आजवरच्या आयुष्यात अनेक उर्जास्त्रोत अनुभवायची संधी मला मिळाली. वेगळ्या उंचीवरच्या पण उर्जेच्या समान धाग्याने जोडलेल्या आणि अशा उर्जास्त्रोतांशी जोडले जाण्याची संधी मिळते तेव्हा नियतीसमोर नतमस्तक होवून स्वतःच्या शुन्यतेला मान्य करावं. भरून घ्यावी जेवढी घेता येईल तेवढी उर्जा. मनापासून प्रणाम करावा. आशीर्वाद म्हणजे दुसरं काय असतं वेगळं याहून? मानवतेचा एक जिवंत झरा अनुभवायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे.यातलाच एका वेगळ्या वाटेवरचा उर्जास्त्रोत म्हणजे कोथरूड, पुणे येथील अनघाताई ठोंबरे. “येथे गरिबांसाठी सारे काही ‘फुकट’ मिळते…..एकही पैसा न घेता.” गरीब बांधवांसाठी जगातील एकमेव अनघा ताईचे अनोखे कॅशलेस असे हे दुकान आहे.
अनघा ठोंबरे यांचं पुण्याला आपल्या राहत्या घरीच एक अनोखं ‘दुकान’ गेली पंधरा वर्षे सुरू आहे. हे दुकान आहे कॅशलेस. कारण तिथल्या वस्तू फुकट दिल्या जातात. दिवाळीला कपडे, नवरात्रीत नऊ साडय़ा, ईदसाठी ओढण्या, वारीसाठी टोप्या, अनवाणी लोकांना चप्पल, भुकेल्यांना अन्न, लहान मुलांना खेळणी, कष्टकरी बाईला तवा, कुकर, इतकंच नाही तर ‘स्थळ दाखवायला’ नवीन कपडेही.. सारं काही इथे मिळतं.. समाजातल्या गरीब बांधवांसाठी सुरू असलेल्या या अनोख्या दुकाना’साठी हजारो लोकांची मदत झाली, होते आहे. ‘पिंपळाला पार बांधण्यासाठी’ असंख्य हात पुढे येत आहेत..
यशाच्या एका क्षणी ताईच्या आईने त्यांना सांगितलं, ‘‘आपलं आयुष्य, आरोग्य, यश, समृद्धी, शिक्षण यांच्यामागे कितीतरी राबणारे, कष्ट करणारे हात असतात, मग ते हात शेतात राबणारा शेतकरी, ओझी उचलणारा हमाल, सफाई कामगार, बांधकाम कामगार, शेतकरी, मोलकरणी, सीमेचे रक्षण करणारा जवान असे अगणित असतात. आपण त्यांच्याविषयी कृतज्ञ असलं पाहिजे, ते सगळे यशाचे, श्रेयाचे वाटेकरी आहेत. आपण सण, उत्सव साजरे करतो, छंद, मनोरंजनाने आनंदी होतो, नोकरी करतो, वृद्ध रुग्णांची सेवा करतो, घर सजवतो, प्रत्येक वेळी त्यांचे स्मरण केले पाहिजे. त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवे. पिंपळाला पार बांधत राहावं.’’ आईच्या शब्दाला ‘अमर’ करण्यासाठी एका क्षणी ताईंनी भरपूर पगार, सुविधा असणारी केंद्र सरकारची सन्मानाची नोकरी सोडली आणि गरिबांसाठी ‘समाजप्रस्थाश्रम’ स्वीकारला. घेणाऱ्यांचे हात हजारो आहेत हे माहीत होतेच पण देणाऱ्यांचेही हात हजारो आहेत, याचा साक्षात्कार झाला, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या देण्या-घेण्यातून असंख्य आठवणी ताईच्या पदरात पडत गेल्या. समाधानाचं कटोरं शिगोशिग भरत गेलं.आजही जातंय..
एका गरीब मुलीची ब्रेन टय़ुमरची शस्त्रक्रिया करायची होती. ती गुणी मुलगी कविता करत असे, या कवितांचे पुस्तक प्रसिद्ध करायची तिची शेवटची इच्छा होती. उपचार, तपासण्यांसाठीही पैसे नव्हते, तिच्याविषयी एका वृत्तपत्रात लेख लिहिला आणि मदतीचा ओघ सुरू झाला. लोकांनी भरभरून मदत केली. सर्व तपासण्या, उपचार, शस्त्रक्रियेसाठी पैसे मिळाले. मुख्य म्हणजे या शस्त्रक्रियेनंतर ती मुलगी वाचली. आता ती दोन मुलांची आई आहे. मग तिच्या वस्तीतल्या अनेक गरीब स्त्रिया आल्या. त्यांनाही मदत हवी होती. मग वृत्तपत्रे, मासिकातून अनेक लेख प्रसिद्ध झाले. त्याच्याशिवाय सगळं अशक्यच होतं. त्यांचे उपकार अनघाताई कधीच विसरू शकत नाही. और कारवाँ बनता गया अशा पद्धतीने असंख्य लोक जोडले गेले. अनेक जण काही ना काही आणून देऊ लागले. चांगल्या अवस्थेतील वस्तू, तर काही वेळा न वापरल्या गेलेल्या वस्तू, अगदी भांडीसुद्धा. काही तर अगदी कोरी करकरीत. काहींनी त्यांचे संपर्क क्रमांक दिले. काहीही लागलं तरी फोन करा, असं आवर्जून सांगितलं. अशा तऱ्हेनं ताईचे गरिबांसाठीचं ‘कॅशलेस दुकान’ सुरू झालं. इथे सगळं काही मिळतं. एकही पैसाही न घेता.
प्रथम कपडय़ांचं दुकान सुरू झालं. अनेक लोक जुने पण चांगल्या अवस्थेतले कपडे आणून देतात. मग ते गरिबांना, कष्टकऱ्यांना दिले जातात. एकदा एक माहिती समजली, नवीन जन्मलेल्या बाळांना झबली नसतात. एका रुग्णालयामध्ये ही दीडदोनशे बाळे उघडीच असतात, असं कळलं. अनेकांनी मला जे फोन नंबर दिले होते, त्यांच्याशी संपर्क साधला. मग ब्लाऊजपीस, कटपीसेस लोकांनी आणून दिली, एका मैत्रिणीने तीनशे झबली मोफत शिवून दिली, ताईच्या दुकानात झबली आली. ज्यांना ती हवी होती त्या गरीब स्त्रिया या दुकानात आल्या आणि आवडीची झबली घेऊन गेल्या. बाळांना झबली मिळाली.
मग ताईचे कपडय़ांचे दुकान प्रसिद्ध होत गेले, इकडे देणाऱ्यांचे हातही हजारो झाले. एकाने रेडिमेड कपडय़ांचे दुकान बंद केले, मुलांचे चारशे ड्रेसेस मला फुकटात आणून दिले. ते सारे आदिवासी, ग्रामीण भागात पाठवले. आदिवासी भागातली मुले तर चार दिवस अंगावरचे कपडे धुण्यासाठी द्यायला देखील तयार नव्हती, नुसतं ऐकूनच अंगावर रोमांच उभे राहिले. प्रत्येक सण वेगळ्या अर्थाने आता साजरा होतो. रमजान ईदला मुलींना, बायकांना नमाज पढायला नव्या ओढण्या हव्या असतात. पण त्याचबरोबरीने त्यांना हवी असलेली खजूर, दुधाची पाकिटं ती सुद्धा या दुकानात मिळायला लागली.
कुणी बोहारणी, कुणी कासारणी, कुणी मोलकरणी, कुणी गावाकडच्या. सगळ्या जणी तृप्त होऊन जातात. पांडुरंगाच्या वारीच्या अनेकांना वेळी टोप्या, पायजमे, शर्ट, धोतर हवे असतात. दोन-तीन महिने आधीपासून ते जमवायला सुरुवात होते. साबण, टूथपेस्ट, पाण्याच्या बाटल्याही सगळ्यांना वाटायला जमतात. आजपर्यंत कधी काही कमी पडले नाही की अपुरे पडले नाही. ताई वारीला न जाताही त्यांना प्रसाद आणून दिला जातो, प्रत्येकात विठुराया दिसतो. नवरात्रातल्या नऊ दिवसांत उपवासाला दाणे, साबुदाणे, राजगिरा वडय़ा आणून दिल्या जातात आणि मागितल्याही जातात. सगळ्या सणांना काही ना काही दिलं- घेतलं जातंच. सगळे देव आज अनघाताईवर प्रसन्न आहेत.
इतकंच कशाला एखाद्या गरीब मुलीचा ‘दाखवण्याचा’ कार्यक्रम असतो. कधी तर तो ताईच्या घरातच होतो. मुलींमध्ये अंध मुलीही आहेत. त्यांना अंगभर कपडा लागतो, त्यांच्यासाठी पूर्ण बाह्य़ांचे ड्रेस लोक आणून देतात. गरीब शेतकऱ्यांना शहरात उपचाराला, कुणाला भेटायला यायचे तर अंगावर धड कपडे नसतात. काही जण मग शेजाऱ्यांचे बिनमापाचे कपडे घालून येतात. कुणी असे लोक दिसले की दुकानातले कपडे त्या खेडय़ापाडय़ात जातात. महालक्ष्मीला नेसवायला साडय़ा, साठ सत्तर आज्या आहेत, त्या नऊवारीच नेसतात. आता नऊवारी जुने मिळतच नाही मग नवीन नऊवारी साडय़ा दुकानात दिवाळीत येऊन पडतात. मोठे दुकानदारही भरपूर डिस्काऊंट देतात. रिक्षावाले ओझी उचलायला मदत करतात.
कपडय़ांबरोबर सर्वाधिक मागणी असते ती वस्तूंना, भांडय़ांना. या लोकांना मी त्यांना देणारच हे इतकं पक्कं माहीत असतं की चक्क हक्काने मागूनच घेतात. अशा देण्यातून आज ताईंना हजारो लेकी मिळाल्या आहेत. चकलीसाठी कुणाला सोऱ्या हवा असतो, कुणाचा कुकर नवरा दारू पिण्यासाठी विकतो, तिला कुकर, एकदा रस्त्यावर तीन दगडांची चूल मांडणारीने तवा मागितला, भाकरी नाही मागितली, ताईंना लोकांकडून जुनी भांडी मिळू लागली, जुनी कसली नवीनच. दुष्काळी भागातल्या लोकांना पाण्याचे कॅन्स, भांडी लागतात, मग लोकांनी बादल्या, कळशा आणून दिल्या. गेल्या पंधरा वर्षांत काय हवे तेही समजले.
देणाऱ्यांना फक्त निमित्त लागतं. लोकांनी आपणहून गट तयार केले आहेत. तरुण मुले आहेत, आयटी इंजिनीअर्स आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, गरिबांना मदत करणारे गरीबही आहेतच. कुणी मग स्वत:चे, मुलाचे वाढदिवस, कुणाचे स्मृतिदिन तर कुणी दिवाळी, दसरा, नवरात्र या सणाच्या निमित्ताने अनेक वस्तू आणून देतात .उन्हात पाय भाजतात, चटके खात खात लोक ताईकडे येतात. चप्पल, बूट मागायला. दुकानात ते असतातच. मग आपल्या मापाचे, आवडीचे चप्पल, बूट घेऊन जातात. मोठी माणसं तर मदत करतातच पण त्यांचं पाहून लहान मुलंही त्यांच्या या मित्रांसाठी मदतीचा हात पुढे करतात. काही शाळांचे विद्यार्थी मदत करतात. साबण, पेन्स, टूथपेस्ट, खेळणी, हौसेने आणतात. रोजगार हमीवर काम करून इंजिनीअरिंग करणाऱ्या एका तरुणाला कॉम्प्युटर हवा होता. तोही प्रिंटरसकट एकाने आणून दिला. सायकल हव्या होत्या तर मोठय़ा सोसायटीतल्या पार्किंगमधल्या वीस सायकली दुरुस्त करून आणून दिल्या. गरजेच्या वस्तू दिल्या घेतल्या जातातच. पण गंमत म्हणजे हौसेच्या वस्तू पर्सेस, पावडरचे डबे, बेडशीट्स, तोरणे हेही सगळं मिळत राहतं.
या दुकानात धान्य बँकही आहे, काही भुकेल्या घरांसाठी डाळ, तांदूळ, चहा, साखर, कडधान्येही लोक आणून देतात. बिस्किटांचे पुडे, कांदा लसूण मसाला, अगदी दूध पावडरही ! दुष्काळी भागातले लोक येतात, त्यांना देवाच्या नैवेद्याला डाळ, गूळ, कणीक हवी असते. बाळंतिणीला दलिया, वरणभात हवा असतो. तो तिला इथेच मिळतो. मुख्य म्हणजे काही तरी द्यायचं हा भाव नाही. चांगल्या गुणवत्तेच्या, खाण्यासाठी योग्य वस्तू या लोकांकडून मिळत जातात. या सगळ्याचा उपयोग आजूबाजूच्या लोकांमध्येही होतो. गंभीर शस्त्रक्रियाही डॉक्टर मोफत करतात. उपचार करतात. त्यांच्या औषधांचे पैसेही मिळत राहतात.
ताईंना तर त्यांच्या आयुष्यात आनंदाच्या ठेवा मिळाला आहे. या साऱ्या आनंदाच्या यात्रेत आपण सहभागी सहभागी व्हाल ?
– लेखन : मानसी चिटणीस.
– संपादक: देवेंद्र भुजबळ.9869484800.