Homeलेख"रश्मिरथी"

“रश्मिरथी”

महाभारत असो की रामायण त्यातील कथा आजही श्रवणीय आहेत.ही दोन्ही महाकाव्ये माहित नाही असा माणूस सापडणं विरळा. या कथा किती ही ऐकल्या किंवा त्यावर जितकं चिंतन मंथन करु तसं त्यातील नवनवीन पैलू जन्मास येतात. ही बाब लक्षात घेऊन काही ना काही उपक्रम राबवित असलेल्या “आम्ही मैत्रिणी” ग्रुप मधील वाचनाची आवड असणाऱ्या आम्ही दहा बारा मैत्रिणीनी एकत्र येऊन ‘पुस्तकावर बोलू काही’ हा उपक्रम सुरु केला. याला प्रतिसाद कितपत मिळेल याविषयी मी थोडीशी साशंक होते. पण धाडसाने उपक्रम सुरू केला.

कथा किंवा गोष्टी हा आपणा सर्वांचा आवडता अन् जिव्हाळ्याचा विषय असल्याने नुकतेच वाचलेले कवी दिनकर यांचे “रश्मिरथी” हे महाभारतावर आधारित महाकाव्य वाचनास घेतले.
हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त हिंदी महाकाव्य आहे. उत्तर हिंदुस्थानी शुध्द भाषा शैलीत असले तरी वाचनीय आणि श्रवणीय आहे. भाषा रसाळ आणि गोड आहे.मुख्य म्हणजे काही हिंदी भाषिक मैत्रिणी पण आमच्या ग्रुप मध्ये आहेत.

लेखक रामधारी दिनकर

महाभारतातल्या कर्ण आणि कुंती यांच्या भेटीचा प्रसंग हा मनाला चटका लावणारा, आई अन् मुलाच्या अतूट नात्याचा पदर उलगडणारा ! या निमित्ताने साक्षात डोळ्यासमोर उभा राहिला. कर्णाला स्वतः च्या जन्माचं रहस्य राजमाता कुंती येण्यापूर्वी श्रीकृष्णाने सांगितलेले असते. परंतु कुठली ही कटुता जिव्हेंवर न आणता दानशूर कर्ण ‘देवी’ म्हणत राजमाता कुंतीचं स्वागत करतो. सायंकाळची वेळ! सूर्य अस्ताला निघालेला ! त्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलेलं ! किती तरी तेजस्वी ! अन् किनाऱ्यावर उभा असलेला कर्ण ! तो ही त्या सूर्या इतकाच तेजस्वी ! जणू एकच प्रतिकृती ! आपल्याच पोटी जन्मलेल्या तेजस्वी, महापराक्रमी पुत्राला अनिमिष नेत्रांनी पाहात राजमाता कुंती उभी होती. मनात शब्दांची जुळवाजुळव करीत होती.
“मी तुझी आई आहे” हे कोणत्या तोंडाने सांगू ? अन् कशी सांगू ? तितक्यात कानावर शब्द आले,
“देवी ! आप कौन है ? आपकी मैं क्या सेवा कर सकता हूं ?”
या शब्दाने ती भानावर आली. दोघांचा संवाद सुरु होतो.

दुसऱ्याच दिवशी महायुध्द सुरु होणार असते कौरव अन् पांडव यांच्यातले हे महायुध्द ! ‘सुईच्या नोखावर बसणार नाही इतकी ही जमीन पांडवांना मी देणार नाही,’ हा दुर्योधनाचा अट्टाहास ! कृष्ण शिष्टाई असफल ठरली आणि युध्द अटळ ठरले. राजमाता कुंतीच्या मातृत्वाला जाग आली. महायोध्दा महापराक्रमी असणारा आपल्याच पोटचा गोळा कर्ण एका बाजूला आणि महापराक्रमी पांडव दुसऱ्या बाजूला ! माझे पुत्रच एकमेकांचे शत्रू होऊन युध्दात उतरणार ? नाही …? हे कदापि शक्य नाही …!!
पूत्र कर्णाला सारं सत्य सांगून त्याला आपल्या बाजूनं वळवाव, त्याने कितीही आपला धिक्कार केला, कठोर शब्दांत निर्भर्त्सना केली तरी शांतपणे स्वीकारत फक्त एकदा तरी त्याला कवटाळत अवघ्राण करावे ही त्या मातेची तीव्र इच्छा ….!!

कर्ण आणि राजमाता कुंती यांच्यातला संवाद अंतःकरण पिळवटून टाकणारा आहे.
कर्ण आपला कटू भूतकाळ, जन्मदात्या आईने केलेला त्याग, “मी कोण आहे ?” हा सतत त्याला भेडसावणारा प्रश्न आणि जेव्हा त्याची जन्मदात्री साक्षात त्याच्यासमोर उभी राहते, तो प्रसंग, त्याची घालमेल, आयुष्यभराचा सल, उफाळून आलेली वेदना, विषाचा एकेक घोट गिळावा तद्वत कर्णाचे एकेक बोल ह्रदय आरपार चिरुन जातात. जन्मलेलं पाडस आईच्या अमृत पानास आसुसलेलं असताना, त्याला एकदा ही छातीशी न कवटाळता तू त्याला गंगेच्या पाण्यात सोडून देतेस. दगडाला पाझर फुटला असेल पण तुला कसा पान्हा आला नाही… ? आपल्या बाळापेक्षा तुला राज-वैभव, प्रतिष्ठा, राजघराणे प्रिय होते. कुमारी माता हा तुला कलंक वाटत होता. तुला महाराणी, सम्राज्ञी म्हणून मिरवायचे होते. त्यासाठी तू मला फेकून दिलेस. “अनौरस पुत्रा पेक्षा औरस पुत्राची माता म्हणून तुला सन्मान हवा होता.’

राजमाता कुंती हे सारं निमूटपणे ऐकत असते. एका मातेच्या मनाची कुचंबना काय झाली असेल…? हे शब्दापलिकडले आहे. हा प्रसंग काळजाला घरं पाडणारा, शब्दातीत आहे.

हा प्रसंग अतिशय रंगत गेला. विशेषत: गार्डन मध्ये हा उपक्रम घेत असतांना बागेत फिरायला येणारे जेष्ठ नागरिक येऊन बसू लागले. खेड्यापाड्यातून आलेले, निवृत्तीचा वेळ कसा घालवावा या विवंचनेत असणाऱ्या श्रोत्यांना एक चांगली मेजवानी मिळाली. गावाकडे जे असताना देवळात जाऊन पांडव कथा ऐकत होतो. इथं मनच लागत नाही. शेजारीपाजारी एकमेकाला बोलत नाहीत. कुणी कुणाच्या घरी जात नाहीत. दाराची कवाडं सतत लावलेली असतात. ना घरातल्यांना बोलायला वेळ आहे ना शेजाऱ्यांना …! गावाकडची लय याद येती बघा… ! हे असंच चालू राहू द्या. हे त्यांचे मनोगत ऐकून खूप बरे वाटले.

एका श्रोत्याने नुकतेच पनवेलमध्ये एका जोडप्याने नवजात बालकाला कचरा कुंडीत टाकून दिले होते. पोलिसांनी या घटनेचा छडा लावत आरोपी शोधून काढले. या जोडप्याचे ते पहिलेवहिले अपत्य परंतु हाताला शाश्वत काम नसताना त्या बालकाचे पालनपोषण कसे करावे ? पुढे त्याच्या शिक्षणाचा खर्च कुठून अन् कसा करावा ? त्याऐवजी एखाद्या गरजू पालकांकडे आपले मूल गेले तर त्याचं भविष्य तरी चांगले होईल या अपेक्षेने त्याचा त्याग केल्याची त्यांनी कबुली दिली. कालाय तस्मै नमः !!!

डाॅ. प्रभा वाडकर

— लेखन : प्रा.डॉ.प्रभा वाडकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments