Homeसाहित्यविठ्ठल विठ्ठल : काही रचना

विठ्ठल विठ्ठल : काही रचना

1) विठ्ठल भेटला !

जिथं मदतीचा हात आला
माणुस माणसासम बोलला
तिथं विठ्ठल भेटला !

जिथं नाही जाती भेद
नाही घोर विषारी वाद
सोबत मित्रासम चालला
तिथं विठ्ठल भेटला !

जिथं नाही गर्वाची बाधा
अपमानाची अनिष्ट प्रथा
सुखद सुसंवाद साधला
तिथं विठ्ठल भेटला !

जिथं पर्यावरणाची निगा
झाडांना म्हणती खुप जगा
सावलीचा सहवास लाभला
तिथं विठ्ठल भेटला !

जिथं मंदिर उभे मानवतेचे
गाती गोड गीत समतेचे
मनशांतीचा बगीचा फुलला
तिथं विठ्ठल भेटला !
तिथं विठ्ठल भेटला !

— रचना : गज आनन म्हात्रे. करावेगाव, नवी मुंबई.

2) सोने ..

पांडुरंग भोळा
रंग कुट्ट काळा
तरी दे उजाळा अंतरंगा

पांडुरंगा गळा
तुळशीचे माळा
सोने शत तोळा भासे जणूं

लावियेला टिळा
बुक्का कपाळा
खुश लडिवाळा तेवढ्याने

भक्त होई गोळा
रमतो तो खुळा
फुलवितो मळा आत्मानंदा

पाहता हरि रुपा
चंद्र भागा डोळा
वाहे घळा घळा भक्ती भाव

विठ्ठल लडिवाळा
कसा रे जिव्हाळा
कधी नसे कंटाळा तुझ्या संगे

सर्वत्रचं सावळा
मनाकरी बावळा
बा तुझाचं दर्वळा आयुष्यात

— रचना : हेमंत मुसरिफ. पुणे

3) वारकरी

नित्य नेमे वारीला जाई तो वारकरी
चौर्‍यांशीचा शिलालेख दावी वाट
पांडुरंगपल्लीचा कानडाहो विठ्ठलू
चारी वर्णासी लागला तुझा बाट ||१||

पुंडलीकासाठी ऊभा विटेवरी
कर कटी ठेऊनी भेटे भक्तांसी
चंद्रभागी बुडले अभंग तुक्याचे
भक्तांनी तारले मुखासी ||२||

गोपीचंदन गळा तुलसीमाळ
दिंड्या, पताका, टाळ, मृदुंगासंगे
आलिंगती माऊली प्रेमापोटी
आसमंत भक्तिसवे दंगे ||३||

वारकर्‍यांनी जोपासला मानवधर्म
‘राम कृष्ण हरि’ देऊनी महामंत्र
दया, क्षमा, शांती तेथे विठ्ठल वसती
संसारीकांना नाम महिम्याचे तंत्र ||४||

काळ्या विठ्याची काळीजादू
संतांनी दिली सकला हाती
भागवत धर्माची पताका
समते संगे फडके आकाशी ||५||

— रचना : सौ.अंजली रो. मस्करेन्हसव्हाईट प्लेन, न्यूयाॅर्क

4) विठू वसे मनी

मोह माया विसरुनी सारी
मुखे म्हणा राम कृष्ण हरी
एकच आस असे मनी
घडो एकदा पायी वारी

विठ्ठलास जशी प्रिय तुळस
तशी वारी मायेचा कळस
भजनात होऊ तल्लीन
भक्तीची ही अदृश्य वीण

वैष्णवांचा पवित्र मेळा
सर्वांस वाटे ज्याचा हेवा
परंपरा अध्यात्माची जोड
अहंकार गर्व सर्व सोड

आनंदाला आले उधाण
नाचू, गाऊ हरपुनी भान
वारी हा जगण्याचा सार
दिवे घाट ही होईल पार

मस्तकी टिळा हाती टाळ
सोबतीला जपाची माळ
वारीची ती अद्भुत नाळ
विठू आम्ही तुझे बाळ

लाभेल हे आम्हा संत
मनी नसे कोणती खंत
विठुचे रूप किती ते छान
रत्न जडीत हिऱ्यांची खान

विसरुनी मनावरील ताण
चरणी वाहू तुळशीचे पान
रखुमाई जशी सोबती
विठू भक्तीची अतूट नाती

नर नारी फुगडी खेळती
ज्येष्ठां सोबत मुले रमती
स्वर्ग सुख दुसरे नाही
विठूचा गजर ठाई ठाई

भक्त चाले पाई पाई
थकवा जरा ही नाही
विठुची वारी चाले पंढरी
देव ही वाट पाहत दारी

सोडून आसनी उभा हरी
दर्शनाची रितचं न्यारी
सावळे रूप दिसे माऊली
आश्रू आले माझ्या लोचनी

विठू वसे मनी
विठू वसे मनी.

— रचना : रश्मी हेडे.

5) चोरी

देव मंदिरात आहे
देव चोरून का पाहे
खजिन्याच्या मालकीस
चोर हस्तक्षेपी राहे

देवा घरचा खजिना
नाही आपुल्या बापाचा
डाका दरोडे घालून
धनी होतो रे पापाचा

दिले आहे विधात्याने
हेच आपुले नशीब
कशासाठी मागतोस
देवापाशी फुका टिप

अंती नसे स्वतः हाती
काडीमोल धनदायी
जातो खाली हाती अंती
भोग भोगे ठायी ठायी

उपकार त्या मातीचे
कशासाठी हवी चोरी ?
चोरी पकडे त्या दिनी
गळ्या आवळेल दोरी

— रचना : शोभा प्रकाश कोठावदे. नवी मुंबई

6) वारी

धन्य तो प्रस्थान सोहळा l
वंदू या ज्ञानेश लडिवाळा ll
महाविष्णू अवतार श्री ज्ञानेश्वर l
प्रभु विठ्ठल ही महाविष्णू अवतार ll
दोन रूपे परी कार्य एक l
जडमुढ उद्धारण्याला ll १ ll

भक्ती सागरा येई भरती l
पायी वारी सुखमय अती ll
भजन कीर्तन नाम घोषे l
आनंद होई अंतराला ll २ ll

नाम गजरी घेती अन्न ब्रम्ह l
सुखात विहरते भक्त आत्म ब्रम्ह ll
पायी वारीचे अपार सुख l
सुखविते वारकऱ्याला ll ३ ll

ज्ञानोबा – तुकाराम म्हणत वाचे l
पाहता श्री मुख श्री विठ्ठलाचे ll
जन्मोजन्मीचे अनंत पुण्य l
पायी वारीत ये उदयाला ll ४ ll

— रचना : अलका मोहोळकर. पंढरपूर.

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments