स्त्रियांना विनोद कळत नाही, त्यांना विनोद बुद्धी नसते, असे म्हणतात. पण हा समज गैर असल्याचे सिंगापूर स्थित लेखिका-कवयित्री मोहना कारखानीस ह्यांनी चक्क विनोदी कवितालिहून सिद्ध केले आहे. आज त्यांच्या चार विनोदी कविता वाचू या आणि छान हसू या !
— संपादक
१) फॅशन
माणसांना लागते फॅशनचे वेड
त्या वेडात येते कपड्यांचे फॅड
बाळांपासून आजोबा शाप य्याड
काळाचा महिमा खेळतो झिम्माड
जीन्सला कुठे कुठे भोके पडली
तुकड्या तुकड्याची शर्यत लागली
आखूड होत गेल्या ब्लाउजच्या बाह्या
फॅशन बघता चक्रावल्या म्हाताऱ्या
श्रीमंतांना आला गरीबाचा कळवळा
फाटक्या कपड्यांना दिला सहारा
कानात आली पोरांच्या भिकबाळी
नथनीला मिरविती तरण्या पोरी
केसाला लागल्यात फॅशनच्या कळा
कधी शेंडी कधी चकोट नाना तऱ्हा
लांब केस झाले कधीच छू मंतर
तोकडे केस म्हणती आम्हीच बहाद्दर
कुंकू झाले कधीच तडीपार
गोंदण झाले फॅशनचे आधार
कुंकवाचे हाल पाहून हसली बिंदी
म्हणाली माझी ऐश रंगवते भिंती
नमस्कार बिचारा ‘हाय हाय’ करतो
संस्काराला नवा वारा मिठी मारतो
‘जुने ते सोने’ हे मात्र नेहमी खरे
जुन्या मालाला नेहमी लेबल नवे
२) डायट
जेव्हा हसू लागला मला वजनाचा काटा
तेव्हाच ठरवले घ्यावा डायटचा वसा
तळकट तुपकट खाल्ले आतापर्यंत जन्मभर
यापुढे करेन आता टाटा बाय बाय आयुष्यभर
स्लिम ट्रिम होऊन जिद्दीने सर्वाना दाखवेन
हसणाऱ्यांना मला टिच्चून अद्दल घडवेन
दोन दिवस कसेतरी केले डाएटिंग फायटिंग
जळ्ळे नाक हे मेले समजेना करावे कॉपरेटिंग
खमंग वासाने नाक सैरभर होऊ लागले
समजेना जिभेलाही कधी त्याचे वारे लागले
माझ्याच अंगांनी माझ्याशी केली गद्दारी
डायटच्या मुहुर्ताची वाट पाहते मी बिच्चारी
३) काव्यमंच
बंडूनानांना आले निमंत्रण काव्यमंचाचे
आनंदाने झाले वेडे हरखले कमालीचे
दाखवले ज्याला त्याला पत्र आमंत्रणाचे
घाबरले लोक बघून वेड त्यांचे काव्यवाचनाचे
कवितांवर कविता खरडल्या कागदावर
कविता न एक धड झाला कचरा ढीगभर
बायको मुले झाली बेजार, वेड सोसत नानांचे
नोकरी सोडून बसले, पोट भरावे कसे त्यांचे
महिनाभर केली प्रॅक्टिस, फक्त कविता म्हणण्याची
जोरात झाली तयारी, काव्य मंचावर जाण्याची
फ्रेंच कट दाढी , झब्बा लेंगा, गॉगल चढला डोळ्यावर
कानात बसे अत्तर फाया लटके शबनम खांद्यावर
शेवटी एकदा उगवला दिवस काव्यसंमेलनाचा त्याला
बंडूनाना निघाले पळत जिंकायला मंच काव्याचा
चढता मंचावर आले भलतेच स्फुरण त्यांना
कविता राहिली अन् भाषण लागले द्यायला लोकांना
भडकले श्रोते आणि घेतला समाचार नानांचा
कांदे बटाटे अंडी मारा अन आहेर चोपण्याचा
४) नमुताईंचे समाजकार्य
नमुताईंना पहाटे पहाटे स्वप्न पडले
स्वप्नात कोणी साधूने गदगदा हलवले
उबदार दुलई, खाली गुबगुबीत पलंग
पसरल्या होत्या त्यावर नमुताई घोरत
“घोरतेस काय नमु ? अगं, ऊठ लवकर
समाज तुझी वाट पाहतो, कामाला लाग तत्पर”
स्वप्नाने नमुताई मनोमन कळवळल्या
समाजकार्यासाठी भयंकर आसुसल्या
आजपासून आराम आहे मला हराम
गरिबांसाठी धावणार त्याविण नाही काम
ब्रेकफास्ट नको आजपासून फक्त संत्र्याचा रस
जोडीला ऍव्हाकॅडो आणि स्ट्रॉबेरीचा खच
एव्हढेच खाऊन खपेन मी गरिबांसाठी
त्यांना सोडून कशी खाऊ पोळी तुपाशी
त्यातल्या त्यात विगन खाणे शोभेल मला
टोफू, हर्ब्स, पास्ता साठी ऑर्डर गेली नोकराला
सगळे काही कार्य करेन त्या समाजासाठी
प्रश्न एक भेडसावतो, उत्तर देऊन मदत करा आधी
भेटतील कुठे मला गरीब बंधू, कसे त्यांना शोधू ?
सांगा मला साधू महाराज, गाडी कोणत्या मॉल मध्ये घेऊ ?

— रचना : मोहना कारखानीस. सिंगापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
