“खानदेशी संस्कृती”
आम्ही व्यवसायाच्या निमित्ताने जळगावला राहत होतो पण आमच्या संसाराची खरी नाळ ही आमच्या अंमळनेरस्थित संयुक्त कुटुंबाशी कायम जोडलेली राहिली. आम्ही त्याच ‘एकत्र कुटुंबाचा एक भाग’ हीच आमची खरी ओळख होती.
जवळजवळ दर पंधरा दिवसांनी आम्ही अमळनेरला जायचोच. सगळेजण आमची अगदी आतुरतेने वाट बघत असत. वास्तविक आमच्या या परिवारातले प्रियजन तसे शांत गंभीर प्रवृत्तीचे, अबोल, मितभाषीच होते पण याचा अर्थ ते शिष्ठ, तिरसट, ‘आलात काय गेलात काय’ असे असंवेदनशील मुळीच नव्हते. काही नाती बोलकी असतात. काही अव्यक्त असतात पण अव्यक्त नात्यातले मनातले आदर आणि प्रेमाने गुंफलेले धागे चिवट असतात हे मी आजपर्यंत अनुभवलेलं आहे.
त्यावेळी आम्ही सुरत–भुसावळ पॅसेंजरने अमळनेरला जायचो. पाळधी, धरणगाव, चावळखेडा, टाकरखेडा अशी गमतीदार नावं असलेली स्थानके ओलांडत आमचा अमळनेरपर्यंतचा जवळजवळ दीड दोन तासाचा अगदी धिम्या गतीचा प्रवास असायचा. या गाडीत प्रामुख्याने नोकरीसाठी अपडाऊन करणारे प्रवासी असायचे. नकळत मला माझ्या ठाणे-व्ही.टी. या मुंबईच्या लोकल गाडीचा प्रवास आठवायचा आणि पुन्हा शहरी आणि ग्रामीण संस्कृतीचं वेगळेपण मला या जळगाव- भुसावळ पॅसेंजर मध्ये जाणवायचं. या प्रवासातली आजही मनात राहिलेली गमतीदार आठवण म्हणजे धरणगाव स्टेशनवर गाडीत डोक्यावर वेताचे डालके (टोपली) घेऊन स्वतःला सांभाळत चढणारा भेळवाला. तो कांदा, लिंबू, कोथिंबीर पेरून शेव कुरमुर्यांची इतकी काही चविष्ट भेळ बनवायचा की भूक असो नसो ती खाल्ल्याशिवाय आमचा प्रवास पूर्ण व्हायचाच नाही. आजही गाडीतल्या त्या गर्दीत कागदाची ओलसर त्रिकोणी घडीत सांभाळत चवी चवीने खाल्लेली ती धरणगाव ची भेळ जिभेवर त्याच चवीसकट रेंगाळते. आजही मी कधीकधी विलासला म्हणते, “पुन्हा एकदा आपण त्या जळगाव भुसावळ पॅसेंजरने अंमळनेरला जाऊया केवळ धरणगावची भेळ खायला.”
अर्थात त्या सोबत प्रश्नही येतात. आता असेल का तोच भेळवाला ? तोही म्हातारा झाला असेल? आता कशाला या धक्काबुक्कीत तो “पोटापुरता पसा” देणारा धंदा करेल ?
या प्रवासातली आणखी एक आठवण म्हणजे “सदररूचा टांगा.” ज्या दिवशी आम्ही अंमळनेरला जाणार असू त्या दिवशी सकाळपासूनच आबा (माझे सासरे) मुलांच्या (माझे दीर सुहास, विवेक, श्री च्या) पाठी लागलेले असत. “अरे ! आज दादा येणार आहे ना ? सदरूला सांगून ठेव स्टेशनवर टांगा न्यायला.”
आम्ही अमळनेर स्टेशनातून बाहेर पडताच ‘सदरू’ आमच्या स्वागताला उभाच असायचा. पटकन आमच्या हातातलं सामान घ्यायचा आणि “चला दादा !” म्हणायचा. आम्ही त्याच्यापाठोपाठ त्याच्या टांग्यात जाऊन बसायचो. त्यादिवशी “सदरू” कोणाचेच भाडं घ्यायचा नाही. त्यावेळीही मला सुट्टीत आईबरोबर आजोबांकडे जातानाची आठवण यायची. व्ही.टी.समोर असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या इमारती जवळ आजोबांनी आईसाठी पाठवलेली त्यांची तपकिरी रंगाची चकचकीत रोव्हर गाडी उभी असायची. रामजी नावाचा ड्रायव्हर आम्हाला घ्यायला यायचा. ‘रामजीची रोव्हर’ आणि ‘सदरूचा टांगा’ या दोन्हीमागची अव्यक्त भूमिका मला एकाच भावनेची असल्याचे जाणवायचे. आयुष्यातल्या या गोष्टी मुळीच छोट्या नसतात. नकळत त्या तुम्हाला घडवत असतात. आयुष्यातली कधीही न सुकणारी अशी ती हिरवळच असते.
नंतरच्या काळात आम्ही स्वतःच्या गाडीतून जळगाव- अमळनेर बाय रोड जायला लागलो. त्या प्रवासात कधी असायची रणरणत्या उन्हानं पार भेगाळलेली खानदेशची काळी धरती आणि कुंपणावरची बाभळी, काटे सावरीची हिरवी झाडं. मधूनच दोन्ही बाजूला डेरेदार हिरवेगार निंबाचे वृक्षही असायचे. त्याच्या सावलीखाली बसलेली गुरं ढोरं आणि इतर पांथस्थही दिसत. त्यावेळी आता पाऊस पडलाच पाहिजे ही सृष्टीची व्याकुळता जाणवायची. पावसाळ्यात मात्र सारं चित्र पालटलेलं असायचं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ज्वारी, बाजरी, कापूस, हरभरा गव्हाची हिरवीगार, लांबलचक पसरलेली शेती नयनरम्य वाटायची. सुजलाम् सुफलाम् देशाचं एक सुंदर हिरवंगार दर्शन मनभावन वाटायचं. गाडी चालवताना विलासची शेतीविषयक कॉमेंट्री मस्त असायची. मी आणि मुली.. आम्ही समरसून जायचो.
या प्रवासात आमचा एक महत्त्वाचा थांबा असायचा तो म्हणजे उजवीकडे वळणाऱ्या अमळनेर रस्त्याच्या आधी लागलेला पारोळ्याचा ढाबा. भल्या मोठ्या कढईत गरमागरम तेलात तळले जाणारे ते फाफडे आणि त्यासोबतच्या तळलेल्या हिरव्यागार लांबट मिरच्या. आहाहा ! ते कागदात गुंडाळलेले गरमागरम फापडे खाल्ल्याशिवाय आमचा पुढचा प्रवास व्हायचाच नाही. लाकडाच्या मोठ्या पाटावर मळलेले डाळीचे पीठ हातानेच घासून सफाईदारपणे केलेल्या त्या पट्ट्या गरम तेलात बुडबुडत सोडणाऱ्या त्या आचार्याचे पाककौशल्यही वाखण्यासारखे असायचे. आजही मुली जेव्हा अमेरिकेहून भारतात येतात तेव्हा इथलं पाणी, धूळ, रस्त्यावरचा गलिच्छपणा, गर्दी याविषयी काटेकोरपणे स्वतःला आणि नातींना (त्यांच्या लेकींना) सांभाळत असतानाही “बाबा ! पारोळ्याचे फाफडे खाऊया हं आपण !” असं जेव्हा म्हणतात ना तेव्हा खूपच मजा वाटते.

वर्षभरात येणारा कुठलाही सण असो आम्ही नेहमीच सारे सण अमळनेरलाच साजरे करायचो. एक तर संयुक्तपणे सण साजरे करण्याची मजाच निराळी असते शिवाय लहानपणापासून मुलींना भारतीय संस्कृती, परंपरा, सण आणि संस्कार यांची ओळख व्हावी, त्यातले महत्त्व त्यांना कळावे हे मनापासून वाटायचे. शिवाय खानदेशात साजरे होणारे कृषी संस्कृतीशी निगडित असणाऱ्या सणांविषयी मला स्वतःलाही फार आकर्षण वाटायचे. गौरी गणपती, राखी बंधन, दसरा, दिवाळी, होळी, संक्रांत हे सण सर्वत्र साजरे होतात पण काही प्रांताप्रांतातले ग्रामीण संस्कृतीशी जुळलेले जे सण असतात त्या पाठीमागच्या कथा, भूमिका, श्रद्धा, भावना सगळं आगळं वेगळं असतं. त्यापैकी श्रावणात येणारी कानबाई आणि बैलपोळा हे सण मला नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. चैत्रातला आखाजीचा घागर भरण्याचा सण सुद्धा (अक्षय तृतिया) मी याच मातीत अनुभवला.

कानबाई रानबाई या ग्रामदेवतांचं पूजन खानदेशात घरोघरी मोठ्या भक्ती भावाने केलं जातं. कानबाई म्हणजे राधा आणि रानबाई म्हणजे रुक्मिणी. या दोन्ही देवता म्हणजे कृष्ण स्वरूपच. शेतकऱ्यांसाठी या देवता शेतात मोती उगवतात अशी भोळी भाबडी कल्पना म्हणून त्यांच्या प्रती असलेला हा भक्ती भाव. शिवाय त्या अहिराणी कुळातल्या असाही एक समज येथे आहे.कधी या कानबाईला शंकराची पार्वतीही मानतात.
श्रावणातल्या नागपंचमी नंतर येणाऱ्या रविवारी या कानबाई चे पूजन होते. त्यानिमित्ताने जणू काही तिच्या स्वागतासाठी घराची साफसफाई, रंगरंगोटी होते. या सगळ्या कामात कुटुंबातल्या सगळ्यांचा सहभाग आणि उत्साह असायचा. चौरंगावर नवे जरतारी वस्त्र, त्यावर स्वच्छ तांब्या, त्यात विड्याची पानं, त्यामध्ये नारळ आणि नारळालाच वज्रटीक, चपलाहार, मोहनमाळ, नथनी मुकुट घालून प्रतिकात्मक कानबाईची अशी सौंदर्यपूर्ण प्रतिष्ठापना होते. केळीच्या खांबांनी सजलेला तो चौरंग अतिशय देखणा भासतो. नैवेद्यात पुरणपोळी, खीर, कटाची आमटी (खानदेशी रश्शी), वगैरे कांदा लसूण वर्ज्य पदार्थही असतात, हे सगळं असंच याच पद्धतीने अमळनेरला आमच्या कुटुंबातही ही साजरं व्हायचं. घरातल्या पुरुषांच्या नावाने सव्वा मूठ धान्य त्यात गहू आणि हरभऱ्याची डाळ घेतली जाते आणि जाडसर दळलेल्या त्या पिठाचे रोट (रोडगे) बनवले जातात. लोखंडाच्या तगारीत गोवऱ्या, काड्यांचा हार(निखारे) पेटवला जातो आणि त्यात हे रोट भाजले जातात. (जगड्यावरचे रोट).

हे रोट कुटुंबातल्या व्यक्तीच खातात. कानबाईचा खरा प्रसाद हे रोट असतात. आतापर्यंत मी फक्त गाण्यात ऐकलं होतं. “रोडगा वाहीन तुला भवानी आई रोडगा वाहीन तुला” पण प्रत्यक्ष कानबाईचे रोट करण्याचा अनुभव आणि त्याचं सेवन हे फारच मजेचं आणि चवीच असायचं.या दरम्यान गणगोतातील बाया मस्त कानबाईची आहिराणी भाषेतली गाणी गायच्या.
।। अवती भवती फुलझाडी
तठे मन्ही मालन तोडी
खुयखुय नदीनं झुयझुय पानी
तठीनं घागर भरीन आनी
मन्ही मालन बोले अमृतवानी
सुखी राहो तुन्हा घरधनी
आदीशक्ती की आदीमाया
खानदेशमा घरोघर बठन्या कानबाया ।।
दुसऱ्या दिवशी या कानबाईचे नदीत साग्रसंगीत विसर्जन केलं जातं. शेतात जी बाई बियाणं पेरते तिलाही कानबाईच्या रुपात पूजले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये नारी पूजन, नारी शक्ती वंदन याचं किती महत्त्व आहे ना ?
कानबाई म्हणजे सूर्यशक्ती, आदिशक्ती. मुलींना तिच्या भोवती गुंफलेल्या विविध मनोरंजक कथा सांगताना माझ्या मनात नेहमी एक विचार असायचा, ”या माझ्या लेकी उद्याच्या सक्षम नाऱ्या होणार आहेत. जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्यांना सामोरं जाण्याचं बळ या आपल्या संस्कृतीतून त्यांच्यात रुजवण्याचा माझा एक प्रयत्न असायचा. प्रतीकात्मकतेत श्रद्धा, भोळेभाबडेपणा असला तरी त्या आनंदाच्या वाटा असतात. त्यातून एक समृद्ध संस्कृती झिरपत असते आणि नकळतच सुसंस्काराचं एक भक्कम कवच जगताना प्राप्त होत असते.
सहज गंमत म्हणून इथे सांगावसं वाटतं, ज्या ज्या वेळी ज्योतिका, मयुरा मला भेटायला ऑफिसात येत त्यावेळी माझे सहकर्मचारी माननीय वासुदेव भुरे मला म्हणत, ”मॅडम आल्या तुमच्या कानबाई रानबाई”.
खरंच आज अनेक विविध विचाराने, आठवणींने माझे मन भरून येते. आनंदाच्या या वाटांवर पुन्हा झुलू लागते.
क्रमश:

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800