Saturday, March 15, 2025
HomeUncategorized"रमणीय व्हिएतनाम" समारोप

“रमणीय व्हिएतनाम” समारोप

व्हिएतनाम सहलीच्या अंतिम सत्रात आम्ही हनोई येथून लक्झरीने हलोंग बे कडे मार्गस्थ झालो. टोल विरहित हायवेचा सुसाट प्रवास होता. प्रवासात या दरम्यान अंताक्षरी, दम शेरा हे गेम खेळणे सुरु होते. रस्त्याच्या दुतर्फा बरेच क्षेत्र ट्रॅक्टरने चिखलणी करून तयार दिसत होते. डोक्याला व्हिएतनामी टोपी घातलेले शेतकरी भात रोप लागण करण्यात मग्न दिसत होते. या देशाची लोकसंख्या कमी असल्याने रस्त्यावर किंवा दारात नाहक कोणाचीही वर्दळ दिसत नव्हती.

अडीच तासांच्या प्रवासानंतर विश्रांती साठी आमची बस रस्त्यालगत मोती उत्पादन केंद्रात (लिजंड पर्ल) थांबली. येथे मोती उत्पादन घेण्याचा दृष्टीने जिवंत शिंपल्यात कृत्रिम रीत्या बीज सोडून पुन्हा त्यांना नैसर्गिक वातावरणाच्या तलावात सोडतात. तेथे शिंपल्यात मोती तयार होण्याची पुढील प्रक्रिया पार पडते. हे सारे कसे करतात ? याचे नावीन्यपूर्ण प्रात्यक्षिक पहायला मिळाले. लगतच्या मॉल मध्ये मोती व दागिने विक्री साठी ठेवले होते. यानंतर आम्ही हालोंग बे कडे मार्गस्थ झालो.

हालोंग बे (Halong Bay) :-

हनोई येथून तीन तासाचा प्रवास करून आम्ही हालोंग बे येथील खाजगी बंदरातून क्रुझ वास्तव्यासाठी लिली क्रुझ वर पोहोचलो. समुद्रकिनारा असला तरी सूर्य नारायणाचे दर्शन झाले नव्हते. अती थंड वातावरणात सभोवताली निळ्या भोर पाण्याचा शांत जलाशय पहात आलिशान क्रुझ सुट मधील वास्तव्याने मन प्रफुल्लीत झाले होते. क्रूझवर उत्कृष्ट निवास व्यवस्था, शाकाहारी व व्हिएतनामी स्थानिक सी फूड उपलब्ध होते. क्रुझ सभोवताल सागराच्या जलाशयातून वर आलेले उंच डोंगर व त्यावरील किर्र झाडांच्या हिरवळीचे नयनरम्य दृश्य दिसते. जलाशयातील टेकड्यांच्या बोगद्यातून होडीने केलेली रपेट विलक्षण वाटते.

नजीकच्या बेटावर जुहू चौपाटी सारखा बीच आहे. हे ठिकाण हो ची मिन्ह यांचे फ्रेंच मित्र टी टॉप यांनी विकसित केलेले होते. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ तेथे टी टॉप यांचा दगडी भव्य पुतळा उभारण्यात आलेला आहे.

सायंकाळीं बोटीने लगतच्या सरप्राइज केव्हज पाहण्यास गेलो. एका बाजूने पायऱ्या चढून जायचे अन् आत डोंगरात भव्य स्वयंभू गुहा बघताना आश्चर्य वाटते.

सरप्राइज केव्हज

हा सारा नजारा बघत दुसऱ्या बाजूने बेटावर पुन्हा परतीच्या बोटीत बसलो. सायंकाळीं क्रुझ वास्तव्यात तेथील लोकल फूड शिकणे व स्वतः बनवण्याचे प्रात्यक्षिक करता येते.

रात्री भोजन आटोपल्यावर थंडी असली तरी क्रुझच्या डेकवर आम्ही जमलो. तेथे शर्मिला यांनी गायलेल्या दम मारो दम या गाण्यावर नाचण्याचा मोह कुणालाच आवरता आला नाही. सैराट चित्रपटातील गाणे सुरू होताच क्रुझ मुक्कामी आलेला म्युनिच, जर्मन येथील ब्रूनो हा तरुण सराईतपणे त्याच्या वडिलांच्या समवेत आम्हा सोबत नाचात सहभागी झाला. एकूणच क्रुझ वास्तव्याचा आनंद संस्मरणीय अन् द्विगुणित करणारा ठरला. आमच्या लीली क्रुझच्या आसपास इतर अवाढव्य अन् आकर्षक क्रुझ फिरताना बघणे ही पर्वणी ठरत होती.

क्रुझ डिनर

दुसऱ्या दिवशी सकाळी बांबू बोटीने आम्ही जलाशयातून भूकंपामुळे तयार झालेले डोंगर जे छोटे बेट बनले तिकडे निघालो. या बेटाच्या मधोमध नैसर्गिक पोकळी वजा बोगदा झालेला होता. त्या बोगद्यातून बोटीने प्रवास करताना निसर्गाचा चमत्कार अनुभवता आला. एक दिवसाचा मुक्काम उपभोगुन आम्ही हानोईला परतलो.

व्हिएतनाम स्वतंत्र लढ्यात बरेच सैनिक किंवा जनता पंगू बनली आहे. हे सारे अपंगत्वावर मात करत कशिदा काम करतात. पेंटिंग करतात. तसेच काहीजण बांबू पासून तयार होणाऱ्या सुतापासून तलम कपडे बनवतात. त्या विक्री केंद्रास भेट देवून उपयुक्त वस्तू खरेदी केल्या.

मातृभूमीत परत…

सायंकाळीं शिल्लक राहिलेले डोंग चलन सार्थकी लावण्यासाठी पुन्हा खरेदी करून विमानतळावर पोहोचलो. व्हिएतनाम एअर लाईन्सने साडे पाच तासांच्या प्रवासानंतर मुंबईत सुखरूप परतलो.

सहलीचा पुरेपूर आनंद लुटून सह प्रवांशांसोबत जमलेले ऋणानुबंध अधिक दृढ करत सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. सहलीसाठी खर्चलेल्या पैशाचा पुरेपूर उपभोग लाभला. ट्रॅव्हल्सच्या सुविधा अन् टुर मॅनेजर अब्बास सैयद याच्या कामगिरीवर सारे बेहद्द खुश होतो. एकंदरीत आमची ही व्हिएतनाम सहल अगदी अविस्मरणीय ठरली.

समाप्त.

— लेखन : संजय फडतरे. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments