Homeसेवामोर्चे पक्षांचे, हाल सामान्यांचे !

मोर्चे पक्षांचे, हाल सामान्यांचे !

काल परवा मुंबईला झालेल्या एका महिला मोर्चा प्रसंगी, एका सामान्य सुशिक्षित महिलेने नेत्याला, पोलिसांना धारेवर घेत चांगले फैलावर घेतल्याचे टी व्ही वर बघायला मिळाले. कुणीतरी मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याचे काम धैर्याने केले म्हणून त्या महिलेचे कौतुक करायला हवे. पण नेते, कार्यकर्ते, पोलिस ती अद्वातद्वा बोलली म्हणून तिलाच दोष देत आहेत. डोक्यावरून पाणी जाते, सहनशीलतेचा उद्रेक होतो तेव्हा भल्या भल्याचा जिभेवर ताबा राहत नाही हे खरे.

वास्तविक पाहता या महिलेच्या भाषेवर टीका करणारे लोक प्रतिनिधी संसदेत, विधानसभेत किंवा बाहेर एकमेकावर टीका करताना किती अर्वाच्य भाषा वापरतात हे आपण टी वी वर बघतोच ! पण मुळात सामान्य नागरिकांना त्रास देणारी ही परिस्थिती निर्माणच का करायची हे राजकीय पक्षांना, शासनाला, पोलिसांना केव्हा कळेल ? व आज कोणताही पक्ष, कोणताही नेता उठसूट माणसे घेऊन रस्त्यावर येतो. बंद, आंदोलन, धरणे, मोर्चे काढणे यामुळे वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होतो. मुंबई सारख्या शहरात तसेही वाहतुकीची समस्या नागरिकांच्या पाचवीला पुजली असते. त्यात ही निषेधाचे मोर्चे, रस्ता रोको, बंद याने नेमके कोणते समाज हित साधले जाते हे विचार करूनही समजत नाही. आमचे राजकीय अदन्यान त्यास कारणीभूत असू शकते.

हा मोर्चा महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्याच्या विरोधात होता. हे विधेयक संसदेच्या नियमांस धरून फेटाळले गेले. ते मान्य होऊ शकणार नाही हे संसदेतील संख्येचे गणित लक्षात घेता, आतबाहेर सगळ्यांना माहिती होते. महिलांची संख्या वाढवून, एकूण सभासदाची संख्या वाढवून नेमके काय साधले जाणार होते ? आताही प्रतिनिधित्व आहेच की ! त्याची परिणामकारिता आधी तपासा. महिलांपैकी कोण किती प्रभावीपणे सामान्य नागरिकाच्या समस्यांना वाचा फोडतात ते बघा. काही सन्माननीय अपवाद वगळता फक्त पदाचे आर्थिक लाभ, भत्ते घेण्यापलीकडे बहुतेक लोकनेत्याचे फारसे भरीव, योगदान दिसून येत नाही. एका मुलाखतीत स्वतः लता मंगेशकर यांनी मला त्या राज्यसभेत, राजकारणात काही इंटरेस्ट नव्हता, मी फक्त एक दिवस गेले अन् तो आरडाओरडा बघून प्रचंड अस्वस्थ झाले अशी कबुली दिली होती.

राजकारण, समाजकारण ज्यांच्या रक्तातच आहे अशा महिला प्रभावीपणे आपले कर्तव्य बजावतात. प्रमुख केंद्रीय मंत्रीपदे, पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री अशा सर्व जबाबदाऱ्या महिलांनी समर्थपणे सांभाळल्या आहेत. त्यांना संधीच द्यायची तर कोणत्याही पक्षाला जास्तीत जास्त महिलांना तिकीट देण्यापासून कुणी रोकले आहे ?

दुसरे म्हणजे एकूण खासदाराची संख्या वाढविण्याचा घोळ! संख्या वाढली की कार्यक्षमता वाढते हे कुणी सांगितले ? आहे त्यांनीच गांभीर्याने, प्रामाणिकपणे समाजहिताचे, विकासाचे काम केले तर अर्धेअधिक प्रश्न सहज सुटतील. खासदाराची संख्या वाढविल्याने फक्त सरकारी तिजोरीवर भार पडेल. अन् या तिजोरीत सामान्य नागरिकांनीच दिलेल्या करातून पैसा जमा होत असल्याने आपल्या खिशाला कैची लागेल ! या मंडळींना मिळणारे मानधन, भत्ते, इतर सोयी, जन्मजात पेन्शन हे सगळे खर्च बघता यात देशाचा विकास नव्हे सामान्य माणसाचा विनाश दडला आहे हे कटू सत्य !

त्यामुळे मुळातच ज्या कारणासाठी हे आंदोलन मोर्चे सुरू आहेत त्यातील फोलपणा, राजकीय संधीसाधूपणा सिद्ध होतो. याच मोर्चामुळे नव्हे एकूणच कोणत्याही मागणीसाठी जेव्हा तीव्र आंदोलन होते, बंद पुकारले जातात, मोर्चे निघतात तेव्हा सर्वात अधिक त्रास बिचाऱ्या निरपराध जनतेला होतो. नागरिक यात विनाकारण भरडले जातात. कुणाची परीक्षा असते, कुणाला मुलाखतीला जायचे असते. कुणाला हॉस्पिटल ची इमर्जन्सी असते किंवा इतर काही अर्जंट गंभीर कारणासाठी तातडीने प्रवास करायचा असतो, त्यात बाळंतपणासाठी अडलेली गर्भार बाई असते.. शिवाय व्यापारी, छोटे मोठे दुकानदार, ऑटो, टॅक्सीवाले यांचे देखील प्रचंड आर्थिक नुकसान होते. पण कुणालाच कशाची पर्वा नसते. फक्त आपली राजकीय पोळी भाजायची असते.

तसे पाहिले तर असे निषेध नोंदविण्यासाठी, मोर्चे काढण्यासाठी, सभा घेण्यासाठी, बंद पुकारण्यासाठी शासकीय नियम आहेत. पण ते सरकारी पक्ष असो, विरोधी पक्ष असो, किंवा संघटना असोत…कुणीच पाळताना दिसत नाहीत. नियम धाब्यावर बसवले जातात. पोलीस देखील कधी कधी त्याकडे कानाडोळा करतात. त्यांचाही नाईलाज असतो. वरून प्रेशर असते. इकडे आड तिकडे विहीर अशी त्यांची परिस्थिती असते. कायदे आहेत पण पाळायचे नाहीत असे आपले राजकीय समाजमन झाले आहे की काय, अशी शंका येते.

प्रश्न केवळ या मोर्चाचाच नाही. वेगवेगळे उत्सव, सण सोहळे, या निमित्ताने अनेक दिवस रस्त्यावर शोभा यात्रा निघतात. मिरवणुका निघतात. यांची वाहतुकीचा खोळंबा होतो. पूर्वी ही सारे शिस्तीत व्हायचे. त्यामागे असलेली मंडळी, मंडळे, संस्था यांना सामाजिक भान होते.त्यात शिस्त होती.आता फक्त डी जे चा गोंधळ,नाचण्याचा धांगडधिंगा उरला आहे. आपण विश्वगुरु वगैरे होण्याच्या बाता करतो. पण हा दिव्याखालचा अंधार कसा घालवणार आधी ??
शेवटी या मोर्चात, आंदोलनात सामील होणारे कोण असतात ? तेही सामान्य नागरिकच असतात. तुमच्या आमच्या सारखे. ते पण ते तेवढ्या वेळेपुरते कसल्यातरी प्रलोभनाला बळी पडले असतात. ते कुठल् तरी आश्वासनाच्या, खोट्या आशेच्या नशेत खऱ्या खोट्याची जाण गमावून बसले असतात.खरी गरज प्रत्येकाने शहाणे सजग होण्याची आहे.आपले बरे वाईट आपणच जाणून घेण्याची गरज आहे.आपला विवेक सदैव जागृत ठेवत कुणाच्या भूल थापा ना बळी न पडता आपले बरे वाईट आपणच ठरवण्याची गरज आहे. आपले दोर आपण दुसऱ्याच्या हाती दिले की तो आपल्याला कठपुतली सारखे नाचवायला मोकळा होतो.

आपल्या साठी चांगले काय वाईट काय हे दुसऱ्या कुणी ठरविण्यापेक्षा आपले आपणच ठरविले तर आपल्याला या आंदोलन मोर्चाच्या मृगजळामागे धावण्याची गरजच उरणार नाही. नेते, पुढारी बेकार होतील. सामान्य नागरिकांना मग त्यांचा त्रास होणार नाही कदाचित..कदाचित या शब्दाने शंका यासाठी व्यक्त केली की मुळात आपल्याला शहाणे व्हायचे आहे का ?
या पुढाऱ्यांच्या साखळदंडातून मोकळे व्हायचे आहे का ? की याच पिंजऱ्यात अडकून पडायचे आहे ? मला खरेच माहिती नाही.
(मला माहिती नाही हे जगातील सर्वात शक्तिशाली वाक्य गणले जाते !)

प्रा डॉ विजय पांढरीपांडे.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे, माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments