प्रख्यात विदर्भ साहित्य संघाच्या अमरावती शाखेची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून त्यात पांच वर्षासाठी म्हणजेच २०२१ ते २०२६ पर्यंत अध्यक्षपदी श्री विलास अरुण मराठे यांची एकमताने निवड झाली. त्यांच्या या निवडीने संपूर्ण विदर्भ साहित्य संघात नवं चैतन्यमय वातावरण निर्माण झाले असुन आनंदोत्सवाचा जणु पाऊसच पडत आहे .
श्री विलास मराठे हे ‘दैनिक हिंदुस्थानचे‘ अनुभवी प्रबंध संपादक आहेत. गेल्या दोन दशकांपासून सुरू केलेला त्यांचा साहित्य प्रवास लोकप्रिय दैनिक हिंदुस्थानच्या माध्यमातून साहित्यिक, लेखक, पत्रकार, कवी, वाचक यांना भारावून टाकणारा आहे. त्यांच्या मनाचा मोठेपणा व सूस्वभावीपणा हा राजहंसालाही लाजविणारा आहे हे येथे उल्लेखनीय आहे.
विशेष म्हणजे विदर्भ साहित्य संघाचे केंद्रीय कार्यालय जरी नागपूर येथे असले तरी या संघाची निर्मिती मात्र अमरावती येथेच झाली आहे. जिल्ह्यातील सन्माननीय साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे संघाचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी शाखा सातत्याने प्रयत्न करत आहे.
कादंबरी लेखन कार्यशाळा तसेच नवनवीन गाणी, कविंची कविता आदी उपक्रम राबविले जातील असा मानस संघाचा आहे. दिलदार व्यक्तीमत्व असल्याने विलासराव साहित्य संघाला विविध उपक्रमांची झळाळी प्राप्त करून देतील हे नक्कीच .
ज्याप्रमाणे ‘अंबा महोत्सव’ हा संपूर्ण महाराष्ट्रात नांव लौकिकात आहे, तसेच विलासरावांच्या नेतृत्वात संघाच्या व्यासपीठावर साहित्याला विदर्भ साहित्य संमेलनाचे रुप आल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र नक्कीच आहे.
प्रामुख्याने जर विचार केला तर विलासरावांच्या दैनिक हिंदुस्थानमधुन पूर्वीपासूनच साहित्यिक, लेखक, ज्येष्ठ पत्रकार यांच्या साहित्याला व लेखणीला विशेष प्राधान्य दिले जाते हे निर्विवाद सत्य आहे.
प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घ्यायचा याचे उत्तर म्हणजे विलासराव मराठे. हातावरील रेषेत आपले भविष्य बघणारे राजहंस, विलास अरुण मराठे नाहीत तर आपल्या हाताने कष्ट करा आणि भविष्य बनवा या विचाराचा वारसा त्यांनी आजोबा पत्रमहर्षी बाळासाहेब मराठे व वडील पत्रश्री डॉ.अरुण मराठे यांच्याकडून घेतलेला आहे.
हसा कारण हसायला पैसे लागत नाहीत याची सुरुवात त्यांनी स्वतः पासूनच केली असून कुटुंब व मित्रमंडळींना सूद्धा त्यांचे वैचारिक महत्त्व आता कळले आहे. ज्याला वेळेची किंमत नसते त्याची वेळही किंमत करीत नाही हे विलासरावांना चांगले ठाउक आहे. खरे म्हणजे वेळ विकत मिळत नाही म्हणून वेळेचा सदुपयोग करा हे कर्तुत्व त्यांच्या लोकप्रिय दैनिक हिंदुस्थानच्या आकर्षक प्रकाशनाने सहज लक्षात येते.
वेळ असुनही वेळेची वाट पाहतो, तो वेळ गमावतो हे जाणून विलासराव दैनंदिन जीवनात यशस्वी होत आहेत. कारण दैनिक हिंदुस्थानच्या जडणघडणीत आपले चांगले दिवस जगाला सांगतात की आपण कोण आहोत आणि वाईट दिवस सांगतात की जग काय आहे याचा प्रदिर्घ अनुभव मराठे कूटूंबाने, जेव्हा दैनिक हिंदुस्थान जळुन खाक झाला होता तेव्हा घेतला आहे. त्या अविस्मरणीय प्रसंगाचा मी सुद्धा एक कौटुंबिक साक्षीदार आहे.
विलासरावांच्या यशाचे रहस्यं म्हणजे डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. शरीराच्या जखमा बऱ्या होतात पण शब्दांनी मनाला केलेल्या जखमा कधीच बऱ्या होत नाहीत. बोलणं शिकायला मुलाला दोन वर्ष लागतात. पण काय बोलू नये हे शिकण्यासाठी माणसाचे आयुष्य जाते याची जाणीवपुर्वक कल्पना विलासरावांना आहे असे त्यांच्या बोलण्यातून सतत दिसून येते.
विलासराव मी, माझे घर, माझे वृत्तपत्र एव्हढ्याच संकुचित वृत्तीचे नाही. या सर्व जबाबदाऱ्या तर ते लिलया पार पाडतच आहे याशिवाय विकास कार्ये, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, शासकीय कामकाजात त्यांचा सतत सक्रिय सहभाग राहिला आहे.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक विकासासाठी ‘अंबा महोत्सव’ सुरू केला आहे. निसर्ग आणि प्राणी संवर्धन समितीचे ते सक्रिय सदस्य आहेत. भारतीय ज्ञान मंडळाच्या अभ्यासक्रम समितीचे सदस्य, नवी दिल्ली येथील भारतीय लघु व मध्यम वृत्तपत्र संघटनेचे अनेक वर्षे कार्यकारिणी सदस्य, हॉटेल मॅनेजमेंट संस्थेचे सल्लागार सदस्य, महाराष्ट्र शासनाच्या विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष अशा विविध भूमिका त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. पदभ्रमणाची त्यांना विशेष आवड आहे. अनेक मोहिमांमध्ये त्यांनी यशस्वी सहभाग घेतला आहे.
अशा या संपूर्ण दिलदार मनाचे अमरावती शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष विलास अरुण मराठे व सर्व सन्माननीय पदाधिका-यांचे व सर्व सन्माननीय सदस्यांचे “गोफण गोटखडे” कडून सहर्ष स्वागत असून साहित्याची धूरा सांभाळण्याचे भाग्य लाभल्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन व सर्वांना भरभरून खूप खूप मनापासून शुभेच्छा.
– लेखन : डॉ रमेश गोटखडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.