Homeलेखललित

ललित

“आकाशाच्या दर्पणात”

माझ्या खोलीला एक मोठीशी खिडकी आहे. इथुन एक आकाशाचा तुकडा मला छान दिसतो. ते माझे स्वत:चे आकाश आहे. एखाद्या आरशात बघावे तसे मी त्या आकाश दर्पणात जमेल तेव्हा निरखून बघत रहाते. छंदच आहे माझा तो. तास न् तास मी खुर्चीत बसुन हा आनंद केव्हाही झुंजूमुंजू पहाटे, प्रसन्न सकाळी, माध्यान्ही, सांजसमयी, रात्री, मध्यरात्री चांदणरात्री अशी केव्हाही निरखत मजेत वेळ घालवते.

आज मी छान सर्व आटपून बसले आहे. रात्र काजळ पैंजण लेऊन नटत मुरडत वेशीवर मग गावावर ऊतरते. अलगद गावाला कुशीत घेऊन अंधारात गुडूप करते. गावगाडा थांबतोच. ऊद्याच्या नव्या आशेत शांतपणे झोपेच्या आधिन होतो. त्याही काळोखात आभाळातुन एका रांगेत काही आवाज करत शुभ्र बगळ्यांची माळ घरी परतत असते. एखादी चुकार टिटवी ओरडत जाते. कूठे दूरवर हट्टी कूत्रा एका सुरात भूंकत रहातो. असे बारिक सारिक ओळखीचे आवाज तर सहज ऐकू येतात.अलगद् वारा शांत होत सुस्तावतो. तरूवेली स्तब्ध होतात. जमिनीवरच्या चांदण्यात झाडांच्या फांद्यांची सावल्यांची नक्षी स्थीर होते. नदीच्या लाटांचा धीर गंभीर आवाज येत राहातो. कमालीची नि:स्तब्धता, निरवता, शांतता पसरलेली असते. मनाची तंद्री लागते. मनही त्या निरवतेचा अनुभव घेण्यात दर्पणात दंग होते. भानावर येते तेव्हा आकाशात रजनी चा कारभार चालू होतो. चांदण्यांचा गालिचा पसरतो. एकेक नक्षत्रांचे दिवे प्रकाशायला लागतात. तारका व त्यांचा सखा यांचा खेळ मांडलेला असतो. ढगाआड मधेच चांदवा लपतो, आणि तारकांची धांदल ऊडते त्याला शोधायला. ढग पांगल्यावर पुन्हा चांदण चूरा सांडायला सुरवात होते. चांदणं पिऊन तृप्त झालेला इवलूसा चकोर आनंदात आभाळात विहरत रहातो. समोरच्या मोठ्या वृक्षावर काजव्यांच्या दिपमाळा चमकायला लागतात. शुभ्र जाई जुई, मोगरा, अनंत दृष्ट लागेल अशी अर्धवट ऊमलत लोभस दिसतात. सुगंधाचा नुसता घमघमाट सुटतो.

माझ्या आकाशाच्या दर्पणात असे वेगवेगळे आवाज, सुगंध, रंग सुद्धा छान मनाला भुरळ पाडतात. पक्षांचा किलबिलाट बिलकूल नसतो कारण दिवसभर थकलेली पांखरे घरट्यात विसावलेली असतात.
समोर जलाशयात थोडी खळबळ होते. चांदण्यात एक डौलदार देखणी जलक्रिडेत रमलेली शुभ्र हंसांची जोडी तोंडाने विचित्र आवाज करत मोठ्या दिमाखात पुढे येते. अतिशय मोहक पुन्हा पुन्हा बघत रहावे असं ते देखणं सौंदर्य असते. मनसोक्त जलक्रिडा करण्यात ते मशगुल होतात.

समोर रस्त्याच्या दोन्ही बाजूला रातराणीचे ताटवे बहरलेले दिसतात. रातराणीच्या सुगंधाने नवथर मनात शृंगाराचा मनमोर थुई थुई नाचत असेल असं ऊगाचच वाटुन जाते.

क्षितिजावर दशमीची कोर स्थिरावते आणि तारका दले एकत्र होऊ लागतात. खेळ खेळुन दमलेल्या तारका झोपाळायला लागतात पण त्यांनाही चांदरातीच्या स्वप्ननगरीत जायचं असतं. हळूहळू दंवाची शाल आकाशात पसरू लागते. एकेक नक्षत्रांचे दिवे विझायला लागतात. तारकादले स्वप्ननगरीत ऊतरतात, तारकांचा सखा चांदोबा झोपायला जातो. चांदणे धुसर धुसर होऊ लागते. इतक्यात एक गंमतीचे दृष्य दिसते. चमकणार्या टपोर दंवबिंदुंच्या माळा आकाशातुन खाली तरू वेलींवर, जलाशयावर, जमिनीवर गवतात, पानोपानी फुलांवर ऊतरतात व लोंबकळतच झोपी जातात. समोरच्या जंगली पायवाटेवरून हरणांचा कळप वेगात दौडत जातो.
इतकावेळ नाद करणारे खुळे भुंगे कमलदल मिटताच आत अडकले जातात. पाण्याच्या कडेने कूठूनशी एक बदकांची रांग क्व्ॅक क्वॅक करत पाण्यात शिरते.अंधार आपल्या गावाला निघतो. वर शुक्राची चांदणी चमकायला लागते आणि दंवाने आकाशाच्या दर्पणी वेगळेच सुंदर दृष्य दिसू लागते. आकाशीचा चित्रकार आता वेगळ्याच सुंदर दृष्याचे रंग माझ्या आकाशात भरू लागतो व माझ्या आकाशीच्या दर्पणी आरस्पानी झुंजूमुंजू पहाटेचे दृष्य रेखाटायला लागतो.

— लेखन : अनुराधा जोशी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments