शिवाजी विद्यापीठ आज, १८ नोव्हेंबर रोजी आपला ६२ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख. शिवाजी विद्यापीठाचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा …
— संपादक
माझ्या आगामी पुस्तकात ज्यांच्या जीवन कथा आहेत, त्यातील एक कथा नायक, लेखक तथा शिवाजी विद्यापिठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ आलोक जत्राटकर हे आहेत. आज सकाळी त्यांची कथा तपासण्यासाठी त्यांच्याकडे पाठवली असता, त्यांनी तत्परतेने कळविले, “सर आज विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने रात्री कथा वाचून काय ते कळवतो”. मी ही बरे म्हणालो.
निरोपाची ही देवाणघेवाण संपता संपता मला आठवले ते 1989 साल. कारण त्याच साली माझी शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विभागात अधिव्याख्याता म्हणुन निवड झाली होती. रीतसर निवड पत्र प्राप्त होऊन रुजू होण्याबाबतही कळविण्यात आले होते. त्या दरम्यान मी मुंबई दूरदर्शन केंद्रात कायमस्वरूपी सेवेत होतो. तर वृत्तपत्र अधिव्याख्याता हे पद अनुसूचित जाती साठी राखीव असल्याने, ही नेमणूक एका वर्षासाठी होती. दूरदर्शन मधील बहुतेक सहकार्यांचे मत पडले की, भारत सरकारची कायमस्वरूपी नोकरी सोडून शिवाजी विद्यापीठाच्या एका वर्षाच्या नोकरीत जाण्यात काही अर्थ नाही. त्यात परत माझ्या डोळ्यासमोर पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिटय़ुट मधील सहपाठी संजय संगवई याचे उदाहरण होते. ते म्हणजे, रानडे इन्स्टिटय़ुट मध्ये राखीव असलेल्या अधिव्याख्याता पदावर दोन वर्षे काम केल्यावर, तिसर्या वर्षी, त्या संवर्गातील उमेदवार मिळाल्याने, त्याची ती नोकरी गेली आणि त्याला परत सकाळ पेपरमध्ये नोकरी पकडावी लागली.
अशा या कात्रीत मी सापडलो असताना, मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाच्या मास्टर्स अभ्यासक्रमातील वर्ग मित्र शेषराव वानखडे, ज्यांनी अधिव्याख्याता पदासाठी मुलाखत दिली होती, त्यांनी मला पत्र पाठवून कळविले की, मी जर त्या पदावर रुजू झालो नाही, तर ते प्रतीक्षा यादीत असल्याने, त्यांना संधी मिळू शकते. शेषराव यांचे हे पत्र आल्यावर मग मी शिवाजी विद्यापीठात रुजू न होण्याचा निर्णय घेतला आणि तसे विद्यापीठाला कळविले. पण काय झाले, कोणास ठाऊक, शेषराव म्हणाले होते, तशी त्यांची निवड न होता, त्या पदासाठी पुन्हा जाहिरात देऊन, निवड प्रक्रिया राबवून, निशा मुडे (तेव्हा त्या डॉक्टर झालेल्या नव्हत्या) यांची निवड झाली. त्या तिथे रुजू ही झाल्या. पुढे त्यांनी डॉक्टरेट मिळवली. आता त्या
वृत्तपत्र विद्या विभागाच्या प्रमुख असून वृत्तपत्र विद्येच्या अध्यापनात त्यांनी छान नाव लौकिक मिळविला आहे.
दरम्यान मी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मार्फत स्पर्धा परीक्षेद्वारे निवड करण्यात येणार्या आकाशवाणी आणि दूरदर्शन मधील प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह आणि इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस मधील सिनियर ग्रेड पदासाठी 1990 साली मुलाखती देऊन निवड पत्र येईल, या आशेवर वाट पहात बसलो होतो. पुढे प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह च्या तीन पदांसाठी दिलेल्या मुलाखती चांगल्या झालेल्या असल्याने, त्या तीनही पदांसाठी मला निवड पत्र प्राप्त झाले. मी मुंबई दूरदर्शन केंद्रातच सहायक निर्माता म्हणून कार्यरत होतो, म्हणुन मुंबई दूरदर्शन केंद्रात झालेली नेमणूक स्विकारली. पुढे चार महिन्यांनी इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस साठीही निवड झाल्याचे पत्र येऊन विनंती प्रमाणे क्षेत्रीय प्रचार अधिकारी, नगर म्हणुन नेमणूक करण्यात आली असल्याचे आदेश ही प्राप्त झाले. तिकडे रुजू होण्यासाठी दूरदर्शन मधून रीतसर कार्यमुक्त होणे आवश्यक होते. पण आमचे नियंत्रक अधिकारी हे नवी दिल्ली येथील मंडी हाऊस मध्ये असल्याने तिकडून कार्यमुक्त करण्याचे आदेश प्राप्त झाल्याशिवाय कार्यमुक्त होता येत नव्हते. अशा परिस्थितीत माझी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात जिल्हा माहिती अधिकारी, वर्ग 1 म्हणुन निवड झाली असल्याचे पत्र मंत्रालयातून विशेष दूतामार्फत (याचे पदनाम इंग्रजीत रायडर असे तर मराठीत जावकस्वार असे आहे, हे पुढे कळले!) घरपोच मिळाले आणि मग मी जिल्हा माहिती अधिकारी म्हणुन अलिबाग येथे रुजू झालो. पुढे उपसंचालक, संचालक म्हणुन पदोन्नत्या मिळत गेल्या आणि यथावकाश मी सेवा निवृत्त झालो.
पण अजूनही मनात विचार येतो की, जर मी तेव्हा शिवाजी विद्यापीठात रुजू झालो असतो तर मी आज कुठे असतो ? असो.
तर आता वळू या शिवाजी विद्यापीठाकडे. दक्षिण महाराष्ट्राच्या उच्च शिक्षणाची गरज भागविण्यासाठी एका विद्यापीठाची स्थापना करण्याचा प्रस्ताव शासनाकडे आला. या संदर्भात शासनाने प्राचार्य एस. आर. तावडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने विद्यापीठ व्हावे, असा अहवाल दिला. त्यावेळी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रयत्नाने विद्यापीठ कोल्हापूर येथे उभारण्याचे निश्चित झाले. विद्यापीठ तर मंजूर झाले पण विद्यापीठाला जमिनीची आवश्यकता होती.
कोल्हापूर शहराच्या पूर्वेला खाजगी मालकीच्या जमिनी विद्यापीठासाठी योग्य होत्या. पण या जमिनी जगदाळे, सरनाईक, पायमल, साळुंखे, थोरात, मंडलिक, माने आदींच्या मालकीच्या होत्या. या सर्वांनी स्वेच्छेने अवघ्या आठशे, हजार ते पाच हजार रुपयापर्यंत आपल्या जमिनी दिल्या. त्या केवळ दिल्याच नाही तर कोल्हापुरातल्या अनेक तालमीतील पैलवान श्रमदानासाठी या माळावर गेले. त्यांनी बरेच दिवस माळावरचे गवत कापून 853 एकर ओबडधोबड जमीन आधी सपाट केली. विद्यापीठाच्या उभारणीसाठी एक एक रुपयाची कुपणे काढली गेली. केशवराव जगदाळे, रामभाऊ उबाळे, डी.एस. नार्वेकर, हिंदुराव साळुंखे, बाळ साटम, काका राऊत, ए. आर साळोखे आदींनी सायकलवर फिरून ही कुपणे खपवली.

‘ज्ञानमेवामृतम्’ हे ब्रीद असलेल्या या विद्यापीठाचे कार्यालय प्रारंभी महागावकर सदनात (सध्याचे ओपल हॉटेल) सुरू करण्यात आले होते. विद्यापीठाच्या स्थापनेवेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे नाव द्यायचे ठरत होते. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शिवाजी विद्यापीठाच्या सल्लागार समितीच्या सदस्यपदी असलेल्या. डी. पाटील यांच्याशी चर्चा करून शिवाजी या शब्दात असलेली आंतरिक ओढ लक्षात घेऊन शेवटी शिवाजी विद्यापीठ असेच नामकरण करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठाची स्थापना तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते १८ नोव्हेंबर १९६२ रोजी करण्यात आली. प्रारंभी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर असे पाच जिल्हे असावेत अशी योजना होती. पण रत्नागिरी जिल्हा मुंबई विद्यापीठाकडे राहिला. (कालांतराने सोलापूर विद्यापीठ स्थापन करण्यात आले) त्यामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा असे तीनच जिल्हे शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात राहीले.

शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू आप्पासाहेब पवार आणि कुलसचिव श्री वैद्य या दोघांचे या विद्यापीठाच्या जडणघडणीत फार मोठे योगदान आहे. त्यानंतर एकाहून एक चांगल्या कुलगुरू, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला चांगली दिशा देऊन ते जागतिक पातळीवर नावारूपाला आणले. या विद्यापीठाकडे 156 पेटंट आहेत !
जगाची गरज ओळखून पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबरच विद्यापीठात हॉस्पिटल मॅनेजमेंट, रुरल डेव्हलपमेंट, नॅनो- टेक्नॉलॉजी ब्रेल, क्रिमिनॉलॉजी, मल्टीमीडिया, ओशनोग्राफी, मेट्रोलॉजी, मरिन सायन्स, फिशरीज, वॉटर मॅनेजमेंट, ग्लोबल बिझनेस, ग्लोबल फायनान्स, फॉरेक्स मॅनेजमेंट आदी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. ‘नॅशनल नॉलेज नेटवर्क’शीही विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्नित असलेली १७० महाविद्यालये जोडलेली आहेत. तर तीन लाखाहून अधिक विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत. विद्यापीठ व्हीडिओ कॉन्फरन्सिंगमुळे सर्वच संबंधित घटकांचा अमूल्य वेळ, त्रास, पैसा वाचवित आहे. विद्यापीठाच्या १६ अधिविभागात स्मार्ट वर्गाचा उपक्रमही यशस्वी झाला आहे. त्यासाठी विविध वर्गांमध्ये स्मार्ट-बोर्ड बसविले आहेत.
अशा या लाखो विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिवाजी विद्यापीठाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
