न्युज स्टोरी टुडे या पोर्टल ला, २२ जुलै २०२५ रोजी ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे या पोर्टल मधूनच ३ वर्षापूर्वी न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन सुरू झाले तर लवकरच, न्युज स्टोरी टुडे यू ट्यूब वाहिनी सुरू होत आहे.
अजूनही समाज माध्यमांचा वापर प्रामुख्याने करमणुकीचे साधन म्हणूनच होत असतो. पण समाज माध्यम कल्पकतेने, गांभीर्याने वापरले तर त्याचा कसा विधायक वापर होऊ शकतो याचे उदाहरण म्हणून “न्यूज स्टोरी टुडे” www.newsstorytoday.com या आंतरराष्ट्रीय मराठी पोर्टल कडे बघता येईल.
हे पोर्टल मनाला सकारात्मक आनंद देण्याचं काम करते. या पोर्टलचे वैशिष्ट्य म्हणजे पोर्टलवर, राजकारण, गुन्हेगारी, बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला जात नाही. तर मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, कला, पर्यटन, सेवा, उद्योजक विकास, यशकथा, लोक शिक्षण,वैचारिक लेखन, कविता, अनुभव कथन यांना प्रसिद्धी देऊन पोर्टल महत्वाची भूमिका बजावत आहे. केवळ प्रस्थापितांना स्थान देण्याऐवजी विविध क्षेत्रातील नवोदितांचे पोर्टल स्वागतच करत असते. त्यामुळे देश विदेशातील अभिरुची संपन्न लेखक, कवी, वाचक, विविध क्षेत्रातील व्यक्ती या पोर्टलशी जोडले गेले आहेत. या पोर्टल वर दररोज लेख, बातमी, साहित्य दिनविशेष, लेख, लेखमाला, कविता प्रसिद्ध होत असतात. आता पर्यंत १३०० हून अधिक कविता, वाचकांची असंख्य पत्रे प्रसिद्ध झाली आहेत.
पोर्टलवर आतापर्यंत २८ लेखमाला प्रसिद्ध झाल्या आहेत. तर रोज एक या प्रमाणे ६ लेखमाला सध्या सुरु आहेत. वैचारिक लेख, पुस्तक परिचय, पर्यटन, हलकं फुलकं, आठवणी, ललित, पाककला, अनुभव कथन, व्यक्ती विशेष अशी सर्व छप्पन भोगाने भरलेली थाळी, श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवावी, असा भरगच्च विचार नैवेद्य या पोर्टलवर मिळतो.
पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या काही लेखमाला पुस्तकात रूपांतरित झाल्या आहेत. उदा. समाजभूषण. लेखक : देवेंद्र भुजबळ. मराठी साता समुद्रापार, लेखिका : मेघना साने. मी, पोलीस अधिकारी, लेखिका : निवृत्त पोलिस उपअधीक्षक सुनीता नाशिककर, माझी कॅनडा – अमेरिका सफर“ लेखक निवृत्त पुराभिलेख संचालक डॉ भास्कर धाटावकर, आम्ही अधिकारी झालो” लेखक देवेंद्र भुजबळ, या प्रमुख आहेत. तर माध्यमभूषण हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे.

बदलत्या काळाची पावले ओळखून पोर्टल तर्फे पुढील उपक्रम राबविण्यात येतात.
१) स्नेहमिलन : लेखक, कवी, अन्य सर्व संबधित यांचे अनौपचारिक स्नेहमिलन, मैत्रीपूर्ण भेट हा एक आगळा वेगळा उपक्रम आहे. या स्नेहमिलनाचे वैशिष्ट्य म्हणजे ते अतिशय अनौपचारिक आणि एखाद्या लेखक, कवी यांच्या घरीच असते. इथे कुणी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सूत्र संचालक असे काहीही नसते. निखळ एकमेकांची ओळख, अनुभव, विचारांची देवाणघेवाण, गप्पागोष्टी असे लोभसवाणे स्वरूप असते.
२) सामाजिक पर्यटन : पर्यटन म्हणजे केवळ मौज मजा नाही, तर सामाजिक आशयाचे पर्यटन व्हावे, संबंधित संस्थांचे कार्य समक्ष पाहता यावे, त्यांच्या कार्यात सहभाग व्हावा, हातभार लावावा अशा हेतूने न्युज स्टोरी टुडे तर्फे आयोजित करण्यात येते.
३) आरोग्य संवर्धन : चांगले शारीरिक आणि मानसिक आरोग्य ही आनंदाची गुरुकिल्ली आहे. हे लक्षात घेऊन पोर्टलने उरळी कांचन येथील निसर्गोपचार केंद्राच्या संयुक्त विद्यमाने शिबिर आयोजित केले.
प्रकाशने : न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स तर्फे आतापर्यंत १३ पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. त्यातील काही पुस्तकांना पुरस्कार देखील मिळाले आहेत. आगामी ६ पुस्तके लवकरच येत आहेत
या पोर्टलला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील ठळक खालील प्रमाणे आहेत
१. विकास पत्रकारितेतील अत्यंत मानाचा असा राज्यस्तरीय “चौथास्तंभ पुरस्कार” तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
२. पोर्टलचे सांस्कृतिक योगदान लक्षात घेऊन “एकता पुरस्कार”
३. नवी मुंबईतील मराठी साहित्य, संस्कृती, कला मंडळातर्फे मराठी भाषा दिनी “विशेष सन्मान” करण्यात आला.
४. पोर्टल च्या निर्मात्या म्हणून सौ. अलका भुजबळ यांना “सावित्रीबाई फुले पुरस्कार“, ठाणे येथे प्रदान करण्यात आला.
५. पोर्टल चे सामाजिक योगदान म्हणून “माणुसकी सेवा गौरव पुरस्कार” नाशिक येथे प्रदान करण्यात आला.
६. पोर्टलचे साहित्यिक योगदान लक्षात घेऊन मुंबईत “सर्वद पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
७. विश्व बंधुत्वासाठी पोर्टल करीत असलेले कार्य पाहून रोटरी इंटरनॅशनल तर्फे विशेष पुरस्कार.
असे हे अनोखे पोर्टल आहे. फ्री प्रेस जर्नल जर्नल या वृत्तपत्रात प्रिंसिपल कॉरस्पॉडंट असलेल्या देवश्री भुजबळ ह्यांनी कोरोना काळात लोकांना धीर मिळावा, योग्य माहिती मिळावी, या साठी काळाची पावले व डिजिटल पत्रकारितेचे महत्व ओळखून सुरू केले. यासाठी तिने या माध्यमाचे स्वतः प्रशिक्षण घेतले.
निवृत्त माहिती संचालक तथा माजी दूरदर्शन निर्माते, माजी पत्रकार देवेंद्र भुजबळ हे या पोर्टलचे संपादन तर, त्यांच्या सहचारिणी सौ अलका भुजबळ या पोर्टलची निर्मिती करीत असतात.
“या पोर्टलला मिळालेले व मिळत असलेले यश हे सर्व लेखक, कवी, वाचक आणि पोर्टलशी जोडल्या गेलेल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांनी हम होंगे कामयाब म्हणावं त्याचं जणू प्रतीकच आहे” यात फोटो छान आकर्षण असतात. अंक त्याला साजेसे फोटोसह छान दिसतो.
फक्त पाच वर्षात’ अशा नावाने पोर्टल बद्दल लिहायला तर सुरुवात केली. पण अजून पुढे विचार करत काळ गेला. कारण शब्दात पकडता यावे असं छोटस त्यांचं काम नाही. शब्दांच्याही पलीकडे अवकाश व्यापुन राहील, अशी त्यांची ही गुणवत्ता आहे. हे पोर्टल आणि त्यातील मजकूर, ते चालवणाऱ्या व्यक्ती यांच्याकडे बघून सुद्धा, बरच काही शिकता येतं. आपण या दोघांकडून आदर्श घेऊ शकतो. अलकाताई एका असाध्य आजारातून बऱ्या झाल्या असून अतिशय आनंदी आणि सकारात्मक आहेत. या कुटुंबात यांची कन्या “मा बाप से बेटी सवाई” इतकं छान काम करते.
देवेंद्र भुजबळ सर सर्वसामान्य माणसांना देखील प्रेरणा देत असतात, मार्गदर्शन करत असतात. या पोर्टलने केवळ पाच वर्षात एवढी प्रगती केली आहे. हे पोर्टल १०० वर्षे चालू राहो या शुभेच्छांसह !

— लेखन : शुभांगी पासेबंद. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800