सोशल मीडिया चे जसे काही फायदे तसे तोटेही आहेत. घ्यायचे ते घ्या नको ते सोडून द्या असा युक्तिवादही केला जातो. पण नको असलेल्या मेसेजेस मुळे आपली मेमरी वाया जाते त्याचे काय ? शिवाय हे फालतू मेसेजेस डिलिट करीत बसणे हा आणखीन एक मोठा उद्योग! त्याने तर बोटे दुखतात. बहुतेक लोक गुड मॉर्निंग, शुभ प्रभात ने सुरुवात करून गुडनाईट पर्यंत वैताग आणतात. शिवाय आजकाल धार्मिक व्हिडिओ, एकदम उफाळून आलेले धर्माविषयीचे प्रेम, राष्ट्रभक्ती हे ओघाने आलेच. जणू इथे व्यक्त केल्याशिवाय ते देशभक्त, धर्म निष्ठ ठरणार नाहीत !
आपल्याला आलेली मेसेज दुसऱ्याच्या उपयोगाची असो, नसो ती फॉरवर्ड केलीच पाहिजे असे बहुतेकांना वाटते. त्याशिवाय यांना चैन पडत नाही. मोबाईल पचत नाही ! मग काही आंबटशौकीन लोक पी जे पाठवतात. नॉनव्हेज जोक्स, व्हिडिओ देखील पाठवतात. या देवघेवीमुळे म्हातारचळ लागलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढली आहे असे दिसते !
आता व्हॉट्स ऍप ग्रुप तयार करणे हा देखील एक रिकामपणाचा उद्योग झाला आहे. त्यात कुटुंबाचा वेगळा ग्रुप. कुटुंबातील विशिष्ट भावाबहिणीचा वेगळा ग्रुप, ऑफिसचा, मित्रांचा, मैत्रिणीचा, असे वेगवेगळे प्रकार. भाज्यांचे, चटण्या कोशिंबिरीचे नसतील एव्हढे या ग्रुप चे सबगृप असतात. काही माहितीच्या देवाणघेवाणीसाठी, तातडीची सूचना पाठविण्यासाठी याचा निश्चितच चांगला फायदा होतो. पण इथेही रिकामटेकडी माणसे gm, gn पासून तर फालतू मेसेजेस फॉरवर्ड करीत असतात. शिवाय गणपती, देवी, हनुमान या देवावरील श्रद्धा भक्ती ही व्हॉट्सॲप फॉरवर्ड शिवाय सिद्ध होत नाही अशीही त्यांची गोड समजूत असते. त्यातच हा मेसेज एकवीस जणांना फॉरवर्ड करा, पुण्य मिळेल अशी अंधश्रद्धा देखील इथे फोफावलेली दिसते.
सगळ्यात जास्त वैताग असतो तो विशिष्ट छंद जोपासणाऱ्या मंडळीचा. इथे सिने संगीत, शास्त्रीय संगीत, नाट्यप्रेमी, साहित्यिक, कवी, शिक्षण प्रेमी, कलावंत, चित्रकार अशा छंदिष्ट लोकांचे ग्रुप असतात. इथे कुणी एक जण म्होरक्या असतो. त्याला ॲडमिन म्हणतात. हे महाशय आपण एखाद्या मोठ्या आय टी कंपनीचे सीइओ किंवा प्रेसिडेंट वगैरे असल्यासारखे वेगळ्याच तोऱ्यात वागतात. कुणाला घ्यायचे, कुणाला वगळायचे असे एच आर हेडचे अधिकार यांच्या हातात (बोटात) असतात. इथे एकमेकांची स्तुती करणे, तू मला खाजव मी तुला खाजवतो असे परस्पर कौतुक सोहळे चालतात. काही ग्रुपवर तर नळावर बायकाची जशी भांडणे होतात, तसे वाक्युद्ध चालते. यात पक्षीय, जातीय राजकारण आले तर मग विचारायलाच नको. कधीकधी ही वादावादी इतकी टोकाला जाते की ॲडमिन महाशयांना मध्यस्थी करून कुणाला तरी ग्रुप मधून काढावे लागते. कारण इथे मेरे मुर्गीकी एकही टांग असा अट्टाहास धरणारी हटवादी, आग्रही मंडळीच जास्त असतात. प्रत्येकाचा इगो सांभाळणे ही ऍडमिनसाठी चक्क तारेवरची कसरत असते. या ग्रूपवर एकाने वाढदिवसाच्या कुणाला शुभेच्छा दिल्या की मग इतराना तो उपचार पाळणे भाग पडते. तीच कथा कुणी दगावल्याची. मग तुम्ही त्या व्यक्तीला ओळखत नसला, तुम्ही ती व्यक्ती कधी पाहिली नसली तरी ओम शांती, भावपूर्ण श्रद्धांजली असे सांत्वना संदेश हे उपचार पाळावेच लागता. नाही तर तुम्ही शिष्ट, अहंकारी ठरता.
कुणाला कुठले अवॉर्ड मिळते, कुणाचा कुठे सत्कार होतो तेव्हा ग्रूपवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू होतो. तेव्हा ग्रुपला ट्रॅक्टर वरून झेंडूच्या पाकळ्या चा वर्षाव होणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांच्या मिरवणुकीचे स्वरूप येते ! इथे अनेक जण आपोआप सुप्रसिद्ध लेखक, वक्ते होतात. कवी मंडळीचे तर विचारूच नका. व्हॉट्स ऍप ग्रुप वर अनेकाना प्रतिभेचे गरुड पंख फुटतात. मग कौतुकाची थाप देण्याचे उपचार प्रत्येकाला पाळावे लागतात. स्तुतीपाठक एकमेकांना आवडतात. बाकीचे शिष्ट, मग्रूर म्हणून तांदळातल्या खड्यासारखे बाहेर पडतात, फेकले जातात.
काही जणांना मोठमोठ्या पोस्ट पाठवून व्यक्त व्हायचा उमाळा येतो या ग्रूपवर. घरी एकमेकांशी न बोलणारी मंडळी इथे मात्र नको तितकी ऍक्टिव्ह असतात. घरातील समस्या त्यांच्या कानीदेखील नसतात. पण इथे मत द्यायला, उपदेश करायला ते एकदम विचारवंत होतात.
आपल्या लेखनाचे, छंदाचे, कौतुक करवून घ्यायला लोकांना व्हॉट्स ॲप ग्रुप हे फुकटचे व्यासपीठ मिळाले असते. त्यामुळे इथे प्रत्येकाला स्वतःची जाहिरातबाजी करण्याची हौस भागवता येते. कधी कधी याचा इतका अतिरेक होतो की काही मंडळी स्वतःचे हसे करून घेतात. पण त्याची त्यांना खबरबात देखील नसते.
या मेसेजेस बघण्यात, डिलिट करण्यात, त्यावर व्यक्त होण्यात आपला किती अमूल्य वेळ खर्च होतो याचे आपल्याला कुणालाच भान नसते. यातून काहीच साध्य होत नाही. थोडेफार मनोरंजन होत असेल कुणाचे. ज्याला टाइमपास म्हणतात ते साधत असेल कुणासाठी. पण काही थोडे चांगल्या माहितीच्या देवाणघेवाणीतून होणारे अपवाद सोडले तर कुणाच्याच पदरी काही पडत नाही. हा वेळ आपण चांगले पुस्तक वाचण्यासाठी, चांगले गाणे ऐकण्यासाठी, चांगला सिनेमा, एखादे नाटक बघण्यासाठी, आपल्या घरच्या मुलांशी गप्पा मारण्यासाठी, कौटुंबिक समस्या सोडविण्यासाठी, काही नवे शिकण्यासाठी, आपला राहून गेलेला छंद जोपासण्यासाठी सहज घालवू शकतो. खरे तर ते जास्त गरजेचे असते आपल्यासाठी. पण आपल्यालाच काय हवे, काय गरजेचे आहे हे आपल्याला कळेनासे झाले आहे. आपली स्थिती भरकटलेल्या वाटसरू सारखी झाली आहे. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणाऱ्या वेड्यासारखी आपली केविलवाणी स्थिती झाली आहे.
या नव्या तंत्रज्ञानात सगळेच काही वाईट नाही. महत्वाच्या बातम्यांची देवाणघेवाण, प्रत्यक्ष जाऊन आमंत्रण देण्यापेक्षा इथे टाकून वेळेची बचत, काही चांगल्या माहितीत भर, असे मोजके फायदे देखील आहेत. पण या आदान प्रदान होणाऱ्या माहिती जंजाळात खरे काय, खोटे काय, कामाचे उपयोगाचे काय, फेक काय हे समजणे फार कठीण झाले आहे. यात टाइमपास पेक्षा (टाइम वेस्ट), वेळेचा दुरुपयोग जास्त आहे हे मात्र निश्चित. हे त्या महाभारतातील चक्रव्युहासारखे आहे. आत जाऊ शकणे तसे सोपे, पण त्यातून बाहेर येणे तितकेच कठीण !

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे, माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
