‘युवंता’ ही कादंबरी माझ्या हातात पडताच युवंता नावाचे कुतूहल जागे झाले. शोध घेतला अन् कळले, युवंता ही रोमन लोकांची देवता !
प्राचीन काळी, रोम मध्ये पुरुषांनी तारुण्यात पदार्पण करताच त्यांना दीक्षा दिली जात अस, त्यात नव तरुण युवंतांच्या मूर्ती समोर सोन्याच्या नाण्याची दक्षिणा ठेवून तिचा आशिर्वाद मागत, तर नववधू आपलं वैवाहिक जीवन सुखी व्हावं म्हणून लग्नात तिची पूजा करतात ! अशी ही युवंता देवी यौवनाने मुसमुसलेली आणि सर्वांना यौवनाच वरदान देणारी देवता आहे.
या ‘युवंता’ कादंबरीची नायिका देवयानी देशमुख चिरतरुण आहे. असाधारण सौंदर्य घेऊन जन्माला आलेली देवयानी काळाला दाद न देता ते टिकवून ठेवते. जिच्या अहंकाराला दंश झालेला आहे अशी ही मराठी नायिका देवयानी आणि ज्याचा अहंकार सुखवायला वैभव हात जोडून उभं आहे असा चिरतरुण असा पंजाबी उद्योगपती राहुल खन्ना ! अशा दोन भिन्न प्रवृतीच्या, प्रकृतीच्या आणि सर्वस्वी दोन वेगळ्या परिस्थितीत वाढलेल्या व्यक्तींची गाठ नियती घालून देते हा या कादंबरीतील कथानकाचा गाभा आहे. दोघांचे
अभ्यासपूर्ण व माहिती पूर्ण अशा चुरचुरीत संवादामध्ये कादंबरी व्यापली आहे.
तशी या कादंबरीची कलाकक्षा ५० वर्षांची आहे. त्यावेळच्या राजकीय व सामाजिक घटनांचा संवादात सुरेखपणे परामर्ष घेतलेला आहे. व्यक्तींची नावे अगदी तीच आहेत. मुंबईचे एकेकाळचे सम्राट स.का.पाटील, पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पासून अगदी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंपर्यंत विविध राजकारणी धुरंधरांचे त्यांत उल्लेख आहे
कादंबरीचं आणखी मला भावलेलं वैशिष्ट्य म्हणजे वाचकांना कुतूहल असलेल्या विषयांची उदाहरणार्थ स्वप्नांची मीमांसा, मद्द्याच्या विविध प्रकारच्या ब्रँड निर्मितीचा इतिहास, ‘नोस्टरडेम्स’ ची भविष्य वाणी, धर्मशास्त्राचा अभ्यास, बोधविश्व, बाह्यविश्व, अंतर्मन, चित्रपट, नट नटी, इत्यादी विषयांचे कुतूहल वाटण्याजोगे तपशीलवार वर्णन आहे. सुप्रसिद्ध दिवंगत व हयात व्यक्ती कादंबरीतील पात्रांना भेटतात, त्यांच्याशी संवाद साधतात असा एक आगळावेगळा प्रयोग कादंबरीकार
डॉ मोहन द्रविड यांनी केला आहे.
हलक्या फुलक्या माध्यमातूनच ललित लेखनाबरोबर सभोवतालची ‘नाँनफिक्शन’, माहितीपूर्ण लेखन कादंबरीची उंची वाढवते. ही एक संवादरुपी ऐतिहासिक शैलीतली आणि सामाजिक-राजकीय घटनांनी वेढलेली कलात्मक व नाट्यपूर्ण कादंबरी आहे.
जाता जाता, आजच्या तरुणवर्गाला वाचनांचे वावडे आहे असे सर्वत्र म्हटले जाणाऱ्या तक्रारीला ‘आजचे तरुण’ मागील पिढी पेक्षा जास्त अनुभवी आहेत. त्यांनी जास्त जग बघितले आहे याचा साक्षात्कार या कादंबरीतून न कळत होतो.
संपूर्णपणे तंत्र आणि विज्ञान यांची पार्श्वभूमी असलेल्या आणि भारत व अमेरिका या दोन्ही देशात मुलखगिरी करणार्या आणि आय आय टी वाल्यांना धडे देणार्या डॉ मोहन द्रविड यांची ही कादंबरी म्हणूनच मला खुप भावलेली आहे. !

– लेखन : सुधाकर तोरणे, निवृत्त माहिती संचालक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
खूपच छान परिचय.