Wednesday, March 12, 2025
Homeपर्यटन"रमणीय व्हिएतनाम" - १

“रमणीय व्हिएतनाम” – १

नमस्कार मंडळी.
आज पासून आपण सलग ६ दिवस “रमणीय व्हिएतनाम” ही लेखमाला वाचणार आहोत. ही लेखमाला लिहित आहेत, श्री संजय फडतरे. त्यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील घालवाड हे असून त्यांचे शिक्षण M.Sc. (Agri) झाले आहे. त्यानंतर ते महाराष्ट्र शासनाच्या कृषी आयुक्तालयातून तंत्र अधिकारी म्हणून निवृत्त झाले असून आता पुण्यात स्थायिक झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी निवृत्तीनंतर आवड म्हणून लेखनांस सुरुवात केली. महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात लाईक अँड शेअर सदरात त्यांचे काही लिखाण प्रसिद्ध झाले.

तसेच आयुष्यात आलेले अनुभव, काही रम्य आठवणी, अभिव्यक्त होण्याची उर्मी आणि केलेली भ्रमंती यावर आधारित श्री फडतरे यांचे ‘वेचक वेधक’ हे पुस्तक वल्लरी प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केले आहे.
श्री संजय फडतरे यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे.
— संपादक

सौ.स्नेहाची आते बहिण, अरुणा ताईंचे यजमान शंकरराव पाटील व त्यांचे मित्र मदन कोकीळ हे व्हिएतनाम दौऱ्यावर जायचे ठरवत होते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निघालेल्या सहलीत आम्हीही सोबत जाण्यास होकार कळवला.
मग स्नेहाच्या बहिणी शुभदा व रीना देखील सहलीस तयार झाल्या. वास्तविक ‘सफर’ मार्फत आमची ही पहिलीच सहल होती. त्यामूळे मनात थोडी साशंकता होती. मात्र सफरने आम्हाला दिलेली उत्कृष्ट सेवा व छान आयोजन केल्याने साऱ्यांचे समाधान झाले. व्हिएतनाम सहलीत मी बघितलेल्या स्थळांची माहिती आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.

बहुसंख्य बौद्ध धर्मीय असलेल्या व्हिएतनाम देशाच्या उत्तरेस चीन, पश्चिमेस लावोस व कंबोडिया तर पूर्वेला पॅसिफिक महासागर (दक्षिण चीनचा समुद्र) पसरला आहे.
व्हिएतनाम देशाला इ.स. ९३८ मध्ये चीन पासून स्वातंत्र्य मिळाले होते. पण १९ व्या शतकाच्या अखेरीस फ्रेंचांनी आक्रमण करून तिथे फ्रेंच-इंडोचीन वसाहत स्थापन केली. दुसऱ्या महायुद्धानंतर हो-ची मिन्ह यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी फ्रांसचा पराभव केला.

सन १९५४ मध्ये व्हिएतनामचे उत्तर व दक्षिण असे तुकडे करण्यात आले. सन १९७६ मध्ये एकत्रीकरण युध्दात हा देश पुन्हा एकसंघ बनला. पण सोव्हिएत संघाच्या छत्र छायेत दारिद्र्य व आर्थिक निर्बंधांमुळे या देशाला एकाकीपणाची पुढील दहा वर्ष भोगावी लागली. त्यामुळे खऱ्या अर्थाने १९८६ पासूनच या देशाने प्रगती करण्यास सुरुवात केली. या देशात बऱ्याच नद्या आहेत. प्रामुख्याने चीन, थायलंड, मलेशिया, कंबोडिया या देशातून वाहत येणारी मेकाँग ही सर्वात मोठी व प्रमुख नदी सर्व देशातून वहात जावून समुद्रास मिळते. या नदीच्या खालोखाल सायगोंन, लाल (रेड) नदी, हान या नद्यामूळे भात हे त्यांचे मुख्य पीक बनले आहे.

जगात दुसऱ्या क्रमांकाचा कॉफी निर्यातदार असणारा व्हिएतनाम हा देश पर्यटनासाठी उत्कृष्ट आहे. हजार व लाखो रुपयाच्या स्वरूपातील ‘डोंग’ (VND) हे त्यांचे चलन भारतीय चलनाच्या तुलनेत चलन फुगवटा असल्यासारखे वाटते.

पर्यटनासाठी तुलनेत व्हिएतनाम हा देश सर्वात स्वस्त आहे. भारतीयांना तेथे आदराने वागवले जाते. आपले उच्चार त्यांना समजतात. शिवाय बरेच विक्रेते भारतीय रुपये देखील स्विकारतात.

हो ची मिन्ह :
आम्ही मुंबई-कलकत्ता मार्गे हो-ची मिन्ह येथे मध्यरात्री पोहोचलो. वास्तविक या शहराचे ‘सायगोंन’ हे मूळ नाव होते. त्याचे १९७५ मध्ये नामांतर झाले आहे. व्हिएतनाम एकत्रिकरणापूर्वी हो ची मिन्ह हे उत्तर भागाची राजधानी असलेले हे सर्वात मोठे व प्रगत शहर आहे. सर्वत्र स्वच्छ्ता, रस्त्यावर पोलीस नसतानाही सर्व वाहने शिस्तबध्द सिग्नलचे पालन करतात. केवळ दुचाकी साठी स्वतंत्र मार्ग असल्याने वाहतूक कोंडी होत नाही. आम्हाला कोठेही अतिक्रमण किंवा उघडी गटारे, भिकारी दिसले नाहीत.

आम्हा सर्वांचे लक्ष वेधून घेत होते ते म्हणजे प्रत्येक घर व दुकानासमोरील गेंडेदार झेंडू व शेवंती फुलांनी भरलेल्या कुंड्यानी. यामुळे आमची मनं प्रफुल्लीत झाली. शिवाय भल्या मोठ्या कुंडीत जर्दाळूच्या (अँप्रिकॉट) पिवळ्या फुलांनी डवरलेले झाड दर्शनी भागात जागोजागी पहायला मिळत होते.

आमची निवास व्यवस्था ‘रामाना सायगोंन’ या तारांकित हॉटेलमध्ये होती. सकाळी भरपेट नाश्ता उरकून आब्बास सय्यद या तरुण हसतमुख टुर मॅनेजर सोबत आम्ही कू-ची टनेल कडे वातानुकूलित बसने मार्गस्थ झालो. जंगलाच्या भू भागाखाली कू ची या गावात हे साधारण २५० किमी बोगद्याचे जाळे आहे.

जमिनी खाली युध्दात गनिमी सैनिकासाठी घरे, दळणवळण आणि पुरवठा, वैद्यकिय उपचार, हवाई बॉम्ब स्फोटापासून आश्रय घेणे तसेच आकस्मिक हल्ले करून पुन्हा जमिनीत अदृश्य होण्यासाठी हे बोगदे बनवले होते. व्हिएतनामी सैनिकांची शरीरयष्टी मुळात सडपातळ व खुजी असल्याने जाणीवपूर्वक चिंचोळे बोगदे बनवण्यात आले होते. या बोगद्यातून बलदंड शरीर यष्टीचा शत्रू प्रवेश करने अशक्य होते. शत्रू सैनिकांची दिशाभूल करणारे बोगदे आम्ही स्वतः फिरून पहिले. केवळ जिद्द व चिकाटी आणि गनिमी कावा तंत्रज्ञान वापरून बलाढ्य शत्रू देशाला या इवल्याश्या देशाने नामोहरण कसे केले हे आम्हास समजले.

टनेल मधील चिंचोळी वाट

टनेल मधून ते शत्रू सैनिकास टिपून मारत असत. आमच्या ग्रुप मध्ये सारे ज्येष्ठ नागरिक असल्याने चिंचोळ्या सीक्रेट टनेल मध्ये उतरण्याचे धाडस करत नव्हते. पण मी त्यात बिनधास्त उतरुन त्याची पाहणी केली. या परिसरात भू पृष्ठावर शत्रूला जाळ्यात अडकवून ठार मारणारे सापळे पहायला मिळाले. येथेच शत्रू सैनिकांकडून हस्तगत गेलेले शस्त्र साठे, दारू गोळे याचा पुनर्वापर कसा केला जायचा याची माहिती जाणून घेतली.

कु ची येथील सिक्रेट टनेल

त्यांकाळी काबीज केलेले रणगाडे, तोफा, दारूगोळा प्रदर्शनार्थ ठेवला आहे. जमिनी खालील बोगद्यात चिंचोळ्या मार्गाने आत जात तेथेच सैनिकांची निवास व्यवस्था केलेली होती. बोगद्यात प्राणवायू येण्यासाठी तसेच स्वयंपाकाचा धूर दूरवरून बाहेर जाण्याची व्यवस्था केलेली होती. त्याकाळी सायंकाळी सहा नंतर कोणीही बाहेर पडत नसत. नजरचुकीने कोणी बाहेर पडला तर त्यांचीच शत्रू समजून हत्या केली जायची. हे सारं पाहून झाल्यावर आदल्या दिवसाच्या प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी हॉटेलवर विश्रांती साठी लवकरच परतलो.
क्रमशः

संजय फडतरे.

— लेखन : संजय फडतरे. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित
सौ.मिनल शशिकांत शिंदे, on चित्र भाषा संमेलन : अभिनव उपक्रम