Wednesday, November 26, 2025
Homeलेखवाढत्या आत्महत्या : चिंतेचा विषय

वाढत्या आत्महत्या : चिंतेचा विषय

“वाढत्या आत्महत्या : या “शिक्षणा”चा काय उपयोग ?” हा श्री देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेला चिंतनपर लेख आपल्या पोर्टल वर 13 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.
याच अनुषंगाने माजी कुलगुरू प्रा डॉ विजय पांढरीपांडे यांनी मांडलेले विचार पुढे देत आहे.
— संपादक

तरुण वर्गात आत्महत्येचे वाढत चाललेले प्रमाण हा सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे.अगदी शाळेतील मुलेमुली देखील क्षुल्लक कारणावरून आत्महत्येचे टोकाचे पाऊल गाठताना दिसतात.तरुण स्त्रियांमध्ये लैंगिक अत्याचार, मानसिक छळ,अशी कारणे दिसून येतात.पुरुषी बळाचा वापर अजूनही थांबलेला नाही.स्त्री पुरुष समानता म्हणावी त्या प्रमाणात समाजात रुजलेली नाही. शिक्षणाने कुणी संस्कारित, विचारी,विवेकी झाल्याचे दिसत नाही.उलट माणसाची जुनी पूर्वकालीन राक्षसी मनोवृत्ती बळावत चाललेली दिसते. पूर्वी आध्यात्मिक संस्काराचा थोडाफार पगडा होता.आता तोही राहिला नाही.पाश्चात्य देशात योग,अध्यात्म याकडे लोक वळताना दिसतात.उलट आपण मात्र अधिकाधिक पाश्चात्य संस्कृतीच्या नादी लागत चाललो आहोत.
तंत्रज्ञानाचा अती वापर आपल्याला अधिकाधिक आळशी, अविचारी, अविवेकी बनवतो आहे. चांगले वाईट याची विवेकी जाण लोप पावते आहे. माहितीच्या धबधब्यात चिंब भिजलेला जीव आतून मात्र कोरडा आहे !

आधुनिकतेच्या वाहत्या प्रवाहात नाका तोंडात पाणी जाईपर्यंत आकंठ बुडत चाललेली आधुनिक पिढी आपले मूळ सत्व गमावून बसली आहे.कुणाचा कुणाला धाक राहिला नाही.आपल्या चांगल्या वाईट वागण्याचे काय भले बुरे परिणाम होतील याची भीती राहिली नाही. शिवाय वेगवेगळ्या कारणाने ताण वाढतो आहे तो वेगळाच. भविष्याविषयी संभ्रम, अनिश्चितता ही कारणेही सोबतीला आहेतच. पाल्य, पालकत्व या संबंधातले अंतर काळाबरोबर वाढते आहे. कुटुंब संस्था पूर्वीसारखी एकसंघ राहिली नाही. एका पिढीचे दुसऱ्या पिढीशी काही देणेघेणे नाही इतका दुरावा वाढला आहे.

लग्न संस्थेबद्दल तर बोलायलाच नको.लग्न कशासाठी करायचे,त्याची गरजच काय असे प्रश्न नव्या पिढीकडून सर्रास विचारले जातात. अन् अशा प्रश्नाची समाधान कारक उत्तरं पोक्त, वयस्क मंडळीकडे नसतात.

तारुण्य सुलभ भावना तर वय विसरून वेळे आधीच उमलायला लागल्या आहेत. दहा बारा वर्षाच्या मुलीला आज सर्व काही कळते. प्रेम, डेटिंग, फ्लरटिंग, सेक्स असे सारे काही नको त्या वयातच माहिती झाले आहे. सगळे काही उघड्यावर दिसते आहे. कुणाला काही लपवून ठेवण्याचीही गरज वाटत नाही. सगळे काही स्वाभाविक, नैसर्गिक असल्यासारखे खुल्लम खुला चालले आहे.
स्वाभाविकच अशा परिस्थितीत मनासारखे काही घडले नाही तर धक्का बसतो. दिशाहीन भरकटकलेल्या अवस्थेत मनाची चलबिचल होते.अनपेक्षित नैराश्य आले की अस्वस्थता, मनाची बेचैनी वाढते. कुणाजवळ काय बोलायचे, कुणाला काय सांगायचे हे कळेनासे होते. मग अशा वेळी आत्महत्येचे पाऊल उचलले जाते. प्रकरणात एका ऐवजी दोन व्यक्ती असल्या तर एक दुसऱ्याच्या मनस्तापाला, नैराश्याला कारणीभूत होतो.

अशा वेळी आत्महत्या की हत्या असेही प्रश्न निर्माण होतात. अशा प्रकरणाचा तपास करणे, छडा लावणे सोपे नसते. खरे माहिती असले तरी सांगायचे नसते. इज्जत का सवाल असतो. कुटुंबाची प्रतिष्ठा आड येते. काही बाबतीत संबंधित मुले मुली बड्या धेंडाची असली तर राजकीय दबाव देखील असतो. अर्थात आता तर न्याय विकत घेता येतो.निर्णय हवा तसा फिरवला जातो.सगळा पैशाचा खेळ असतो. त्यामुळे शेवट पर्यंत वर्षानुवर्षे हत्या की आत्महत्या हे कळतच नाही. नेमके काय झाले, कसे झाले, का झाले या प्रश्नाची खरी उत्तरं मिळतच नाहीत. नेमकी कारणे बाहेर येत नाही. नेमके समस्येचे स्वरूप कळतच नाही. मग उपाय शोधायचा कसा.अभ्यास, विश्लेषण करायचे कसे ? या सामाजिक समस्येत सगळीच गोची आहे.

एकूणच प्रकरण वाटते तितके सोपे राहिले नाही आता. ही वस्तुस्थिती आहे. मग करायचे काय ? डोळे मिटून आहे ते चालू द्यायचे ? उपाय नाही म्हणून हताश होऊन हात झटकून स्वस्थ बसायचे ? याचा अर्थ असा होतो की एकीकडे आपण प्रगती, विकासाच्या, समाज सुधारणेच्या गोष्टी करतो. राजकारणी पक्षही हीच भाषा बोलतात.विकासाला मते द्या ? कशाचा विकास ? कुणाचा विकास ? मोठमोठ्या गगन चुंबी सिमेंटच्या इमारती, महामार्ग, फ्लायओव्हर, रेल्वेचे, मेट्रोचे जाळे म्हणजे विकास? माणूस आतून खचत चाललाय, खंगत चाललाय, पोकळ होत चाललाय,त्याचे काय? आपण मानसिकदृष्ट्या दुबळे होत चाललो आहोत.

आपले आपल्यावर नियंत्रण राहिले नाही, आपण चांगले वाईट याची पारख करण्याची दृष्टी गमावून बसलो..म्हणून आपले नियंत्रण ढासळते. म्हणून आपला मानसिक तोल ढासळतो.म्हणून आत्महत्या होतात. संवाद हरवला आहे. पूर्वीसारखी मैत्री राहिली नाही. एकमेकावर विश्वास राहिला नाही. स्वार्थ बोकाळला आहे. मी, माझे, एवढीच विचाराची त्रिज्या.कुपमंडुक वृत्ती. आपण इथपर्यंत आलो ते सहकार भावनेने, एकमेकाच्या मदतीने. हाच तर फरक होता, आहे माणसात अन् जनावरात. माणूस कळपात राहून, एकमेकाशी सहकार्य करून, हातात हात धरूनच मोठा झाला, संस्कारित झाला.आता माणसापेक्षा जनावरे बरी असे म्हणण्याची वेळ येत चाललीय ! मानव जातीसाठी ही धोक्याची घंटा आहे.
आत्महत्येने आपण आपले शरीर गमावून बसतो. कारण त्या शरीरात असलेल्या मनाकडे आपण संपूर्ण दुर्लक्ष केलेले असते. मनाचे ऐकलेले नसते. मनातील भावनांना तिलांजली दिली असते. म्हणून आपल्यावर श्रद्धांजली स्वीकारण्याची पाळी येते. एवढे सोपे गणित आहे. ते वेळीच समजले, सुटले तर क्या बात है !!

डॉ विजय पांढरपट्टे

— लेखन : प्रा.डॉ. विजय पांढरीपांडे. हैदराबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments