Wednesday, September 17, 2025
Homeयशकथामाधव गोगावले : कोरेगाव बुद्रुक ते शिकागो !

माधव गोगावले : कोरेगाव बुद्रुक ते शिकागो !

देवेंद्र भुजबळ लिखित, ग्रंथाली निर्मित आणि न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स तर्फे प्रकाशित होत असलेल्या “माध्यम भूषण” या पुस्तकातील माधव गोगावले यांची यशकथा पुढे देत आहे.
माधवरावांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
— संपादक

समाजाभिमुख राहून काम करणाऱ्या ठाणे येथील सुप्रसिद्ध एकपात्री कलाकार, लेखिका सौ मेघना साने यांनी त्यांच्याकडे आलेली “शिकागो येथे विठ्ठल मूर्तीची स्थापना” ही बातमी आणि काही छायाचित्रे न्यूज स्टोरी टुडे पोर्टल वर प्रसिद्ध करण्यासाठी मला पाठवली. सर्व बातमी वाचून आणि मराठमोळ्या वेशभूषेतील सर्व व्यक्ती, पालखी, लेझीम पथके, प्रचंड जोशात चाललेला कार्यक्रम , दिंडी असा सर्व माहौल बघून आपण अमेरिकेतील दृश्ये बघतोय की महाराष्ट्रातील ? असा प्रश्न मला पडला.

शिकागो सारख्या शहरात विठ्ठल मूर्तीची स्थापना ही बातमी, छायाचित्रे सर्व काही मला सुखद आनंदाचा, आश्चर्याचा धक्काच होता. त्यात बातमीसुद्धा अतिशय शुद्ध मराठीत, देवनागरी लिपीत,रसाळ भाषेत, ओघवत्या शैलीत लिहिलेली होती. सर्व बातमी वाचून आपण प्रत्यक्ष त्या आनंद सोहळ्यात सहभागी झाल्याचा प्रत्यय मला आला. काही अधिक माहितीसाठी मी मेघना ताईंकडून ही बातमी लिहिणारे, शिकागो येथील श्री माधव गोगावले यांचा मोबाईल क्रमांक घेतला आणि तेव्हापासून, म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून आमचा, आम्ही इतके दूर असलो तरी अंत:करणापासून नियमितपणे संवाद सुरू झाला. ते पाठवित राहिलेल्या बातम्या, वृत्तांत पोर्टल वर नियमितपणे प्रसिद्ध होत आले आहेत. विविध विषयांवर आमची विचारांची, अनुभवांची देवघेव होत असते.

आमची कन्या देवश्री हिच्या एम एस इन जर्नालिझम या पदवीदान सोहळ्यासाठी दोन वर्षांपूर्वी आम्ही अमेरिकेत गेलो होतो. त्याच दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती येत असल्याने मला माधवरावांनी शिकागो मराठी मंडळात “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता” या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले होते. शिकागो येथे सौ अलकाचा मावस भाऊ रहात असल्याने आम्ही ही आनंदाने तिथे जायचे ठरवले. पण ऐनवेळी काही कारणांनी तिथे जाता आले नाही. म्हणून मग ते व्याख्यान आणि त्या नंतरची प्रश्नोत्तरे ऑनलाइन झाली. पण आमची शिकागो भेट हुकली याची खंत मात्र वाटत राहिली.

माधवरावांविषयी मला नेहमीच आदर वाटत आला आहे, तो अशासाठी की एका लहानशा गावातील एक मुलगा लहानपणीच आई वडिलांपासून दूर जातो, घरातील सर्व कामें करीत, काही वर्षे, काही मैल पायी पायी शाळेत जात राहतो, कृषी विषयातील उच्च शिक्षण घेतो, ४५ वर्षांपूर्वी अमेरिकेत जातो, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला घडवत असताना आपली मूळं न विसरता उलट ती तिथे रुजविण्यासाठी जिवापाड प्रयत्न करीत राहतो, ही खरोखरच आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. अशा या शिकागो येथे आरोग्य विभाग तंत्रज्ञान विभागात कार्यरत असलेल्या माधवरावांविषयी जाणून घ्यायला आपल्याला नक्कीच आवडेल, असा मला विश्वास आहे.

माधवराव हे मूळ पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर (तेव्हाचा खेड तालुका) तालुक्यातील कोरेगाव बुद्रुक येथील आहेत. त्यांचे आजोबा शंकरराव गणपतराव गोगावले हे शेतीला जोडधंदा म्हणून दुकान सुद्धा चालवित असत. वडील नामदेवराव यांनी तीच परंपरा पुढे चालवली.

त्याकाळी कोरेगाव येथे फक्त चौथीपर्यंत शाळा होती. एकदा शाळेची वार्षिक तपासणी करण्यासाठी आलेल्या शिक्षण निरीक्षकांकडून माधवरावांच्या आजोबांना ते अतिशय हुशार विद्यार्थी असल्याचे सांगण्यात आले. गावात चौथी पर्यंतच शाळा होती. म्हणून माधवरावांच्या आजोबांनी अत्यंत धोरणी निर्णय घेऊन त्यांना तालुक्याच्या ठिकाणी, म्हणजेच राजगुरूनगर येथील शाळेत दुसरी इयत्तेत असतानाच घातले. हाच जणू माधवरावांच्या जीवनातील “टर्निंग पॉईंट” ठरला.

राजगुरूनगर येथे माधवरावांना शिकायला ठेवायचे कारण म्हणजे, एक तर तेथील शाळा आणि दुसरे म्हणजे ते त्यांचे आजोळ होते. आजोबा रामभाऊ कोंडाजी टाकळकर आणि आजी सीताबाई यांच्या घरीच त्यांच्या राहण्या जेवण्याची, त्यांच्याकडे लक्ष देण्याची प्रेमळ सोय होती. त्यामुळे घरच्यांना काही काळजी नव्हती.

राजगुरूनगर येथे माधवरावांचे सहावीपर्यंत शिक्षण छान झाले. पण आजी आजोबांनी वय झाल्यामुळे त्यांच्या मूळ टाकळकर वाडीत रहायला जायचे ठरवले. साहजिकच माधवरावांनीही त्यांच्या बरोबर टाकळकर वाडीत रहायला जावे लागले . पण त्यामुळे त्यांना टाकळकर वाडी ते राजगुरूनगर हे तीन मैलांचे अंतर पुढे अकरावी होईपर्यंत रोज पायी तुडवावे लागले. सोबतच वृद्ध आजी आजोबांची काळजी घेणे, दूध दुभत्या जनावरांच्या आणि घरात पडेल त्या कामात मदत करणे अशी सर्व कामेही ते करीत राहिले. कारण एकच शिकण्याची दुर्दम्य इच्छा. काहीही झाले तरी शिक्षण सोडायचे नाही, हा त्यांचा निर्धारच त्यांच्या त्यावेळच्या खडतर परिस्थितीतून त्यांना पुढे नेत राहिला.

राजगुरुनगर येथील जिल्हा परिषदेच्या जीवन शिक्षण विद्या मंदिर या प्राथमिक या शाळेत असताना लिहिलेले निबंध शाळेतील सूचना फलकावर लावले जायचे. शाळेत नाटक, वक्तृत्व स्पर्धा, खेळ यात भाग घेऊन ते चमकत असत.आठवीत असताना तीन-चार फेरीतील लेखी परीक्षा आणि मुलाखतीतून त्यांची निवड राजगुरूनगर तालुक्यातून महाराष्ट्र सरकारच्या उन्हाळ्यातील एक महिन्याच्या “युवक नेतृत्व विकास शिबिरासाठी” झाली होती. या शिबिरासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सात जिल्ह्यातील विद्यार्थी पुणे येथील शिबिरात सहभागी होते. तिथे अनेक तज्ञ लोकांनी मार्गदर्शन केले. पु ल देशपांडे, बाबासाहेब पुरंदरे, शांता शेळके, दामू धोत्रे इत्यादी साहित्यिकांची भाषणे ऐकून त्यांच्याबरोबर चर्चा करण्याची संधी माधवरावांना मिळाली. याची परिणीती म्हणजे त्यांना साहित्याची कायमची गोडी लागली.

प्राथमिक शाळेतील चौथ्या इयत्तेत शिकविणाऱ्या माडीवाले बाई यांनी माधवरावांच्या मनात कायमचे घर केले. त्यांनी वर्षभर अतिशय जिव्हाळ्याने शिकविले आणि मार्गदर्शन केले यामुळे माधवराव खेड केंद्रात चौथीत पहिले आले.
त्यांचे सातवी फायनलचे पवार गुरुजी हे नुसते प्रेमळ आणि उत्तम शिक्षकच नव्हते तर खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांचे जीवन विद्यार्थ्यांना समर्पित केले होते. त्यामुळे ते दिवसा तर मुलांना शिकवितच पण संध्याकाळी जादा तास घेत असत. सर्व मुलांसोबत शाळेतच झोपत असत. पवार गुरुजींनी घेतलेल्या मेहनतीमुळे आणि त्यांच्या मेहनतीला प्रतिसाद दिल्यामुळे माधवराव सातवीच्या परीक्षेत वर्गात पहिले आले. या शाळेनेच आपल्याला घडविले, अशी कृतज्ञतेची भावना माधवराव व्यक्त करतात.

पुढे आठवी पासून ते अकरावी होईपर्यंत माधवरावांचे शिक्षण राजगुरूनगर येथीलच महात्मा गांधी विद्यालयात झाले. ते ही सर्व मराठी माध्यमातून, हे विशेष होय. या विद्यालयातील पाठक सर, ठाकूर सर, मांजरेकर सर, शिंदे सर, सांडभोर सर, थिगळे सर, दफ्तरदार बाई, जोशी बाई, बलदोटा सर यांच्याकडून अनेक गोष्टी माधवरावांना शिकायला मिळाल्या.
अभ्यासाशिवाय माधवराव इतर उपक्रमात सातत्याने सहभागी होत राहिले. तेव्हापासूनच वर्तमान पत्रात व नियतकालिकांत त्यांचे लेख, कविता प्रकाशित होऊ लागल्या. शिवाय खेळांची अतिशय आवड असल्याने त्यांच्या शाळेच्या कबड्डी आणि खो-खो या खेळांचे ते संघ नायक होते. महाराष्ट्र शासनाच्या “दिवसा पिकवा मळा, रात्रीची शिका शाळा” या साक्षरता उपक्रमात त्यांच्या गुरुजींबरोबर ते सहाव्या वर्गात असल्यापासून पुढे तीन वर्षे प्रौढांना साक्षर करण्याचं काम आनंदाने करीत राहिले. या सर्व बाबींचा त्यांना पुढील वाटचालीसाठी फार उपयोग झाला.

माधवरावांची अकरावी मॅट्रिक होणारी शेवटची तुकडी होती. मॅट्रिकची परीक्षा ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी कुठली शाखा निवडायची, असा प्रश्न निर्माण झाला. पण विद्यालयातील शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार कृषी पदवीधरांना ताबडतोब चांगल्या नोकऱ्या मिळतात, असे सांगण्यात आले. तसेच आजोबांचे म्हणणेही त्यांनी कृषी शाखा निवडावी, असेच होते. त्यामुळे त्यांनी पुढील शिक्षणासाठी पुणे येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथून त्यांनी उच्च श्रेणीत पदवी मिळवली. इथे शिकत असताना ते खो-खो संघात होते. तसेच ८०० व १५०० मीटर धावणे आणि ट्रिपल जंपसाठी त्यांच्या महाविद्यालयाचे त्यांनी आंतर विद्यापीठ स्पर्धेत प्रतिनिधित्व केले होते. चार वर्षे ते एनसीसीत होते. त्यामुळे त्यांना दर आठवड्याला लष्करी प्रशिक्षणात भाग घ्यावा लागला. या प्रशिक्षणामुळे आरोग्य चांगले राखण्याची सवय निर्माण होऊन सोबतच देशसेवेची प्रेरणा जागृत झाली. अभ्यासक्रमाचा भाग म्हणून दरवर्षी एक महिना पर राज्यात प्रशिक्षण घेण्याच्या उपक्रमामुळे भारतातील त्याकाळच्या बहुतेक राज्यात त्यांचा प्रवास आणि त्या त्या राज्यांचा अभ्यास झाला.

कृषी पदवीच्या शेवटच्या वर्षात असतानाच भारत सरकारच्या भारतीय कृषी अनुसंधान केंद्र (आयसीएआर – ICAR) या संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या अत्यंत कठीण प्रवेश परीक्षेत पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये माधवराव आले. त्यामुळे त्यांना आयसीएआर फेलोशिप मिळाली. या फेलोशिप मुळे त्यांना नैनिताल येथील प्रसिद्ध गोविंद वल्लभ पंत राष्ट्रीय कृषी आणि तांत्रिक विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेता आले. अशा प्रकारे गावातील पहिला मॅट्रिक पास, पहिला पदवीधर व पहिला पदव्युत्तर पदवीधर असे बहुमान त्यांना मिळाले.

या सर्व वाटचालीत माधवरावांचे थोरले बंधू साहेबराव आणि रघुनाथ, थोरली बहीण सुभद्रा बहिरट व सावित्रा बोत्रे यांचेही त्यांना मोलाचे योगदान लाभले.

एमएससी झाल्यानंतर माधवरावांनी काही काळ कृषी क्षेत्रात काम केले. या कामानिमित्त त्यांना महाराष्ट्रभर फिरावे लागले. त्यातून त्यांना महाराष्ट्र समजत गेला.

सर्व काही व्यवस्थित चालू असताना, माधवरावांनी मोठे धाडस केले. भारत सोडून त्यांनी थेट अमेरिकेची वाट धरली. तिथे सुरुवातीला त्यांनी कृषी क्षेत्रात एका हायब्रीड सीड कंपनीत चार वर्षे नोकरी केली. पण कृषी क्षेत्रात फार वाव दिसत नसल्याने त्यांनी नोकरी करीत करीत संगणक शास्त्रातील पदवी मिळविली. त्यामुळे त्यांना आरोग्य क्षेत्रात प्रोग्रामर, सिस्टिम ॲनालिस्ट, ऍप्लिकेशन ॲनालिस्ट, नेटवर्क ॲडमिन, सुरक्षा अनुपालन अधिकारी अशा चढत्या श्रेणीने काम करण्याची संधी मिळत गेली.

शाळेत प्रथम क्रमांकावर आलेले, दहावी,बारावी च्या गुणवत्ता यादीत चमकलेले सर्वच विद्यार्थी जीवनात यशस्वी होतीलच असे नाही. तर जो समाज सेवा करतो, अनेकांशी चांगले संबंध जोडतो अशा व्यक्तीची मात्र जीवनात निश्चितच उन्नती होते हे मनावर लहानपणापासूनच बिंबलेले असल्यामुळे माधवरावांनी तेच धोरण अमेरिकेत कायम ठेवून अनेक क्षेत्रातील तज्ञ व प्रसिद्ध व्यक्तींशी मैत्री केली. भारतीय परंपरा, संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी असे काही उपक्रम असतील त्यात ते स्वखुशीने भाग घेऊ लागले आणि अजूनही घेत आहेत. आपल्या संस्कृतीची जोपासना करणं हे आपलं कर्तव्य आहे, या निस्वार्थ, निरपेक्ष भावनेने ते हे कार्य करीत आहेत.

शिकागो येथील चिन्मय मिशनमध्ये मुलांना माधवरावांनी सपत्नीक पंचवीस वर्षे रामायण, महाभारत, संत चरित्रे, गीता, वेद, उपनिषदे आणि भारतीय परंपरा यावर स्वामी चिन्मयानंद यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित अभ्यासक्रम शिकविला आहे. या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी दरवर्षी भारतीय सणांच्या वेळी होणाऱ्या कार्यक्रमात सादर करण्यासाठी भारतीय संत, रामायण, महाभारतातील प्रसंग, परंपरा, सणांची माहिती यावर वेगवेगळ्या १५ मिनिटे ते ४५ मिनिटांच्या नाटिका लिहिल्या. शिवाय या नागरिकांचे दिग्दर्शनही त्यांनीच केले. शिकागोतील वार्षिक शिबिरात ऐनवेळी दिलेल्या विषयांवर बोलण्याच्या स्पर्धांचे त्यांनी २५ वर्षे आयोजन केले आहे. काही वर्षे निबंध स्पर्धांचे आयोजक व शिबिराचे मार्गदर्शक म्हणूनही काम केले. शिकागो महाराष्ट्र मंडळाच्या मराठी शाळेत मुलांना स्वयंसेवक म्हणून तीन वर्षे शिकविले आहे. लिंकन व्हिलेजच्या कार्यकारणीचे सदस्य म्हणून त्यांनी मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगणे बांधण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.संगम – इंडो अमेरिकन कल्चरल संस्थेचे अध्यक्ष आणि संगम फाउंडेशन ट्रस्टी म्हणून काही वर्षे काम केले.
संगम संस्थेचे ते अध्यक्ष असताना भारतातून फोर्ट वेन या शहरात येणाऱ्या दोन विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्कॉलरशिप सुरू केल्या.

१९९१ साली फोर्ट वेन या शहरात माधवरावांनी दिवाळी अधिवेशनाचे सूत्रसंचालन केले. त्या कार्यक्रमावर आधारित सुमारे दोन तासांची डॉक्युमेंटरी त्यांनी निर्माण केली. यासाठी अनेक तास सौ ज्योती वहिनी व त्यांनी संकलनामध्ये घालवले. फोर्ट वेन शहरातील टी व्ही चॅनलवर अनेक वेळा ती दाखविली गेली. त्याच बरोबर अमेरिकेतील अनेक शहरातील पब्लिक टी व्ही वाहिन्यांवर ती डॉक्युमेंटरी प्रदर्शित केल्या गेली आहे.

महाराष्ट्रातील किल्लारी भागात ३० सप्टेंबर १९९३ या दिवशी झालेल्या भयानक भूकंपातील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी आणि त्यांच्या परिवाराने एक हाती फोर्ट वेन, इंडियाना राज्यात मदत गोळा करण्यासाठी प्रयत्न करून त्यावेळच्या सुमारे एक लाख डॉलर्सची औषधे, कपडे, आणि इतर काही वस्तू आणि पैसे पाठविले.

कोविड काळामध्ये “महाराष्ट्र मंडळ, शिकागो”च्या अध्यक्षा उल्का नगरकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणीने अनेक उपक्रम सुरू केले. विशेष म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीची व मराठी धर्माची जोपासना करण्यासाठी सुरू केलेले ते उपक्रम आता अधिक जोमाने चालू आहेत. महाराष्ट्र मंडळाच्या अध्यात्मपीठ, साहित्यकट्टा, इतिहास मंच, ज्येष्ठ नागरिक यांसारख्या वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन व अनेक कार्यक्रमांचे सुत्र संचलन माधवरावांनी केले आहे. भाषा टिकली तरच आपली संस्कृती टिकते. आपल्या संस्कृतीची पुढील पिढीसाठी जोपासना करणे हे आपले कर्तव्य आहे. या कर्तव्य पूर्तीसाठी गेली अनेक वर्षे ते सक्रिय भाग घेत आहेत. अमेरिकेत मराठी भाषेची जोपासना करून वाचन- लेखनाद्वारे ती वृद्धिंगत करणे, सभासदांच्या मनात मराठी साहित्याविषयी गोडी निर्माण करणे, नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना त्यांच्या साहित्याच्या सादरीकरणासाठी व्यासपीठ देणे, ज्यांच्यात साहित्यिक दडला आहे त्याला जागृत करणे आणि अर्थातच उत्तम कार्यक्रम आयोजित करून श्रोत्यांचे मनोरंजन करण्यासाठी हातभार लावत आहेत. भारतातील अनेक साहित्यिक व कलाकारांना आमंत्रित करून झूम सत्रातील त्यांच्या कार्यक्रमांचा अनेक सभासद लाभ घेत आहेत.
सात वर्षे त्यांनी ISACA शिकागो चाप्टरचे “बोर्ड ऑफ डिरेक्टर“ म्हणून सेवा कार्य केले आहे. महाराष्ट्र मंडळ शिकागो च्या कार्यकारणीवर ते सदस्य होते व आता विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत.

माधवराव यांच्या आईची इच्छा होती की त्यांनी शिक्षक किंवा प्राध्यापक व्हावे. प्रबळ इच्छा असली आणि त्यासाठी आवश्यक असणारे प्रयत्न केले तर ती इच्छा पूर्ण होतेच. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी अतिरिक्त प्राध्यापक म्हणून शिकागो शहरातील एका विद्यापीठात अनेक वर्षे तांत्रिक विषय शिकविले.

आतापर्यंत माधवरावांनी आमंत्रित कवी म्हणून ४ कवी संमेलनात कविता सादर केल्या आहेत. तर २ विश्व मराठी संमेलनात तसेच २०२३ साली वाराणसी येथे झालेल्या विश्व सनातन धर्म संमेलनात निमंत्रित वक्ता म्हणून विचार मांडण्याची संधी त्यांना मिळाली आहे. दोन वर्षांपूर्वी भारतातील एका कार्यक्रमात त्यांनी इंग्रजीतील एकही शब्द न वापरता एक मिनिट शुद्ध मराठीत बोलण्याचे आव्हान खरोखरच एकही इंग्रजी शब्द न वापरता पेलून दाखविले. इतके ते मराठीचे जाज्वल्य अभिमानी आहेत. असे आव्हान आपण तरी पेलून दाखवू की नाही याची मला शंका वाटते.

माधवराव काही वर्तमानपत्रे, नियतकालिके यामधून सातत्याने वृत्तांत, लेख, कविता लिहीत असतात. पुण्यातील एका मासिकात त्यांनी “पशुसंवर्धन” या विषयावर लेख माला लिहिली आहे. त्यांचे काही शोधनिबंध व संशोधन पर लेखही प्रकाशित झाले आहेत.⁠

“इलिनॉय : भारतीयांसाठी सोनियाचा दिन” हा इलिनॉय राज्यात दिवाळी ची सार्वत्रिक सुट्टी देण्याबाबतच्या तेथील सरकारने घेतलेल्या निर्णयावर माधवरावांनी लिहिलेला सविस्तर वृत्तांत “न्यूज स्टोरी टुडे’ पोर्टलवर प्रसिद्ध झाला आहे. विशेष म्हणजे या वृत्तांताचे लगेच हिंदी, इंग्रजी, गुजराती, कानडी, तामिळ, तेलगू, आणि मल्याळम भाषेतही अनुवाद प्रसिद्ध झाले. त्यामुळे जगभरातील इतर भाषिक भारतीय सुद्धा हा वृत्तांत वाचू शकले.

इतकी वर्षे झाली तरी आपण मूळचे शेतकरी आहोत, हे माधवराव कधीही विसरले नाहीत. म्हणूनच त्यांच्या घरच्या बागेमध्ये सेंद्रिय पद्धतीने वेगवेगळ्या पालेभाज्या व भाजीपाला लावत असतात. यामुळे निसर्गाशी असलेले नाते टिकवत त्यातून मिळणारा आनंद ते घेत असतात. स्वतःच्या बागेत स्वतः वाढविलेल्या आणि सौ ज्योती वहिनींनी बनविलेल्या खमंग चवदार ताज्या ताज्या भाज्या खाण्यात असलेले सुख ते मनसोक्त घेत असतात. इतकेच नव्हे तर बागेतील बराचसा भाजीपाला मित्रमंडळी व कार्यालयातील सहकाऱ्यांनाही ते अगत्याने देतात.

विविध उपक्रम करीत असतानाच माधवरावांचे हौशी खेळांमध्ये भाग घेणे चालूच आहे. गेली दोन वर्षे त्यांनी पाच किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत पन्नास वर्षावरील गटात सुवर्णपदके मिळविली आहेत. ह्या वर्षीही सुवर्ण पदक मिळवण्यासाठी त्यांची तयारी चालू आहे. शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी ते नियमित व्यायाम करीत असतात.

पूर्वाश्रमीच्या पुणे येथील ज्योती सीताराम खरबस यांच्या सोबत माधवरावांचा १९८० साली विवाह झाला.
त्यांनी प्रतिष्ठित अशा परड्यू विद्यापीठातून बी एस सी ही पदवी मिळविली. विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे माधवरावांच्या प्रत्येक उपक्रमात सौ ज्योती वहिनी केवळ त्यांच्या पाठीशीच नसतात तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असतात. माधवरावांची मुलगी शालिनी ही प्रोग्राम डायरेक्टर म्हणून तर मुलगा अजित व्यवसाय क्षेत्रात व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.त्यांना दोन नातवंडे आहेत.

व्यावसायिक, कौटुंबिक, सामाजिक, साहित्यिक जबाबदाऱ्या पार पाडीत असतानाच माधवरावांनी एक गोष्ट कटाक्षाने जपली आहे आणि ती म्हणजे त्यांची पर्यटनाची आवड !
अमेरिकेतील बहुतेक सर्व भाग त्यांनी पाहिले आहेतच. त्या शिवाय अनेक देशात जाऊन त्यांनी त्या त्या देशाची संस्कृती, राहणीमान, चालीरीती, पुरातन वास्तू, उद्योगधंदे, कृषी उद्योग आणि तिथे पिकणारी पिके आणि फळझाडे, प्रसिद्ध शहरे, प्रेक्षणीय आणि निसर्गरम्य स्थळे पाहण्याबरोबर तेथील जीवनाचा अभ्यास केला आहे. आजपर्यंत त्यांनी सपत्नीक नेपाळ, श्रीलंका, भूतान, थायलंड, जपान, चीन, मलेशिया, इंडोनेशिया, जावा, सुमित्रा, बाली, कॅनडा, मेक्सिको, कॅनकुन, सेंट्रल अमेरिकेतील पनामा, कॅरिबियन भागातील बहामाज, काझूमेल बेटे, इजिप्त, मोरॉक्को, दक्षिण आफ्रिका, दुबई, अबुधाबी, शारजाह, क्वातार, कुवेत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी आणि पॉलीनेशिया बेटांतील ताहिती, बोरा बोरा, मोरया, आणि हवाई बेटे पाहिली आहेत. तर युरोप खंडातील आइसलँड, ग्रेट ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, इटली, ग्रीस, पोलंड, डेन्मार्क, हंगरी, नेदरलँड, स्वीडन, स्विझर्लंड, ऑस्ट्रिया, फिनलँड आणि नॉर्वे इत्यादी देशांचा प्रवास केला आहे.

माधवराव सहपरिवार उर्वरित आयुष्य आनंदात जगण्याबरोबर अनेक ज्येष्ठ साहित्यकांनी सुचवल्याप्रमाणे आता नियमित साहित्य लिहून कविता संग्रह आणि ललित कथा पुस्तक प्रकाशित करण्याच्या प्रयत्नात सध्या आहेत. त्यात ते यशस्वी होतीलच यात काही शंका नाही.

आज अमेरिकेत जाण्याची मुलामुलींमध्ये, त्यांच्या पालकांमध्ये प्रचंड ओढ निर्माण झाली आहे. या मुलामुलींना आपण काय सांगू इच्छिता ? असे विचारल्यावर माधवराव म्हणाले, “आपण सामान्य कुटुंबात जन्मलो, वाढलो त्यामुळे आपली स्वप्नपूर्ती होईल की नाही असा विचार कधीच मनात आणू नका. मराठी माध्यमातून शिकलेले असला तरी त्याबद्दल मुळीच खंत मानू नका. जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी असेल व मिळेल त्या क्षेत्राशी जुळवून घेऊन आपल्या स्वप्नपूर्तीसाठी सतत झटत राहिलात तर यश तुमच्या हातात पडल्याशिवाय राहणार नाही. साध्या साध्या गोष्टीने हिरमोड होऊन न थांबता पुढे पुढे जातच राहिलो तर जीवन निश्चितच एक ना एक दिवस यशस्वी होतेच. आई-वडिलांचे आशीर्वाद, त्यांची सेवा, समाज सेवा करत करत आपल्या परिवारालाही चांगलं शिक्षण व संस्कार देऊन आपल्या जीवनात समाधानी नक्कीच होता येते. केवळ पैशाच्या मागे लागून जीवनात समाधान मिळत नाही. आपल्या जीवनाचे सूत्रधार आपणच असतो पण त्यामध्ये परमेश्वर व आपल्या जवळच्या माणसांचा विशेषतः विवाहानंतर तुमच्या जोडीदाराचा खूप मोठा वाटा असतो. योग्य संगतीत आपण राहिलो, आपली मुळे आपण विसरलो नाहीत तर नक्कीच उच्च प्रतीचे जीवन जगत आपल्याला पाहिजे तितकी उंच भरारी घेता येते.”

खरोखरच माधवरावांनी दिलेला हा अमूल्य सल्ला केवळ अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या मुलामुलीनीच नाही तर जगात इतरत्र कुठेही जाऊ इच्छिणाऱ्या किंवा आपल्या देशातच राहून करिअर करू इच्छिणाऱ्या प्रत्येक मुलामुलीने लक्षात घेऊन तो अमलात आणणे, हीच या पिढीच्या सुखी जीवनाची खरी गुरुकिल्ली असेल.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

8 COMMENTS

  1. माधव गोगावले यांचा संपूर्ण प्रवास रोमहर्षक खराच; पण आजच्या पिढीला प्रचंड प्रेरणादायी आहे. कष्ट आणि संघर्ष केल्याखेरीज ईप्सित ध्येय प्राप्त होऊ शकत नाही. भुजबळ सर, आपण हा प्रवास अतिशय प्रेमपूर्वक शब्दबद्ध केल्याने तो अधिक आत्मीय झाला आहे. आपण परिचय करून देत असणारी सर्वच व्यक्तिमत्त्वे प्रेरक आहेत. मनापासून धन्यवाद.

  2. शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन

    खुप छान आणि प्रेरणादायी लेख…असे अनेक माधवराव आपल्या लेखाच्या प्रेरणेतून घडतील असा विश्वास मला वाटतो सर..माधवराव सरांना मनःपूर्वक शुभेच्छा 🙏

  3. श्री. माधवराव गोगावले यांची माहिती वेधक आणि प्रेरक

  4. श्री माधवराव गोगावले यांच्या प्रेरणादायी जीवनाचा गोषवारा वाचून महाराष्ट्रातील सामान्य कुटुंबातील घरातून बाहेर पडून आपल्या कर्तृत्वावर अमेरिकेतील ‘संधीच्या भूमीत’नमस्कार नाव आणि प्रतिष्ठा कमावली. समाजिक कार्यक्रमात संचलन केले. ही विशेष गोष्ट आहे. काही महिन्यांपूर्वी शिकागो महाराष्ट्र मंडळातील इतिहास प्रेमींच्या करिता नरवीर तानाजी मालुसरेंची सिंहगडावरील शौर्यगाथा आणि महाराणा प्रताप यांच्या हळदीघाटातील युद्ध यावरील प्रेझेंटेशन सादर करताना सूत्रसंचालन त्यांनी केले होते. ही माझ्या संदर्भातील आठवण जरूर उल्लेखित करावीशी वाटते.
    विंग कमांडर शशिकांत ओक.

  5. 👏 हरे कृष्ण ! 👏
    श्री. माधवराव गोगावले यांचे अभिनंदन 💐
    👍त्यांचा जीवन प्रवास इतरांना प्रेरणादायी ठरेल असाच आहे👌
    ☝️ते कृषी महाविद्यालय पुणे येथील आमचे वर्ग मित्र आहेत, आम्हास त्यांचा अभिमान वाटतो💪
    शिकागोतील त्यांच्या कार्याची ओळख देवेंद्र भुजबळ यांनी करून दिल्याबद्दल त्यांचेही आभार 🙏
    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🤝

  6. मला तुमचा खूप अभिमान आहे मामा….. तुमच्यासारखे मामा मला मिळाले हे माझे भाग्य आहे 🙏🙏🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं