महाराष्ट्र मंडळ, शिकागो कार्यकारिणीने ह्या वर्षी ‘जागतिक मैत्री दिना’च्या दिवशी तिसरी पाच किलोमीटर धावण्याची/चालण्याची स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित केली.
महाराष्ट्र मंडळ शिकागो कार्यकारिणीने ठरावीक साच्यातून बाहेर पडून ह्या वर्षाची पाच किलोमीटर धावण्याची स्पर्धा एका विशेष उपक्रमाला देणगी देण्यासाठी आयोजित केली. श्री. यजुवेंद्र महाजन यांनी चालविलेल्या ‘दीपस्तंभ मनोबल’ या उपक्रमाला या स्पर्धेतून मिळालेली रक्कम पाठवली जाणार आहे. ही स्पर्धा गेली तीन वर्षे आयोजित केली जात आहे. यावर्षी स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांचा उच्चांक होता. स्पर्धकांनी आणि पुरस्कर्त्यांनी स्पर्धेला भरपूर प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे यात इतर अमराठी मंडळे व स्थानिक अमेरिकन लोकसुद्धा सहभागी झाले होते, हे अभिमानाने नमूद करावेसे वाटते आणि हीच महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या उपक्रमांच्या यशस्वीतेची खरी पोचपावती होती.
महाराष्ट्र मंडळ, शिकागो केवळ मराठी लोकांसाठीच आहे असे नाही, तर सर्वांनाच आपल्या मराठी संस्कृतीची ओळख करून देत असून अमेरिकन समाजात आपला ठसा उमटवत आहे.
रविवारी, सकाळी उत्साहवर्धक हवामानात बसे वुडज् पार्क – रोलिंग मेडोज्च्या (Busse Woods Park – Rolling Meadows) लांबच लांब पसरलेल्या निसर्गरम्य झाडीतून व सरोवरावरील छोट्याशा पुलावरून भव्य धावपट्टीवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शिकागो परिसरातील सर्व लोकांसाठी ही स्पर्धा खुली होती. मंडळाच्या या स्पर्धेत दीडशेहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला.
स्पर्धेच्या आयोजनासाठी विशाल नवलकर व मंडळाच्या फिटनेस क्लब चमूने कित्येक आठवडे आधीपासून खूप मेहनत घेतली होती. स्पर्धेसाठी मोठी जागा निवडणे, शहर व सार्वजनिक उद्यान विभागाची परवानगी घेणे, परिपत्रक तयार करणे, निमंत्रणे पाठविणे, स्पर्धेसाठी प्रायोजक मिळविणे, नोंदणी टेन्ट उभारणे, स्पर्धकांची नोंदणी करणे, जलपान, नाश्ता व खाण्याची व्यवस्था करणे, स्पर्धेच्या कार्यक्रमाचे व स्पर्धा पूर्ण करताना स्पर्धकांचे फोटो व वेळ नोंदणी करणे, स्पर्धकांसाठी पदके प्रत्येक गटातील विजेत्यांसाठी करंडक व पारितोषक चषक आणणे, या कार्यक्रमानिमित्त वाटल्या जाणाऱ्या खास टी-शर्ट्सचे आकर्षक डिझाइन करणे, स्पर्धेदरम्यान सर्वांची देखभाल करणे अशा अनेक बारीक-सारीक गोष्टींची त्यांनी सुंदर व्यवस्था केली होती.
स्पर्धेच्या दिवशी स्पर्धकांना खास भारतातून मागविलेले टी-शर्ट व त्यावर लावण्यासाठी मोठे ठळक अक्षरातले स्पर्धक क्रमांक दिले गेले. ज्या ठिकाणी स्पर्धा सुरू होणार होती तेथे प्रायोजक, स्वयंसेवक आणि आयोजक जमले होते. जर स्पर्धेदरम्यान कोणाला शारीरिक इजा झाली, तर प्रथमोपचारासाठी फिजिओथेरपिस्ट देखील तेथे उपस्थित होते
नोंदणी टेन्ट व टेबल मांडणीसाठी भास्कर शेडगे, प्रियेश देशपांडे, माधव गोगावले, अमोल श्रीपाल, चेतन रेगे, सोहम जोशी, अनिरुद्ध दामले, मनोज भट, विशाल नवलकर इत्यादींनी नोंदणी भागाची पूर्वतयारी केली होती. स्पर्धकांची नोंदणी झाल्यानंतर ह्या वर्षी प्रथमच फिटनेस क्लबचे सहआयोजक आनंद देशपांडे यांनी स्पर्धेआधी स्पर्धकांचे वार्मअप व्यायाम आणि स्पर्धा संपल्यानंतर कूल डाऊन व्यायाम करवून घेतले. याला सर्व स्पर्धकांनी व जमलेल्या प्रेक्षकांनी विशेष दाद दिली आणि सर्वांनी यात भाग घेऊन अनेक नवीन व्यायामप्रकार आत्मसात केले. त्यानंतर आयोजकांनी स्पर्धेचे नियम व इतर सूचना दिल्यावर कधी एकदा स्पर्धा सुरू होते याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते.
मंडळाच्या सजावट चमूतील पल्लवी बेटसूर यांनी सुंदर व आकर्षक असा फलक तयार केला होता. बहुतेक सर्व स्पर्धक आपले फोटो त्या फलकासमोर काढत होते.
या प्रसंगी बालमित्रांनी अमेरिकेचे राष्ट्रगीत छान म्हटले. तर जमलेल्या सर्व भारतीय प्रौढ व्यक्तींनी भारताचे राष्ट्रगीत जबरदस्त आवाजात म्हटले.
अमेरिका व भारताचे राष्ट्रगीत झाल्यावर स्पर्धा सुरू झाली. “गेट… सेट… रेडी” असा स्पर्धा सुरू होण्याचा हुकूम आयोजकांकडून मिळताच दहा वर्षांच्या बालकांपासून ते सत्तरी ओलांडलेल्या स्पर्धकांपर्यंत सर्वांनी धावण्यास अगर चालण्यास सुरुवात केली. त्यात काही मुरलेले, मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणारे अनुभवी स्पर्धकही होते. धावपट्टीवर काही ठिकाणी जलपान व शीतपेयांची सोय केली होती. प्रेक्षक टाळ्या वाजवून स्पर्धकांना प्रोत्साहन देत होते.
आपापल्या शारीरिक क्षमतेप्रमाणे सर्व स्पर्धक धावत किंवा चालत होते. ज्या ठिकाणी स्पर्धा संपते त्या ठिकाणी अनेक प्रेक्षक व आयोजक आनंदाने जल्लोष करत त्या सर्व स्पर्धकांचे कौतुक करत होते. प्रत्येकाला अखेरची रेषा ओलांडण्यासाठी खास दोरी लावली गेली होती. प्रत्येक स्पर्धक ती रेषा ओलांडण्याचा आनंद घेत होते. ह्यावर्षी मंडळाच्या ढोल ताशा पथकाचे आयोजक अनिरुद्ध दामले आणि त्यांचे सहकारी ढोल ताशाच्या गजरात स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांचे अभिनंदन करत होते. या स्पर्धेचे फोटो शलाका ब्रिजेन सावंत यांनी काढले आणि स्पर्धकांच्या वेळेची नोंदणी चेतन रेगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. पाच किलोमीटर स्पर्धा पूर्ण केल्यानंतर प्रत्येकाला खास बनविलेले पदक देण्यात येत होते. दमलेल्या स्पर्धकांसाठी शीतपेये, फळे व इतर पदार्थ अल्पोपहार म्हणून देत होते.

ह्यावर्षीच्या मंडळाच्या अध्यक्षा नमीताताई वेदक यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचा कुठलाही कार्यक्रम असला तरी त्यात सगळे आयोजक खेळीमेळीने, एकजुटीने आनंदी वातावरणात कार्यक्रम साजरे करतात. हा कार्यक्रम पण त्याला अपवाद नव्हता. सजावट चमू आणि खाद्यपदार्थांचे प्रायोजक देखील स्पर्धेच्या आनंदी वातावरणात सहभागी झाले होते. शेवटच्या स्पर्धकाने स्पर्धा पूर्ण केल्यानंतर ज्याची सर्वजण वाट पाहत होते तो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू झाला. मंडळाच्या अध्यक्षा नमीताताई वेदक व मुख्य आयोजक विशाल नवलकर आणि चमू यांनी प्रायोजकांचे आणि स्पर्धकांचे आभार मानले. प्रायोजकांना आपल्या उपक्रमाबद्दल माहिती देण्यास सांगितले. एकल विद्यालयाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व विभागीय अध्यक्ष ऋत्विज भट, डॉक्टर चंद्रा वेदक (Horizon Behavioral Health), मंडळाचे विश्वस्त माधव गोगावले, अध्यक्षा नमीताताई वेदक, नरेंद्र आणि नंदा काळे यांच्या हस्ते स्पर्धेच्या वेगवेगळ्या गटातील विजेत्यांना पारितोषके व चषक देण्यात आले. या प्रसंगाला उत्साहवर्धक ढोल ताशा गजराची साथ होती. एकंदरीत वातावरण अगदी जल्लोषमय झाले होते. शेवटच्या, साठ वर्षावरील पुरुष गटातील विजेते यांचे नाव जाहीर करण्यापूर्वी विशाल नवलकर यांनी प्रेक्षकांना विचारले, “या गटातील विजेते कोण असतील ?” अनेक स्वयंसेवक, स्पर्धक आणि प्रेक्षक जल्लोषात म्हणाले, “एकच वादा माधव दादा”. विशाल नवलकर यांनी परत म्हटले, “इज देअर सरप्राईज विनर ?”
परत प्रेक्षकांनी आणखी मोठ्या आवाजात “एकच वादा माधव दादा” अशा टाळ्यांच्या कडकडाटात आरोळ्या ठोकल्या. मुख्य आयोजक नलवकर म्हणाले, “मंडळाचे अनेक क्षेत्रात प्रेरणास्थान असलेले माधव दादा गोगावले यांनी सतत तीन वर्षे (Three-peat) ह्या गटात विजय मिळवला आहे.”

पुरुष गटातील यशस्वी विजेत्या स्पर्धकांची नावे :
अठरा वर्षाखालील युवा गट – अजय विरामिथु
एकोणीस ते साठ वर्षे पुरुष गट – विरामिथु करूप्पूसामी
साठ वर्षांवरील पुरुष गट – माधव ना. गोगावले

महिला गटातील यशस्वी विजेत्या स्पर्धकांची नावे :
अठरा वर्षाखालील युवती गट – हर्षिणी राजेश
एकोणीस ते साठ वर्षे महिला गट – अश्विनी पिंगळे
साठ वर्षा वरील महिला गट – रश्मी चाफेकर
बक्षीस वितरण समारंभानंतर सर्व स्पर्धक व स्वयंसेवकांनी पिझ्झा, शीतपेये आणि बहुतेकांचा आवडता चविष्ट बटाटेवडा, पन्हं आणि शिरा इत्यादी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत परस्परांशी संवाद साधला. मंडळाच्या अन्नपूर्णा गटातील अपर्णा खळदकर, उर्मिला दामले, अश्विनी कुंटे, अर्चना श्रीपाल, अनुप देशमुख, चेतन रेगे, नमीताताई वेदक आणि त्यांचे सहकारी हे सर्व खाद्यपदार्थाची तयारी करून अगदी आग्रहाने स्पर्धकांना व स्वयंसेवकांना रुचकर पदार्थ वाढत होते.
या स्पर्धेसाठी एकल विद्यालयाचे अधिकारी – ऋत्विज भट्ट, निशंदू बक्षी, निरमेश पटेल व स्वयंसेवक, अन्य संस्थांचे प्रायोजक – डॉक्टर चंद्रा वेदक, श्री. नरेंद्र आणि नंदा काळे, महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणीचे सदस्य, मंडळाचे विश्वस्त आणि स्वयंसेवक सभासदांनी वेगवेगळ्या आघाड्यांवर केलेल्या मदतीमुळे, महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या इतिहासातील हा स्पर्धकांचा उच्चांक असलेला आणि ‘दीपस्तंभ मनोबल’ या उदात्त उपक्रमाला मदत करणारा कार्यक्रम यशस्वी झाला.
धडाडीच्या कार्यकर्त्या आणि मंडळाच्या ज्येष्ठ विश्वस्त उल्का नगरकर यांनी वेगवेगळ्या समूहांवर आवाहन करून जास्तीत जास्त स्पर्धकांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यासाठी मोलाची मदत केली.
जून- जुलै या काळात अमेरिकेत आलेली उष्णतेची लाट, कॅनडातील अनेक जंगलांना लागलेले वणवे आणि त्यामुळे झालेले प्रदूषण या पार्श्वभूमीवर गेले दोन-तीन दिवस मस्त आल्हाददायक हवामानाचा आनंद घेण्यात मग्न झालेले शिकागोनिवासी, उन्हाळ्याची सुट्टी अशा अनेक गोष्टींमुळे कार्यक्रमास कितपत प्रतिसाद मिळेल, याची आयोजकांना चिंता होती, परंतु शुभ संकल्प, सर्व कार्यकर्त्यांची सकारात्मक वागणूक, लागेल तेथे झटून कामे करत मनापासून एकमेकांना मदत करण्याची प्रवृत्ती या सगळ्या सकारात्मक गोष्टींमुळे दीडशेहून अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले. ‘दीपस्तंभ मनोबल’ संस्थेला मदत, स्पर्धकसंख्येचा उच्चांक, स्पर्धेआधी वार्मअप आणि स्पर्धा संपल्यानंतर कूल डाऊन व्यायामाचा नवीन उपक्रम, ढोलताशाचा गजर, सतत तीन वर्षे (Three -peat) स्पर्धा जिंकणारे स्पर्धक अशी अनेक आगळीवेगळी वैशिष्ट्ये असलेली ह्या वर्षीची स्पर्धा धूमधडाक्यात पार पडली.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800