ्यांसमोर येऊन चित्त प्रसन्न झाले ना ?
श्रावणी सोमवार, शुक्रवार, जिवतीचे पूजन, व्रते, काही लोकांकडे पहिल्या शुक्रवारी एका गौरीचे आगमन सुद्धा होते. मग सवाष्ण, कुमारिका, भोजने, अगदी घरोघरी सत्यनारायण पूजासुद्धा होतात. पण या व्यतिरिक्त या महिन्याचे खास वैशिष्टय किंवा मुख्य आकर्षण म्हणजे मंगळागौरीचे पूजन!खास नववधूच्या साठीच बनलेला हा आनंद महोत्सव !
श्रावण महिन्यातील चारही मंगळवारी सलग पाच वर्ष ही मंगळागौर पूजिली जाते. मंगळागौरी म्हणजे पार्वती ! शंकराची पत्नी.. अन्नपूर्णा ! मंगल करणारी अशी ही देवी ! तिची पूजा मनोभावे अखंड सौभाग्यासाठी करतात. नवीन लग्न झालेल्या मुली पहाटे उठून अभ्यंग स्नान करून निरनिराळी फुले, आघाडा, दुर्वा, तुळशीपत्रे, केवडा, माका यासहित सोळा प्रकारच्या सोळा सोळा पत्री गोळा करून चौरंग मांडून भोवती सुंदर रंगीत रांगोळी काढून पूजेचे सर्व साहित्य जमवून मंगळागौरीचे, अन्नपूर्णेचे पूजन मनोभावे करतात. पुरणाचा, खिरीचा नैवेद्वय दाखवून न बोलता जेवतात. दुपारी किंवा रात्री पारंपारिक खेळ खेळून जागरण करतात.
साधी फुगडी, एका हाताची फुगडी, त्रिफुला फुगडी, चौफुला फुगडी, दंड फुगडी, कंबर फुगडी, गुडघ्याची फुगडी, केरसुणी फुगडी, जाते फुगडी, बस फुगडी, भुई फुगडी किंवा बैठी फुगडी, कासव फुगडी, पाट फुगडी, लोळण फुगडी, लाटणे फुगडी आणि फुलपाखरू फुगडी असे फुगडीचे अनेक प्रकार खेळले जातात. फुगडीनंतर दोन-तीन प्रकाराचा झिम्मा, तळ्यात -मळ्यात, खुर्ची का मिर्ची, नाच गं घुमा, आटुंश पान, तिखट मीठ मसाला, तांदूळ सडू बाई, कीस बाई कीस.. दोडका कीस, आगोटं-पागोटं, कोंबडय़ाचे तीन-चार प्रकार, आळुंकी-साळुंकी, सासू-सुनेचे अथवा सवतींचे भांडण, आवळा वेचू की कवळा वेचू, किकीचे पान, माझी आई मोठी की तुझी आई मोठी, नखोल्या, ताक, सोमू-गोमू, काच-किरडा, धोबीघाट, होडी, मासा, भोवर भेंडी, अडवळ घूम, पडवळ घूम, गोफ असे मजेदार व प्रसंगी मिश्कील खेळ रंगत खेळतात.
संध्याकाळी भाजणीचे वडे, मुगाच्या डाळीची भाजून केलेली खिचडी, मटकीची उसळ, लाडू चिवडा, चकली असे फराळाचे पदार्थ खातात.
दुसऱ्यादिवशी सकाळी पुन्हा स्नान करून उत्तरपूजा करून दहिभाताचा नैवेद्य दाखवून या पूजेचे विसर्जन करतात. याचे उद्यापन सुद्धा अशीच मंगळागौर पूजन करून पाच वर्षानंतर आईला एका भांड्यात चांदीच्या नागाची प्रतिमा ठेवून त्याचे तोंड कापडाने झाकून दिले जाते. तिला सौभाग्यवाण् आणि साडीचोळी दिली जाते आणि आशीर्वाद घेऊन याची समाप्ती होते. असे होते मंगळागौरी पूजन !
ही पूजा म्हणजे नववधुवर केलेले एकप्रकारचे सामाजिक, कौटुंबिक भान देणारे संस्कारच ! शिव पार्वती प्रमाणे कायम आदर्श जोडीने, एकीने एकमेकांवरील प्रेम, विश्वास दृढ ठेवून निष्ठेने आदर्श संसार करावा, कुटुंबव्यवस्था जपावी, नववधूला. सर्व नातलगांची ओळख होऊन आपुलकी, माया, प्रेम उत्पन्न व्हावा आणि एकीतील आनंद कळावा तो तिने आत्मसात करावा ही यामागील भावना आहे.
मनोरंजन म्हणून खेळ खेळत गाणी म्हणण्यामुळे मजा तर येतेच, पण नातलगाविषयीच्या भावनाही व्यक्त करता येऊन मन हलके होते. सासरच्या खाष्ट लोकाना नाजुक चिमटे सुद्धा यातून हसत हसत घेता येतात. खेळताना स्वयंपाक घरातील वस्तूंचा सूप, लाटणे, घागर, करवंटी, गोफ अशा साधनांचा वापर केलेला असतो. या गीतांतून नवविवाहितेच्या मनातील सुख दु:खाच्या भावना, विचारच प्रगट होतात.हे खेळ म्हणजे सर्वांगाला व्यायाम देणारे असतात. ती एक प्रकारची आसनेच आहेत. महिलांना घरातली कामांबरोबर मनोरंजन, आनंद मिळावा या हेतूने गाण्याची जोड देऊन हे खेळ खेळले जातात. हे जिम्नॅस्टिकच आहे. मनाची एकाग्रता, शरीराची लवचिकता, नेम साधणे हे सर्व आजच्या ॲरोबिक्सप्रमाणे गीतांच्या तालावर, ठेक्यावर खेळले जातात. मनोरंजन आणि व्यायाम यातून आरोग्य उत्तम राहते.
पूर्वी मुलींची खूप लहान वयात लग्न होत असत त्यांना नातेवाईक, औषधी वनस्पती, निसर्गाची ओळख हसत खेळत व्हावी, त्यान्चे जतन व्हावे, मनोरंजन व्हावे, एकीची भावना त्यांच्या मनात रुजावी आणि त्याच बरोबर आपल्या हिंदू धर्मातील देव,धर्माची माहिती व्हावी हा मुख्य उद्देश होता ही मंगळागौर साजरी करण्यामागचा.
पण आता काळ बदलला आहे. मुलींची लग्ने शिक्षण, करिअर यामुळे खूप उशीरा होत आहेत. माणसे ओळखण्याइतक्या त्या सक्षम असतात. नोकरीमुळे त्यांना इतका वेळ या पूजेसाठी देणे शक्य होत नाही. हे सर्व खरे असले तरीही काही गोष्टी, परंपरा आपण आपल्यासाठी जपल्याच पाहिजेत असे मला वाटते. आता पुजेचे सर्व साहित्य ऑनलाईन मिळते त्यामुळे ते आणायला जाण्याचीही गरज नाही. हॉल, केटरर्स सर्व तयार मिळते. फक्त पैसे दिले की बस्स ! ते तर दररोजच कमावतो. मग त्यातून थोडासा आनंद, विरंगुळा घेतला तर समाधानच वाटेल ना ? तर्हेतर्हेची फुले, पत्री पाहून मन प्रसन्न होईल, एकत्र भेटीमुळे वेगळा आनंद, उत्साह वाढेल.
आरोग्य उत्तम रहावे यासाठी आरोबिक्स, झुंबा, जिम करण्या ऐवजी एखादा दिवस वेगळे मंगळागौरीचे खेळ खेळून पहा तरी ? त्यापेक्षा सुंदर आणि हसत खेळत सर्वांगीण व्यायाम नक्कीच मिळेल. आता खास मंगळागौरीच्या खेळ खेळण्याची कॉन्ट्रॅक्टस घेतली जातात. भरमसाठ पैसे मोजतात त्यासाठी. त्या खेळ खेळतात आणि बाकीच्यांनी ते फक्त पहायचे. पण यात स्वतः खेळण्याची मजा येतच नाही. म्हणजे त्यांना पैसे द्यायचे आणि त्यांनी खेळून मिळवलेला आनंद आपण फक्त पाहायचा असे झाले हे ! जमेल तसे,जमेल तेवढे खेळ खेळा, पण स्वतः ते खेळून त्याचा खरा आनंद घ्या. या मंगलमय वातावरणात मंगळागौर पुजून, खेळून मनसोक्त आनंद लुटा. मंगळागौरी नक्कीच तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल.
आपल्या संस्कृती आणि रूढी परंपरांचे जतन करणे ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे ना ?

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान लेख आहे. मंगळागौरीच्या पूजेचे सविस्तर वर्णन आणि उद्देश व्यक्त करून आधुनिक तरुणींना छान बोध करून दिला आहे.