Homeसाहित्यपाऊस : काही कविता

पाऊस : काही कविता

1) रिमझिम रिमझिम

रिमझिम रिमझिम पाऊस आला
थेंब टपोरे घेऊनि आला
ढगांनीही गडगडाट करुनि
प्रतिसाद तो दिला तयाला

नद्या कोरड्या, पाण्याने या
आता कशा तुडुंब भरल्या
नाल्यांनाही पूर आला अन्
बागा हिरव्यागार जाहल्या

हिरवळ दिसते चहूकडे ती
पावसात नाचती मोर
हे पाहुनी नाचू लागले
मन माझेही होऊन मोर

— रचना : सौ. निर्मला भयवाळ. छ. संभाजीनगर.

2) जीवदान

जीवदान देरे मेघा
वाट पाहतोय तुझी
किती अंत पाहतोस
आता तरी हो राजी !१!

मन आमचं कसं झुरतंय
उभ्या पिकाकडे पाहून
मन पिळवटून जातंय
हंबरडा फुटतोय आतुन !२!

रात्रंदिवस एकच चिंता
उद्या काय होईल आमचं
जर शेत शिवार पिकलं नाही
तर झोळी फाटकी राहीन माही !३!

मुला-मुलीचं शिक्षण आता
फार महागडे झाले आहे
सरकार मायबाप डोळे मिटून
सारा उघडा तमाशा पाहे !४!

महागाईचं काय बोलू
कंबरडं मोडलं आमचं
येता जाता भाववाढ होते
काय नुकसान होतं त्यांच !५!

राजा आमचा का भिकारी

मानसिकता त्याची बिघडली
शेतक-यांच्या हितासाठी
अजून चिंता का नाही पडली !६!

फोडाफोडीच्या भानगडी
अन् राजकारणी आहे मशगुल
जनता मात्र हुशार आहे
करतील तुमची बत्ती गुल !७!

— रचना : राजाराम जाधव. नवी मुंबई

3) निसर्ग आभा

पर्ण शुष्क हे वृक्ष पाहते
आशेने जणू कि नभाकडे
धुक्यातले हे नभ उतरते
बाजूस दिसती उंच कडे..1

धूसर नभी गे धुके दाटले
कृष्णमेघ रम्य ते आसमंती
मोदभरे हरीत शेत नटले
जमती पावसाचे दंवमोती.2

नागमोडी वळण पायवाट
सखी चालते सख्या संगती
खाली खोल गे दरी घनदाट
सृष्टीचीजादू पाहातचालती..3

नटरंगी या चित्रगंधातून
मोह सागरात मन विहरतं
सांजवेळी आम्रमोहरातून
रानवाऱ्यातून गे नादावतं…4

पहाटेचा हवेत हो गारवा
त्यासोबत पावसाची सर
सुगंधित फुलांचा ताटवा
सृष्टीत दिसे रंगांची भर…5

चरचरात गंध भरूनी वाहे
कोण करे बरे दिव्यप्रभा
गंधाळल्या आसमंती दिसे
नियंत्याची गे गूढ किमया…6

— रचना : सौ मीना घोडविंदे. ठाणे

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments