“वाढत्या आत्महत्या : या शिक्षणाचा काय उपयोग ?” या पोर्टलचे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या लेखानंतर “वाढत्या आत्महत्या”: चिंतेचा विषय” हा प्रा डॉ विजय पांढरीपांडे यांचा लेख आपण वाचला. या गंभीर विषयावर आता जेष्ठ पत्रकार श्री कुमार कदम यांनी लिहिलेला लेख वाचू या. आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
— संपादक
पुणे येथील वैष्णवी हगवणे आणि त्या पाठोपाठ सातारा जिल्ह्यातील फलटण येथील आरोग्य केंद्रामधील डॉक्टर संपदा मुंढे हिच्या आत्महत्येचे प्रकरण गेले तीन महिने देशभरात गाजत असतानाच आता पंकजा मुंढे यांचा पीए अनंत गर्जे याची पत्नी डॉ. गौरी पालवे, त्याचबरोबरीने समाजमाध्यमांवर गाजत असलेली, कल्याणच्या एकोणीस वर्षीय अर्णव खैरेच्या आणि नवी दिल्लीतील सोळा वर्षाच्या एका मराठी विद्यार्थ्याच्या आत्महत्यांसारखी प्रकरणे गेले काही दिवस सतत कानावर येत आहेत. रोजच्या वृत्तपत्रात कोणा ना कोणाच्या आत्महत्येची किमान एक तरी बातमी वाचण्यात येते. ही सारी परिस्थिती भयावह आहे.
एकीकडे स्पर्धात्मक आयुष्य, आर्थिक ओढाताण, वाढत्या गरजा, रोजगाराची अनिश्चितता अशा चक्रव्युहात सापडलेल्या आजच्या पिढीला त्यातून बाहेर पाडण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळवून देणारी व्यवस्था प्रभावीपणे कार्यान्वित असल्याचे फारसे आढळत नाही. त्याचा परिणाम असा की, स्वतःचे अस्तित्त्व संपवून टाकण्याकडे वाढत असलेली मानसिकता ही जगभरातील मोठी समस्या झाली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी सुमारे सात लाखांहून अधिक जण, म्हणजेच प्रती चाळीस सेकंदाला एक तरी व्यक्ती आपले जीवन संपवित आहे. तर भारतात हे प्रमाण दररोज जवळपास ४७० इतके आहे. या व्यक्तींच्या आत्महत्या ही फक्त त्यांची वैयक्तिक शोकांतिका जरी म्हटली गेली तरी ते समाजासमोरील एक फार मोठे गंभीर आव्हान आहे, ही वस्तुस्थिती मान्य करावीच लागेल.
भारत सरकारच्या “नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो” या संस्थेने २०२३ मध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात एका वर्षात १,७०,९२४ व्यक्तींनी आत्महत्या केली. त्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण गतवर्षीपेक्षा तीन टक्क्याने वाढलेले आढळून आले. त्यावर्षी देशभरात १५ ते २९ वयोगटातील युवक-युवतींनी आत्महत्या केली, त्यात १३,०८९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही संख्या गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक आढळते. कर्जबाजारी शेतकरी, बेरोजगारी, शैक्षणिक ताणतणाव आणि मानसिक आजार आदी प्रमुख कारणांनी होणाऱ्या या आत्महत्यांच्या यादीत महाराष्ट्र हा वरच्या क्रमांकावर आहे. या कालावधीत महाराष्ट्रात बावीस हजारपेक्षा जास्त आत्महत्यांची नोंद झाली आहे. आर्थिक अस्थिरता आणि सामाजिक ताणतणाव हा आत्महत्याचे प्रमाण वाढण्यामागील मोठा कारणीभूत घटक असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, राजस्थानमधील कोटा हे स्पर्धा परिक्षांच्या शैक्षणिक प्रशिक्षणासाठी प्रसिध्द केंद्र असलेले शहर गेली काही वर्षे सातत्याने विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमुख केंद्र झाले आहे. यंदाच्या वर्षी, मे २०२५ अखेरपर्यंत तेथे १४ विद्यार्थ्यांनी नैराश्यापोटी आत्महत्या केली आहे. गत २०२३मध्ये ही संख्या १७, तर २०२२ मध्ये ती २६ इतकी होती. होऊ घातलेल्या स्पर्धा परिक्षेत आपला निभाव लागणार नाही हे हेरलेल्या आणि आत्मविश्वास पूर्ण गमावलेल्या या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला सध्याची चढाओढीची परिस्थिती आणि मृत विद्यार्थ्यांच्या लालची पालकांच्या फाजिल महत्त्वाकांक्षा देखील कारणीभूत ठरल्या आहेत.
वरील सर्व आकडेवारी धक्कादायक, भयानक आणि चिंताग्रस्त करणारी असली तरी तिचे समोर आलेले वास्तव बदलण्याचे प्रयत्न आता तुम्हाआम्हा सर्वांनाच करावे लागणार आहेत. त्या कसोटीला उतरणे ही काळाची गरज असून त्याकरीता प्रत्येकाने तसा दृढ संकल्प करायला हवा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख हे निर्माण होत असतेच. मात्र त्याचे स्वरुप व्यक्तीगणीत भिन्न असते. एखाद्याला जवळच्या व्यक्तीचा वियोग सहन होत नाही, एखाद्याला शालेय जीवनामध्येच काही प्रसंगामुळे निराशेने किंवा वैफल्याने ग्रासलेले असते, त्यावेळेस त्याची मानसिक परिपक्वताही पूर्णत्त्वाला गेलेली नसते. अशा व्यक्तीची लहानपणीची ती निराशा किंवा वैफल्य त्याला पुढच्या संपूर्ण आयुष्यभर त्रास देत असतो. आर्थिक अडचण व नुकसान, भौतिक परिस्थितीशी तोंड देण्यास आलेले अपयश, प्रेमभंग, वैवाहिक समस्या, शैक्षणिक स्पर्धा आदी विविध कारणांनी अनेकजण आत्महत्येला प्रवृत्त होत असल्याचे आढळून येते.
आजची वैद्यानिक प्रगती आणि आधुनिक तंत्रज्ञान याने सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आमुलाग्र बदल केला आहे. या नव्या आधुनिक विज्ञानामुळे ज्ञानाची विविध कवाडे सर्वसामान्यांसाठी उघडली गेली असली तरी या प्रगतीचा स्वतःच्या उत्कर्षासाठी लाभ घेण्याऐवजी नवी पिढी मोठ्या प्रमाणात स्वैर विचारांकडे भरकटत चालल्याचे आढळून येते. त्यामुळे आजच्या डिजिटल युगात चांगल्यापेक्षा वाईट प्रवृत्तीच मोठ्या प्रमाणात वाढीस लागल्या आहेत. सद्यस्थितीत अशा अपप्रवृत्तीवर कोणाचे नियंत्रण राहिलेले नाही. उलट बहुसंख्य मंडळी ही दिखावू आणि फसव्या मोहजाळात गुरफटूत चालली आहे.
कौटुंबिक पातळीवर संस्काराची व्याख्याच बदलून गेली आहे. परिणामी, भरकटलेल्या मनःस्थितीतील तरुणाईवर एक मोठे गंडातर येऊ घातले आहे.
सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा खूप बोलबाला आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे संगणक प्रणाली मानवी बुद्धिमत्तेसारखी कार्ये करू शकते, त्यात तर्क करणे, समस्या सोडवणे आणि भाषा समजून घेणे या बाबींचाही अंतर्भाव आहे. हे तंत्रज्ञान संगणकांना विशिष्ट कार्ये करण्यासाठी, नमुने ओळखण्यासाठी आणि अचूक परिणाम देण्यासाठी सक्षम करते. एवढे ते प्रभावी आहे. मात्र तंत्रज्ञानाचा उपयोग सकारात्मक कामासाठी त्याचा वापर हा नको त्या गोष्टींसाठी केला जात असल्याचे आढळून येते. हे तंत्र वापरणाऱ्यांनी ते सुयोग्य पध्दतीने वापरात आणले नाही, तर ती मंडळीदेखील नैराश्याकडे ओढली जातील हे निश्चित !
आज पाश्चिमात्य देशांमध्ये, विशेषतः अमेरिकेमध्ये तरुणांमध्ये जी अराजकता माजली आहे, त्याची बीजे याच तंत्रज्ञानाच्या स्वैरवापरात रुजलेली आहेत. जीवनाची लढाई हरण्यापूर्वी कोणीतरी मदतीचा हात पुढे केला तर अनेक जीव वाचू शकतात. दुर्दैवाने संबंधिताची वेदनादायी हाक ऐकू आली तरी त्याच्या मदतीला धावून जाण्याची समाजाची मानसिकता आज हरवत चालल्यामुळे या आत्महत्या ही दिवसेंदिवस एक मोठी समस्या बनत चालली आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाला आता सज्ज व्हावे लागणार आहे. आज शेजाऱ्यावर आलेले संकट कोणत्याही क्षणी आपल्या घरात शिरकाव करू शकते, याचे भान प्रत्येकाला गांभीर्याने बाळगावे लागेल. एखाद्या परिचित व्यक्तीवर त्याला अत्यंत दुःखी करणाऱ्या मानसिक नैराश्याचा किंवा वैफल्याचा असर होत आहे, याचा जरा जरी अंदाज आपल्याला आला, तर लागलीच आपण त्याला कोणत्या चुकीच्या विचारप्रभावामुळे नैराश्य किंवा विफलतेने ग्रासले आहे, या बाबतही माहिती घ्यायला हवी. त्याचबरोबर, व्यवहारामध्ये अशा व्यक्तीच्या आयुष्यात वैफल्य किंवा नैराश्याचे कोणते प्रसंग येऊ शकतात व ते आल्यावर त्यावर कोणती उपाययोजना करणे जरूरीचे आहे याचाही अंदाज घ्यायला हवा. एखादा आजार किंवा रोग का आणि कसा उत्पन्न होतो हे नुसते कळून चालत नाही, तर त्या रोगाच्या त्रासातून सुटका होण्यासाठी त्याच्यावर उपाय करणे अत्यंत जरूरीचे असते. जी बाब शारीरिक आजाराची, तीच बाब मानसिक दुखण्याचीही असते. आपल्या नेहमीच्या जीवनातील काही प्रसंग उदाहरणादाखल घेतले व त्यावर कशा पध्दतीची उपाययोजना करायला पाहिजे, हे ध्यानात घेतले की मग ती उपाययोजना एखाद्यामध्ये नैराश्य किंवा वैफल्य न येण्याला मदत करते. दुःख आणि नैराश्य किंवा वैफल्य या दोन भिन्न बाबी आहेत. त्यांचा नीट अंदाज घ्यायला हवा. तरच एखाद्याला आत्महत्येपासून परावृत्त करणे सोपे जाईल.
“जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारी मना तुच शोधोनी पहावे! “असा प्रश्न स्वामी रामदासांनी तमाम मनुष्य प्राणीमात्रासाठी उपस्थित केला आहे. आनंद आणि समाधान या दोन वेगवेगळ्या कृती आहेत. म्हटल्यास त्या एकमेकाशी खूप निगडीत आहेत, म्हटल्यास त्या एकमेकीपासून कोसो दूर आहेत. माणूस मग तो कोणीही असो. गरीब वा श्रीमंत, तो आनंदी असेलच हे निश्चितपणे सांगता येणार नाही, मात्र तो समाधानी राहात असेल तर त्याला खऱ्या अर्थाने नशीबवान म्हणता येईल. ते समाधान मिळविणे हीच आजच्या काळातील सर्वात मोठी गरजेची बाब आहे.

— लेखन : कुमार कदम. मुख्य संपादक, महाराष्ट्र वृत्त सेवा,
माजी अध्यक्ष, मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
