यंदा पावसाचे आगमन लांबणार असून एकूण पर्जन्यमानही कमी राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त केली जात आहे. हा केवळ हवामानाचा साधा बदल नसून पर्यावरणातील मोठ्या असंतुलनाचे संकेत मानले जात आहेत.
देशभरातील सगळ्यात जास्त तापमान 47 डिग्री हे महाराष्ट्रातील अकोल्यात नोंदवले गेले आहे. इतर जिल्ह्यातही परिस्थिती काही वेगळी नाही. उन्हाळ्याचे चटके सगळ्यांनाच प्रकर्षाने जाणवत आहेत. एप्रिल महिन्यात उन्हाचा एवढा तडाखा तर मे आणि जून मध्ये काय अवस्था असेल ?
निसर्गाच्या या बदलत्या चक्राचा परिणाम केवळ हवामानापुरता मर्यादित राहत नाही, तर तो शेती, पाणीव्यवस्था, अर्थकारण आणि सर्वसामान्यांच्या जीवनावर खोलवर परिणाम करणारा ठरतो.

भारत हा शेतीप्रधान देश असल्याने पावसावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. पाऊस उशिरा येणे किंवा कमी पडणे याचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनावर होतो. पेरण्या उशिरा होतात, काही ठिकाणी पिके करपतात, तर काही भागात शेतकरी पर्यायी पिकांकडे वळण्यास भाग पडतो. त्याचा थेट परिणाम अन्नधान्याच्या उत्पादनात घट होऊन महागाई वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. ग्रामीण अर्थव्यवस्था डळमळीत होण्याची ही गंभीर बाब आहे. तसेच कडक उन्हाळ्यामुळे कामगार आणि रोजनदार यांच्या उत्पादकतेवर थेट परिणाम होऊन हजारो करोडोंचं नुकसान संभावित आहे.
पावसाच्या या अनिश्चिततेमागे जागतिक हवामानातील बदलही मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत. विशेषतः *एल निनो* आणि *ला निना* हे नैसर्गिक चक्र असून या घटकांचा प्रभाव भारतीय मान्सूनवर पडतो. एल निनोच्या प्रभावाने समुद्राच्या तापमानात वाढ होऊन पावसाचे प्रमाण घटते, तर ला निनाच्या काळात पाऊस वाढण्याची शक्यता असते. मात्र अलीकडील काळात या चक्रांमध्येही अनियमितता दिसून येत आहे,त्याला महत्त्वाचे कारण म्हणजे हवामान बदल, निसर्ग चक्रात मानवी हस्तक्षेप, जंगल तोड, प्रदूषण ज्यामुळे हवामानाचे अचूक भाकीत करणे अधिक कठीण होत चालले आहे. अमेरिकन क्लायमेट प्रोटेक्शन सेंटरने यावर्षी *मेघा एल निनो* चा प्रभाव असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आगीत तेल टाकण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे.त्याचा परिणाम म्हणजे यंदाचा उन्हाळा विशेषतः तीव्र जाणवत आहे. वाढते तापमान, उष्णतेच्या लाटा आणि दीर्घकाळ टिकणारी कोरडी हवा यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. याचा परिणाम जलस्रोतांवर होत असून विहिरी, तलाव आणि धरणांतील पाणीसाठा कमी होतो आहे. तसेच, प्रचंड उष्णतेमुळे मानवी आरोग्यावरही परिणाम होत असून उष्माघात, निर्जलीकरण यांसारख्या समस्या वाढत आहेत.

पर्यावरणातील या बदलांचे दुष्परिणाम दीर्घकालीन असू शकतात. जैवविविधतेवर त्याचा परिणाम होऊन अनेक वनस्पती आणि प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. जलसंकट तीव्र होण्याची शक्यता आहे. शहरी भागात पाणीटंचाई, तर ग्रामीण भागात शेती संकट अशा दुहेरी समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
या पार्श्वभूमीवर, पर्यावरणाचे संतुलन राखणे ही काळाची गरज बनली आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन, वृक्षारोपण, शाश्वत शेती पद्धती आणि पर्यावरणपूरक जीवनशैली यांचा अवलंब केल्याशिवाय या संकटावर मात करणे शक्य नाही. निसर्ग आपल्याला सतत इशारे देत आहे. आता त्याकडे दुर्लक्ष करणे आपल्यासाठी घातक ठरू शकते.

— लेखन : सुधीर थोरवे. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
