१०६ वर्षिय एम. पप्पम्मल यांचा भारत सरकारने २०२१ मध्ये सेंद्रिय शेतीतील त्यांच्या कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरव केला, तेव्हां केवळ कुटुंबियच नव्हे तर सारे गावकरी उल्हसित झाले.
एम. पप्पम्मल उर्फ रंगम्मल यांचा जन्म १९१४ मध्ये देवरायपुरम गांवात वेलम्मल आणि मरुथचला मुदलियार यांच्यापोटी झाला. लहान वयातच तिने आई-वडील गमावले आणि तिचे आणि तिच्या दोन बहिणींचे पालनपोषण कोइम्बतूर येथील थेक्कमपट्टी येथे त्यांच्या आजीने केले.
त्या काळांत गावांत शाळा नव्हती. Pallanghuzi या पारंपरिक खेळांतून गणित शिकले तेव्हढेच. त्याकाळी जर एखाद्याने पाचवीपर्यंत शिक्षण घेतले तर ते स्वतः शिक्षक बनण्यास पात्र बनत.
जवळपास पन्नास वर्षांपूर्वी तिच्या आजीच्या मृत्यूनंतर, तिला थेक्कमपट्टीमध्ये एक लहान दुकान वारसा हक्काने मिळाले. तिथें तिने स्नॅक्स आणि शीतपेये विक्री करण्याचे एक छोटेसे भोजनालय सुरू केले.
पण लहानपणापासूनच तिला शेती व्यवसायात रस होता, त्यामुळे या व्यवसायातून झालेल्या नफ्यातून तिने गांवात जवळपास 10 एकर जमीन खरेदी केली. पप्पम्मलने मका, विविध प्रकारच्या कडधान्ये आणि काही फळे आणि भाज्यांची लागवड करून सुरुवात केली जी कुटुंबाच्या दैनंदिन जीवनासाठी उपयोगी पडू लागली.
तिने आपल्या बहिणीच्या मुलांनाही वाढवले. कुठेतरी, औपचारिकपणे शिकण्यासाठी तिने तामिळनाडू कृषी विद्यापीठात (TNAU) प्रवेश घेतला. तिने कॉलेजमध्ये कोणत्या वर्षी प्रवेश घेतला असे विचारले असता, आज १०५ वर्षांची असलेल्या पप्पम्मल सांगतात की ते खूप पूर्वीचे आहे आणि त्या वर्षाचा तपशील आठवत नाही. परंतु एक विद्यार्थी म्हणून नेहमी प्रश्न विचारीत हे सांगतांना त्या हसून म्हणतात, ‘मला एकही वर्ग किंवा सत्र आठवत नाही ज्यात मी प्रश्न विचारला नाही आणि लवकरच प्रत्येकजण मला ओळखू लागला आणि माझ्या जिज्ञासावृत्तीचे कौतुकच केले गेले.’
मिळालेल्या ज्ञानाचा शेतीसाठी उपयोग करीत पप्पम्मल एक यशस्वी शेतकरी बनली. त्यानंतरच्या दशकांमध्ये, विद्यापीठात पदभार स्वीकारणारा कोणीही कुलगुरू पपम्मल यांना ‘Pioneer farmer’ म्हणून संबोधित करत असे आणि विद्यापीठाने आयोजित केलेल्या वादविवादांमध्येही त्यांना आवर्जून आमंत्रण असे. त्या त्याच्या अनेक शेतकरी सभांना एकट्याच फिरायच्या आणि शिकलेल्या सर्व गोष्टी अंमलात आणायच्या.
अशाच एका बैठकीत पप्पम्मल यांनी ‘सेंद्रिय शेती’ हा शब्द प्रथमच ऐकला. त्या सांगतात, “आम्ही आमच्या पिकांवर वापरलेली सर्व रसायने मातीसाठी आणि ग्राहकांसाठी हानिकारक आहेत हे मला समजले. आणि लगेचच सेंद्रिय शेतीचा प्रयोग करण्यास सुरुवात केली.” त्यांच्या पद्धतींना लवकरच लोकप्रियता मिळाली आणि विद्यापीठाने त्यांच्याकडून शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या गांवात फील्ड व्हिजिटवर पाठवण्यास सुरुवात केली. विद्यापीठाने त्यांना ‘व्हिलेज स्टे प्रोग्राम’ मध्ये सामील करून घेतले.
पप्पम्मल यांनीही विद्यापीठाने शिफारस केलेल्या शेतांना भेट दिली. ते तिला एक आठवडा आधी पत्र पाठवित आणि त्या बसने नियोजित ठिकाणी दाखल होत. अशाप्रकारे, पप्पम्मल यांनी या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट व्यक्तींकडून मार्गदर्शन तर मिळविलेच पण त्यांच्या अनुभवाच्या गोष्टी, कसब त्यांना देखिल सांगितले. “शेतकऱ्यांच्या भेटींसाठी त्यांनी अनेक शहरांमध्ये प्रवास केला आहे,” हे सर्व करणाऱ्या त्या एकमेव महिला शेतकरी होत्या.
लवकरच, एक ठाम स्वर असलेली साडी नेसलेली महिला स्थानिक सेलिब्रिटी बनली. ‘तिला कसलीच भीती नव्हती’ त्यांचा नातू बालसुब्रमण्यम म्हणतात, “तिने अनेक मिटींग्समध्ये कोणत्याही अधिकार्याकडे जाण्याचा दोनदा विचार केला नाही,” ते पुढे म्हणाले, “ती पुढे चालत जाई, त्याच्या कुटुंबाची आणि गावाची चौकशी करी आणि तिला जे काही करायचे आहे ते पूर्ण करे.”
खेडोपाडी लोक शेतीसाठी त्यांचे मार्गदर्शन घेऊ लागले. हे व्रत अव्याहतपणे सुमारे ७० वर्षे त्या चालवित आहेत. आता तर केवळ त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून दूरवरून लोक येतात.
१९५८ मध्ये तामिळनाडूने पंचायत कायदा स्वीकारल्यानंतर निवडणुका घेण्यात आल्या होत्या आणि पप्पम्मल १९५९ मध्ये थेक्कमपट्टी पंचायतीचे नगरसेवक म्हणून निवडून आल्या.
एका दशकापूर्वी पपम्मलच्या पतिस देवाज्ञा झाली. त्यांना तीन मुली, तीन नातवंडे, दोन पतवंडे आहेत आणि त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांसह त्या रहातात. जमिनीचा एक मोठा भाग विकावा लागला, पण २.५ एकर जमीन राखून ठेवली. जेव्हा आजची पिढी वयाच्या ५० व्या वर्षी निवृत्त होण्याचा विचार करत आहे, तेव्हां ज्यांचा नातूही ५० वर्षे वयाचा आहे !
१०७ वर्षांच्या पपम्मल यांचा दिवस आजही पहाटे ५:३० वाजता सुरू होतो. सकाळी ६ वाजता त्या शेतात जाऊन दुपारपर्यंत काम करतात. खाण्याच्या सवयी आणि सक्रिय जीवनशैलीमुळे आपण निरोगी आहोत असे त्यांना वाटते. ‘वयाचे काय ? मी शांत बसूच शकत नाही ‘ ….हसत हसत त्या म्हणतात. दीर्घायुष्याचे रहस्य विचारल्यावर, ‘रहस्य वगैरे काही नाही. पहाटे ४ पासून अखंड काम, नाचणी, थिनाई आणि समई यांसारखी धान्ये पाण्यात शिजवून त्यात दही किंवा ताक मिसळून कुरकुरीत कांदे व हिरव्या मिरच्या घालून खायचे. कोणतीही रसायने वापरायची नाहीत. मी कडुलिंबाच्या डहाळ्यांनी माझे दात घासते आणि स्वच्छतेसाठी साबणाऐवजी दगड ! आणि वयाची फिकीरच केली नाही. सवयीने जाग येतेच आणि शेती हेच माझे सर्वस्व. तिथे सकाळी जाऊन काम करण्यातच मला आनंद मिळतो.’
पद्मश्री जाहीर झाल्यावर काय वाटले विचारल्यावर, “मी एक सर्वसामान्य स्त्री, हे स्वप्नासारखे वाटत आहे असे सांगून हसत म्हणाल्या, काल ३० इंटरव्ह्यू दिले.” कायम शेतावर आयुष्य घालविणाऱ्या पपम्मल, कॅमेरासमोर उभे राहून विविध चॅनेल्स, पत्रकार यांना सहजपणे मुलाखती देत, मधेच फोनवर अभिनंदन, मुलाखतीसाठी आमंत्रण स्विकारत होत्या.
हे ऐकल्यावर / पाहिल्यावर मनांत प्रचंड कौतुक दाटल्याशिवाय रहात नाही आणि गेल्या शतकांतील महान, प्रेरणादायी व्यक्तींमधे आपण त्यांच्या नांवाची नोंद करतो !’

– लेखन : नीला बर्वे. सिंगापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
खुप छान माहिती. थॅक्स नीला
खूप छान 👌👍👍🙏🙏🙏,उद्बोधक ,प्रेरणादायी 🙏🙏🙏
खूप छान लिहिले आहे.
जे माहित नव्हते ते आज आपण सर्वासमोर मांडले आहे.
लेखिकेला धन्यवाद. 🙏🙏👌🌹🌹