Friday, July 4, 2025
HomeUncategorizedलोक काय म्हणतील?

लोक काय म्हणतील?

लोक काय म्हणतील ? ह्या पडलेल्या प्रश्नामुळे जगायचे राहून जाते आणि जीवनाचा खरा आनंद शोधण्यात आयुष्य निघून जाते. बऱ्याच लोकांना असे वाटते की सुखी व आनंदी आयुष्य जगण्यासाठी खूप पैसा,गाडी,बंगला व सर्व सुख सोयी पाहिजे .त्यामुळे ते मिळवण्यासाठी तो खूप कष्ट करतो . मात्र हे सर्व मिळाल्यावर देखील तो सुखी व समाधानी नसतो . त्याला सतत कोणती न कोणती चिंता असते. सतत कामाचे टेन्शन असते. कारण एकच, त्याच्या अपेक्षा कधीच संपत नाही. त्याचा लोभ कधीच संपत नाही.

Click here to read शांताबाईंच्या मनःपटलावरलं चांदणं!..

आज लहान गाडी असली तर उद्या मोठी हवी असते. आज हा बंगला विकून नवीन बंगला घ्यायचा असतो. म्हणजे रोज नवीन अपेक्षा. मात्र त्याच्या हे लक्षात येत नाही की, सतत कामाच्या व्यापात असल्यामुळे तो कुटुंबासाठी, मैत्रीसाठी व नातेवाईकांसाठी कधीही वेळ देत नाही. त्यामुळे ही सर्व जिवाभावाची व रक्ताची नाती दुरावतात. हे त्याच्या लक्षात येत नाही . जेव्हा येते तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते. तो काही करू शकत नाही. अनेक कौटुंबिक कार्यक्रम असतात. सण समारंभ असतात .मात्र ही व्यक्ती त्या कशात ही सहभागी होत नाही.त्याला हे लक्षात येत नाही की खरा आनंद तर ह्या सर्व लहान लहान गोष्टीमंध्येच तर असतो. ती दंगामस्ती ,ती नाचगाणी , ते हसने ते रागावणे,रात्री जागुन रंगलेल्या त्या गप्पा गोष्टी,ते चिडणे ते चिडवणे,चेष्टा मस्करी करणे ती अंताक्षरी खेळणे !

आनंदी आयुष्य जगण्यासाठी स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. आपल्या मनाला पटेल त्या गोष्टी करायला पाहिजेत.मित्र मैत्रिणी खऱ्या अर्थाने आयुष्य सुंदर बनवतात. कारण हे एकमेव असे नाते आहे जेथे अपेक्षांचे ओझे नसते. बिनधास्त मनमोकळे पणाने जगता येते . वेडेपणा ही करता येतो. लहान होऊन बागडता येते .निरागस आयुष्य जगता येते. कोणतेही नियम अथवा अटी तटी नसतात. त्यामुळे आपल्या मैत्रीत वावरताना कोणत्याही गोष्टीची चिंता नसते. आयुष्याचा आनंद घेताना अनेक लहान गोष्टी करताना जसे की मी नाचले तर ? मी दंगा मस्ती केली तर ? मी जीन्स टॉप घातला तर ? लोक काय म्हणतील ! माझ्या वयाला हे शोभेल का असे प्रश्न पडत असतील तर ते लगेच पुसून टाकावे .कारण लोक असे ही बोलतात व तसे ही बोलतात. त्यामुळे ह्या गोष्टीकडे लक्ष न दिलेले केव्हाही चांगले.

लोक काय म्हणतील ? ह्या गोष्टींचा विचार केवळ वाईट कृत्य करताना केला पाहिजे. जसे की चोरी करणे,कोणाला फसवणे,एखाद्या व्यक्तीच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणे, पैश्यासाठी खून करणे,अत्याचार करणे,भ्रष्टाचार करणे,दंगे करणे, गुंडगिरी करणे अश्या अनेक चुकीच्या गोष्टी ज्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल, मन दुखावले जाईल, आयुष्य उध्वस्त होईल,अशावेळी मात्र लोक काय म्हणतील ? याचा अवश्य विचार केला पाहिजे. कारण सत्य कधीही लपत नाही. ते आज न उद्या सर्वानाच कळते. ते उघडकीस येतेच.

Click here to read IAS: दोन सख्खे भाऊ झाले आयएएस! एक आदर्श उदाहरण

आजकाल मनुष्य एवढा स्वार्थी व लोभी होत चालला आहे की त्याला ह्या चुकीच्या गोष्टी करताना जरा ही वाईट वाटत नाही . त्याची खंत नसते. अथवा त्याचा पस्तावाही नसतो. खरे तर लाभलेले हे सुंदर आयुष्य म्हणजे परमेश्वराने दिलेली एक संधी आहे .एक पर्वणी आहे .ते कसे जगावे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. मनुष्याचा स्वभावच असतो जो त्याला अनेकांशी जोडून ठेवतो. चांगल्या गोष्टी करताना आयुष्याचा आनंद घेताना लोक काय म्हणतील ? हा प्रश्न महत्वाचा नसतो. जर एखादं मस्त गाणे लागले आहे आणि तुम्हाला मनापासून नाचावे वाटते , मात्र लोक काय म्हणतील ? ह्या विचाराने आपले मन मारतो. कारण दुसरे कोणीच नाचत नाही .मग मीच एकटा कसा नाचू ? त्यामुळे आपण गप्प बसतो.

असे आयुष्यात अनेक प्रसंग येतात. जेव्हा इच्छा असून देखील मन मारावे लागते. खरे तर जीवनाचा आनंद घेणे हे सर्वांनाच जमते असे नाही .आणि ज्याला ते जमते त्याचे आयुष्य खूप सुंदर असते. तो मनुष्य कायम उत्साही व दिलखुलास असतो .कारण ती व्यक्ती प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घेते. त्यांना हे माहीत असते की तो क्षण पुन्हा येणार नाही.ती व्यक्ती वर्तमानात जगते .कायम खुश असते. दंगा मस्ती करते. आयुष्य खर्रखऱ्या अर्थाने जगते. अशी व्यक्ती सर्वांनाच हवीहवीशी वाटते. कारण तिच्या असण्याने वातावरण नेहमीच हसते खेळते असते . म्हणजे अश्या व्यक्तीच्या आयुष्यात काही अडचणी नाहीत असे नाही तर ते अडचणींशी धैर्याने सामना करतात. त्याचा बाऊ करत नाही. त्याचे हास्य त्याच्या सुखी व आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली आहे.त्याच्या जगण्यात जिवंतपणा असतो .ते दिलखुलासपणे जगतात. मरण हे अटळ सत्य आहे .ते आज न उद्या येणारच. मग आजचा दिवस उद्यासाठी का वाया घालवायचा ? आलेला दिवस, आलेला प्रत्येक क्षण मस्त जगता आला पाहिजे नाही का ?

Click here to read भरारीच्या लता गुठे

आयुष्याच्या शेवटी आपण जेव्हा थकलेले असतो ,शरीर साथ देत नाही , अनेक आजार मागे लागतात व आपले मरण आता स्पष्ट दिसू लागते तेव्हा असे वाटत कामा नये की मी हे केले नाही,अमुक गोष्ट करण्याची राहून गेली , माझे जगायचे राहूनच गेले व आज हे करू उद्या करू असे म्हणता म्हणता आयुष्याच निघून गेले व ते मला कळलेस नाही ! कारण मी फक्त लोक काय म्हणतील ? ह्या एकाच गोष्टीचा फार विचार केला.थोडा वेळ स्वतःसाठी , आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी आवर्जून दिला पाहिजे. किमान आठवड्यातील एक दिवस आपल्या कुटुंबासाठी , आपल्या मुलांसाठी दिला पाहिजे.कधीतरी एखादी लहान मोठी सहल आपल्या परिवाराबरोबर , आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर आवर्जून आखली पाहिजे .त्यामुळे आयुष्यात थोडा वेगळेपणा मिळेल . एक सकारात्मक ऊर्जा मिळेल .ते दिवस नक्कीच तुमच्या आठवणीतील असतील ह्यात शंका नाही. श्रुष्टीने आपल्याला अनेक गोष्टी दिल्या आहेत. सुंदर निसर्ग निर्माण केला आहे. जोपर्यंत शरीर साथ देईल तोपर्यंत त्या गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे . नाहीतर उद्या असे होईल की तुमच्याकडे भरपूर पैसे व वेळ आहे मात्र जीव लावणारी माणसे जवळ नाही ! आपला जोडीदार नाही व तुम्हीही आता थकलेले आहेत तर मग काय उपयोग ह्या सर्व सुख सोईचा ज्याचा उपभोग तुम्ही घेऊ शकत नाही.एखादा चित्रपट अथवा नाटक बघून तुम्हाला आनंद होत असेल तर आवर्जून पहा. माझा वेळ वाया गेला असे न म्हणता आपण स्वतःसाठी थोडा वेळ दिला असे म्हणा. आज थोडे शांत बसून विचार करा मी जीवन जगलो का ? मी आयुष्यात आनंद घेतला का ? ह्याचे उत्तर प्रामाणिकपणे स्वतःलाच द्या . उत्तर नाही असे असेल तर आज पासून, ह्या क्षणापासून स्वतःसाठी जगा. आपला आनंद कशात आहे ह्याचा शोध घ्या . हसा, नाचा,मजा करा. छंद जोपासा. एखाद्या व्यक्ती बरोबर बोलून त्याच्याशी गप्पा मारून तुम्ही आनंदी होत असेल तर जरूर बोला. एकमेकांना वेळ द्या .आपली कामे व जबाबदारी चोख पार पाडा . मात्र हे करताना स्वतःसाठी देखील जगा .कारण हा जन्म पुन्हा नाही. आजचा दिवस आपला आहे . उद्या कधीही येत नाही. त्यामुळे वर्तमानात रहा व जगा.

खरे तर आयुष्य जगणे ही देखील एक कलाच असते हे ज्याला जमते तो ह्या जगातील सर्वात सुखी मनुष्य असतो. प्रत्येक वेळी डोक्याने विचार करण्यापेक्षा कधीतरी मनाचेही ऐकले पाहिजे.
आयुष्य आहे किती हो सुंदर,
ते भरभरून जगू यात,
दुसऱ्याच्या आनंदात आनंदी होऊन,
आपण ही जगायला शिकू या ,
आयुष्य आहे एक संधी,
त्याचं सोन करू या,
आयुष्य आहे किती हो सुंदर ,
ते भरभरून जगू या !

लेखन : रश्मी हेडे.
संपादन : देवेंद्र भुजबळ.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. उत्तम विचार 👌👌🙏🙏
    अगदी बरोबर आणि खर आहे.
    वेळोवेळी जसं आहे तसं जगुन घ्यावे.
    पुन्हा संधी मिळेल न मिळेल जिवण एकदा च मिळत.
    🙏🙏🌹🌹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments