व्हिएतनामच्या दक्षिणेस सुमारे एक हजार वर्षापूर्वीचे हनोई हे प्राचीन शहर आहे. तुलनेत लहान असले तरी हे शहर देशाची राजधानी आहे.
हनोईत आम्ही पर्यटनाची सुरुवात राष्ट्राध्यक्ष हो ची मिन्ह यांच्या स्मृती स्थळ भेटीने केली. या राष्ट्राचे ते आदरणीय स्थळ असल्याने तेथे अंगभर पोशाख घातलेल्यानांच प्रवेश दिला जातो. काहीसा डगळा वाटणारा मेहंदी रंगाचा पोशाख घातलेले सैनिक पर्यटकांना तेथे शिस्तबध्द व ओळीने सोडतात.

राष्ट्रपुरुष हो ची मिन्ह यांचा जन्म १८९० मध्ये तर त्यांचे निधन १९६९ मध्ये झाले. त्यांचे कर्तुत्व आणि देशाला दिलेले योगदान यामुळे आदर म्हणून त्यांचे शव आजतागायत जतन केले आहे. त्यांची योग्य निगा व प्रक्रिया केल्याने त्यांचे शव ५६ वर्षांनीही जसेच्या तसे दिसते.

तद्नंतर नजीकच्या एक खांबी (वन पिलर) पॅगोडाचे आम्ही दर्शन घेतले.हनोईत तुलनेत जास्त थंड हवामान होते. व्हिएतनाम मध्ये स्त्रिया सर्व उद्योग धंद्यात पुरुषांच्या बरोबरीने कामे करतांना दिसतात. एकूणच सर्व जनता कष्टाळू व प्रामाणिकपणे कामे करणारी आहेत. पर्यटकांची नाहक फसवणुक करत नाहीत असे आम्हास जाणवले.

हनोई स्ट्रीट ट्रेन : हो ची मिन्ह पासून निघालेली ट्रेन सुमारे तेहत्तीस तासांचा प्रवास करून हनोई शहरात पोहोचते. हनोईत जेथे ही ट्रेन शिरते त्या रेल्वे ट्रॅकलगत दुतर्फा दुकाने, रेस्टॉरंट आहेत.याच ठिकाणी हनोई स्ट्रीट ट्रेन बघण्यास सारे पर्यटक आवर्जून भेट देतात. सायंकाळी ट्रॅकलगत खुर्च्यांवर बसून जगप्रसिद्ध कॉफी किंवा नारळ पाणी यांचा आस्वाद घेत धावणारी ट्रेन पाहण्याचा आगळा आनंद पर्यटकांना मिळतो.

शहराच्या मधोमध तळे (वेस्ट लेक) आहे. तळ्यालगत पॅगोडा दर्शनासाठी लोकांची व पर्यटकांची रीघ लागलेली असते.
हनोईत विविध वस्तू खरेदीसाठी स्ट्रीट मार्केट आहे. येथील खरेदी व्यवहार डॉलर, डोंग शिवाय भारतीय चलनात देखील करता येते. येथे दराची घासाघीस करत खरेदी करण्याचे भारतीय समाधान येथे लाभते.
वॉटर पपेट शो : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सायंकाळपासून तासाभराचा कलाकार पारंपरिक शो सादर करतात. स्टेजवरील पाण्याच्या हौदात पारंपरिक कटपुतळीचा कथानकांसहित सादर केलेला खेळ उत्कंठावर्धक आहे.स्ट्रीट खरेदीत व्हिएतनामी टोप्या, कपडे, ड्राय फ्रूट, कोकोनट चॉकलेट आदी बाबी किफायतशीर दरात मिळतात.
क्रमशः

— लेखन : संजय फडतरे. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800