“ती”
सुमंगला राई शंकर यांचा “ती” हा कवितासंग्रह सुरवातीला नुसताच चाळला होता. आज जेव्हा सदरहू कवितासंग्रह पुन्हा वाचला तेव्हा अक्षरशः प्रत्येक कवितेचं पारायण केले. हे तोंडदेखलं म्हणण्याचा हा अट्टाहास नाही.

या कवितांमधून मला जाणवलं ते नुसत्याच तू आणि मी या नाते संबंधातील काव्य उलगडलेले नाही तर भयाण जगण्यातली असोशी आणि त्याचवेळी समाजातील कोलाहल कवयित्रीच्या काळजाला जाऊन भिडतो.कोरोनाच्या काळातील गाव गाठताना पोराबाळांसकट चाललेली पायपीट मोजक्या शब्दांत मांडली आहे. पनवेलसे गोरखपूर या फरफटीतील दाहकता काळजाला विद्ध करते. कधी पाऊस तर कधी अपघाताने विदीर्ण झालेलं अंतःकरण कोकिळेच कूजन जनमानसाला कितीही आल्हाददायक वाटत असले तरी कवयित्रीने स्वतःवर कोसळलेले आभाळ ऐन तारुण्यात कमजोर बाहूनी आईचा अर्धवट मोडलेला संसार कच्च्याबच्चा भावंडासकट पेलला. सगळीकडे अंधार झाला. आईच्या अकस्मात जाण्याने आलेलं पोरकेपण झेलताना सुद्धा ताठ राहीलेले पोक्तपण अजूनही रेडिओचे सूर अन् कोकिळेची कुहूकुहू अंतःकरण विदीर्ण करते.
लांबून आश्वासन, एक तो आता, दृष्टीआड झालेला मित्र, हे विषय सुध्दा कवितेला जन्म देऊन जातात. बळी कवितेत लग्न नातेसंबंधातील भयाण वास्तव अधोरेखित करतात आणि वाचकांना खूप विचार करायला भाग पाडतात बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा दुरुपयोग करीत तथाकथित एक वर्ग नामानिराळा झालेला दिसत असतो. परखडपणे भाष्य करण्याचं धैर्य, या कवयित्रीकडे आहे त्याबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच.

आपमतलबी नेते, जनतेची फसवणूक, जडलेले पिसे, तू आणि मी, तहान पाऊस, या कवितांमधील असोशी, प्रिय कवितेत अनाम मित्राला रोखठोक दिलेला सल्ला कवयित्रीच्या धीट मनाची ग्वाही देतो. अव्यक्त कवितेत आहे रे नाही रे या संभ्रमात निसटलेले काही क्षण शब्दांत रेखाटण्यात कवयित्री यशस्वी झाली आहे.
सामाजिक बांधिलकी, स्त्रियांवरील अत्याचार, या बरोबरच एक कोमल मन अधेमधे डोकावत रहाते. ऋतू मैत्री प्रतारणा, यातून ते आपल्या काळजाला स्पर्श करते.

शिकत असताना ज्यांनी आकार दिला त्या शिक्षिकेला हा संग्रह कृतज्ञतापूर्वक अर्पण केला आहे यातूनच कवयित्रीचे वेगळेपण उठून दिसते. अशाच कवितांनी साहित्याची बाग फुलवत रहावी, अनेक संग्रह प्रकाशित व्हावेत अशी शुभेच्छा देऊन तूर्त येथे थांबते.

— परीक्षण : सुरेखा पाटील. कवयित्री, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
