Wednesday, October 15, 2025
Homeसंस्कृती"विजयादशमी : दसरा"

“विजयादशमी : दसरा”

नमस्कार मंडळी.
आपण सण साजरे करीत असतो. पण बऱ्याच जणांना त्याचे महत्व,वैशिष्ट्य, पूर्वपिठिका माहिती नसते. हे जर सर्व कळाले तर आपण आपले सण अधिक डोळसपणे साजरे करू शकू. या दृष्टीने सणांचे महत्व सांगणाऱ्या लेखमाला, लेख, अनुभव आपण आपल्या पोर्टलवर प्रसिद्ध करीत असतो. या अनुषंगाने नवरात्रीचे महत्व,वैशिष्ट्य, पूर्वपिठिका सांगणारी लेखमाला आपण प्रसिद्ध केली. भारतीय संस्कृतीच्या अभ्यासकसौ स्नेहा मुसरीफ यांनी अतिशय परिश्रमपूर्वक, अखंडपणे आणि छान भाषेत,शैलीत ही लेखमाला लिहिली, या बद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. आपणा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक

दरवर्षी नवरात्र हे नऊदिवस आणि नऊ रात्री नंतर दहाव्या दिवशी संपते. पण यंदा हे दहा दिवस पूर्ण झाल्यावर अकराव्या दिवशी समाप्त होते आहे.

नवरात्रीचे नऊदिवस, नऊरात्री खूपच धामधूमीचे गेले. नऊ देवींच्या नऊ सुरेख रूपांचे दर्शन झाले. आजच्या दिवशी नवरात्रीची पुरण, गोडधोड करुन देवाला नैवेद्य दाखवुन, घट, दिवा हलवुन सांगता केली जाते. काही ठिकाणी आदल्या दिवशीसुद्धा समाप्ती होते.

दहावा दिवस म्हणजेच दसरा ! यालाच दशहरा, विजयादशमी असेही म्हणतात.

हिंदूंच्या सणांपैकी दसरा सण खूप मोठा आणि महत्वाचा आहे. नवरात्रीच्या नऊरात्र, नऊ दिवस अविरत युद्ध करून दहाव्या दिवशी दुर्गा देवीने महिशासूर, रक्तबीज, शुंभ, निशुंभ अशा क्रूर, उन्मत्त राक्षसांचा नाश करून विजय संपादन केला आणि तिन्ही लोकांना त्यांच्या त्रासातुन मुक्त केले म्हणून हा विजयाचा मोठ्ठा दिवस ‘विजयादशमी’ म्हणून धुमधडक्यात साजरा करतात.

दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. यादिवशी सर्व शुभ कार्यांची सुरुवात केली जाते. नवीन लहान मोठ्ठया सर्व वस्तूंची, वाहनांची, घराची खरेदी केली जाते. आपट्याची पाने, झेंडूच्या फुलांनी बाजार नुसता फुलतो.घरे, दुकाने, वाहने, यांची झेंडूचे हार, माळा यांनी सजावट केली जाते. पुरण, गोडधोड, मिठाया बनवून खाल्या जातात. सर्व आप्तेष्ट एकमेकाना भेटून हा सणं खूप आनंदाने साजरा करतात. तीन रात्री सरस्वती निद्रा करते आणि दसऱ्याला ती जागी होते असे मानून तिचे प्रतिक म्हणजे पाटी, पुस्तके, वह्या यांची विद्यार्थी पूजा करतात.

आजच्या दिवशी अश्मंतक म्हणजेच आपट्याच्या पानांना सोने समजून विजयादशमी या सणाचे महत्व प्रत्येक प्रांतात, राज्यात खूप वेगवेगळे आहे, त्यामुळे तो साजरा करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत.

हे दहा दिवस बऱ्याच राज्यात रामाने रावणावर केलेल्या विजयाचे स्मरण म्हणुन साजरे करतात. काही भागात रामकथेतील कथा वर आधारीत विविध नाटके सादर करतात त्यांना ‘रामलीला’ म्हणतात. शेवटच्या दहाव्या दसऱ्याच्या दिवशी गावातील सर्वांत मोठ्या मैदानामध्ये पुठ्ठे, लाकडे, कापड यांनी खूप मोठ्ठा भव्य दहा तोंडे असलेल्या रावणाचा पुतळा बनवून त्यात भरपूर फटाके, शोभेची दारू भरून उभा करतात. मग रामलीलेतील रामाचा अवतार घेतलेला माणूस त्या रावणाला धनुष्यातून अग्निबाण सोडून मारतो आणि रावणाला ठार मारतो, त्याचे दहन करतो. हा खूप मोठा आणि सुरेख सोहळा असतो आणि तो पाहण्यासाठी गावोगावचे असंख्य लोक येतात. सर्व दुष्ट शक्तींचा नायनाट होऊन या दिवशी आनंदाचे, संपन्नतेचे, शांततेचे रामराज्य सुरु होते असे मानले जाते. हे रावणदहन वाईटाचा नाश असल्याचे प्रतीक मानले जाते.

हा दिवस रामायण आणि महाभारत दोन्ही काळात घडलेल्या चांगल्या दिवसाची आठवण म्हणूनच साजरा होतो. या दिवशी रामाने रावणाचा नाश करून विजय मिळवला होता तर पांडवांनी त्यांचा वनवास आणि अज्ञातवास यशस्वीरित्या पार पाडून या दिवशी शमीच्या झाडावर लपवून ठेवलेली सर्व शस्त्रे काढून त्यांची पूजा केली आणि त्यांचे राज्य परत मिळवले म्हणून या दिवशी शस्त्रांची पूजा करतात. त्याची आठवण म्हणुन या दिवशी पुरुष नवीन कपडे घालून, डोक्यावरील शिरपेचात टोपी किंवा फेट्यात नवरात्रातील घटामध्ये उगवलेले धान्य मोठ्या दिमाखात खोचून गावाचे सीमोल्लंघन करतात आणि घरी येताना आपट्याची पाने तेजाचे, विजयाचे प्रतिक आहे म्हणून सोनेच मानून घरी आणतात. दारात त्यांचे पाय धुवून, औक्षण करून सुवासिनी त्यांना सन्मानाने स्वागत करतात. मग ही आपट्यांची पाने सोने मानून एकमेकांना आनंदाने देतात.

आपट्यांच्या पानांना सोने का समजतात याबद्दल एक पौरणिक कथा आहे. रघुराजाने सर्वस्वदक्षिणा यज्ञ केला. या यज्ञानंतर आपल्याजवळील सर्व संपत्ती लोकांना दान करून टाकायची असते, तसे त्याने केले. त्यानंतर त्याच्याकडे कौत्स मुनी त्यांच्या यज्ञासाठी दान मागण्यासाठी रघुराजाकडे आले. त्यांनी चौदा सहस्त्र मुद्रांची मागणी केली. रघुराजाने तर सर्व कोषागार रिकामे केले होते. पण धर्माने राज्य करणाऱ्या राजाला ब्राह्मणाला तसेंच विन्मुख पाठवणे पटणारे नव्हते. त्याने देवांचा खजिनदार कुबेर याच्यावर आक्रमण करण्याचे निश्चित केले. कुबेर खूप घाबरला आणि त्याने अमाप धनसंपत्ती राज्याच्या वेशीबाहेरील आपट्याच्या झाडाखाली आणून ठेवली. रघुराजाने ती सगळी संपत्ती कौत्समुनीना देऊ केली, पण त्यांनी फक्त चौदा सहस्त्र मोहराच घेतल्या. मग ब्राह्मणांसाठी दिलेल्या संपत्तीवर आपला काय अधिकार आहे,असे म्हणून त्याने सर्व प्रजेला त्यांना हवी तेवढी संपत्ती घेऊन जाण्यास सांगितले. तेंव्हा सारी प्रजा तिथे आली आणि आनंदाने संपत्ती घेतली. या साऱ्याचा साक्षीदार हे आपट्याचे झाड होते. त्याची आठवण म्हणून दसऱ्याला त्या झाडाची पूजा करण्याची प्रथा पडली. मग संपत्ती, सोने म्हणून याच्या पानाला मान,महत्व दिले आणि म्हणूनच या मंगल दिवशी लोक एकत्र भेटुन आनंदाने ते एकमेकांना देतात. यामुळे आदानप्रदानशीलता वाढते. उत्साह वाढतो. त्यानिमित्ताने का होईना लोक आपट्याची
झाडे लावून त्याचे संवर्धन करतील, अशी त्यामागे भावना आहे. पण दुर्दैवाने लोक ती भावना समजून न घेता त्यासाठी त्यादिवशी ती झाडेच अक्षरशः तोडतात. कित्येकाना तर खरे आपट्याचे झाड, पान ठाऊकही नसते, विशेषतः शहरात ! मग आपट्याची म्हणून त्याच्यासारख्या दिसणाऱ्या पानांची झाडेसुद्धा ओरबाडली जातात. आणि हे नकली सोने एकमेकाना केवळ प्रथा म्हणून देतात.याचा खरंच खेद वाटतो.

या लेखमालेच्या समारोप करताना, असे सांगावेसे वाटते की, प्रत्येक चांगल्या प्रसंगांची, सण, उत्सव किंवा वाढदिवसासारखे कार्यक्रम असले की त्याची छान आठवण म्हणून किमान एकतरी झाड लावून ते वाढवावे किंवा जो पैसा छोट्या, मोठ्या एव्हेन्ट मध्ये विनाकारण केवळ आपल्या आनंदासाठी, डामडौल म्हणून खर्च करतो, तोच पैसा अनाथ, अपंग, गरजू व्यक्तींना दिला तर तो आनंद त्याही पेक्षा मोठा असतो हे लक्षात येईल.एका माणसाच्या आनंदात कित्तीतरी गरजूंच्या आयुष्यात आनंद देऊन तो डोळ्यांनी पाहण्याचे सुख तर आपल्याला मिळेलच, पण त्यांचे आशीर्वाद, सदिच्छाही
मिळतील.समाजसेवेचे पुण्यही लाभेल.

असा जर दसरा साजरा केला तर खऱ्या अर्थाने अभिमानाने म्हणता येईल, “दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा.”
समाप्त.

स्नेहा मुसरीफ

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप