“वाचन संस्कार”
“वाचनं ज्ञानदं बाल्ये,
यौवने शील रक्षणम्
जरावस्थे दु:ख हरणं,
हितं सद् ग्रंथ वाचनम् ।।”
खरंतर हा श्लोक म्हणजे गागर में सागर.
वाचनाला दुसरा पर्याय नाही हे सांगणारा. वाचन सातजन्माचा साथीदार असल्या सारखे. या श्लोकाप्रमाणेच वेगवेगळ्या वयात वाचनाचे महत्त्व जाणण्याचा प्रयत्न करुया.
वाचनं ज्ञानदं बाल्ये : बाल्यकालात वाचन ज्ञानदाता असते. याकाळात मुलांमधे भरपूर जिज्ञासा असते. ती सतत प्रश्न विचारून जिज्ञासा शांतवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळी पुस्तकं त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन त्यांची ती भूक भागवतात.
खोटं का बोलू नये ? चांगले मित्र का असावे ? विचार करून का वागवे ? हे प्रश्न त्यांना पडतात आणि जर सरळ समजावलं तर ते तितकं प्रभावी ठरत नाही. मग पंचतंत्र, हितोपदेश सारखी पुस्तकं वाचून त्या कथांच्या मार्फत सांगितलेल्या गोष्टी पटण्यास सहायक ठरतात.
त्याची कल्पनाशक्ती वाढावी, मनोरंजन व्हावे यासाठी सिंदबाद, अल्लादिन आणि जिन्न, स्नोव्हाईट या गोष्टी वाचायला देतो किंवा ते वाचनासाठी प्रेरित करतो. आपला इतिहास आणि धार्मिक कथा कळाव्या म्हणून लघुकथा किंवा चित्रकथा चांगला पर्याय आहे.

यौवने शीलरक्षणम् : युवावस्था ही ऊर्जेने सळसळणारी, पण मनातून संभ्रांत असलेली असते. त्यांना योग्य अयोग्य मार्गाची निवड करायची असते. योग्य मूल्ये शिकवण्याचा काळ असतो. ज्यामुळे त्यांचं जीवन चुकीच्या मार्गाला जाणार नाही अशी, त्यांना मार्गदर्शन करणारी, किंवा अपयशातून ही यश कसे मिळाले ही प्रेरणा देणारी पुस्तके मदत करतात.
द यूनिकॉर्न, (अच्युत गोडबोले), द अलकेमिस्टी (पाउलो कोएलो), सारखी जीवनाला दिशा दाखवणारी पुस्तकं वाचायला द्यावी किंवा अपयशातून यशस्वी झालेल्यांची. जसं धीरूभाई अंबानी, कॅप्टन जी. आर. गोपीनाथ, स्टीव्ह जॉब्स यांचे अनुभव असलेली पुस्तकं वाचली तर मनाला उभारी येण्यास मदत मिळू शकते.
कारण हे वय अपयशाने खचून जाऊन निराश होऊ शकते . अशा प्रकारचे वाचन मनाला उभारी देणारे ठरते. एक पुस्तक माझ्या संग्रही आहे ते म्हणजे डेल कार्नेगीचं “How to Stop Worring And Start Living”
खूप सुंदर पुस्तक आहे. मार्गदर्शनपर आणि मनाला उभारी देणारं.
तसंच आपला इतिहास, शास्त्र याबद्दलची माहिती देणारी पुस्तकंही तरुणवर्गाने वाचायला हवीत हे माझं मत.

जरावस्थे दु:ख हरणम् : उतारवयात किंवा हळूहळू प्रपंचापासून निवृत्त झालेल्या वयात मन:शांती लाभेल असे वाचन, मानसिक स्वास्थ्य सुदृढ ठेवते. या वयात अनुभव आलेला असतो, जिज्ञासा थोडी शमलेली असते. इतर पुस्तकांसह धार्मिक पुस्तकांचं वाचन त्यांच्या मनाला शांती प्रदान करतात. संसारापासून थोडंसं अलिप्त रहाण्यास मदत करतात. दासबोध, ज्ञानेश्वरी, गीतारहस्य सारखे ग्रंथ त्यांना आनंद देणारे ठरू शकतात.
हितम् सद् ग्रंथ वाचनम् : चांगले ग्रंथ, पुस्तकं वाचणं हे हितकारी असतं. वाटेल ते वाचन म्हणजे सारहीन वाचन. त्यापासून काहीच मिळत नाही. उगाच वेळ फुकट घालवणारे वाचन असते ते.
पुस्तकं म्हणजे ज्ञानाची मंदिरे आणि वाचन हा खरा संस्कार आहे. वाचन ही विचारांची भूक भागवणारी मेजवानी आहे. वाचन ही एक कला आहे. वाचन माणसाला माणूस बनविते, जीवनाला नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करते आणि योग्य अयोग्य याची जाणीव करून देते.
वाचनाचे महत्त्व आणि त्याची महती सांगण्यासाठी जपानच्या एका सार्वजनिक बागेत एक बनावटी सी सॉ तयार करून ठेवला आहे. त्यावर एकाबाजूला वयाने मोठा असलेला माणूस बसला आहे आणि दुसऱ्या बाजूला एक छोटी मुलगी बसली आहे आणि गंमत म्हणजे त्या छोट्या मुलीची बाजू खाली टेकलेली आहे आणि वयस्कर माणूस बसलेली बाजू वर आहे. कारण ? कारण त्या मुलीच्या हातात पुस्तक आहे. वाचन हे माणसाला वजनदार बनविते हे यातून सुचवलं आहे.
वाचनाने ज्ञानप्राप्ती तर होतेच पण आनंद प्राप्तीही होते. मन विकसित होते त्यावर संस्कार होतात. मानसिक आरोग्य सुधारायलाही वाचन सहाय्यक असते. इतिहास, कला, विज्ञान, धर्म, निसर्ग, तंत्रज्ञान या सोबत जगात आणि त्यापलीकडे काय चालू आहे ती माहितीही आपल्याला मिळते.
आजच्या काळात ही सर्व माहिती गूगलवर पटकन् सापडते त्यामुळे वाचन हा प्रकार हळुहळू कमी होत चालला आहे. प्रत्येक माहिती चुटकीसरशी मिळवण्याची सवय लागल्याने पुस्तक वाचन बोजड वाटतंय. एकाग्रता कमी होत असल्याने सलग वाचन करणं नकोसं होतं चाललंय. मोबाईलमुळे इतर प्रकारात गुंतणे जास्त आल्हादायक वाटायला लागलं आहे.
पुस्तक वाचन जर कालबाह्य करायचं नसेल तर ती जबाबदारी प्रत्येक घराने उचलायला हवी. घरातील मोठ्यांनी वाचनाचा आदर्श पोरांपुढे ठेवला तरच हे शक्य होईल. नुसतं “वाचाल तर वाचाल” हे घोषवाक्य घोळवून काही साध्य होईल असं चित्र दिसत नाही. घरातील मोठे जर पुस्तकं वाचतील, मुलांना त्यासाठी प्रेरित करतील, त्यांना भेट म्हणून पुस्तकं देतील आणि पुस्तकं विकत घेण्याची गोडी लावतील तर आपली वाचन संस्कृती नक्कीच टिकून राहील.
शेवटी एका श्लोकाद्वारे वाचनाचे महत्त्व पटवून देण्याचा छोटासा प्रयत्न करते.
“शीलं सद्गुणसंपत्ति: ज्ञान विज्ञानमेव च
उत्साहो वर्धते येनं वाचनं तद् हितावह:।।
ज्याने शील, सद्गुण, संपत्ती, ज्ञान विज्ञान, उत्साह या सगळ्यांची वाढ होते ते वाचन हितकारी असते.
असे हे बहुगुणी वाचन आपण केले पाहिजे आणि दुसऱ्यांना प्रेरणा दिली पाहिजे.
अस्तु

— लेखन : राधा गर्दे. कोल्हापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
