Wednesday, February 5, 2025
Homeयशकथामेघना साने: सामाजिक जाणिवेच्या कलाकार

मेघना साने: सामाजिक जाणिवेच्या कलाकार

मानवाने गेल्या दोनशे वर्षात जेव्हढी भौतिक प्रगती केली, तेव्हढी गेल्या दोन हजार वर्षांत केली नाही. दिवसेंदिवस या प्रगतीचा वेग वाढतच चालला होता. या प्रगतिशील जीवनात आपण मागे पडू नये म्हणून इच्छा असो वा नसो, सर्वांनाच धावावं लागत होतं. जगाची ही गती कधी थांबु शकेल असं ना कोणी भविष्य वर्तविलं होतं ना कोणा शास्त्रज्ञाला काही कळालं नव्हतं. अशा या गतिमान जीवनात २०२० हे वर्ष उगवलं आणि पहाता पहाता अति वेगवान झालेलं जनजीवन जणू ठप्प झालं. वेळच मिळत नाही, अशी सतत तक्रार करणाऱ्या व्यक्तींना कोरोनाच्या भीषण संकटात घरी बसायची पाळी आली आणि प्रश्न निर्माण झाला. आता वेळेचं काय करायचं? घर बसल्या वेळ कसा घालवायचा? जो तो आपापल्या परिनं मार्ग शोधू लागला. अशातच एका वृत्तपत्रातील बातमीने माझं लक्ष वेधले. ही बातमी होती, ठाणे येथील मेघना साने आणि हेमंत साने या दाम्पत्याने घरी राहूनच विडंबनात्मक गीतं तयार करून ती यु ट्यूबवर प्रसिद्ध केली असून या गीतांना जगभर छान प्रतिसाद मिळत आहे याची.

सामाजिक बांधिलकीतुन या दोघांनी हाती घेतलेला हा कलात्मक उपक्रम खरोखरच प्रशंसनीय आणि ठिकठिकाणी अनुकरण करण्यासारखाच आहे. कलाकार मेघना साने आणि माझा परिचय झाला तो व्यंगचित्रकार विवेक मेहत्रे आणि आभा प्रकाशनाच्या शारदा धुळप यांनी दोन वर्षी अलिबाग जवळ आयोजित केलेल्या लेखक वाचक मेळाव्याच्या निमित्ताने. मेघना साने या त्यांच्या एकपात्री प्रयोगांमुळे सर्वांनाच परिचित होत्या. पण प्रत्यक्ष भेटीत, त्यांच्यातील निगर्वीपणा, सहजपणा सर्वांनाच भावला. तसा तो मलाही भावला. मेघना साने आज कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर अध्यक्ष म्हणून ठाण्यातील सांस्कृतिक वातावरणात मोलाची भर टाकत आहेत. दर महिन्यात उत्तमोत्तम कार्यक्रमांची रेलचेल, शिवाय नवनवे उपक्रम आपल्या संस्थेतर्फे राबवून सर्व प्रकारच्या कलाकारांना त्या व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. काव्य संमेलने, निबंध स्पर्धा यांपासून ते थेट तळागळातील लोकांना कला सादर करायला मिळेल, असे आदिवासी नृत्य संमेलनही त्यांनी ठाण्यात घडवून आणले. लोक साहित्याचेही कार्यक्रम त्यांनी केलेत, कारण उपजतच त्यांना अनेक कलांची जाण आहे. लेखन आणि नाट्य सादरीकरण या दोन्ही प्रांतात त्यांनी चांगलीच मुशाफिरी केली आहे. काही मालिका व चित्रपटातही त्या विविध भूमिकेत झळकल्या आहेत.

मेघना साने यांची व्यावसायिक रंगभूमीवर कारकिर्द पाच वर्षांची होती. नाट्यसंपदा’च्या “‘तो मी नव्हेच”‘ मध्ये प्रभाकर पणशीकर यांचे समवेत सुनंदा दातारच्या म्हणजे नायिकेच्या भूमिकेत त्यांनी महाराष्ट्राचे दौरे केले. तसेच सुयोग’च्या ‘”लेकुरे उदंड झाली”‘ या व्यावसायिक नाटकात तीन वर्षे प्रशांत दामले व सुकन्या कुलकर्णी यांचे सोबत गुजरात, दिल्ली, विदर्भ येथील सर्व रंगमंदिरांमध्ये अभिनेत्री म्हणून मेघना सहभागी झाल्या. दूरदर्शन मधील आमचे सहकारी आणि नंतर मित्र झालेले सुप्रसिद्ध एकपात्री कलाकार जयंत ओक यांच्या सोबत ‘गप्पागोष्टी’ या एकपात्री कार्यक्रमात मेघना यांनी काही नाट्यछटा सादर केल्या. हा लोकप्रिय कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील बहुतेक गावात तर झालाच पण ऑस्ट्रेलियातील सिडनी, मेलबर्न येथील महाराष्ट्र मंडळांकडूनही त्यांना बोलावणे आले आणि तेथील मराठी रसिकांनी देखील हा कार्यक्रम अक्षरशः डोक्यावर घेतला. एकपात्री प्रयोग कसा सुरू करायचा, त्यात रंगत कशी आणायची, ती कशी वाढवत न्यायची याचं बाळकडू मेघनताईंना जयंत ओक यांच्या सोबत मिळालं.

त्याची फलश्रुती पुढे त्यांनी एकट्याने एकपात्री प्रयोग यशस्वीरित्या सादर करण्यात झाली. सात-आठ वर्षे अशी मुशाफिरी केल्यावर मेघना साने यांनी स्वतःच्या ललित लेखन रुपातील पुस्तकांवर आधारित स्वलिखित एकपात्री ‘कोवळी उन्हे’ कार्यक्रम रंगभूमीवर आणून एकपात्री कार्यक्रमांना नवा आयाम प्राप्त करून दिला.
२००८ साली सुरू झालेल्या या स्वनिर्मित कार्यक्रमात कथाकथन, नकला, संवाद, लावणी, नाट्यछटा असे विविध साहित्यप्रकार त्या स्वतः सादर करतात. एका स्त्रीने विविध साहित्य प्रकार लिहीणे व ते स्वत: सादर करणे हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य आहे. नाट्यक्षेत्रातील अनेक वर्षे केलेल्या अभिनयाचा त्यांना ‘कोवळी उन्हे’ कार्यक्रम सादर करताना उपयोग होतो. संगीताची बाजू हेमंत साने यांनी सांभाळली आहे.

नाटकाच्या दौऱ्यात लेखन केल्याने त्यांची एकूण आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात कथा, कविता, ललित लेख असे वैविध्य तर आहे. एक ओव्यांचेही पुस्तक आहे. निसर्ग हेच ईश्वराचे रूप आहे असे सांगणाऱ्या ‘मेघमणी’ या त्यांच्या पुस्तकातील ओव्यांना निरनिराळ्या रागांमध्ये हेमंत साने यांनी स्वरबद्ध केले आहे. या ओव्यांची सीडी देखिल प्रकाशित झाली आहे. यात मेघना साने यांनी स्वत: निरूपण केले आहे. मेघना सध्या रेडिओ विश्वास या इंटरनेट रेडीओच्या समनव्यक आहेत. या रेडिओच्या “आजचे पाहुणे” कार्यक्रमासाठी त्यांनी देशविदेशातील व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. विविध वाचकांनी लिहिलेल्या विविध पुस्तकांविषयीच्या “पुस्तकावर बोलू काही” या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले आहे. तर हायकू या काव्य प्रकाराबद्दल केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना मुंबई विद्यापीठाने नुकतीच एम.फिल. पदवी बहाल केली आहे

मेघनाचे वडील ए एस मेढेकर हे मूळचे मुंबईकर. काही वर्षे वकिली केल्या नंतर ते नागपूर येथे न्यायाधीश झाले. पुढे ते महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त होते. त्यांना लेखनाची आवड होती. त्यांची ६ पुस्तके प्रकाशित झाली. मेघनताईंच्या आईही मराठीत सुवर्णपदक मिळवून एम. ए. झालेल्या होत्या. त्या विद्यापिठात जर्मन भाषेच्या प्राध्यापिका तसेच साहित्यिक होत्या. त्यामुळे घरी साहित्यिकांचे येणे जाणे असायचे. कवी सुरेश भट, संगीतकार यशवंत देव, नाटककार रंजन दारव्हेकर, पत्रकार वसंत नानल, कवी मधुकर केचे यांची गप्पांची मैफल घरीच असे. त्यातूनच मेघनताईंवर लेखनाचे संस्कार झाले. नागपुरात लाभलेल्या साहित्यिक, सांस्कृतिक वातावरणाचे आपल्या जडणघडणीत मोलाचे योगदान आहे, असं त्या मानतात. मेघना १९८१ साली मेढेकरच्या साने झाल्या. नागपूर सोडून मुंबईला आल्या. त्यांच्यातील कलागुणांना दूररदर्शनमध्ये संधी मिळाली. त्या निवेदिका झाल्या. मुलाखती घेऊ लागल्या. निर्मात्या नीना राऊत, नागेश महाले, वंदन कुलकर्णी यांनी त्यांना कॅमेऱ्याचं तंत्र समजावून सांगितलं. याचा पुढे त्यांना खूपच फायदा झाला. लोकप्रिय दुरदर्शन मालिका “कुंपण” मध्ये दिग्दर्शक संजीव कोलते यांनी त्यांना मोठी भूमिका दिली होती. थोडं नाव झालं. त्यामुळं मेघना, हेमंत साने आणि जयंत ओक या त्रिमूर्तीला “रसिकांचा दरबार” या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं. एका तासाचा हा कार्यक्रम खूप छान झाला. पुढे तो खूपदा दाखवण्यात आला. औरंगाबाद येथे त्या चंद्रकांत कुलकर्णी यांच्याकडून नाटक शिकल्या. पुढे त्यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही.

मेघना ताईंना शिक्षणाची मुळातच आवड आहे. संगीत, नृत्य यांचे शिक्षण देण्यासाठी त्यांनी पनवेल येथे ‘मेघदूत कला अकादमी’ ची स्थापना केली होती. त्यात नृत्य, संगीत, वादन यांचे वर्ग चालायचे. महाराष्ट्र शासनाच्या बालचित्रवाणीसाठी त्यांनी सातवीच्या अभ्यासक्रमावर अनेक नाटुकली लिहिली. मेघनाताईंनी नागपूर विद्यापीठातून बी.एस्सी., बी.एड. या पदव्या प्राप्त केल्या. महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांनी ‘गांधी विचार दर्शन’ हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. तसेच विद्यार्थी समुपदेशन पदविकाही प्राप्त केली. मुंबई विद्यापीठातून मराठी विषयात एम. ए. व एम.फिल. या पदव्या संपादन केल्या. ‘जपानी व मराठी हायकू’ यात संशोधन केले. त्या स्वतः उत्तम हायकू लिहीतात.
मुलांसाठी ‘हसरी मुले’ आणि ‘सॉलिड मज्जा’ या सीडीची सुद्धा त्यांनी निर्मिती केली आहे. विद्यार्थ्यांना स्नेह सम्मेलनात सादर करण्यासाठी उत्तम गाणी असावीत म्हणून कवी कुसुमाग्रज, इंदिरा संत, सुधीर मोघे, मेघना साने यांच्या मुलांसाठी असलेल्या गीतांना आधुनिक संगीत देऊन गाण्यांचे रेकॉर्डिंग अनुजा वर्तक आणि २५ मुले यांच्या स्वरात केले आहे. गझल सम्राट सुरेश भट, गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या गझलांची सीडी अनिरुद्ध जोशी, गौरी कवी आणि स्वप्निल बांदोडकर यांच्या स्वरात त्यांनी ध्वनिमुद्रित केली. ‘ऋतुरंग संगतीला’ या टायटलने ती प्रसिद्ध झाली आहे . या सर्व सीडीजची निर्मिती मेघना साने यांनीच केली आहे.

महाराष्ट्र मंडळ, लंडन

एकाच वेळी स्वतःचे कार्यक्रम करणे व संस्थेच्या व्यासपीठावर इतरांचे कार्यक्रम आयोजित करणे यामुळे मेघना साने यांचा जनसंपर्क मोठा आहे. आतापर्यंत मेघनताईंनी आपल्या कार्यक्रमाचे सादरीकरण लंडन, अमेरिका व इस्रायल येथील मराठी मंडळांमध्ये केले आहे. अमेरिकेत त्यांचा पहिल्यांदा एकपात्री प्रयोग १९९१ साली झाला.इस्रायलमधील ‘मायबोली’ संस्थेसाठी तर त्यांना दोनदा कार्यक्रमाचं आमंत्रण मिळालं. इस्राईलमध्ये एकपात्री कार्यक्रम सादर करणाऱ्या त्या बहुधा पहिल्या भारतीय महिला होत.

मायबोली संमेलन ईसत्र्यायल

साने दाम्पत्याची दोन्ही मुलं इंजिनिअर आहेत. सून सई रानडे- साने गेली दहा वर्षे विविध मालिकांमधून आपल्या समोर आहे. कोरोनामुळे सर्व वातावरण बंदिस्त असताना, स्वतःची अमूल्य कला सर्व समाजाला विनामूल्य उपलब्ध करून देणाऱ्या मेघना साने यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

लेखन – संपादक :-देवेंद्र भुजबळ :-9869484800.
ईमेल: devendrabhujbal4760@gmail.com

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी