पुणे येथील, शाहीर हेमंतराजे पुरूषोत्तम मावळे हे एक उच्चशिक्षित शाहीर आहेत. एम. ए., पत्रकारिता पदविका, वाणिज्य पदविका असे त्यांचे शिक्षण झाले आहे. ३ डिसेंबर १९६६ रोजी जन्मलेल्या शाहीर मावळे यांनी, कै. गुरुवर्य शाहीररत्न किसनराव हिंगे यांच्याकडून शाहिरीचे शिक्षण घेतले. शाहीर हिंगे यांचे पट्टशिष्य म्हणून ते ओळखले जातात. १९८२ पासून ते शाहिरी क्षेत्रात कार्यरत आहेत. गुरुवर्य कै. शाहीररत्न किसनराव हिंगे स्थापित लोकप्रबोधनपीठाचे ते उत्तराधिकारी आहेत.
शाहीर मावळे यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तसेच बेंगलोर, हैद्राबाद, भोपाळ, कनार्टक प्रांत अशा विविध राज्यात, तसेच दिल्लीत, संगीत नाटक अकादमी मध्ये पोवाड्यांचे सादरीकरण केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, स्वदेशी, कारगील रणसंग्रामाचा पोवाडा, १८५७ चे स्वातंत्र्यसमर सावित्रीमाई फुले, सरसेनापती संताजी घोरपडे , पानिपतचे रणतांडव, वीर जीवा महाला अशा विविध विषयांवरचे त्यांचे पोवाडे व पद्य रचना लोकप्रिय आहेत.
शाहिरीबरोबरच त्यांनी अनेक माहितीपटांसाठी पार्श्वगायन, राजा शिवछत्रपती या स्टार प्रवाहवरील मालिकेसाठी पोवाडा गायन, द डेक्कन ट्रॅप
हिंदी थ्रिलर शॉर्ट फिल्म साठी हिंदीतून पोवाडा गायन केले आहे.
होनराजराजे प्रस्तुत, ‘शाहिरी चौरंग‘ या नावाने ते शाहिरी कार्यक्रम करीत असतात. मनोरंजनातून प्रबोधन करणारे, ‘कुटुंब रंगलय शाहिरीत‘ या कार्यक्रमात पत्नी प्रा सौ. संगीता मावळे (एम कॉम एम पी एम) आणि मुलगा पार्श्वगायक होनराज मावळे, देशभर शाहिरी सादर करीत ते फिरत असतात.
आकाशवाणीचे ते मान्यता प्राप्त कलाकार आहेत. त्यांची, हरहर महादेव छत्रपतींची शौर्यगाथा ही सीडी बाजारात उपलब्ध आहे.
लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी वर्ष व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘लोकमान्य-लोकशाहीरा घ्या मानाचा मुजरा…!‘ या नावाने शाहिरीचे १०० कार्यक्रमाचा संकल्प त्यांनी केला आहे.
शाहिरांनी, महाराष्ट्रातील शाहीरांचा अल्प परिचय दै. प्रभात मधून मांडला आहे. या लेखांचा संग्रह ‘वंदितो तुज शाहिरा‘ पुस्तक रूपाने प्रकाशित झाला आहे. करवीर पीठाधीश शंकराचार्य श्री विद्या शंकर भारती यांच्या हस्ते कारगील रणसंग्रामाचा पोवाडा या पुस्तिकेचे प्रकाशन झाले आहे.
महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय, राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०१७,
लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार, पुणे महानगरपालिका, पुणे (१ लाख रुपये व स्मृती चिन्ह), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पहिला लोकशाहीर पुरस्कार (१ ऑगस्ट २०१९), प्रबोधन यात्री पुरस्कार, स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार, युवा शाहीर पुरस्कार, रोटरी गुणवत्ता पुरस्कार, रमाश्रीधर पुरस्कार, कसबा भूषण पुरस्कार, लोकशाहीर सगनभाऊ पुरस्कार (जेजुरी), शाहीर बापूराव विभूते स्मृती पुरस्कार (सांगली), गुरूवर्य कला पुरस्कार, गुरू महात्म्य पुरस्कार, बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी ते सन्मानीत आहेत. याशिवाय विविध शासकीय समित्यांवर ते कार्यरत आहेत.
शाहिरांच्या आईवडिलांनी मरणोत्तर नेत्रदान केले असल्याने श्री व सौ मावळे यांनी नेत्रदान व मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे.
आपल्या शाहिरीने समाजात वीररस चेतवणाऱ्या शाहीर मावळे यांना मानाचा मुजरा.
– लेखन : देवेंद्र भुजबळ, 9869484800.
राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेम जागविणारी, वीररसाने प्रेरीत करणारी प्राचीन कला, शाहीरी परंपरा भक्तीभावाने, समर्पण भावनेने व समर्थपणे जपणाऱ्या शाहीर मावळे यांना मानाचा मुजरा व लक्ष लक्ष शुभेच्छा
खुपच छान! शाहीर शिवनेरी स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत व गेली अडतीस वर्ष फाल्गुन वद्य तृतीयेस अव्याहतपणे शिवजयंती साजरी करत आहेत. एखादी गोष्ट ठरविली की ती यशस्वीपणे पार पाडण्यास ते सतत प्रयत्नशील असतात.
खूप छान
उत्कृष्ट लेखन माहिती पदरी पडली. शाहीर मावळे उभयतांची मरणोत्तर संकल्पना प्रेरणादायी आहे.आपल्या जन्मभूमीला,शाहीर मावळे यांच्या रूपाने लाभलेले वरदान आहे. धन्यवाद! देवेंद्र सर.