Thursday, September 18, 2025
Homeलेख"माहिती" तील आठवणी ( ४ )

“माहिती” तील आठवणी ( ४ )

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात कार्यरत राहिलेल्या/असलेल्या व्यक्तींच्या “माहिती” तील आठवणी आपण या सदरात वाचत असता.

यापूर्वीच्या तीनही आठवणी या प्रत्यक्ष प्रसिद्धीशी संबंधित व्यक्तींच्या होत्या, तर आजच्या आठवणी मात्र, या कुठल्याही विभागाचा कणा समजल्या जाणाऱ्या आस्थापना शाखेतून वरिष्ठ सहायक संचालक या पदावरून निवृत्त झालेल्या श्री विलास कुडके यांच्या आहेत.….

मुंबईमधील माझ्या सरकारी सेवेच्या ३१ वर्षांच्या सेवेनंतर मी २८ फेब्रुवारी २०२० रोजी सुखरुप सेवानिवृत्त झालो. या सेवेत एवढे अपडाऊन झाले की तेवढ्यात एक पृथ्वी प्रदक्षिणा होईल ! आज या गोष्टीवर माझाच विश्वास बसत नाही.

गेलेल्या वर्षातील कितीतरी आठवणी फुलपाखरासारख्या अधूनमधून मनात रुंजी घालत राहतात. या आठवणी, आयुष्यात आलेले अधिकारी, सहकारी, प्रवासातील क्षण, चढउतार, वेगवेगळे दिवस, मिळालेल्या पदोन्नत्या, आगाऊ वेतनवाढी यांच्या असतात. कधीतरी या सर्व आठवणी आपल्याभोवती फेर धरत राहतात. आपल्या घडण्यामध्ये या सर्वांचाच हातभार होता हे जाणवत राहते..

मला आठवते ते १९८९ हे वर्ष होते. तेव्हा मी नाशिकमध्ये उपनगर भागात राहून डी.एड. करीत होतो. त्यापूर्वी १९७८ ते १९८७ पर्यंत खाजगी नोकरीत होतो. पण सरकारी नोकरीच्या शोधात होतो. स्पर्धापरीक्षा देत होतो पण हवे तसे यश मिळत नव्हते. आपल्या नशिबात सरकारी नोकरी आहे की नाही ? असाही कधीकधी प्रश्न पडे.

अचानक एके दिवशी पोस्टमनने एक छोटा खाकी लिफाफा आणून दिला आणि माझ्या आयुष्यात आशेचा किरणच उगवला ! तोपर्यंत मला निराशेने अगदी ग्रासून टाकलेले होते. लिफाफा उघडून बघितला तर सामान्य प्रशासन विभाग असे लिहिलेला आदेश ! महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुरस्कृत उमेदवार म्हणून निवड केली असून लिपिक पदावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती केल्याचा तो आदेश होता.

तो आदेश पाहून मी अगदी भांबावून गेलो. कधीतरी १९८५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली होती ते आठवले. एव्हाना ही गोष्ट मी विसरुनही गेलो होतो. नंतर शुन्याधारित अर्थसंकल्प आला आणि सरकारी नोकरीची दारे बंद झाली होती. आदेश घेऊन अण्णा म्हणजे माझे सासरे यांच्याकडे गेलो. ते आनंदून गेले. काही करुन मुंबईला जायचे असे म्हणून त्यांनी तयारी केली. मुंबईला नोकरी म्हणजे माझ्यापुढे अनेक प्रश्न उभे राहिले. त्यात मुंबई कधी पाहिलेली नव्हती. कुटूंबापासून दूर. कुठे राहायचे, काय खायचे, कसे करायचे, पण अण्णा ठाम ! त्यांच्यापुढे काही बोलायची सोय नव्हती.

मला घेऊन ते सायंकाळी निघाले. ट्रेनने प्रवास करुन आम्ही कल्याणला आलो. तेथे आते सासऱ्यांकडे मुक्कामी राहिलो आणि सकाळी लोकलने मुंबईला पोहोचलो. मंत्रालयाकडे कसे जायचे हे त्यांनाही माहित नव्हते. विचारत विचारत आम्ही पायी मंत्रालय गाठले. नवीन प्रशासन भवनची इमारत पाहिली. एवढी उंच इमारत तोपर्यंत आयुष्यात मी पाहिलेली नव्हती. त्यात १७ व्या मजल्यावर काम करायचे यामुळे मी अगदी गांगरुन गेलो.

कसेबसे १७ व्या मजल्यावर लिफ्टने गेल्यावर कार्यालयात सामान्य प्रशासन विभागाचा आदेश दाखवून अण्णांनी चौकशी केली. तेव्हा सहायक संचालक (आस्थापना) म्हणून श्री.सु.पां. धुरु होते. त्यांनी सौ. रं.र. प्रभू यांना भेटायला सांगितले. सौ.प्रभू यांनी आदेश पाहिला. शैक्षणिक अर्हता, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र इत्यादी पूर्तता करण्यास सांगितले. मी जवळ असलेली कागदपत्रं जमा केली. त्यांनी अधिवास प्रमाणपत्र आणावे लागेल असे सांगितले. एक कार्यालयीन आदेश त्यांनी टंकलेखन शाखेकडून तयार करुन त्या मला समोर मंत्रालयात महासंचालकांकडे घेऊन गेल्या. त्यावेळी महासंचालक श्री प्रमोद माने साहेब हे परदेश दौऱ्यावर असल्याने स्व.रमेश शं. वाबगावकर हे प्रभारी महासंचालक होते. त्यांच्या दालनात शिरण्यापूर्वी मला जराशी धडकीच भरली. मी दालनाबाहेर चपला काढून आत गेलो. त्यांनी आपल्या जाड भिंगाच्या चष्म्यातून मला नीट निरखून पाहिले आणि माझ्या नियुक्तीच्या आदेशावर धावत्या अक्षरातील सही केली.

अधिवास प्रमाणपत्रासाठी मी पुन्हा नाशिकला परतलो. मुंबईला कोठे राहायचे हा प्रश्नच होता. योगायोगाने माझी गाठ रिझर्व्ह बँकेत लागलेल्या श्री.साळवे या मित्राशी पडली. तो सुट्टीसाठी घरी नाशिकला आला होता. तो म्हणाला माझ्याबरोबर कांजुरमार्ग येथे राहा. त्याने कांजुरमार्ग येथे भाड्याने रुम घेतलेली होती. एकटाच होता. बटाटे उकडून मीठ मिरची लावून खायचा. तिथून लोकल कशी ‘पकडायची’ हे मी शिकलो. गर्दीत बोगीत शिरकाव करणे, पुढे रेटत रेटत जागा करणे शिकलो. माझ्या दृष्टीने हे सर्वच नवीन होते.

आठवडाभर कांजूरमार्गवरुन लोकलने प्रवास, सुट्टीला पंचवटीने घरी असा क्रम सुरू झाला. पुढे त्या मित्राचे लग्न ठरले. मग मी कोठे राहावे याचा शोध घेत कसाऱ्याला भाड्याने राहू लागलो. पत्नी तेव्हा पेठला प्राथमिक शिक्षिका म्हणून नोकरीला होती. ती, लहान मुलगा व वडील पेठला राहायचे. एक दिवस सुट्टी आली की पत्नी नाशिकला यायची व दोन दिवस सुट्टी आली की पेठला जायचो. पेठचे वातावरण अगदी अद्भूत होते. वडीलांनी एकदा पत्र पाठवून मला कळवले होते की तिकडे वाघ फिरतो, येताना दिवसाच जपून येत जा !

नाशिकहून येतांना कसारा लोकलने यायला सुरूवात केली. एकदा फारच गंमत झाली. मी खिडकी पकडून झोपून गेलो. तेव्हा तिथे नेहमीचे येणारे डोंगरे यांनी मला न उठवता शेजारी बसले. उठल्यावर चौकशी केली. सर्वांच्या जागा ठरलेल्या असतात, असे सांगितले. मग मी न चुकता त्यांची खिडकी सोडून बाजूला बसायला लागलो.

डोंगरे म्हणजे अगदी गमत्या स्वभावाचे. कोणाला झोपू द्यायचे नाही. तरी देखील हटकून झोपणारे एमटीएनएल मधील शंकर होतेच. मग डोंगरे त्यांना झोपेतच ठेवून त्यांच्या शर्टाच्या गुंड्या सर्व उघडून ठेवायचे आणि सर्वत्र खसखस पिकली की शंकर हळूच डोळे उघडून गुंड्या लावून पुन्हा झोपून जायचे. हळूहळू मीही त्या ग्रुपचाच एक भाग झालो.

मुंबईमधील माझ्या नोकरीला प्रारंभ झाला. कार्यालयात पाहिले, जो तो कामात होता. आपण काय काम करायचे हा प्रश्न होता. मग कोणीतरी सांगितले एवढा एक तक्ता असा भरुन द्या. मी सुरुवात केली. माझं अक्षर पाहून सौ.लव्हेकर ह्या अधीक्षक स्व.पेंडसे यांना काहीतरी म्हणाल्या आणि स्व.पेंडसे यांनी मला त्यांच्या जवळच बसायची व्यवस्था करुन बसायला सांगितले. ते म्हणाले “तू इथेच बसून काम कर. केलेले काम आम्ही पाहून घेऊ.”
मी चौफेर नजर फिरवली तर समोर स्व.जयवंत म्हसकर, सौ.पडवळ, पांडुरंग जोशी, सौ.येसाजी, बाजूला श्री.ठाकूरदेसाई, कोपऱ्यात श्री.मुरुडकर अशी सगळी वरिष्ठ होती.
“हा काय काम करणार ?” अशा नजरेने जणू ती पहात असावी असा मला आपला सारखा भास होत होता.

एवढ्या ज्येष्ठ मंडळीत मीच तेवढा नवखा होतो. त्यावेळी मला प्रथमच पांडुरंग जोशी, सी.एल. सावंत यांनी त्यांच्या बरोबर खाली चहाला नेले. नवीन प्रशासन भवनच्या उजव्या बाजूला समोरच चहावाला होता. पाणी पिता पिता उरलेले पाणी मी रस्त्याच्या कडेला टाकले. ते चुकून तिथे उभे असलेल्या काहींच्या पॅन्टीवर उडाले. तर ते एकदम हमरीतुमरीवर आले. त्यांना मग सांगण्यात आले की, नवीनच आहे वगैरे.

दुपारी जेवणाचा प्रश्न श्री.सी.एल. सावंत यांनी सोडवला. तो मला चौरस आहार गृहात घेऊन गेला. तिथे अवघ्या एक रुपयात जेवण पाहून मी थक्क झालो. पोळी संपल्यावर मी आणखी पोळी येईल म्हणून वाट पाहायला लागलो. तर श्री.सावंत म्हणाले एवढ्याच पोळया असतात !

सायंकाळी जो तो निघायला लागला. मला थांबलेले पाहून धुरु साहेबांनी विचारले, “अरे तुला जायचे नाही का ? तेव्हा निघालो.” तेंव्हा बजेटला कुरळया केसांचे पुलं सारखे भारदस्त वाटणारे विलास श्रृंगारपुरे होते. त्यांच्यासमोर आंतर्लेखा परीक्षक प्रफुल्ल देशपांडे हे होते. पेंडसे साहेब मला एक एक संदर्भ मार्क करायचे. सुरूवातीला त्यावर नेमकं काय करावे हेच सुचत नसायचे. कोणाला विचारावं असा प्रश्न पडे. कोणीतरी म्हणायचे, शासनात जास्त हुशारी करु नये, अंगाशी येते ! तरीसुद्धा मी मार्गदर्शन कोणाकडे मिळेल असा शोध घेई. यामध्ये मला प्रफुल्ल देशपांडे एक चांगले मार्गदर्शक मिळाले. ते कितीही बिझी असले तरी मला जवळ बसवून घ्यायचे. मला मार्क केलेला संदर्भ पाहायचे आणि त्यावर टिप्पणी कशी लिहायची, नियम कसे नमूद करायचे, मान्यता मिळाल्यानंतर मसुदा कसा सादर करायचा असे मार्गदर्शन करायचे.

नियम नमूद करायचा म्हणजे नियमांचा अभ्यास आलाच. वेगवेगळया विषयांवर नियम, शासन निर्णय, परिपत्रक शोधण्याचा, विषयवार फाईल्स करण्याचा मला जणू छंदच जडला. म्हसकर साहेबांकडे त्यांनी सादर केलेल्या टिप्पण्यांच्या स्थळप्रतींची एक फाईल होती ती त्यांनी एकदा मला अभ्यासाला दिली. त्यांचे अक्षर खूप सुंदर होते. याउलट जोशींचे अक्षर बारीक वर्तुळे वर्तुळे काढल्यासारखे असायचे.

तेव्हा कार्यालयात एक प्रकारचे कौटुंबिक, घरगुती वातावरण वाटायचे. इतक्या लांबून माझ्या सारख्या नवख्या नुकत्याच नोकरीस लागलेल्यास या वातावरणाने सामावून घेतले. परकेपण कुठल्या कुठे नाहिसे झाले. धुरु साहेब आवर्जून सायंकाळी मला पळायला सांगायचे. बहुदा लांबून प्रवास करुन येणारा तेव्हा मीच असावा.

कापडी साहेब तेव्हा माहिती केंद्र, दादर येथे व्यवस्थापक होते. त्यांनी एकदा महासंचालकांना सांगितले, त्यांना दादरला काहीच काम नाहीय, त्यांना काम हवे. त्यांचा तो प्रामाणिकपणा पाहून महासंचालकांनी त्यांना आस्थापना शाखेत आणले. त्यांच्याकडे मुख्यालयाचे व धुरु साहेबांकडे जिल्ह्याच्या आस्थापना शाखेचे काम सोपविण्यात आले. कापडी साहेबांचे अक्षर म्हणजे अख्ख्या कागदावर तिरपे तिरपे, मोठ्ठे न लागणारे असे होते. महासंचालकांनी एकदा त्यांना विचारले “तुम्ही फाईलवर लिहित का नाही ?” तर ते म्हणाले “माझे अक्षर आपल्याला लागणार नाही”. महासंचालक म्हणाले “कोणतेही अक्षर माझ्याकडे घेऊन या, ते मी वाचून दाखवीन पण फाईलवर तुमचे अभिप्राय हवेतच”. हे माझ्या चांगले लक्षात राहिले.

एकदा असाच प्रसंग घडला. कोणाचा तरी मला फोन आला. तो घेता घेता नकळत मी ज्या खुर्चीचर बसलो ती साहेबांची खुर्ची आहे असे कोणीतरी जोरात ओरडले. त्या खुर्चीवर पुढे आपल्यालाही कधीतरी बसावे लागेल असे त्यावेळी वाटले नव्हते. मी अगदी ओशाळलो.
कापडी साहेबांची खुर्ची म्हणजे फिरती खुर्ची होती. पुढ्यात मोठ्ठे टेबल होते. एकेक फाईल ते आपल्या भिंगाच्या चष्म्यातून लकाकत्या नजरेने वाचायचे. वाचता वाचता ते प्रश्नार्थक मुद्रेने आपले कपाळावरचे पुढे आलेले केस ओढत राहायचे. फाईल दुमडून वाचायला घ्यायची अशी त्यांची पद्धत होती. त्यांनी माझ्याकडे अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याचे प्रकरण सोपवले. मीही ते मेहनतीने सर्व संदर्भ शोधून त्यांना करुन दाखवले. तेव्हा ते खूप खुष झाले. त्यानंतर मी त्यांचा अगदी लाडका झालो. मी कसे काम करतो आणि तुम्हाला कसे जमत नाही असे ते शाखेत इतरांना सुनावू लागले तेव्हा मला अगदी शरमल्यासारखे व्हायचे.

जयवंत म्हसकर साहेब जातांना संदर्भ घेऊन जायचे आणि सकाळी शबनमवजा झोळीत चार ते पाच फाईल तयार करुन आणायचे. मला त्यांचे खूप कौतुक वाटायचे. त्यांच्या टिपण्या म्हणजे मला आदर्श वाटायच्या. त्यांच्यासारखे आपणही काम करावे असे वाटायचे. हळूहळू तसे मला जमायलाही लागले. माझ्या टेबलावर कामकाज वाटपाप्रमाणे ठरलेले विषय असे नव्हतेच. छोट्या संदर्भांपासून मोठ्या कार्यवाहीच्या संदर्भांपर्यंत जे जे पेंडसे साहेबांना तातडीचे, क्लिष्ट वाटे ते ते संदर्भ ते मला देऊ लागले. ते संदर्भ हाताळता हाताळता जो विषय आहे त्यातील तरतुदी, नियमांचा अभ्यास मी करीत गेलो. प्रशिक्षण, परीक्षा असे प्रकार त्यावेळी नव्हते. एकलव्य निष्ठेने मी नियमांचा अभ्यास करीत गेलो. अधिकारी मार्गदर्शक पुस्तक मंत्रालय केंद्रीय ग्रंथालयात होते. त्यातील प्रकरणे मला इतकी भावली की अक्षरश: त्यातील माहिती मी डायरीत उतरवून घेतली.

आस्थापना शाखेतील सौ.प्रभू, सौ.पडवळ, सौ.देवरुखकर, सौ.बांदोडकर, सौ.येसाजी, हेमा साळुंके, कुंढडिया, नेहा सावंत, निशा सावंत आणि शेजारच्या लेखा शाखेतील सौ.शेणोलीकर, जागडे तसेच प्रकाशन शाखेतील सौ.भोर इत्यादी 12 जणींचा ग्रुप सगळयांमध्ये प्रिय होता. त्यांचे जेवणाच्यावेळी एकत्र येणे, हास्य विनोद, एकमेकांची चेष्टा मस्करी, हळदीकुंकू सर्व आज आठवतं.

सौ.वारंग ह्या समोर दिसणाऱ्या खिडकीतून दिवसात पडणाऱ्या वादळी पावसाचा अंदाज घ्यायच्या, त्यांचे वर्षभरातील रजा घेण्याचे नियोजन जानेवारीमध्येच तयार असायचे  0!

दुपारी जेवणानंतर जागेवर बसल्या बसल्या पुढ्यात फाईल घेऊन त्यावर लेखणी टेकवून झोप घेणारे एकजण होते. त्यांच्या चष्म्यावर खिडकीतून येणाऱ्या उन्हाची तिरीप अशी पडायची की ते झोपले आहेत यावर कुणाचा विश्वासच बसणार नाही. त्या दरम्यान कुणी आले की शेजारचे त्यांच्या कोपराला हळूच धक्का देत. तेव्हा ते “काहीतरीच काय” म्हणून जागं होऊन लिहायला सुरुवात करीत. तेव्हा मोठी गंमत वाटे.

आणखी एक आठवते. सहायक संचालक (आस्थापना) यांच्या दालनाबाहेर श्री.ल.भि. जाधव बसायचे. कुरळया केसांचे. रंग काळा. पान खाण्याचे शौकीन. शाखेत कोणी बाहेरचा चौकशी करायला आला की ते त्याला जवळ बसवून सर्व विचारपूस करुन घ्यायचे. त्यालाही वाटायचे आपले काम यांच्याचकडे होईल पण शेवटी ते त्याला बोटाने ज्याच्याकडे काम आहे त्याला भेटायला सांगायचे तेव्हा चौकशी करायला आलेल्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा व्हायचा.
श्री.ल.भि. जाधव यांना घरी परत जातांना कोणत्याही होर्डिंग्जवरील मजकूर वाचत उभं राहण्याची सवय होती.

माझ्या शेजारीच श्री.ठाकूरदेसाई बसायचे. मोठे डोळे. सोनेरी चष्मा. हाफ बाहीचे चेक्सचे शर्ट. पान खाण्याचे शौकीन. न्यायालयीन प्रकरणे पाहायचे. वरिष्ठांनी अगदी निलंबनाचे आदेश काढायला सांगितले तरी आधी संबंधिताची बाजू ऐकून घेणारे व वरिष्ठांना पटवून द्यायचे की निलंबनाला आव्हान दिले तर आपली बाजू लंगडी पडेल. काही त्यांना मंमद्या पण म्हणायचे. तेव्हा पंचवटी सायंकाळी पावणेसातला सुटायची तर आम्ही दोघे व्ही.टी. पर्यंत क्लिष्ट प्रकरणांवर चर्चा करीत जायचो. मुद्दाम दोघे दोन पक्ष घ्यायचे व प्रकरणांवर विचारमंथन करीत जायचे. त्यांच्याकडून मी प्रकरणाला न्याय देतांना आपल्या विचारांची बैठक कशी असावी हे शिकलो. त्या निमित्ताने सेवाविषयक बाबींमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकाल लक्षात घ्यावयाला मी शिकलो.

सायंकाळी पंचवटी पकडण्यासाठी एकदा घाईने जात असतांना मी स्टेशनच्या घड्याळाकडे पाहता पाहता नगरपालिकेने दुरुस्तीसाठी उघडून ठेवलेल्या होलमध्ये पडतो होतो. नशिब तेव्हा दोन्ही हाताने वर तरंगून राहिलो. तिथे जमलेल्या गर्दीने मला वर ओढून काढले.

आणखी एक प्रसंग म्हणजे मी रेल्वेच्या खिडकीत हात टेकून बसलो असता कोपरावर काचेची जड खिडकी पडली होती तेव्हा डोळयापुढे अगदी अंधाऱ्या आल्या होत्या.

आणखी एक प्रसंग आठवतो. कोण उशिरा येतो याची तपासणी करायला एकदा वरिष्ठ अधिकारी 17 व्या मजल्यावर आले त्यावेळी नेमके रोज लवकर येणारे म्हसकर उशिरा आले होते. त्या प्रसंगानंतर मस्टर कडकपणे तपासण्याचे फर्मान निघाले. त्यावेळी संचालक दिनकर कचरे साहेब हे होते. त्यांनी ते काम ठाकूर देसाई यांच्याकडे सोपविले होते. त्यांच्याकडे ते काम गेल्यापासून शाखांमध्ये वातावरण अगदी बदलून गेलेले होते. कोणीही हसत नव्हते.

एक दिवशी ठाकूर देसाई नसतांना ते काम माझ्याकडे आले. मी देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून क्रॉस केले. त्यामध्ये नेमके आक्रे अधीक्षक यांच्या नावापुढे देखील माझ्याकडून क्रॉस झाला. ते कार्यालयात आल्यानंतर त्यांनी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे शिपायाकडे मस्टर मागितले. तर शिपायाने त्यांना सांगितले साहेब तुमचे मस्टर क्रॉस झाले आहे. आपले मस्टर कोण क्रॉस करतं असं म्हणून त्यांनी चौकशी केली. तेव्हा माझे नाव पुढे आले. मलाही असे वाटले की, जणू काही माझ्याकडून फार मोठा गुन्हा झाला. परंतु नंतर आक्रे साहेबांनी मला बोलावून घेतले. नि:पक्षपातीपणाने मस्टर क्रॉस केल्यामुळे बहुदा त्यांचा माझ्यावर विश्वास बसला. त्यांनी माझ्याकडे आणखी महत्वाची प्रकरणे सोपविली. मला कसला छंद आहे ? अशी आत्मियतेने चौकशी केली. तेव्हा मी भित भित कवितांची डायरी बघायला दिली . त्यातील कविता पाहून त्यांनी माझ्याकडे ज्या नजरेने पाहिले होते ते मला आजही आठवते.

आणखी मला आठवते त्यावेळी श्री.ब.उ. कोतवाल, जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे हे सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या सेवानिवृत्तीचा संदेश त्यांनी माझ्याकडून लिहून घेतला होता व तो त्यांना खूप आवडला होता.

त्या दिवसांवर आणखी एका व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता. तो म्हणजे श्री.प्र.ग. टावरे यांचा. श्री.धुरु यांच्या सेवानिवृत्तीनंतर मंत्री महोदयांकडे प्रतिनियुक्तीवर असलेले टावरे साहेब आस्थापना शाखेत आले. त्यांचा कामांचा उरक प्रचंड होता. आपल्या तिक्ष्ण नजरेने ते सादर झालेल्या फाईलीतील शब्दनशब्द, ओळनओळ बोट ठेवून वेगाने वाचत आणि बरोबर त्यातील चूक हेरीत. ते स्वत:ही न्यायालयीन प्रकरणे, महत्वाची प्रकरणे हाताळत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे एकेक कागद लिहून ते टंकलेखन शाखेकडे पाठवून देत असत. नियमातील तरतूदी त्यांना बारकाव्यांसह माहित होत्या. फारसे तांत्रिकतेत न अडकता व्यवहार्य भूमिका घेऊन नकारघंटा वाजविण्याऐवजी सुवर्णमध्य साधून सकारात्मक भूमिकेतून काम कसे होईल याकडे त्यांचा नेहमी कल होता. हीच बाब त्यांच्याकडून शिकण्यासारखी होती.

श्री.कापडी यांच्या निवृत्तीनंतर जिल्ह्याचे काम पहावयास श्री.प.ज.आक्रे हे आले. ते सेवादलातील संस्कार झालेले, तत्वनिष्ठ विचारसरणीचे होते. प्रकरणाला न्याय कसा देता येईल, न्याय्य बाजू काय आहे यादृष्टीने ते जागरुक असायचे. प्रसंगी त्यांचे मतभेदही व्हायचे पण ते त्यांच्या भूमिकेवर ठाम असायचे. याही व्यक्तिमत्वाचा ठसा या दिवसांमध्ये उमटून गेला.

त्यावेळी मला मंत्रालयात तळमजल्यावर वृत्त शाखेच्या दूरमुद्रणशाखेत जायचा प्रसंग यायचा. तेथील वातावारण तर अतिशय गंभीर असायचं. 10-12 दूरमुद्रण यंत्रांवर सतत टंकलेखन करीत असलेले पंडित, नाचणकर, नागवेकर, साटम, लोहगांवकर मला दिसायचे. कागदांच्या मोठमोठ्या भेंडोळयांवर संदेश सारखे येत असायचे. “पुणे आले का ? नाशिक आले का ?” असे आवाज येत असायचे.
उशीरापर्यंत काम करीत बसणारीही काही मंडळी त्यावेळी होती. टंकलेखन करीत करीत केवळ एक ओळ चुकली म्हणून सगळा कागद टंकलेखन यंत्रावरुन खेचून काढून फाडून चुरगाळून टाकत टाकत एक जण दिवसभरामध्ये टोपली पार भरुन टाकत असे. काम पूर्ण केल्याशिवाय घरी जायचे नाही असा त्यांचा शिरस्ता असल्याने कधी कधी रात्री 10-11 पर्यंतही ते अशा रितीने टंकलेखन करीत एकटेच शाखेमध्ये थांबून राहायचे. त्यांच्याबरोबर मग शिपायला देखील ताटकळत बसावे लागे. हे नेहमीचंच झालं असे पाहून मग कोणीतरी अफवा पसरवली की रात्री पांढऱ्या साडीतील बाई फिरत असते. मग मात्र असे उशीरा रात्रीपर्यंत थांबणे बंदच झाले.

पूर्वी 17 व्या मजल्यावर टंकलेखन शाखा होती. श्रीमती मार्टीन ह्या मुख्य टंकलेखिका होत्या. टंकलेखनासाठी आलेले काम शिस्तीत करुन घेण्याचा त्याचा खाक्या होता. मी मात्र टंकलेखन शाखेत श्रीमती भाग्यश्री जोगळेकर यांना तोंडी मजकूर सांगून टिपणी, मसुदा, टंकलिखित करुन घ्यायचो. तेव्हा मधल्या पॅसेजमध्ये लोकराज्य मासिकासाठी असलेल्या छायाचित्रांचे ब्लॉक्स थप्पीथप्पीने रचून ठेवलेले असायचे. पलीकडे संशोधन शाखेत डॉ.एम.डी.भट होते. मला आठवते तत्कालीन मुख्यमंत्री ह्यांनी केलेल्या घोषणा वृत्तपत्रांतून शोधून काढायच्या कामासाठी नेमलेल्या ग्रुपमध्ये स्व.पांडुरंग पाटील, रोहिणी निनावे यांच्या बरोबर मीही काम केलेले होते. प्रदर्शन शाखेत गहूकर, पाटील हे लोकराज्य मासिकासाठी चित्र काढायचे. त्यांनी बालकवी विशेषांकासाठी बालकवींचे चित्र काढलेले माझ्या चांगल्या स्मरणात आहे.

एकदा तर गंमतच झाली. एक चित्रावर त्यांनी ब्रशने तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांची स्वाक्षरी रंगविली तर ती गैरवर्तणूक ठरून त्यांच्याविरुद्ध कार्यवाहीही झाली.

स्व.सुभेदार साहेब हे उपसंचालक (प्रदर्शने) होते. तेही पान खाण्याचे शौकीन होते. प्रदर्शनाचे संच घेऊन ते ठिकठिकाणी जायचे तेव्हा वाहनचालकाला वाहन लावतांना “येऊ दे येऊ दे” , “अरे काय माझ्या अंगावर गाडी घालतोस की काय ?” अशा स्वत: सूचना द्यायचे.

अशा कितीतरी आठवणी आहेत ज्यामध्ये माझी सेवेमध्ये जडणघडण होत राहिली आणि आत्मविश्वासाचे मला बळ मिळत गेले. या आठवणींमुळेच हा सुवर्ण काळ माझ्या नेहमीच स्मरणात राहील.

विलास कुडके.

– लेखन : विलास कुडके.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

53 COMMENTS

  1. अतीशय सुंदर…!
    माहिती व जनसंपर्क हे एक कुटुंबच आहे. या कुटुंबात अनेक अनुभव संपन्न अशी मंडळी होती आणि आहेत. प्रत्येका कडून काही ना काही शिकायला मिळलेच. मी तांत्रीक विभागात तर कुडके साहेब आस्थापना… कुडकेंना जो अनुभव या महासंचालनायात आला थोड्याफार फरकाने मीही अनुभवला आहे. व्यक्त होणं गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्या जोडीने सर्वांनाच आनंद घेता आला. धन्यवाद.

  2. लिखाणाची शैली अत्यंत सोपी व सर्व घटनाक्रम स्पष्ट करणारी आहे.दोन वर्षांच्या सहवासात श्री.कुकडे साहेबांच्या कार्यालयीन कामकाजाची अंशतः ओळख झाली.परंतु सदर लेखाद्वारे संपूर्ण सेवापट चित्रपटाप्रमाणे नजरेसमोरून गेला. असेच लिहित रहा.आपल्यासारख्या अधिकाऱ्यांच्या अनुभवाची शिदोरी इतरांना मार्गदर्शक ठरेल.

    पुढील वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा.!!

  3. Bhari..👌👌
    सर आपण सदैव सकारात्मक आणि मदतीला सदैव तत्पर असणारे अधिकारी होता. नेहमी हसतमुख असणार व्यक्तिमत्व. आपले अनेक लेख ‘ आपलं मंत्रालय ‘ मध्ये प्रकाशित झाले आहेत. ते प्रकाशित करताना आम्हालाही आनंद वाटत असे. Keep it up Sir..👍💐💐🙏🙏

  4. Bhari..👌👌
    खरचं तुम्ही नेहमी सकारात्मक आणि मदतीला सदैव तत्पर असणारे अधिकारी होता. तुमचा हसतमुख चेहरा नेहमी लक्षात राहणारा आहे. ‘ आपलं मंत्रालय ‘ मध्ये आपले किती तरी लेख प्रकाशित झाले आहेत. ते प्रकाशित करताना आम्हालाही खूप आनंद होत असे.
    Keep it up Sir..👍💐💐🙏

  5. साहेब सर्व प्रथम आपले अभिनंदन.
    आपल्याला खूप मिस करतो आहे.
    अशी जिवाभावाची माणसे जीवनात आली परमेश्वराचे आभार. आपण केल्याल्या कामाचे खूप कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आपणास उत्तम आरोग्य लाभो हिच सदिच्छा.
    भेटूया ……
    आपला
    लक्ष्मण

  6. विलास कुडके हे आमचे जुने मित्र. त्यांचे पूर्वीचे दिवस डोळ्यासमोर आहेत. काहीतरी करण्याची जिद्द दाखवून हा कवी,लेखक चिकाटीने करियर घडवतो हें प्रेरणादायी आहे. अनुभव व त्यांचे कथन बोलके आहे. त्यांच्या लढाऊ वृत्तीला सलाम व भावी सुखस्वप्नांसाठी अगणित शुभकामना!

  7. सर खूप छान सविस्तर माहिती सुरवातीपासून सेवेच्या शेवटपर्यंत दिली आहे.

  8. छान लिहिलं आहे सर ! आनंद वाटला तुमचे सरकारी सेवेतील अनुभव वाचून. पुढील आयुष्य आपणास आनंदी व दीर्घायुषी लाभो ही सदिच्छा.

  9. खूपच सुंदर लेख.वाचताना संपूर्ण ऑफीस डोळ्यासमोर ऊभे राहिले.जून्या आठवणींना ऊजाळा मिळाला.तुमच्या सारखे सतत हसतमुख ,लहान -थोरांशी नेहमी आदराने बोलणारे,सर्वांना मदत करणारे सहकारी आम्हांला लाभले हे आमचे भाग्य.यापुढील आपल्या ऊत्कृष्ट लिखाणाच्या वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.

  10. मित्रवर्य कुडके साहेब आपण आपल्या संपूर्ण सेवाकाळातील अनुभवाचे आपल्या लेखामधून यथार्थ दर्शन घडवले.खूपच सुंदर!! आपला 2 वर्षांचा सहवास मला डी.एड.असतांना लाभलेला आहे.आपण खूपच मेहनती,हुशार शिस्तप्रिय आहात हे मी अनुभवलेले आहे.

  11. साहेब, मुद्देसूद लिखाण आपलं वैशिष्ट्य… त्यामुळे सुरुवातपासूनचे व्यक्तीनुरूप प्रसंग आपण क्रमान उभे केलेत, आता पूर्वार्ध झाला आहे लवकरच उत्तराध वाचावयास मिळावं…या शुभेच्छासह

  12. कुडके साहेब आपला लेख अप्रतिमच आहे. मा व ज
    मधील स्मतीना उजाळा मिळाला. आपली अभ्यासू वृत्ती
    मी स्वतः अनुभवली आहे. आपल्या पुढील वाटचालीस
    सस्नेह हार्दिक शुभेच्छा!

  13. Khup Sundar lihilay Baba !!
    Pan ayushyat faar mage valun baghu naka
    Ajun pushkal pudhe jayche ahe
    Office Sutle pan kavita ahet
    Shubhechha Ani Sneh… 🙏

  14. विलास कुडके यांच्या प्रशासकीय आठवणी वाचून मनात शासकीय कार्यालयाचे एक सर्वसाधारण चित्र उभं राहिले. मुख्य म्हणजे जनमानसाच्या मनातील शासकीय कर्मचारी म्हणजे कामचुकार आळशी,कामं रेंगाळत ठेवणारा,असे जे चुकीचे चित्र आहे त्याला पूर्णपणे छेद देणारं हा लेख आहे आता सगळचं चित्र बदलेले आहे. काम करीन तो टिकेल नाही तर तो घरी जाईन.असं Govt service मध्येही आहे.कोणीच कोणाला आता पोसणार नाही.विलासजींचा हा लेख ही बाब अधोरेखित करतो.

  15. आपल्या 31 वर्षाच्या सेवा कालातीत आठवणी आपण खुप छान पद्धतीने व्यक्त केल्या. आपल्या समवेत काम केलेल्या व्यक्तीची स्वभाव छान पद्धतीने मांडले . अशाच प्रकारे आपल्या डी.एड. कालांतील आठवणी व्यक्त कराव्यात . राजेंद्र साळवे

  16. खुप छान लिहिले आहे सर. माहिती खात्यातील आठवणी ह्या आठवणीत राहण्या सारख्याच आहेत. आपल्याला पुढील लिखाणासाठी खुप खूप शुभेच्छा….!!!!

    • मनापासून धन्यवाद सर. आपलेही कवितेतील स्री यावरील लेखमालिका व नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक अतिशय वाचनीय व संग्राह्य आहे

  17. मा।विलास कुडके साहेबांनी अगदी नोकरीवर रुजु होण्यापासून ते आँफीसमधील निरनिराळ्या व्यक्ती ची सजीव वर्णने खुप मनापासून उभी केली आहेत.त्या त्या व्यक्तीच्या स्वभाव चरित्राच अगदी गुणवैशिष्ट्ये लकबी ही सुक्ष्म अश्या निरीक्षणातुन प्रांजळपणे मांडली आहेत.सर तुम्ही छान आत्म चरीत्र लिहुन काढा.

  18. खूप सुंदर . संपूर्ण आॕफीस डोळ्यांसमोर उभे राहिले .वाचताना आठवणी जाग्या झाल्या . मस्तच सर

    • मनापासून आभार मॅडम. वृत शाखेत असताना डिक्टेशन पध्दतीने आपल्या सहकार्याने कितीतरी प्रकरणे हातावेगळी करु शकलो हे माझ्या कायम स्मरणात राहील.

  19. काका, अप्रतिम लेखन. डोळ्यासमोर चित्र उभ करता तुमच्या लेखातुन.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐

  20. आदरणीय श्री भुजबळ साहेबांचे आभार मानावे तेवढे थोडे आहे. त्यांनीच लिहिते केले आहे. वाचकांना विनंती आहे की प्रांजळ अभिप्राय मिळावेत. आपले अभिप्राय पुढील लिखाणासाठी निश्चितच बळ व प्रेरणा देणारे ठरतील. काही सूचना असतील तर त्याही कृपया या. वाट पहात आहे

  21. कुकडे सरांसारखे अनुभवी अधिकारी जेव्हा आपली अनुभवाची शिदोरी सादर करतात तेव्हा ती नवीन कर्मचारी/अधिकारी यांना मार्गदर्शक ठरते. अनुभवाची ही देवाणघेवाण नवीन कर्मचाऱ्यांना घडवण्यासाठी मार्गदर्शक असते.

  22. सुंदर लिखाण आणि सुंदर आठवणी, तसेच सुंदर संपादन, साहेब आपले कामकाज मी जवळुन पाहिले आहे, अतिशय उत्कृष्ट

    • मनापासून धन्यवाद सर. नागपूर अधिवेशनात आणि मंत्रालयातही मिळेल त्या संगणकावर स्वतः आदेश टंकलिखित करुन वरिष्ठांची सही उभ्याउभ्याच घेऊन देणारे आपण हरहुन्नरी अधिकारी होता. आपले काम चोख बजावून सचिवालय जिमखान्यातील कार्यक्रमात व बँकेच्या कामकाजातही तेवढेच लिलया कार्यरत असायचे. आपण माझ्या कायम स्मरणात रहाल

    • मनापासून धन्यवाद सर. आपलेही लेख सुंदर असतात. आजीची पेटी हा विशेष आवडता.

    • मनापासून आभार सर. दिलखुलास व सदैव मदतीला तत्पर सकारात्मक अधिकारी म्हणून आपण कायम स्मरणात रहाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा