महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, त्यांच्या साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.एम.डी. इंगोले यांची श्री रमेश आराख घेतलेली मुलाखत पुढे देत आहे. वामनदादा कर्डक यांना विनम्रयू भाषेत अभिवादन.
— संपादक
प्र.१) वामनदादांशी आपली पहिली भेट केंव्हा ? कुठे ? आणि कशी झाली ?
उत्तर : वामनदादांची आणि माझी पहिली भेट 1997 ला गंगाखेड येथे झाली. गंगाखेडचे सामाजिक कार्यकर्ते विलासराव जंगले साहेब वामनदादांना गंगाखेड येथे कार्यक्रमासाठी घेऊन आले होते. त्यांच्या गीताचा कार्यक्रम अजिंठा नगर येथे आयोजित केला होता आणि मीही याच नगरात वास्तव्यास होतो. हा पहिला प्रसंग वामनदादांच्या भेटीचा व कार्यक्रम ऐकण्याचा आला.
प्र.२) वामनदादांशी आणि त्यांच्या गीतांचा लळा आपणास कसा लागला ?
उत्तर : माझं मुळ गाव ऊंडेगाव हे औंढा नागनाथ तालुका व हिंगोली जिल्ह्यातील एक छोटंसं खेडेगाव. आमच्या गावी ‘पंचशील गायन पार्टी’ होती. माझे वडील धुराजी रामजी इंगोले गावातील पहिले हार्मोनियम मास्टर व गायक. म्हणून मलाही किशोर वयात गायनाचा छंद जडला. तेंव्हा वामनदादा, अर्जून एंगडे, लक्ष्मण राजगुरू, दलिता नंद, राजानंद गडपायले, इत्यादींची गाणी गायली जायची. विशेष म्हणजे वामनदादांची तेंव्हा लोकप्रिय झालेली गीतं-चला चला ग सोनं लुटू या, जाऊ आज पहाटी त्या नाग नदीच्या काठी, उधरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे. काय सांगु तुला आता, भीम असे म्हणाले आहे माझा कसा होता. लेकराला जशी माता, भीम माझा तसा होता, गडगडले मेघ वरती, कोसळले धरणी वरती, आला नदीला नवापूर, रंगला भूमीचा नवा नूर, तुझीच कमाई आहे ग भीमाई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही, बंधु र शिपया, तू देरं दे रूपया, चोळीच्या खणाला,भीम जयंती सणाला, बाई जाईल तुझ दुःख सारं, बाळ होईल तुझं फौजदार, पहाट झाली, प्रभा म्हणाली, भीम जयंती आली, चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली, कधी जाईल तुझ हे जातियेतेच खुळ, किड लागली तुला चातुर्वर्णा मुळ, माता भिमाई त्या बाळाची आई, सुभेदार रामजी देवी आहे पिता, हो भीम जन्माची ऐका कथा, त्रिशरणाची पंचशीलेची, मंगलमय धम्माची, करीन आरती धरती वरती, मंगलमय नामाची, लेक मी भीमाची नात आहे गौतमाची, आंधळा मी चाललो नागपुराला, बाबाची काठी द्या हो मला, ज्याने प्रेमाने जिंकीले जगा, वीर असा गौतम आहे… इत्यादी गीते आवर्जून गायली जायची. तेव्हापासून वामनदादांच्या गीतांचा मला लळा लागला. मी हायस्कूलच्या शिक्षणासाठी जिंतूर तालुक्यात गेलो तरी मोठे हा छंद होताच. परंतु मी उच्च शिक्षणासाठी परभणी आणि पुन्हा औरंगाबाद येथे गेल्या नंतर हा छंद कमी झाला आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित केले.
प्र.३) वामनदादांच्या हिंदी गीतांचे आपण काही संकलन केले आहे का ? काही लेखन केला आहे का ? विशेषतः हिंदी मध्ये ?
उत्तर : हो, माझ्याकडे वामनदादाच्या हिंदी गीतांचे चार संग्रह आहेत. आणि ‘मराठवाड्यातील आंबेडकरी जलसाकार’ या लघु प्रकल्प संशोधनाच्या वेळी साधारणपणे एक हजार च्या आसपास आंबेडकरी गीते संकलित केली आहेत. प्रा.डॉ.अशोक जोंधळे यांनी संपादित केलेले- ‘दिल्ली दूर नहीं’ आणि ‘जाग उठो’ हे दोन व प्रा.रविचंद्र हडसनकर संपादित- ‘बोल उठी हलचल’ तसेच तांदळे सरांनी ‘वामनदादा के हुंकार के गीत’ माझ्याकडे आहेत.
वामनदादांच्या गीतांवर लेखांचा संग्रह संपादित ग्रंथ ‘आंबेडकरवादाचा भाष्यकार महाकवी वामनदादा कर्डक’ डिसेंबर २०१४ मध्ये प्रकाशित झाला आहे. तो ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी येथे थाटामाटात साजरा झाला. त्याचा वृत्तांत सह्याद्री वाहिनीवर प्रसारित झाला होता. या ग्रंथाची समीक्षा नांदेडचे प्रा.डॉ. चंद्रकांत एकलारे, पुसदचे प्राचार्य डॉ.प्रल्हाद वावरे, मुंबईचे कवी लेखक सुभाष रघु आढाव इत्यादी मान्यवरांनी केली व ती दै.वृत्तरत्न सम्राट, अनेक मासिकात प्रसिद्ध झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाने एक जी.आर. काढला होता. तो असा की, वामनदादांचे काव्य विद्यापीठाच्या पाठ्यक्रमात समाविष्ट करण्यात यावं. म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने मराठी विषयाच्या बी.ए. द्वीतीय वर्षाच्या पाठ्यक्रमात वामनदादाचे गीत, ‘मानसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हीत व्हावे.’ समाविष्ट केले. तसेच ‘आंबेडकर वादाचा भाष्यकार महाकवी वामनदादा कर्डक’ हा ग्रंथ संदर्भ ग्रंथ म्हणून निवडण्यात आला. सदरील विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या हिंदी विषयाच्या पाठ्यक्रमात ‘आंबेडकरी जलसा’ लागू करण्यात आला आहे. विशेषतः पीएचडी नंतर मी वामनदादांच्या हिंदी गीतांवर संशोधन पर आलेख लिहिले. ते राज्य,राष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहेत. ते असे-
१) वामनदादा कर्डक का काव्य: विषय वैविध्य (पत्रिका:आंबेडकर इन इंडिया-लखनौ)
२) आंबेडकरी प्रतिभा का महाकवि वामनदादा कर्डक
(पत्रिका: नागफणी- डेहराडून)
३) वामनदादा कर्डक की दुर्लभ हिंदी कविताओं का संकलन ‘दिल्ली दूर नहीं'(यूजीसी केअर जर्नल: करंट ग्लोबल रिव्ह्यू)
४) वामनदादा कर्डक के काव्य में सामाजिकता(पत्रिका:वंचित दस्तक, ग्रंथ:हिंदी साहित्य में संवैधानिक मूल्य)
५) राष्ट्रीय चेतना के संवाहक महाकवि वामनदादा कर्डक (साप्ता.:भागीदार व अन्य पत्रिका)
६) महाकवी वामनदादा कर्डक (पत्रिका:भावमाला, न्यूज स्टोरी टुडे) ७) लोककवी वामनदादा कर्डक यांच्या काव्यातील आंबेडकरवाद (पत्रिका: संवाद-यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, दै.मराठवाडा साथी, दै. देवगीरी वृत्त)
८) आंबेडकरवादाचा भाष्यकार महाकवी वामनदादा कर्डक (पत्रिका : भावमाला)
९) वामनदादा कर्डक यांच्या काव्यातील उपमा, प्रतिमा, प्रतिके आणि भाषा शैली. अशा प्रकारे वामनदादांच्या गीतांवर आधारित संशोधन पर लेखन केले आहे.
प्र.४) या व्यतिरिक्त आणखी काही लेखन केले आहे का ?
उत्तर : हो. या व्यतिरिक्त दहा ग्रंथ आणि शंभर ते सव्वाशे लेख लिहिले आहेत.
१) कथाकार बदीउज्जमां (संशोधन ग्रंथ),
२) तू चांद बनकर रह गईं (काव्य संग्रह),
३) यादों के झरोखे से (आत्मकथन),
४) मराठवाडा के आंबेडकरी जलसाकार (लघु संशोधन प्रकल्प ग्रंथ),
५) हिंदी साहित्य : विविध विमर्श (शोधालेख),
६) परिवर्तनवादी चिंतन परंपरा और हिंदी साहित्य(शोधालेख),
७) धरती आबा-ऋशिकेष सुलभ (नाटक-बीरसामुंडावर-हिंदी से मराठी अनुवाद),
८) यशोधरा-नारायणराव जाधव(नाटक-मराठी से हिंदी अनुवाद),
९) द्वितीय भाषा हिंदी(बी.ए./बी.कॉम प्रथम वर्ष-दरस्थ शिक्षण),
१०) माझ्या जीवनाची गाणं- वामनदादा कर्डक (आत्मकथन-मराठी से हिंदी अनुवाद) इत्यादी ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.
प्र.५) या व्यतिरिक्त वामनदादांविषयी विशेष काय सांगाल?
उत्तर : गंगाखेड येथे मी १९९४ ला संत जनाबाई महाविद्यालयात रुजू झालो. तेंव्हा पासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक, अकादमिक कार्यामध्ये सातत्याने सहभागी होत असतो. विशेष म्हणजे १९९७ ला सामाजिक कार्यकर्ते विलासराव जंगले यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली . वामनदादांच्या ७५ सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही वामनदादाचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यात वामनदादांना मानपत्र व २१००० रुपये भेट दिली होती. त्यानंतर त्यांचे महाराष्ट्र भर मोठमोठे सत्कार झाले. परभणी, नांदेड आणि औरंगाबाद येथील सत्काराला मी जातीने उपस्थित होतो. गंगाखेडच्या सत्कार समारंभाचे एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे वामनदादांच्या गौरवासोबतच सरत्या वर्षाला निरोप आणि नवं वर्षाचे स्वागत असा संगीत रजनीचा कार्यक्रमही आयोजित केला होता. या कार्यक्रमात निस्पृह आणि निष्कलंक निष्ठावंत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, अधिकारी, गायक कलावंत, चित्रकार यांचा सत्कार ही करण्यात आला होता. त्यामध्ये जयराम एंगडे- परभणी, आमदार एम.डी. नेरलीकर-पूर्णा,बी.एच. सहजराव-परभणी, सेवा निवृत्त उपजिल्हाधिकारी बी.डी. साळवी-परभणी, दै.भीमपुकारचे संपादक डी.टी. शिंदे-परभणी, डी.एन.मोरे-परभणी, उमाकांत उबाळे, कालिदास खंदारे-जिंतूर, वामनदादाचे चाहते गायक प्रा.डॉ.अशोक जोंधळे व सौ.आशा जोंधळे, मूर्तीकार दाढेल, पंडितराव खिल्लारे, फुलाबाई वाव्हळ, वादक रघुनाथ तलवारे, अॅड रणधीर तेलगोटे, श्रीमती मंजुळाबाई मोरे, चित्रकार सुर्यभान नागभिडे इत्यादींचा समावेश होता. वामनदादांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आमच्या महाविद्यालयात ‘संवेदना जागृती’ या कवी संमेलनाचे व वामनदादांच्या ‘स्मृती दिनी’ व्याख्यानाचे आयोजन केले होते.

प्र.६) वामनदादांच्या भेटीमध्ये आपणास आणखी काय जाणवले ?
उत्तर : वामनदादांचे कलावंतांवर प्रचंड प्रेम होते. ते अत्यंत प्रेमळ स्वभावाचे व तितकेच शिस्तीचे पालन करणारे होते. वेळ प्रसंगी ते कलावंतांवर खूप रागवायचे. महाराष्ट्रातील अनेक कलावंतांचे व वामनदादांचे खुप जिव्हाळ्याचे संबंध होते. म्हणून वामनदादावर प्रेम करणारे महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर ही त्यांचे
चाहते आहेत. इतकेच नव्हे तर अनेक कलावंत वामनदादांशी आपले नाते संबंध सांगतात. जसे की, कुणी शिष्य, मानस पुत्र, मानस कन्या, जावई असे वेगवेगळे नाते सांगतात. अनेकांनीही वामनदादांवर प्रचंड प्रेम केले. मग ते श्रावण यशवंते असतील किंवा लक्ष्मण केदार, किसन खरात, प्रतापसिंग बोदडे दादा, सिध्दार्थ जाधव, बाबूराव जाधव, रघुनाथ तलवारे, प्रा.रविचंद्र हडसनकर असतील, विलासराव जंगले, प्रा.डॉ.अशोक जोंधळे अशी अनेक नांवे सांगता येतील. वामनदादा मराठवाड्यात आले की गंगाखेडला विलासराव जंगले यांच्याकडे अनेक दिवस निवास करायचे. तेंव्हा आम्ही त्यांना आवर्जून भेटीसाठी जात असत. वरिष्ठ मंडळी त्यांच्याशी चर्चा करायचे आणि आम्ही ऐकायचो. कधी समाज, राजकारण, अन्याय अत्याचार, बाबासाहेब, आंबेडकरी चळवळ, कलावंत व कधी वैयक्तिक विषय चर्चेला असायचे.
प्र.७) वामनदादा विषयी आणखी काही विशेष आठवणीं सांगता येतील का ?
उत्तर : विशेष म्हणजे वामनदादांची इच्छा होती ती त्यांनी आपल्या गीतात व्यक्त केली आहे की,
“भटकता ही रहे देश में वामन | तुटत
कहीं पर भी बने मगर छोटीशी मजार बने ||”
अर्थात वामनदादांची ही इच्छा मा.विलासराव जंगले यांनी त्यांच्या शेतात खंडाळी या गावी समाधी बांधली व पूर्ण केली. वामनदादांच्या जयंती व स्मृति दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही आवर्जून समाधी स्थळी अभिवादन करण्यासाठी जात असतो. आणखी एक विशेष महत्त्वाची बाब म्हणजे परभणी जवळ ‘पिंपळगाव (ठोंबरे) येथे वामनदादाचे चाहते गायक अशोक जोगदंड यांनी वामनदादांचा पहिला पुतळा उभारला आहे. त्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मी व जंगले साहेब विशेष उपस्थित होतो.
प्र.८) एक संशोधक लेखक म्हणून तुम्ही वामनदादांच्या गीतांकडे कसे बघता ?
उत्तर : वामनदादांच्या संपूर्ण काव्य साहित्याकडे दृष्टिक्षेप टाकला असता असे लक्षात येते की, वामनदादांचे काव्य वैविध्यपूर्ण आहे. त्यांच्या काव्य साहित्याचा विविध अंगांनी अभ्यास केला जाऊ शकतो. बुध्द, कबीर, फुले, शाहू, आंबेडकरी मानवतावादी विचारांचे चित्रण, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची व्यक्ती रेखा-चरित्र, धम्म, समाज, राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अर्थ नीती, संवैधानिक मूल्य, आंबेडकरवाद इत्यादी बाबींचा अभ्यास केला जाऊ शकतो. समतामूक, जातिभेद विरहित, शोषणमुक्त समाज रचना निर्माण करणे आंबेडकरवादाचे ध्येय आहे. त्या अनुषंगाने वामनदादांच्या गीतांचा विचार करता येऊ शकतो. शिक्षण, अज्ञान, अंधश्रद्धा, शोषण, गुलामी, संगठन, संघर्ष, क्रांती, सत्य, अहिंसा, प्रेम, बंधुभाव, मानवता, अन्यायाचा प्रतिकार, वैज्ञानिक दृष्टिकोन इत्यादी. तसेच काव्य शास्त्रीयदृष्ट्या भाषा शैली, प्रतिमा, प्रतिके आणि उपमा याचा विचार करता येईल. वामनदादांनी विविध प्रकारच काव्य लिहिलं. दादांनी पहिलं विडंबन गीत लिहिलं. मुक्त छंद,भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, लावणी, गझल, स्फूर्ती गीत, कव्वाली, दिर्घ गीते, प्रबोधन पर गीते, लघु काव्य इत्यादी काव्य प्रकार त्यांनी हाताळले. आंबेडकरी चळवळीची गीतं लिहीली. वामनदादा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाते बहुजन समाज- दलित, पीडित, गरीब, कामगार, शेतकरी, कष्टकरी मजूरांशी जोडतांना- सात कोटीचा पिता, सात कोटीचा बाप, नवकोटीचा राजा, दयाळू दाता, कोटी कुळांचा उद्धारक, बेसहारों का सहारा, मानवतेचा माळी, धम्म पुरुष भीमराज असे जोडताना दिसून येते. बहुजन समाजाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांशी नाते- भीम के बच्चे, भीम के लोग, भीमाची कोटी मुलं, भीम का समाज, जयभीम वाले, भीम सेना आणि समाजाला ‘भीमरायाचा मळा’ असे संबोधले आहे. तसेच कौटुंबिक संबंध- आई भिमाई, माय भिमाई, माता भिमाई, भिमाई माऊली, भिमाची लेक, भीम सखा, भीम तात असे जोडले गेले आहेत. वरील सर्व संदर्भ वेगवेगळ्या गीतातून मिळतात. आंबेडकरी विचारांना वामनदादा- नव्या युगाची ललकारी, नव्या युगाचे वारे, भीमाचा विचार, भीमाचा प्रकाश, भीम भूपाळी, भीम ललकारी, भीम वाणी, भीम की आवाज, भीम का पैगाम, भीम गर्जना, भीम भट्टी, भीम वादळवारा, भीम पथ असे संबोधताना दिसून येते. आंबेडकरी बहुजन समाज ज्या ठिकाणी राहतो त्या वस्तीला-भीम भवन,भीम नगर, जयभीम नगर, प्रबुद्ध नगर असे संबोधतात. वामनदादा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे आदर्श, गौरवमयी, अद्वितीय, विराट चित्र रेखाटताना- भीम-सा बल, भीम-सा नर, लढवैया-भीम, भीम-प्रतापी, भीम-वादळ वारा, युगंधर-भीम, उपासी जगाचा पसा, भीम युगाचा ठसा, महान भीम नेता, देनगी भीमाची, अतुलनीय भीम, गौतमाचा, फुलेंचा वारसा चालवणारा भीम अशी वेगवेगळी प्रतिमा गीतातून उभी केली आहे. तसेच वेगवेगळ्या नैसर्गिक धातू, मूल्यवान रत्न, प्रतीकांशी तुलना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची केली आहे- चंदन, सूरज, तेजस्वी तारा, सोना, सोन्याची खाण, कंठमनी, हिरा, निला रतन इत्यादी.
प्र.९) शेवटी वामनदादा विषयी काय सांगाल ?
उत्तर : वामनदादांच्या गीतांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. नवकवी, लेखकांना व कलावंतांना प्रेरणादायी आहे. निस्पृह समाज प्रबोधन,ते आंबेडकरी विचारांशी वामनदादांची प्रामाणिकता व एकनिष्ठता ही आमच्यासाठी आदर्श आहे. वामनदादांच्या काव्यातील मानवीय- साहित्यिक मूल्य आमच्यासाठी ‘दिप स्तंभ’ आहे. म्हणून त्यांचे काव्य अजरामर झाले. आंबेडकरी समाजाच्या मनामनात कोरलेले आहे. आंबेडकरी कलावंतासाठी तर ते आद्य कवी कुलगुरू आहेत.
वामनदादा वर अनेकांनी कवने केली. मी ही कवन केले. ते असे-
“वामन तुझीच गाणी”
वामन तुझीच गाणी,
भावली इथे कुणा कुणाला ।
रीत ही नव्या जगाची दाखविली कुणा कुणाला ।।
कुणाची झाली भाजी-भाकर कुणाची झाली चारा ।
गाजे आज चोहीकडे वामन तुझाच नारा ।।
सार्थक झाली उपमा ‘कवी-कुलगुरु’ वामन तुझ्याच नावाची ।
विद्यापीठात अध्यासन केंद्र, संशोधने होती तुझ्याच गीतांची ।।
साहित्य संमेलनात नाद गुंजे, बैनर, मंच तुझ्याच नावाचे ।
सर्वत्र उत्सव, सोहळे होती, पुरस्कार ही देती तुझ्याच नावाचे ।।
बुध्द, कबीर, फुले, शाहु आणि आंबेडकर, बाग फुलविली मानवतेची।
करु पाहती वामन कैक इथे, स्वारी तुझ्याच रथाची ।।
सूर्य, चंद्र, तारे, सितारे, जोवर असतील या धरतीवर ।
तुजसम सारथी भीम रथाचा,
ना कुणी झाला न होणार या अवणीवर ।।
ना झाला न कुणी होणार या अवणीवर ।।
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800.
