Homeलेखआठवणीतील विद्यार्थी : 4

आठवणीतील विद्यार्थी : 4

“मलाच शिकवून गेलेली विद्यार्थिनी”

आपण या पूर्वीच्या भागांमध्ये विद्यार्थ्यांच्या आठवणी वाचल्यात. आज मात्र एका विद्यार्थिनीची आठवण वाचू या. ही
विद्यार्थिनी देखील अशी की, ती तिच्या सरांना पुस्तकात नसलेल्या गोष्टी शिकवून गेली आणि हे सरही असे थोर की आजही त्या विद्यार्थिनीचे ऋण जाहीरपणे मान्य करतात. अशा विद्यार्थिनीस आणि अशा सरांना विनम्र अभिवादन.
– संपादक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मी प्राध्यापक म्हणून काम करत होतो. आमच्या विभागाचं नाव होतं- आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग (Department of Lifelong learning and Extension).

विद्यापीठातील माझ्या सेवेचे ते अखेरचे दिवस होते. कोरोनाने सगळीकडं उच्छाद मांडला होता. सा-या जगाला जणू कुलूप लागलं होतं. अशा परिस्थितीत आम्हाला ऑनलाईन स्वरूपात विद्यार्थ्यांना शिकवण्याचा आदेश होता.विद्यापीठानं सुचवलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आम्ही विद्यार्थांना शिकवू लागलो. सा-या महाराष्ट्रभरातील विद्यार्थी, प्रत्येक ठिकाणच्या विजेच्या अडचणी, विद्यार्थ्यांच्या समस्या आणि वेळापत्रक यांची सांगड घालणं ही तारेवरची कसरत झाली होती.

एम्.ए. (आजीवन अध्ययन) च्या विद्यार्थांना मी वार्धक्यशास्त्र (gerontology) विषय शिकवत होतो. ‘ज्येष्ठ नागरिक: वैशिष्ट्ये आणि समस्या’ या टाॅपीकवर विविध संदर्भसाहित्य आणि सोशल मिडीयावरून मी बरीच माहिती जमवून एक दिवस तो टाॅपीक शिकवत होतो.ऑनलाईन स्वरूपातील अध्यापनात प्रत्यक्ष (face to face) शिकवण्याचा तितकासा फील येत नाही; मात्र अनुभवातून त्यातही, शिकवणे आणि चर्चा घडवून आणणे बऱ्यापैकी जमत होते.

मी ज्येष्ठ नागरिकांची वैद्यकीय आणि इतर निकषांनुसारची वैशिष्ट्यं आणि समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नावर माहिती देऊन शेवटी काही शंका किंवा सूचना असतील तर त्या विचारण्यास सांगितल.निकीता नावाच्या एका विद्यार्थीनीनं “मी काही बोलू का ?” असं विचारल्यावर मी होकार दिला.आणि ती बोलू लागली, “सर तुम्ही अनेक संदर्भ देऊन ज्येष्ठ नागरिक ही संकल्पना चांगली स्पष्ट केली. मी ग्रामीण भागात रहाते. इकडं वृद्ध माणसांना कुटुंब म्हातारा किंवा बाईला थेरडी असं टाकून बोललं जातं.बहुतेक लोक शेती करतात. नोकरी करणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके कमी असतात. पण एकदा वय झालं की, त्यांची उर्जा कमी होते आणि ते फारसे काम करू शकत नाही.आणि मग घरात ‘बिनकामाची व्यक्ति’ म्हणून त्यांना हाडहाड होते. बायकांची स्थिती तर अतिशय बिकट. अनेकजणी कोणाच्या तरी शेतावर किंवा मजूरीला जातात. मात्र त्यांना त्यामुळे घरगुती कामांपासून सवलत मिळत नाही.आणि घरातली कामं हे तर त्यांचं कामच असतं अशी सर्वांची भावना असते. विशेषत: विधवा , परित्यक्ता महिलांचे हाल तर कुत्रंही खात नाही.

वृध्दांसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. पण या त्यांना एकतर माहीतच नसतात किंवा त्यांचे लाभ कसे घ्यायचे ह्याचे त्यांना ज्ञानच नसते आणि आपल्याच कुटुंबात होणाऱ्या त्रासाविरूध्द कुणीही बोलत नाहीत कारण आपल्याच घरातल्या माणसांना अडचणीत आणण्याची कुणाचीच इच्छा नसते.अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिक ही संकल्पना कितपत खेड्यापाड्यापर्यंत पोहोचली असं म्हणता येईल ?” तिचं हे बोलणं ऐकून मी सुन्न झालो. ज्येष्ठ नागरिकांच्या खऱ्या समस्या या विषयावर तीच मला शिकवून गेली होती.

सतीश शिरसाट

— लेखन : प्रा.डाॅ.सतीश का. शिरसाठ. पुणे. ह. मु. लंडन
— संपादन : सौ अलका भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments