आम्ही इथे अमेरिकेला पोचलो आणि आशाताईंच्या जाण्याची बातमी कळली. कसं रिअॅक्ट व्हावं तेच कळेना. आपल्याच घरातील माणसाला आपण गमावलं असाच भाव आला.
आशाताई माझ्या अत्यंत आवडत्या, लाडक्या गायिका. आशाताईंचा तो सुंदर ठाशीव, रेखीव आवाज ऐकला की वाटतं कायच केलं असणार यांनी हा आवाज कमवायला !! तेही आजूबाजूला सगळं विपरीत घडत असताना!!
काही लोक, त्यांची कला ही दैवी गुणसंपत्तीत येते हे मान्य. जशी मंगेशकर पाचही भावंडांची आहे. सगळेच एक से बढकर एक!! पण त्यांच्या विरोधातही काही कमी ताकदीचे लोक/ कलाकार नव्हते. या सगळ्यांना या दोघी बहिणी, लतादीदी आणि आशाताई या पुरून उरल्या ते केवळ त्यांच्या असामान्य कलेच्या मार्फतच !! त्यांचे धाकटे बंधू, हृदयनाथ मंगेशकरांनी असल्या गोड, अद्वितीय सुरावटी निर्माण केल्या की काय सांगू!! अशी गाणी, जी फक्त लता आणि आशाच गाऊ शकतील. तेही अगदी कमीतकमी तालमीत. यासाठी ईश्र्वराचे बळ लागतेच लागते. ते असल्याशिवाय कठीण काळात मार्ग तरी कसा निघेल ??
या चार भगिनी आणि त्यांचे बंधू यांनी वीर सावरकर यांच्या कविता आपल्या समोर ठेवल्या त्या तर अप्रतिम आहेत. आम्ही अगदी लहान होतो तेव्हा अप्पांनी “ने मजसी ने… “हे गाणं आम्हाला शिकवलं होतं. घरी कोणीही पाहुणे आले की अप्पा आणि आम्ही दोघी बहिणी ने मजसी ने हे गाणं गात होतो. नंतर अप्पांनी “जयोस्तुते…” हे ही गाणं शिकवलं. मोठं झाल्यावर कळू लागलं की ही गाणी गायला किती कठीण आहेत. पण हृदयनाथ, लता, आशा, उषा आणि मीना यांनी ती किती सहजतेने गायली आहेत. आणि हृदयनाथांचं संगीत तर अप्रतिम !!
आम्ही 2019 मध्ये आशा ताईंचा एक लाईव्ह कार्यक्रम बघितला होता. त्यात सुधीर गाडगीळांनी आशाताईंशी संवाद साधत, मग त्या संदर्भातील गाणी त्या गात होत्या. आता त्यावेळी त्यांचं वय असणार 83/84. पण ते वय बाजूला सारून आशाताई इतक्या सहजपणे स्टेज वर वावरत होत्या, कधी गाण्यावर ठेका धरत होत्या, कधी पायाच्या स्टेप्स करत गातही होत्या. म्हणजे काय बोलावं!!! हा त्यांचा सळसळता उत्साह आपण नेहमीच बघितला आहे. इतकं सुंदर सळसळतं व्यक्तिमत्व बघून आम्ही दोघे भारावून गेलो होतो. अतिशय आदर वाटतो त्यांच्याबद्दल.
आशाताईंचे जीवन बघितले तर संकटांचा जणू समुद्रच सतत त्यांच्या समोर पहुडला होता. 16 व्या वर्षी, अजाण वयात पळून जाऊन लग्न केलं खरं पण आपल्या पूर्ण परिवाराला गमावलं. काय स्थिती झाली असेल त्या अवखळ मुलीची ? सासरी अतिशय हाल, गाण्याला मज्जाव, प्रसंगी मारपीट, पदरात लहान लहान लेकरं, नवरा पूर्ण नवरेशाही गाजवणारा. तिला गाण्याच्या रेकॉर्डिंग ला जाऊ द्यायचा नाही. आणि गाण्याखेरिज तर ती राहू शकत नव्हती. मग लपत छपत जायचं, तेही मुलांना घेऊनच जायचं, रेकॉर्डिंग करायचं, किती तरी वेळ थांबावं लागत असे. ताटकळून स्टुडिओ बाहेर उभं राहायचं. शिवाय किती तरी वर्ष आशा कोरस मध्ये गात असे. आणि मुख्य गायिका लता मंगेशकर. पण बहिणीला ओळख द्यायची नाही कारण ती कुटुंबातून हद्दपार झालेली. किती अवघड प्रसंग!!
जेव्हा आशाताईंना मुख्य गायिका म्हणून गाणी मिळू लागली तेव्हा तिने त्याचं सोनं केलं… सोनंच काय… त्याचा हिरा केला असही म्हणू शकतो. केवढी तरी गाणी त्यांनी गायली आहेत…
ये क्या बात है आजकी चांदनी मे..
ये राते ये मौसम
सितारे झिलमिला उठे…
अभी ना जाओ छोडकर
ओ मेरे सोना रे सोना रे सोना
पिया तू अब तो आजा
आईये मेहेरबान
जरा हौले हौले चलो मोरे सजना
उडे जब जब झुल्फे तेरी
पिया पिया पिया मोरा जिया पुकारे
चुरा लिया है
मेरा कुछ सामान
दो लफजो की है…
अशी कितीतरी गाणी…
नं मोजता येण्यासारखी आशाने गायली आहेत.

तशीच मराठी गाणी सुध्दा कितीतरी……
चांदणे शिंपीत जाशी
चांदण्यात फिरताना
धुंदी कळ्यांना
रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना
नभ उतरू आलं
केव्हातरी पहाटे
रेशमाच्या रेघांनी
गोरी गोरी पान फुलासारखी छान
शिवाय भक्तिगीते आणि अभंग…
उठी गोविंदा उठी गोपाला
बाई मी विकत घेतला शाम
मला हे दत्तगुरू दिसले
रामा रघुनंदना
किती वेगवेगळ्या आशयाची गाणी !!! प्रत्येक गाण्याच्या भावात ती अगदी न्हाऊन निघत असे.

प्रेमाचा आशय असलेली गाणी किंवा विरहाची गाणी असतील तर त्या त्या गाण्याचा भाव आशाताईंच्या आवाजातच कळायचा. शिवाय भक्तीगीत असेल किंवा अभंग असेल तर देवाची आळवणी ही तितक्याच ताकदीने करायच्या. किती कौतुक करावं !!
शिवाय इतकी प्रसिध्दी, इतके मान मरातब, इतके अवॉर्डस्, इतका पैसा, साड्या दागिने मिळवूनही आशा ताई स्टेजवर यायच्या त्या सुंदर साडी आणि पूर्ण बाहीचा गळेबंद ब्लोऊज् परिधान करूनच. कपाळावर एक मोठी ठसठशीत टिकली… शिवाय मुखावर एक प्रसन्न स्मितहास्य… एकूणच प्रसन्न व्यक्तिमत्त्व. आशाताईंना बघितलं की आपल्याही चेहऱ्यावर हलकेच स्मित येतं. त्यांनी जे जे दुःख भोगलं, सहन केलं त्याचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नसे. त्यांनी त्यांच्या मुलीला, वर्षा भोसले ला, 2012 मध्ये गमावलं. आणि मुलाला 2015 मध्ये कॅन्सर शी झुंज दिल्यानंतर गमावलं. एका आईच्या जीवाची किती तगमग झाली असेल, आपण विचारही करू शकत नाही. पण कधीही त्यांनी त्यांच्या मुलाखतीत आपल्या दुःखाचं रडगाणं गायलं नाही. किती हा संयम, किती हा देहातीत भाव. खरं तर आशाताईंना संसार सुख मिळालंच नाही.
त्यांचं शेवटचं रेकॉर्डिंग बघितलं… ब्रह्मा विष्णू आणि महेश.. सामोरी बसले… मला हे दत्त गुरु दिसले… मला हे दत्तगुरू दिसले… खरंचच आशाताईंना दत्तगुरू दिसलेच असतील आणि त्यांनीच आशाताईंना बोलवून घेतलं असावं… शेवटी देवांचे पण तेच लाडके असतात जे आपले लाडके असतात.
आशाताईंना आदरयुक्त भावपूर्ण श्रद्धांजली.

— लेखन : प्रज्ञा आठल्ये. ह. मु. अमेरिका.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +919869484800
